‘‘पत्रकारितेची नोकरी नि कॉस्टिंगचा अभ्यास अर्धवट सोडून देऊन, पूर्णवेळ निवेदन आणि मुलाखतींचे ‘टॉक शो’ करायला लागून आता चाळीस वर्षे होतील. मराठीत पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून निवेदन करायला लागून माझी २५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा, २००० मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: पुण्यात येऊन ‘बालगंधर्व’मध्ये माझ्या आगळ्या करिअरच्या रौप्यमहोत्सवात मला ‘दाद’ दिलीय. फक्त गाणं किंवा गझल कार्यक्रमाचं ‘निवेदन’ मर्यादित न ठेवता, गाण्याच्या कार्यक्रमाच्या नवनव्या संकल्पना रंगमंचावर साकारल्या आणि निवेदन- मुलाखतीत फक्त भाषांचं वैविध्य आणण्याचा अट्टहास न करता, विषयांचं, माणसांचे वैविध्य आणून, मुलाखतीचे तीन हजार आणि गाण्यांचे दोन हजार कार्यक्रम केले म्हणून या वेगळ्या प्रयोजनासाठी, शरद पवार, आशा भोसले यांच्या उपस्थितीत, अमिन सयानीच्या ‘आवाजात’ सतीश देसाईंनी मला ‘पुण्यभूषण पुरस्कार’ही दिला हे मी माझं
परमभाग्य समजतो.’’

ज्येष्ठ उद्योगपती शंतनुराव किलरेस्कर ‘मुलाखत’ द्यायला फारसे उत्सुक नसत. त्यामागे त्यांचे लॉजिकल कारण होतं. ते म्हणत, ‘आम्ही बनवतो काय, तर शेतात चालणारी इंजिनं. त्यांच्या आवाजातून ‘किलरेस्कर’च बोलत असतात. वेगळं कशाला बोलायचं?’ पण चरित्रकार सविता भावे यांच्यामुळे माझी थेट शंतनुरावांशी भेट झाली. ‘लकाकी’ या पुण्याच्या मॉडेल कॉलनीतल्या बंगल्यावर हिरवळीवर दोन खुच्र्या समोरासमोर टाकून आम्ही मुलाखतीसाठी बसलो. पण ते त्यांच्या स्वभावानुसार खुलत नव्हते. त्यांचा एक वीकपॉइंट मला माहीत होता. त्यांना जगभरचे ‘ऑपेरे’ खूप आवडत. ‘ऑपेरा शो’ दाखवायला आणि तो कसा पाहावा, हे शिकवायला शंतनुरावांना आवडत असे. ते मुलाखतीत फार मोकळेपणाने बोलत नाहीयत, हे लक्षात आल्यावर मी त्यांना म्हटलं, ‘‘बाबा, मुलाखत राहू दे बाजूला. तुमच्याकडे सिडनीचा ऑपेरा आहे का हो!’’ ते एकदम खुलले. हिरवळीवरून ते मला आत बंगल्यात घेऊन गेले. दृकश्राव्य पडद्याची व्यवस्था केली आणि मला सिडनीचा ऑपेरा दाखवायला खुशीत सुरुवात केली. ते मूडमध्ये आले आहेत, हे ध्यानात घेऊन माझ्यातला मूळ पत्रकार जागा झाला आणि मी मनातले नियोजित प्रश्न, ऑपेरा पाहता पाहता, त्यांना विचारत गेलो. ते उत्तरं देत गेले. मी खूश. मुलाखतीच्या साफ नकाराकडून वीकपॉइंट काढताच, खुलून सगळी उत्तरं त्यांच्याकडून काढून घेतली. या आनंदात मी त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडत असताना, किलरेस्कर साहेबांनी मला पुन्हा बोलावलं आणि म्हणाले, ‘‘माझा वीकपॉइंट काढून, माझ्याकडून साऱ्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतली, हे मला कळलंच नाही. असं समजू नका. तुमचा अ‍ॅप्रोच आवडला म्हणून उत्तर दिलं. पुन्हा असं कुणाला गृहीत मात्र धरू नका.’’ माझ्यासाठी हा धडाच होता.

