प्रभाकर जोग
व्हायोलिनवादक, संगीतकार

‘दाम करी काम’ हे सुधीर फडके यांच्या आवाजातील गीत ऐकून दादा कोंडकेयांनी मला ‘आंधळा मारतो डोळा’साठी बोलावले. मला आश्चर्य वाटले कारण त्यांच्या ‘सोंगाडय़ा’ आणि ‘एकटा जीव सदाशिव’ या चित्रपटांचे संगीत राम कदम यांचे होते. ते स्वत: गीतकार होते आणि प्रेक्षकांची नस जाणणारे कलाकार होते. त्यामुळे एखादी स्वररचना झाल्यानंतर ती त्यांच्या गळी कशी उतरवायची, दादांना पटवायचे कसे हा माझ्यासाठी काही वेळा त्रासाचा भाग असायचा. पण चित्रपटातली सगळीच गाणी गाजली. ‘हिल हिल हिल पोरी हिला’ या गीताने तर ‘एचएमव्ही’ कंपनीच्या कॅसेट विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला. मात्र हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर दादांनी मला चित्रपट संगीतासाठी कधी बोलावले नाही. याचे गुपित मला त्यांच्या एका मुलाखतीमध्ये वाचायला मिळाले..’’

महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायणा’ची एक मैफल. बाबूजींच्या गायनाला माझी व्हायोलिनची साथ होतीच. एकामागोमाग एक गीत बाबूजी गात होते. रसिकांमध्ये होते, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे. बाबूजींनी सूर लावला आणि ‘दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा’ हे गीत त्यांनी गायला सुरुवात केली. या गीतानंतर छोटेखानी मध्यंतर झाले. त्यामध्ये पुलंच्या हस्ते कलाकारांचे सत्कार झाले. या वेळी पुलंनी मनोगत व्यक्त केले. ‘‘जीवनामध्ये प्रत्येकाला दु:ख आहे. त्या अर्थाने तो पराधीन आहे. पण आपल्यामध्ये प्रभाकर जोग ही एकमेव व्यक्ती पराधीन नाही तर ‘स्वराधीन’ आहे.’’ पुलंच्या या अनपेक्षित कौतुकाने मी भारावून गेलो. त्या दिवशी मोठा पुरस्कार लाभला, अशीच माझी भावना होती. इंदूर येथे गीतरामायणाचाच कार्यक्रम होता. रसिकाग्रणी रामूभय्या दाते हे त्याला आवर्जून उपस्थित होते. तोपर्यंत मी केवळ त्यांचे नावच ऐकून होतो. कार्यक्रमाच्या मध्यंतरामध्ये ते बाबूजींना भेटण्यासाठी आले. त्यांनी व्हायोलिन वाजविणारा कलाकार कोण? अशी फडकेसाहेबांकडे विचारणा केली. मग रामूभय्या मला भेटले. ‘काय वाजवलेस तू’, त्यांनी मला विचारले. क्षणभर मला काहीच कळेना. मी विचारलं, ‘माझे काही चुकले का?’ त्यावर माझा हात हातामध्ये घेऊन रामूभय्या म्हणाले, ‘इतर व्हायोलिनवादक केवळ स्वरच वाजवितात. तू स्वर तर वाजवलेस, पण व्यंजनही वाजविलेस. असे व्हायोलिन मी कधीच ऐकले नाही.’’ रसिकाग्रणी रामूभय्या यांच्या प्रशंसेने त्या वेळी मी भारावून गेलो होतो.
