‘‘ मी नेहमीच जे आतून वाटलं ते केलं. आता परिस्थिती बदलताना दिसतेय. प्रेक्षक सिनेमागृहाकडे वळताना दिसतोय. परंतु त्यामागे गेली बारा-पंधरा र्वष अनेक चित्रकर्मी सतत प्रयोगशील राहिले. नवनवीन प्रतिभावंत या वारीत दाखल झाले तेव्हा कुठे आता दिंडय़ा-पताका दिसू लागल्यात. टाळ मृदंगाचा गजर वाढलाय. आता दिंडी प्रमुखांचा दिमाख दिसू लागलाय. मोठय़ा आवाजाच्या दिंडय़ा आघाडीवर आहेत..वारकऱ्यांचा ताफा वाढलाय. कळस दर्शनाने पुलकित होऊन दिंडय़ा नाचताहेत. मी पुन्हा एकदा इंद्रायणीच्या काठावरून चंद्रभागेकडे निघालोय..’’
इंद्रायणीच्या काठावर उभा होतो. माऊलीच्या पिंपळाकडे नुकताच जाऊन आलो होतो. संध्याकाळ होऊ लागली होती. मनात घोंग उठलेला. जगात माझी मराठी भाषा एकमेव अशी आहे की जिने साहित्यिकांना देवाचा दर्जा दिला. साहित्यकारांचे देऊळ बांधले. जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या तुकोबा-ज्ञानोबांच्या पालख्या उचलल्या आणि काळाच्या मर्यादा ओलांडून त्यांचे साहित्य माथ्यावर मिरवले..
अनेक दिवस गेले. एका रात्री अचानक जागा झालो. वृंदा म्हणाली, ‘‘काय होतंय?’’ मला स्वप्न पडलं होतं आणि डोक्यावर तुळशी वृंदावन ठेवलेल्या तरंगत जाणाऱ्या सडसडीत देहाच्या तुडतुडीत बायका चालल्या होत्या. मागे टाळ-मृदंग.. कुठूनतरी ती ऊर्जा मला माझ्यात उतरताना जाणवली. त्या रात्री माऊलींची पालखी निघायला तेवीस दिवस बाकी होते. यंदा ‘वारी’ करायचीच..ठरलं. आपल्या पद्धतीने सकाळी एका निर्मात्याकडे गेलो म्हटलं, ‘‘मला वारीत चालत सिनेमा करायचाय.’’ तो म्हणाला, ‘‘बजेट?’’ मी म्हणालो, ‘‘दहा लाख.’’ तो हसला. ‘‘यात काहीच होत नाही..’’ मी म्हणालो, ‘‘मी पुढे जातोय. पुढच्या निर्मात्याकडे पोहचेपर्यंत कळवा.’’
माझा विषय ठरला होता, आशय घट्ट होता. माझ्याकडे कथा नव्हती. मला कथा सांगायचीही नव्हती. मला माझ्या पद्धतीनं माझं असं काहीतरी मांडायचं होतं. खूप बजेट आखून ते शक्य होणार नव्हतं. मला माझ्या उर्मीबरोबरच निर्मात्याच्या पैशाचीही काळजी होती. नॉशीर मिस्त्री आणि मयूर शहा यांना फोन केला, ‘‘आता येऊ का?’’ ‘‘ये’’ म्हणाले. लगेच गेलो. त्यांना सर्व सांगितलं. दोघेही कळवतो म्हणाले. माझ्याकडे धीर होता, पण वेळ नव्हता. बाईक काढली निघालो, तिसरा निर्माता शोधायला. महेश सतत सोबत असायचा. दादरच्या फूल मार्केटपर्यंत आलो आणि पोटात दुखू लागलं. भयानक वेदना.. तेव्हा मला किडनी स्टोनचा त्रास होता. कधीही दुखू लागायचं. बाईक थांबवली. कोहिनूरच्या फूटपाथवर लोळण घेतली. घाम सुटलेला. महेश धीर देत होता.. तेवढय़ात फोन वाजला. मयूर शहांचा फोन होता. म्हणाले, ‘‘परत ये ताडदेव ऑफिसला जाऊ या एकत्रच.’’