Nayanthara News
“फक्त तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी…”, धनुषने कायदेशीर नोटीस पाठविल्याने नयनतारा भडकली; म्हणाली, “तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत, “मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, कारण..”
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे

प्रत्यक्ष मुलाखतीपेक्षा अशा पडद्याआडच्या गोष्टीच या विविध क्षेत्रांतल्या अनेक मुलाखतींमधून शिकत गेलो. समोरच्याचा अंदाज, आवाका बांधण्याइतपत ही माणसं हुशार असल्यानेच, आपल्या क्षेत्रात क्रमांक एकच्या पदावर असतात, हे या ‘दृष्टी आडच्या सृष्टी’चा अनुभव घेताना मला कळत गेलं. गायकांच्या मुलाखती, गाण्यांचे कार्यक्रमही मी खूप केले. श्रेष्ठ गायकांच्या गाण्याचा आनंद तर मिळालाच पण दौऱ्यांमध्ये गायक-गायिकांचा सहवास घडला. व्यक्तित्त्वाचे पदर उलगडले. गाण्यापलीकडचे पैलूही उलगडले..

पं. भीमसेन जोशीसाहेबांच्या ‘संतवाणी’ कार्यक्रमाचं ‘निरूपण’ मी काही काळ करत होतो. त्या काळी रात्री दहा वाजता कार्यक्रम थांबवण्याचं बंधन नव्हतं. पंडितजी मंडई मागच्या बांबूआळीत रस्त्यावर एकदा ‘संतवाणी’ सादर करत होते. रात्री दीड वाजता मैफल संपली. रस्ता निर्मनुष्य झाला. वादकांनी वाद्य मिटवली. बुवांनी मांडीवरची शाल काढली. आम्ही उठणार, एवढय़ात त्या उत्तररात्री निर्मनुष्य रस्त्यावरून एक हमाल गुरुजींकडे आला. बुवा त्याला म्हणाले, ‘काय आवडलं का गाणं?’ यावर तो वृद्ध हमाल उत्तरला, ‘‘आवडलं. पण ते ‘जो भजे..’ घ्यायला हवं होते.’’ यावर भीमसेनबुवा म्हणाले, ‘‘अस्सं. बरं..’’ त्यांनी पुन्हा वाद्यं लावायला लावली आणि मध्यरात्री पावणेदोन वाजता, त्या एकटय़ा हमालासाठी ‘जो भजे..’ म्हटलं. मला आजही त्या वृद्ध हमालाचे कृतज्ञतेने पाणावलेले डोळे आठवतात. अशा गोष्टींमुळेच, ‘भीमसेन अण्णा’ हे बंदिस्त मैफलीतल्या जाणकाराइतकेच, रस्त्यावरच्या कष्टकऱ्याच्या मनात रुजले. असे अनेक प्रसंग मनात घट्ट रुतून आहेत.

१९९९ मध्ये सॅनहोजेजवळ (अमेरिकेत) बृहन्महाराष्ट्र अधिवेशनात मी आदल्या रात्री माधुरी दीक्षितची पाच हजार रसिकांसमोर प्रकट मुलाखत घेतली आणि पाठोपाठ दुसऱ्या दिवशी त्याच व्यासपीठावर आशा भोसले यांच्याशी गप्पा आणि त्यांचं गाणं होतं. कार्यक्रम सुरू करत असताना, अचानक आशाताई माझ्या दंडाला धरून स्टेजपुढे नेत, प्रेक्षकांना म्हणाल्या, ‘काल यानं (सुधीरनं) तुमच्या डोळ्यांना आनंद दिला. आज मी तुमच्या ‘कानांना’ आनंद देणार आहे.’ नमनालाच तुफान हशा. आशाताईंची उत्तम गाण्यापलीकडची ही बोलण्यातली उत्स्फूर्तता ‘शो’ रंगणार याची ग्वाहीच देऊन गेली.

ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार मुंबईचा बाडबिस्तारा गुंडाळून, पुण्याच्या बाणेर रस्त्यावर, सर्जा हॉटेलच्या पुढच्या बाजूला एका कॉलनीतल्या फ्लॅटमध्ये राहायला आल्या. एकटय़ाच होत्या. मी गप्पा मारायला गेलो. त्यांचं एकाकीपण पाहून मी त्यांना गप्पांच्या ओघात विचारलं, ‘‘बाई, लोकांच्या वयाची होत नाहीत, एवढी वर्षे, साठ वर्षे, तुमची अभिनय करण्यात गेली. कॅमेरा.. टेक टू.. स्टार्ट.. असं इतकी वर्षे सातत्याने ऐकत आलात, इथे या फ्लॅटमध्ये एकटं मूक बसून राहण्यानं तुम्हाला गुदमरल्यासारखं होत नाही का? त्यावर ललिताबाई हसत म्हणाल्या, ‘‘अरे इथे मी दांडीवर कपडा वाळत घालते, स्वयंपाक करते, तेव्हा या घरात माझ्या पाठी कॅमेराच लागलाय, असं मी समजते. हा स्वयंपाकघराचा सेट लागलाय, असंच गृहीत धरते. मनाच्या या खेळामुळे मी इथेही शूटिंगच्या-कॅमेऱ्याच्या जगापासून दूर गेलेलेच नसते. म्हणून इथंही एकटी रमते.’’ दुर्दैवानं त्याच फ्लॅटमध्ये त्या गेल्या पण तीन दिवस कुणालाही त्याचा पत्ता लागला नव्हता.