सिनेमा ठरला. कथा नव्हती. नावही नव्हतं. मी म्हटलं, ‘‘मला गाडी द्या.’’ नॉशीरभाईंनी त्यांची सुमो दिली. आणि मग काय मीच ती चालवत निघालो. सोबत माझे जिवलग साहाय्यक कॅमेरामन इम्तीयाज. वारी ज्या वाटेने जाते ती अख्खी वाट धुंडाळत निघालो. थांबत लोकेशनचा अंदाज घेत. प्लानिंग करत केव्हातरी पंढरपूरला पोहोचलो. पंढरीला जाण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. संध्याकाळी एक होडी घेतली आणि चंद्रभागेत पडून राहिलो. सिनेमाने आकार घेतला. परत येताना सलीलला भेटलो. म्हणालो, ‘‘हा सिनेमा. हा विषय..’’ मग काय? त्याने रात्रभर अभंग ऐकवले. नवीन-म्युझिक जन्म घेत होतं. दिवस थोडे होते. स्क्रिप्ट होत होतं. नॉशीरभाई, मयूरभाई मागे भक्कम उभे होते.
..आणि एक दिवस तो दिवस आला. माऊलींची पालखी हलण्याची वेळ आणि इम्तीयाज – खांद्यावर कॅमेरा घेऊन महेशच्या खांद्यावर बसला होता. महेश त्याचा घोडा झाला होता. आणि गर्दी चिरत आत जाऊ लागला. मी आधीच शॉट सांगितले होते. आणि त्या गर्दीत रणधुमाळी सुरू झाली. लाखो लोक.. प्रचंड साऊंड.. ऊर्जा.. उत्साह.. गगन दुदुंभी.. माझ्या कानात रेकॉर्डिगला शौनकने लावलेले सूर घुमू लागले आणि शूटिंग सुरू झालं..
नंतर वारीबरोबर चालत राहिलो. अनेक सीन गर्दीत शूट करत होतो. गर्दी आवरेना. मग एक डमी कॅमेरा आणला. इम्तीयाज तयारीत असायचा. शूटिंगचा भास निर्माण करायचो. गर्दी तिकडे ओढली गेली की इम्तीयाज कॅमेरा फिरवून मागे ओरिजनल शॉट रोल करायचा. दिवे घाटातून दिंडय़ा निघाल्या.. आम्ही अगदी खाली शूट करत होतो. मला घाटावरून खालून येणाऱ्या दिंडय़ांचा शॉट हवा होता. अख्खी वारी ओलांडून धावत निघालो. सगळी इक्विपमेंट घेऊन संपूर्ण युनिट धावत होते. घाट चढून आलो वर टेकडीवर कॅमेरा सेट झाला आणि मी खालचं दृश्य बघून हरखून गेलो..
मयूर शहा खायला घेऊन आले, ‘‘थोडं खाऊन घ्या रे!’’ सासवडला मुक्काम होता. एक बाबा खोकल्याचं औषध पीत होते. बाटलीवर डोसची मार्करपट्टी लावली होती. माझ्या नाकातोंडात धूळ गेलेली. बाबाने बाटली मला दिली. घोट घेतला तर आतहातभट्टीची..