एका चित्रकला प्रदर्शनाचं उद्घाटन होतं. पु. ल. देशपांडे आणि बासुदा प्रमुख पाहुणे होते. उद्घाटन सोहळ्याच्या नमनाला आयोजक आगाऊपणे म्हणाले की, प्रदर्शन चित्रकलेचं आहे. पण यातला एक पाहुणा सिनेमातला, एक नाटकातला. दोघांनी कधी हाती ब्रश धरलेला नसेल. त्याचं वाक्य ऐकता क्षणी, पुलं प्रेक्षकांकडे बघत, हातात ब्रश धरून दाढी करत असल्याची अ‍ॅक्शन घेत, उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘हे काय रोज ब्रश हाती धरतो की.’’ हशा उसळला आणि नमनाचं आगाऊ बोलणाऱ्याचा चेहरा उतरला. पुढची कडी म्हणजे त्या तिथे पुलंनी भाषण करण्याऐवजी हाती ब्रश घेऊन, समोरच्या बोर्डावरच्या कोऱ्या कागदावर, तीन मिनिटांत, चार फटकारे मारत ‘महात्मा गांधी’ चितारले. टाळ्यांचा कडकडाट झाला. वर म्हणतात कसे? ‘‘मित्रहो, मी काही चित्रकार नाही. शिकलेलो नाही. तेव्हा चित्र चुकलं तरी कुणी नाव ठेवू नये, म्हणून मुद्दामच ‘गांधी’ चितारले.’’ पुन्हा हशा. माझं भाग्य असं की, त्या समारंभात नंतर बोलायला मी होतो म्हणून, ‘गांधीं’चं ते चित्र त्यांनी मला जाण्यापूर्वी भेट दिलं. १९७८ मध्ये ‘पुलं’नी काढलेले ते ‘महात्मा गांधी’ माझ्या दर्शनी हॉलमधल्या भिंतीवर आजही आहेत.
‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ चित्रपटाच्या सेटवर आम्हा त्या काळच्या चित्रपट स्तंभलेखकांना दादा कोंडके यांनी कुटुंबीयांसह सेटवर आमंत्रित केलं होतं. आम्ही गेलो. सेटवर माझ्या बायकोची मी दादांना ओळख करून देत होतो. म्हटलं, ‘दादा, मी माझी बायको’. माझा शब्द संपताक्षणी, दादा म्हणाले, ‘आयला, मग काल कोण होत्या?’ सेटवर हशा. असंख्य मुलाखतीतून भल्याभल्यांना निरुत्तर करणाऱ्या माझीच ‘बोलती’ दादांनी ‘बंद’ करून टाकली होती.

पुण्यात वानवडीला अपंग साहाय्यकारी संस्थेच्या कार्यक्रमात तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम भाषणाला उभे राहिले. मी निवेदक होतो. राष्ट्रपती प्रोटोकॉलनुसार मी त्यांच्या विरुद्ध बाजूला एक पायरी खाली उभा होतो. कलामसाहेबांनी भाषण सुरू करण्यापूर्वी अचानक मला जवळ बोलावले. माझी ओळखही नाही. मला कळेना का बोलावतायत. मला म्हणाले, ‘‘ही अपंग मुलं पाहून मला एक कविता सुचतीय. भाषणापूर्वी मी कविता म्हणणार आहे. तुम्ही इथेच शेजारी उभं राहून ती ऐका. आणि लगेच तिचं मराठीत भाषांतर करा.’’ त्यांनी कविता म्हटली. मी भावानुवाद केला. म्हणजे ‘चिल्ड्रेन्स ऑफ गॉड’ला ‘परमेश्वराची मुलं’ नं म्हणता ‘ईश्वराची लेकरं’ असा अनुवाद ऐकवला. टाळ्या पडल्या. त्यामुळे कलामसाहेबांना वाटलं आपली कविता नीट पोहोचली. त्यामुळे भाषण संपल्यावर त्यांनी मला पुन्हा बोलावलं. प्रोटोकॉल बाजूला ठेवून, मला घेऊन स्टेजखाली उतरले. सिक्युरिटीला दोन खुच्र्या शेजारी ठेवायला सांगितल्या. मला म्हणाले, ‘‘बसा आणि त्या अपंग मुलांना पुढय़ात बोलवा. त्यांना सांगा की, आजोबांना काहीही प्रश्न विचारा. मुलं जे विचारतील ते मला इंग्रजीत सांगा आणि मी जी उत्तर देईन, ती मुलांना मराठीत ऐकवा.’’ पडद्यामागे घडलेल्या पण प्रेक्षकांच्या पुढय़ात प्रत्यक्षात आलेल्या या घटनेमुळे प्रोटोकॉल बाजूला सारून मला कलामसाहेबांसारख्या राष्ट्रपतींच्या शेजारी बसून, राष्ट्रपती आणि अपंग मुलं यांच्यात ‘दुभाषी’ म्हणून काम करण्याचं भाग्य मिळालं.