सासवडवरून जेजुरीपर्यंत गेलो. मग परत आलो मुंबईला. रशेस बघितल्या. टेलिसीने केला आणि मग उधाण आलं.. आम्ही उधळलो. पुढे नातेपुतेला पुन्हा वारीत शिरलो. आता माझ्याकडे जनरेटर, क्रेन, लाईट्स सगळी आयुधं होती. आमची एक स्वतंत्र दिंडी तयार झाली होती. एका रात्री पालं लागली होती. तिथे शूट करत होतो. एक बाई म्हणाल्या, ‘‘तुम्हाला सगळं आयतं फुकट मिळतय.’’ ती शूट करू देईना. आयतं, फुकट म्हणजे? हे मनापासून करण्याच्या उर्मीची काय काय किंमत लावायची? मी म्हणालो, ‘‘बाई गं, मी काही घेऊन नाही जात. शूट करून त्या इमेजेस नेणार. तुझा तंबू, तुझा कंदील तुझ्याकडेच असणार. ती ऐकेना. प्रश्न तिच्या तत्त्वांचा होता. प्रॉडक्शन मॅनेजरने तत्त्वं विकत घेतली. मला माझा शॉट मिळाला..
साखर-फुटाण्याची एक ढकल गाडी वारीत चालली होती. धूळ बसून पांढरे फुटाणे तपकिरी झाले होते. त्याला हसलो तर लक्षात आलं माझे केसही प्लास्टिकचे झाले होते जणू. कंगवा काय बोटंही केसात जात नव्हती. एका सुमोत आठ मुली दाटीवाटीने झोपायच्या. महेश बॉनेवटवर तर इम्तीयाज वर कॅरियरमध्ये झोपायचा. बाकीचे जिथे जागा मिळेल तिथे. एकदा तर मी थर्माकॉल घेऊन त्यावर झोपलो. रात्रभर शूट झालेलं. सकाळ झाली. ट्रक्सचे आवाज जाणवायला लागले. तो गाडी तळ होता. शेजारून अनेक ट्रक निघाले होते. परिस्थितीचा अंदाज आला आणि भयंकर ताण आला. कुणी वाचवलं असेल आपल्याला? सुखरूप आहोत हे लक्षात आलं, मग सुमोच्या खाली जाऊन झोपलो..
सर्वत्र माऊलीमय वातावरण होतं तिथं. माऊलीच्या घोडय़ाला, त्याच्या टापेखालची धूळ उचलायला हजारो लोक अक्षरश: तुटून पडले होते. नुसती खेचाखेच.. पण दुपारी बघतो तर तोच घोडा एकटाच चरत फिरत होता. कोणीच आजूबाजूला नव्हतं की कुणाचं त्याच्याकडे लक्षही नव्हतं. हा त्या त्या वेळेचा नमस्कार असतो का? नमस्कारालाही वेळ असते? मागच्या जन्मी हा घोडा दिग्दर्शक असावा..
सदाशिव नगरच्या िरगणासाठी इम्तीयाज कसाबसा भिंत चढून वर गेला.. वाखरीचं िरगणही झालं आणि मग एकादशीच्या आधी एक दिवस आम्ही पंढरीला पोचलो. कुठ कुठल्या दुकानांत पोझिशन घेऊन शूट करत होतो. वैज्ञानिकाची भूमिका करणारा अभिनेता ब्रिटनमध्ये आयुष्य घालवलेला. तो वारीत खात होता. झोपत होता. उलटय़ा करत होता. तापाने फणफणला होता. त्याला आता बाहेर खाणंही अशक्य झालं होतं. केळींचाच काय तो आधार उरला होता.
एकादशी झाली. आणि शूट संपले. त्या दिवशी एक पंचा मी लावला होता. वर अंगात काहीच नव्हतं. कपडे, चप्पल कुठे गेल्या माहीत नव्हतं. अनवाणी, उघडा, केसांच्या जटा घेऊन मी हिंडत होतो. कोण, कुठे, काही समजत नव्हतं. जिकडे तिकडे फक्त गर्दी होती. चंद्रभागेकडे गेलो आणि पाऊस आला. धो धो पाऊस.. नितळ स्वच्छ पाणी.. शौनकने गायलेलं कानात, मनात भरून घेतलं ..आणि पाण्यात उतरलो. एका होडीवर ओळखीचे चेहरे दिसले. संदीपने माझी बॅग सांभाळली होती..