दृष्टीआडच्या अशा असंख्य कहाण्या मी अनुभवल्या आहेत. साऱ्याच सांगणं वर्तमानपत्राच्या मर्यादेत शक्य नाही. पुस्तकंच होतील, कारण राजकारण, सिनेमा, साहित्य, नाटक, खेळ, सामाजिक क्षेत्र, गायक-संगीतकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, इतिहासकार, अशा सुमारे तीन-साडेतीन हजार व्यक्तींच्या प्रकट वा कॅमेऱ्यापुढे मुलाखती मी घेतलेल्या आहेत. आजही वीज न वापरता अंधारात राहून पंधरा-वीस विद्यार्थिनींना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापिका सानेबाईंपासून बिझिनेस समजून देणाऱ्या रस्त्यावरच्या भंगारवालीपर्यंत अनेक ‘मुद्रा’ मी ‘बोलक्या’ केलेल्या आहेत. पत्रकारितेची नोकरी नि कॉस्टिंगचा अभ्यास अर्धवट सोडून देऊन, पूर्णवेळ निवेदन आणि मुलाखतींचे ‘टॉक शो’ करायला लागून आता चाळीस वर्षे होतील. मराठीत पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून निवेदन करायला लागून माझी २५ र्वष झाली तेव्हा २००० मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: पुण्यात येऊन ‘बालगंधर्व’मध्ये माझ्या आगळ्या करिअरच्या रौप्यमहोत्सवात मला ‘दाद’ दिलीय. फक्त गाणं किंवा गझल कार्यक्रमाचं ‘निवेदन’ मर्यादित न ठेवता, गाण्याच्या कार्यक्रमाच्या नवनव्या संकल्पना रंगमंचावर साकारल्या आणि निवेदन- मुलाखतीत फक्त भाषांचं वैविध्य आणण्याचा अट्टहास न करता, विषयांचं, माणसांचं वैविध्य आणून, मुलाखतीचे तीन हजार आणि गाण्यांचे दोन हजार कार्यक्रम केले म्हणून या वेगळ्या प्रयोजनासाठी, शरद पवार, आशा भोसले यांच्या उपस्थितीत, अमिन सयानीच्या आवाजात सतीश देसाईंनी मला ‘पुण्यभूषण पुरस्कार’ही दिला हे मी माझं परमभाग्य समजतो.

नोकरी सोडून देऊन हे आगळं करिअर करायला उद्युक्त करणारी माझी पत्नी शैला ऊर्फ अनघा या गौरव सोहळ्यांच्या वेळी या जगातच नव्हती, एवढीच खेदाची बाब! पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी आताचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि मी, मध्यमवर्गीय घरातले आम्ही दोघांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याकरिता, एकाच दिवशी नोकरी सोडली. तेव्हा संपादकीय नोकरीचा राजीनामा देऊन घरी आल्यावर माझी पत्नी अनघा ऊर्फ शैला मला म्हणाली होती, ‘‘बरं झालं नोकरी सोडलीत. तुमचा तो पिंडच नाही. आता मनाप्रमाणे कलेचं करिअर करा. जर काही आर्थिक अडचण आली तर आपण आपल्या गरजा कमी करू.’’ एखाद्या बाईनं ‘गरजा’ कमी करू म्हणून प्रोत्साहित करणं फारच मोलाचं होतं. मिळालेल्या यशामागे, कुटुंबाची साथ, मित्रांचं पाठबळ, जोडलेल्या माणसांचं सहकार्य, एकाच वेळी पहाटे बातम्या देणं, दुपारी जाहिरातींची भाषांतरं करणं, संध्याकाळी ‘दूरदर्शन’वर नव्या संकल्पनांतून कार्यक्रम करणं (अरुण काकतकर, विनय आपटे, विजया जोगळेकर यांच्या साथीनं) रात्री गाण्याच्या कार्यक्रमाच्या निवेदनाला जाणं असं व्यस्त वेळापत्रक अखंड, न कुरकुरता, न आळस करता केलं हा भाग आहेच. सतत माणसांना भेटणं, माणसांचं वाचन आणि पुस्तकांचं वाचन यातून सतर्कता कायम ठेवत, पत्रकारितेच्या पाश्र्वभूमीमुळे मिळालेल्या दिशेतून संदर्भ साहित्याचा साठा जमा करत, तो स्मरणात ठेवत, क्वचित उत्स्फूर्तपणातून विनोद साधत, वातावरण जिवंत ठेवत असंख्य कार्यक्रम रंगवू शकलोय. उत्स्फूर्त गंमत सहज सुचत नाही. त्यासाठी उत्तम वक्त्यांच्या शब्दखेळीचे ऐकण्याचे संस्कार व्हावे लागतात. बाळशास्त्री हरदास, आफळेबुवा, कोल्हटकरबुवा यांच्या प्रवचन-कीर्तनातून, दत्तो वामन पोतदार ते पु. ल. देशपांडे यांच्यासारख्यांच्या उत्स्फूर्त बोलीतून ऐकता ऐकता बोली भाषेचे नि उत्स्फू र्त शैलीचे संस्कार माझ्यावर घडलेले आहेत.

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून निवृत्त झालेले दत्तो वामन पोतदार एका सायंकाळी साहित्य परिषदेत व्याख्यानाला आले. ते बोलायला उभे राहणार, एवढय़ात शेजारी बसलेले कथाकार श्री. ज. जोशी त्यांना म्हणाले, ‘‘दादा, आज तरी तुम्ही शिवचरित्र कधी लिहिणार ते सांगून टाका.’’ दत्तो वामन उपरणं सरसावत उभे राहिले, म्हणाले, ‘‘मी विद्यापीठातून निवृत्त झालो. मोकळा होतो. काही तरी बरं ऐकायला मिळेल म्हणून इथे आलो, पण काहीही नवं ऐकायला मिळालं नाही. आता बोलणार तर जोशीबुवांनी शिवचरित्राचे वक्तव्य केले. मी त्यांना सांगू इच्छितो की, जोशीबुवा, शिवचरित्र लिहिणं हे भाषांतरित कथा-कादंबरी लिहिण्याइतकं सोप्पं नाही. त्यासाठी चिंतन लागतं. विचार लागतो.. वेळ लागतो..’’ अशा बौद्धिक जुगलबंदी ऐकल्याने, मी बोलण्याचा व्यवसाय सुरू केल्यावर, वाटेला जाणाऱ्यांना अपमान होऊ न देता, शब्दातून टोलवत ‘दाद’ मिळवू शकलो.

बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजात शिकत असतानाच पत्रकारिता केल्याने, विविध क्षेत्रीच्या थोरा-मोठय़ांकडे सहजतेनं जाता आलं आणि त्यातून नव्यानं सुरू झालेल्या ‘दूरदर्शन’साठी नव-नवे विषय सुचवू शकलो. व्यंकटेश माडगूळकर, ना. ग. गोरे, लालचंद हिराचंद, आबासाहेब गरवारे, शकुंतला परांजपे, बाळासाहेब ठाकरे अशा ५० नामवंतांच्या तरुणपणीचे अनुभव, त्यांचं करिअर घडणं, पत्रकारितेच्या निमित्ताने ऐकता ऐकता, ‘दूरदर्शन’साठी ‘आमची पंचविशी’ ही मुलाखत मालिका वर्षभर केली, तर नामवंतांच्या घरातील मुलांशी बोलण्यातून जान्हवी प्रभाकर पणशीकर, कीर्ती जयराम शिलेदार, जयंत भीमसेन जोशी, रमेश स्नेहल भाटकर, श्रीधर सुधीर फडके अशा कित्येक मुलांची मानसिकता समजून घेणारा, ‘वलयांकित’ हा कार्यक्रम ‘दूरदर्शन’वर करू शकलो. डेक्कन क्वीननं प्रवास करताना पुणे स्टेशनवर डेक्कन क्वीनच्या डब्यावर हात ठेवणारा उंच मुलगा पाहून वर्षभरात वेगळी वाटणारी पन्नास माणसं ‘मुलुखावेगळी माणसे’मध्ये आणू शकलो.