केव्हा तरी मुंबईला पोहचलो.. रशेस पाहिल्या. सिनेमाचं नाव पुढे आलं, ‘माझ्याकडे देव माझा पाहतो आहे.’ मी नाही म्हणालो. मला देवाचा सिनेमा नव्हता करायचा. मला त्या वारीतल्या ऊर्जेचा, माणसांचा, माणसांच्या विजिगीषूचा सिनेमा करायचा होता. मिलिंद म्हणाला, नाव सुचवतो. ‘विठ्ठल विठ्ठल’. सगळे एकदम ‘हो’ म्हणाले. सुंदर नाव. एका विलक्षण अनुभवातून गेलो होतो आम्ही सारे..
सिनेमा एडिट झाला आणि सुंदर होत गेला. त्यावर्षीचा सिनेमा, दिग्दर्शन, संगीत, गायक असे चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. सिनेमा चालू लागला. खूप आनंद देऊन गेला. लोकांना आवडला.. त्या वर्षांपासून आजवर दर आषाढी, कार्तिकीला ‘विठ्ठल विठ्ठल’ लागतो आणि अनेक फोन येतात. ते जे रसरशीतपणे अनुभवलंय ते आजही ताजे आहे.
साहित्यिकांचा सन्मान म्हणून न बोलावता हजारो-लाखो लोक ठरलेल्या दिवशी जमतात. अठरा दिवस चालतात.. सोहळा करतात. जगाच्या पाठीवर हा अनुभव मला ऐकिवात आला नाही. आपल्या संचिताचं सार मला माझ्या पद्धतीने टिपता आलं. चंद्रभागेत डुंबताना शेवटच्या दिवशी हेच समाधान खूप मोठं होतं.
‘विठ्ठल विठ्ठल’ करून आता तेरा र्वष झाली. तो माझा तिसरा सिनेमा होता, आता माझा त्रेचाळिसावा सिनेमा फ्लोअरवर आहे. अनेक अनुभव घेतले. एक सिनेमा म्हणजे एक स्वतंत्र आयुष्य असतं. त्यातली पात्रं, लोकेशन्स टेक्निशियन्स, स्वतंत्र जगणं. या स्वतंत्र आयुष्यात अनेक अनुभव येतात, जे कलावंत म्हणून समृद्धी घेऊन येतात. माणूस म्हणून प्रगल्भ करत जातात. बेचाळीस सिनेमांचा प्रवास सोपा नव्हता. पण लोकांनी, निर्मात्यांनी, कलावंतांनी, वृंदाने विश्वास दाखवला म्हणून एवढं काम करू शकलो. माझं बजेट आणि माझा वेग यावर सतत टीका झाली, पण हरकत नाही. मी कधीच बॉक्स ऑफिसचं गणित डोळ्यांसमोर ठेऊन काम केलं नाही. जे आतून वाटलं ते केलं. आता परिस्थिती बदलताना दिसतेय. प्रेक्षक सिनेमागृहाकडे वळताना दिसतोय. परंतु त्यामागे गेली बारा-पंधरा र्वष अनेक चित्रकर्मी सतत प्रयोगशील राहिले.
मराठी सिनेमाने सातत्याने नवे विषय नवे आशय हाताळले. नवनवीन प्रतिभावंत या वारीत दाखल झाले तेव्हा कुठे आता दिंडय़ा पताका दिसू लागल्यात. आता टाळ-मृदंगाचा गजर वाढलाय. आता दिंडी प्रमुखांचा दिमाख दिसू लागलाय. मोठय़ा आवाजाच्या दिंडय़ा आघाडीवर आहेत..वारकऱ्यांचा ताफा वाढलाय. कळस दर्शनाने पुलकित होऊन दिंडय़ा नाचताहेत.
मी पुन्हा एकदा इंद्रायणीच्या काठावरून चंद्रभागेकडे निघालोय..
gajendraahire@hotmail.com