जितेन्द्र अभिषेकीबुवांशी गप्पा मारत, गाणं समजून घेत, ‘मत्स्यगंधा ते महानंद’ हा अभिषेकी संगीताचा कार्यक्रम (कामत, आशाताई, राजा काळे आदींसह) जयराम, जयमाला- कीर्ती- लता- किरण भोगलेशी बोलत, ‘गंधर्व सुरांची शिलेदारी’, गोव्याच्या समुद्रावर काकतकरच्या साथीनं जाऊन, बाकी बाबांशी गप्पा मारत ‘कांचनसंध्या’ असे गाण्यांचे कार्यक्रम करू शकलो. हे सारं ‘नक्षत्रांचं देणे’ संकल्पना येण्यापूर्वी! फक्त ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ कार्यक्रमात अडकून न पडता, ‘स्मरणयात्रे’च्या कोषात न थांबता, दगडूशेठ गणपतीच्या शतकोत्सवात सारस बागेच्या मैदानावर गजानन वाटवे, ज्योत्स्ना भोळे, मालती पांडे, पं. हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, श्रीधर फडके अशा भावगीतकारांच्या तीन पिढय़ा सादर करू शकलो. अरुणभय्या आणि बाळासाहेब मंगेशकर यांचे स्वतंत्र कार्यक्रमही सूत्रबद्ध केले. अरुण काकतकरांमुळे भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, उषाताई, मीनाताई, हृदयनाथजी अशा पाचही मंगेशकर भावंडांच्या मुलाखती आणि गाणी ‘दूरदर्शन’वर प्रथम सादर करण्याची संधी मला मिळाली आणि आशा भोसलेंच्या मुलाखती- गाण्यांचे कार्यक्रम तर गेली २७ वर्षे करत आलोय. भेटलेल्या माणसांच्या गप्पांच्या नोंदी रोज रात्री रोजनिशीत नोंदवायची सवय असल्याने, संदर्भाच्या साडेतीन हजार फायली (माझ्या आरंभकाळात कॉम्प्युटर सोय नव्हती) सांभाळून आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातल्या किमान दोन पिढय़ांशी रंगमंचावरून, कॅमेऱ्यासमोर मुलाखतवजा- संवाद सहजतेनं जमवू शकलोय.

मॉरिशसला व्यासपीठावर माणिकबाई वर्माना घेऊन आलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या (माझी फिरकी घेणाऱ्या) उत्स्फूर्त वक्तव्यानं अस्वस्थ न होता, सभ्य प्रतिउत्तर देऊ शकलोय ते माहितीचे संदर्भ सतत ताजे ठेवण्यामुळे! माणिकताईंच्या गाण्यातून अनेकांची प्रेमं फुलली असल्याने मी त्यांना विचारलं की, ‘‘माणिकताई, माणिक दादरकरची माणिक वर्मा होताना तुम्हाला तुमचं कुठलं भावगीत उपयोगी पडलं?’’ यावर माणिकताईंनी काही उत्तर द्यायच्या आधीच, त्यांच्या बाजूला उभे असलेले पु. ल. देशपांडे म्हणाले, ‘‘अरे सुधीर, तिच्या वर्मावर कशाला घाला घालतोयस?’’ यावर पु.लं.कडे बघत मी पटकन उत्तरलो, ‘‘मी कोण त्यांच्या वर्मावर घाला घालणार? त्यांचा ‘वर्मा’ ‘अमर’ आहे.’’ या उत्स्फूर्ततेला पु.लं.नीही ‘दाद’ दिली.

मला नामवंतांशी संवाद साधण्याच्या संधी खूप मिळाल्या. हिंदी अभिनेते-अभिनेत्रींच्या जवळ जाता आलं ते देवयानी चौबळ नामक सत्तरच्या दशकात फिल्म जर्नालिझममध्ये टेरर असलेल्या ‘स्टार अ‍ॅण्ड स्टाइल’च्या संपादक ज्येष्ठ मैत्रिणीमुळे. ‘मनोहर’ साप्ताहिकात मी काम करत असताना, आमच्याकडे त्या ‘चंदेरी च्युइंगम’ सदर लिहायच्या. दत्ता सराफांनी चौबळ संपर्काची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. त्या हाजीअलीसमोर एनएससीआय क्लबवर राहायच्या. दर बुधवारी मी मुंबईला त्यांच्याकडे जायचो. त्या मला घेऊन थेट हिंदी ग्लॅमरस पाटर्य़ाना, नटांच्या घरी घेऊन जायच्या. त्यामुळे इंग्रजी फिल्मी मासिकांची भाषांतरं न करता थेट बातम्या मिळायच्या. राजेश खन्नाच्या साखरपुडय़ाला, धर्मेद्रच्या मारहाणीला मी साक्षी होतो.

मुळात मुंबईचं राजकारण- सिनेमा- जाहिरातींचं विश्व मला जवळून अनुभवता आलं ते एका वेगळ्याच साप्ताहिकामुळे. आज बऱ्याच नव्या पत्रकारांना ते साप्ताहिक माहीतही नसेल. ते साप्ताहिक म्हणजे ‘तेजस्वी’. चौगुले आणि किलरेस्कर या दोन उद्योगपतींनी निर्मिलेले. विविध दैनिकांतून ज्येष्ठ नामवंत पत्रकार (सुमारे चाळीस) या नव्या साप्ताहिकांत रुजू झालेले होते. किलरेस्करांचे जनसंपर्क अधिकारी नारायण पुराणिक सूत्रधार संपादक होते. ‘इंडिया टुडे’ येण्यापूर्वीच तसं वृत्त साप्ताहिक मराठीत आणण्याचा हा ‘तेजस्वी’ प्रयत्न होता. त्याचं ऑफिस पुण्यात मोदी बागेत होतं. मला आठवतंय, त्या वेळी राजकारणाची जाण असलेल्या वरुणराज भिडेला पुराणिकांकडे इंटरव्ह्य़ूला घेऊन मीच गेलो होतो. त्या ‘तेजस्वी’चा मुंबई मुख्य प्रतिनिधी म्हणून माझी त्या माझ्या उमेदवारी काळात नेमणूक झाली होती. माझी निवड होण्याचं कारण फक्त मी मुंबईत जायला तयार असणं एवढंच होतं. त्या वेळी मी उल्हास पवारांच्या जुन्या आमदार निवासातल्या रुम नं. ६०२ मध्ये बऱ्याचदा असायचो. मधू शेटय़े, गोगल मला त्या वेळी खूप मदत करत. पदच असं होतं की, वसंतराव नाईक, अंतुलेंसह सर्व राजकीय नेते, उद्योजक तर सहजतेनं भेटत. मला आठवतंय की, वडखळ नाकाप्रकरणी बॅ. आर. अंतुले, रामभाऊ म्हाळगी, प्रमोद नवलकर, मृणाल गोरे यांच्या मुलाखती मी घेतल्या होत्या. १९७१-७२ सालातले सारे ‘तेजस्वी’चे अंक माझ्याकडे आहेत.

मुलाखतींच्या राज्यातही अनेक गमती घडल्या आहेत. मी आणि वरुण भिडे ‘अर्न अ‍ॅण्ड लर्न’ स्कीमखाली कॉलेजात शिकत असतानाच्या काळात रेस्टॉरंट नसलेल्या ‘श्रेयस’ हॉटेलात अटलबिहारी ुवाजपेयी साहेबांबरोबर सहज गप्पा झाल्यात तर राजकीय नेत्यांमध्ये सर्वाधिक मुलाखती बाळासाहेब ठाकरे आणि शरदराव पवार यांच्याबरोबर झाल्या आहेत. २४ एप्रिल २०१२ षण्मुखानंद हॉलमध्ये दीदींच्या उपस्थितीत बाळासाहेब शेवटचे भेटले. ७, सफदरजंग रोड, दिल्ली या प्रमोद महाजनांच्या तत्कालीन निवासस्थानी सलग सात तास चित्रबद्ध केलेली महाजनांची मुलाखत शेवटची ठरेल, असं वाटलं नव्हतं. राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांनी आपलं पद- ग्लॅमर विसरून मुक्त गप्पा मारल्या आहेत.
यशवंतराव चव्हाणसाहेबांशी पुस्तकांवर त्यांच्या निवृत्ती काळात चतु:शृंगी पायथ्याशी बोललोय तर पृथ्वीराज बाबांशी अगदी अलीकडे सॅटर्डे क्लबमध्ये धावत्या गर्दीत बोललोय. हे दोन ‘चव्हाण’ आणि कन्नमवार सोडल्यास वसंतराव नाईक ते देवेन्द्र फडणवीस सर्व मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती झाल्या आहेत. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमारजी तर आमच्या कट्टय़ावरच्या गप्पाष्टकातही सहभागी झालेत.

नवी गाडी ‘मनोहर’ साप्ताहिकाच्या कचेरीत दाखवायला आलेला आणि बिनधास्त बोलणारा ‘नामदेव ढसाळ’ तर त्या काळात दोस्तच झाला होता. आळंदीच्या साहित्य संमेलनात अक्षरश: रस्त्यावरच्या धुळीत बसून, दया पवार मुक्तपणे जीवन कहाणी ऐकवताना मी एकटय़ाने अनुभवले आहेत. नितीन गडकरी- गोपीनाथ मुंडे यांनी खासगी विमान प्रवासातही स्टुडिओत बसल्याप्रमाणे सहज मुलाखती दिलेल्या आहेत.
बर्मिगहॅमला मुलाखतींच्या राज्यात शिरण्यापूर्वी चंदू बोर्डे, नाना पाटेकर यांच्यासह क्रिकेटदेखील खेळलोय. त्या वेळी बॅटिंग करत होते श्रेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर. वयाचं- कर्तृत्वाचं अंतर असूनही सी. रामचंद्र गळ्यात हात टाकून, गाण्यांच्या जुन्या आठवणी जागवताना मजजवळ फोटो आहे. कन्नड भाषी सुधा मूर्ती स्वच्छ मराठीत कोल्हापुरात माझ्या गप्पाष्टकात सहभागी झाल्यात आणि पुण्यातल्या दर्शन हॉटेलमध्ये नारायण मूर्तीशी झालेल्या नमनाच्या भेटी त्यांनी खुलवून सांगितल्यात. विजय तेंडुलकरांशी गुन्हेगारी जगतावर बोलण्यात रमलोय.
आता माझ्या मुलाच्या वयाचे सारे स्टार्स आहेत. विश्वजीत कदम, पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे, अमित देशमुख असे राजकारणात आहेत. तर राहुल- महेश काळे, शौनक सारखेगायक गाजतायत. या नव्या पिढी समवेतही माझे सूर जुळलेत. नुकतंच दुबईला महेश-राहुलशी गप्पा मारत, सुबोध भावेला आठवत आम्ही ‘पाडवा’ साजरा केला.

जाता जाता एक सांगतो मला अजिबात न आवडणाऱ्या माणसांची मुलाखत घ्यायची वेळ आली तरी मी टाळत नाही. कारण त्या निमित्ताने माझं ‘न’ आवडणं, हे गैरसमजावर आधारित आहे का, हे तपासता येतं आणि माझी चूक असेल तर माझीच मनातली ‘मतं’ पुसून टाकून, मैत्र वाढवता येतं. जॉर्ज फर्नाडिस ते बाबामहाराज सातारकर, सिंधुताई सपकाळ ते निर्मलाताई पुरंदरे, पु. भा. भावे ते अनिल अवचट अशा परस्पर टोकाच्या मतप्रणालींशी झालेला संवाद सांगणं म्हणजे स्वतंत्र ग्रंथच होईल. फक्त इथे नोंद घेतो. न नोंदता आलेले हजारभर!

एकच सांगतो, या साऱ्या माणसांशी बोलताना जमा झालेले ‘संदर्भ’ मुलाखतींच्या राज्यात उपयोगी पडलेत आणि संदर्भाची सतर्कता, बोलण्यातली अनौपचारिकता, मांडणीतली उत्स्फूर्तता यामुळे ‘माणसं’ मात्र जगभर जोडली गेली आहेत. बोलणं आणि माणसं जोडणं हा अदृश्य पायाच हीच माझी सृष्टीआडची दृष्टी आहे. यातूनच निर्मिलेला एक नवा उद्योग सांगतो नि थांबतो. जगभर ‘आय. टी. कपल’ नोकरीनिमित्त गेली आहेत. मी कार्यक्रमाच्या निमित्तानं जगभरच्या या तरुण तंत्रज्ञांना भेटतो. त्यांचे महाराष्ट्रातले आई-वडील गाठतो. एक दिवस या आजी-आजोबांसमवेत गप्पा मारत त्यांची दैनंदिनी चित्रबद्ध करतो आणि हे सारे चित्रण त्यांच्या परदेशात स्थायिक झालेल्या नातवंडांकडे पाठवतो. या ‘पॅकेजिंग ग्रॅण्डपा’ मोहिमेत मी रमलोय. घरातलं कुणी अचानक गेलं तर ग्रुप फोटोमधला फोटो एन्लार्ज करून त्याला हार घातला जातो आणि ‘हारातलाच चेहरा खरा’ असं पुढच्या पिढय़ा समजतात. त्यामुळे चालते, बोलते, हसते, खेळते आजी-आजोबा असतानाच त्यांना कॅमेऱ्यात बोलकं करत पकडून ठेवा; ही सध्या माझी ‘संवाद मोहीम’ आहे. अर्काइव्हल सेन्स असलेल्यांना या चित्रबद्ध संवादाचं महत्त्व नक्की कळेल.

– सुधीर गाडगीळ
पत्रकार, निवेदक