ही उदाहरणे मुद्दाम सांगितली, ती माझा मोठेपणा म्हणून नाही किंवा आत्मप्रौढी म्हणूनही नाही. माझ्यातील कलाकाराला लाभलेले हे अलंकार मी जीवनभर मोठय़ा आनंदाने परिधान केले आहेत. बालपणीच्या प्रतिकूल परिस्थितीने जगण्यासाठी लढण्याची जिद्द दिली आणि संगीताने माझे जीवन घडले. एका अर्थाने मला घडविणाऱ्या व्हायोलिन या वाद्याचा आणि संगीताचा ऋणी आहे. स्वरलेखन म्हणजेच नोटेशन करण्याची कला ही मला दैवी देणगीच लाभली. त्याच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदूी चित्रपटसृष्टीमध्ये जवळपास तीन पिढय़ांतील नामवंत संगीतकारांसमवेत काम करू शकलो. वादक, संगीत संयोजक आणि स्वतंत्र संगीतकार अशा तीनही भूमिकेमध्ये सहजतेने वावरताना ‘साँग व्हायोलिनिस्ट’ हा लौकिक संपादन केला. व्हायोलिन या वाद्याने मला केवळ ओळखच दिली नाही तर, चित्रपटसृष्टीमध्ये माझे ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ स्थान प्रस्थापित केले.
ज्येष्ठ भावगीतगायक बबनराव नावडीकर यांनी मुलाप्रमाणे माया करून मला आधार दिला. एका अवचित क्षणी सुधीर फडके यांनी माझे व्हायोलिनवादन ऐकणे आणि त्यांनी मला काम करायला बोलावून घेणे हा माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा क्षण ठरला. मराठी चित्रपटांबरोबरच हिंदूी चित्रपटसृष्टीमध्ये जवळपास चार दशके मी काम केले. प्रतिकूल परिस्थितीमुळे जीवनामध्ये अनेक टक्केटोणपे अनुभवले आहेत. मी प्रामाणिक राहून संगीतकलेशी जोडलेली नाळ कायम ठेवली. आता वयोमानापरत्वे काम कमी केले असले तरी दररोज रियाज सुरू असतो. विद्यार्थ्यांना व्हायोलिनवादन शिकवितो आणि शक्य असेल तेव्हा ‘गाणारं व्हायोलिन’ कार्यक्रमही सादर करतो.
मी जेमतेम दहा-बारा वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचे मोटार अपघातामध्ये निधन झाले. मोठा गोतावळा असलेले आमचे कुटुंब उघडय़ावर पडले. प्रपंच चालविण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही छोटे काम करू लागला. ती आमची त्या वेळची गरजच होती. आकाशवाणी नागपूर केंद्रावर माझे बंधू वामनराव काम करीत होते. तेथे व्हायोलिनवादकाची जागा रिकामी झाली होती. तेथे मी जावे, असे मला सुचविण्यात आले होते. मात्र ज्येष्ठ भावगीतगायक बबनराव नावडीकर यांनी बंधूंना माझ्या भवितव्याविषयी आश्वस्त केले आणि माझ्या शिक्षणाचा आणि पुण्याला परतण्याचा मार्ग मोकळा झाला. स. प. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन मी शिक्षण सुरू केले. एका स्नेहसंमेलनामध्ये माझे व्हायोलिनवादन ऐकून बाबूजींनी मला बोलावून घेतले. पुण्यात ध्वनिमुद्रणाचे काम असेल तेव्हा मी तुम्हाला बोलावून घेईन, असे त्यांनी सांगितले आणि तसे केलेही. ‘प्रभात फिल्म’ कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर असताना त्यांनी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा चित्रपट करण्याचे ठरविले. स्नेहल भाटकर त्याचे संगीतकार होते. कथ्थक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्या नृत्य कार्यक्रमामध्ये मी व्हायोलिनची साथ करीत असे. हे भाटे यांच्याशेजारी राहणारे फ्लूटवादक प्रल्हाद होंबळ यांना ठाऊक होते. त्यांच्याकडे नवीन वादक शोधण्याची कामगिरी असायची. वादक कमी मोबदल्यात उपलब्ध होत असल्यामुळे माझी वर्णी लागली. या चित्रपटातील एक गीत गाण्यासाठी ललिता फडके आल्या होत्या. त्या गाण्याआधी असलेल्या नृत्याच्या तुकडय़ाचे संगीत देताना स्नेहल भाटकर आणि वादक आठ मात्रांचा तुकडा विसरले. त्यामुळे कलाकार समेवर येण्याऐवजी नवव्या मात्रेवर जायचे. हा घोळ मी भाटकर यांच्या लक्षात आणून दिला. एवढेच नव्हे तर तो तुकडा वाजवून दाखविल्यानंतर ते खूश झाले. ही कला तू कशी आत्मसात केली असे भाटकर यांनी विचारले खरे. पण माझ्याकडे तरी त्याचे कुठे उत्तर होते.

bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Milind Gawali And Teja Devkar
पैसे संपले, अभिनेत्रीला कल्पना न देता निर्माते झाले पसार; नेमकं काय घडलेलं? मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

सुधीर फडके यांनी ‘प्रतापगड’ चित्रपटाचे काम पुण्यामध्ये सुरू केले होते. व्हायोलिनसाठी प्रभाकर जोग यांना बोलवा, असे ललिताबाईंनी बाबूजींना सांगितले होते त्यानुसार १९५० मध्ये मी वादक म्हणून त्यांच्यासमवेत काम करण्यास सुरुवात केली. ‘सुवासिनी’ चित्रपटाच्यावेळी मी त्यांचा संगीत साहाय्यक झालो. त्यामुळे साहजिकच पुढे गीतरामायणाचे संगीत संयोजन करण्याची संधी मिळाली. माझ्या घरामध्ये गीतरामायणाच्या तालमी होत असत. वादकांना सूचना देण्यापासून ते ‘ऑर्केस्ट्रा कंडक्ट’ करण्यापर्यंतची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली होती. ती मी यशस्वीपणे पार पाडली. त्याचे प्रतििबब गीतरामायणातील गीतांच्या लोकप्रियतेमध्ये दिसून येते.
बाबूजींचा मी इतका विश्वास संपादन केला होता की, गीतरामायणातील ‘चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला’ हे गीत स्वरबद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली होती. या गीतासाठी अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा आवाज वापरला होता. ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा’ या बाबूजींच्या स्वरातील गीताची अस्ताई मी संगीतबद्ध केली होती. गीतरामायणामध्ये वादकांना शंभर रुपये मिळायचे, तर साहाय्यक असल्यामुळे मला सव्वाशे रुपये मानधन मिळायचे. वादकांचे चहापान करण्यासाठी पैसे खर्च व्हायचे. पण कामामध्ये मिळणाऱ्या आनंदापुढे या पैशांचे मोल वाटायचे नाही. आकाशवाणीवरून आठवडय़ाला एक याप्रमाणे प्रसारित होत असलेल्या गीतरामायणातील निम्मी गाणी होईपर्यंत माझ्याकडे घरामध्ये रेडिओदेखील नव्हता. नंतर मी रेडिओ विकत घेतला. एका अर्थाने ‘गीतरामायण’ हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे असे म्हणता येईल.
माझ्या आयुष्यातली आणखी एक गोष्ट त्याच दरम्यान घडली. रोहिणी भाटे यांच्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी कुसुम वाड ही गायिका येत असे. मी त्यांचा व्हायोलिनवादक होतो. आमचा परिचय झाला आणि त्याचे रूपांतर विवाहामध्ये झाले. कुसुम वाड नीला जोग झाली. ‘लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का’ हे संगीतकार म्हणून मी स्वतंत्ररीत्या स्वरबद्ध केलेले पहिले गीत. पूर्वी आकाशवाणी नवीन गायक, कवी आणि संगीतकारांना संधी देत असे. त्यासाठी ऑडिशन घेतली जात असे. यामध्ये नीलाने सहभाग घेतला होता आणि मला तुमचेच गाणे पाहिजे, असा प्रेमळ स्त्रीहट्ट धरला. त्या वेळी माझ्याकडे स्वत:चे असे कोणतेच गाणे नव्हते. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ हे गाणे मी स्वरबद्ध केले आणि तिने ते गायले. हे गाणे एवढे लोकप्रिय झाले की तिची गायिका म्हणून ओळख झाली. मात्र एचएमव्ही कंपनीने या गीताची ध्वनिफीत (कॅसेट) करण्याचे ठरविले. मात्र त्यासाठी ‘ए’ श्रेणीचा कलाकार हवा ही त्यांची अट होती. नीला ‘बी’ श्रेणीची गायिका होती. त्यामुळे ते गाणे मालती पांडे यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध केले गेले. ध्वनिफीत करण्यासाठी त्याच्या जोडीला ‘कशी मी सांगू वडिलांपुढे, श्रावणातल्या घनमेघांचा रंग मला आवडे’ हे गदिमांचेच गीत घेण्यात आले होते. तर मंदाकिनी पांडे यांच्या स्वरांत ‘सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का’ आणि ‘सोनियाचा पाळणा रेशमाचा डोर’ ही संजीवनी मराठे यांची गीते स्वरबद्ध केली होती.
‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीताची एक वेगळीच गोष्ट आहे. मुळात हे गाणे माडगूळकरांनी ‘लाखाची गोष्ट’ चित्रपटासाठी लिहिले होते. ते स्वरबद्ध करण्यासाठी बाबूजी यांच्यासमवेत मी बसलो असताना राजाभाऊ परांजपे तेथे आले आणि त्यांनी गदिमांना म्हटलं, ‘अण्णा हे गाणं नाही चालणार. गाणं छान आहे, पण मी चित्रपटातील ‘सिच्युएशन’ बदलतो आहे. त्यामध्ये हे गाणं बसत नाही.’’ राजाभाऊंनी नाकारलेला ‘लपविलेला चाफा’ मला उपयोगी पडला. ‘लाखाची गोष्ट’ चित्रपटामध्ये राहून गेलेले हे गाणे जयसिंग सावंत या माझ्या मित्राकडे होते. नीलाने हट्ट केल्यानंतर मला त्याची आठवण झाली. जयसिंग याच्याकडून मी ते गाणं आणलं आणि त्याला चाल लावली. नीलाने ते आकाशवाणीसाठी गायले. आणि या गाण्याने संगीतकार म्हणून माझी ओळख झाली.
‘जावई माझा भला’ हा माझा संगीतकार म्हणून पहिला मराठी चित्रपट. या पहिल्याच चित्रपटासाठी ‘काय मागू मी देवापाशी अंगणी गंगा घरात काशी’ हे गीत आशा भोसले यांनी गायिले होते. मात्र त्या वेळी लता मंगेशकर, आशा भोसले, महंमद रफी आणि किशोरकुमार या पाश्र्वगायकांचा ‘एचएमव्ही’ कंपनीशी रॉयल्टीच्या मुद्दय़ावरून वाद झाला होता. आम्ही गायलेल्या गीताची ध्वनिफीत निघणार नाही, असा निर्मात्याबरोबर करार करून मगच ते चित्रपटासाठी पाश्र्वगायन करीत असत. या वादाचा फटका ‘जावई माझा भला’ चित्रपटाला बसला. चित्रपटातील गीते चांगली असूनही ध्वनिमुद्रिका नसल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचू शकली नाहीत.
पण ‘स्वर आले दुरूनी.. जुळल्या सगळ्या त्या आठवणी’ आणि ‘प्रिया आज माझी नसे साथ द्याया’ अशा गीतांनी मला सुगम संगीतामध्ये मुशाफिरी करता आली याचा आनंद वाटतो. सुधीर फडके यांचा अमृतस्वर लाभलेली ही गीते लोकप्रिय झाली हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही. पण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी सांगीतिक कारकीर्द सुरू झाली त्या बाबूजींनी माझ्या संगीत दिग्दर्शनामध्ये ही गाणी आनंदाने गायिली. जे स्वत: परिपूर्ण संगीतकार-गायक अशा बाबूजींना मी गाण्याची चाल सांगायची म्हणजे माझ्यावर दडपण असायचे. पण बाबूजी हे स्वत:च ते दडपण दूर करायचे. ते अगदी एखाद्या विद्यार्थ्यांसारखं गाणं शिकायला बसायचे. एखादी वेगळी जागा घेतली तर चालेल का, असे ते मला विचारत. ‘तुम्ही सांगता तसे माझ्या गळ्यातून आलेच पाहिजे,’ असे सांगून ते सराव करायचे. यशाच्या शिखरावर असताना मेहनत आणि अचूकतेवर भर देणारा असा दुसरा संगीतकार-गायक मी पाहिलाच नाही.
‘स्वर आले दुरूनी’ या गीताची जन्मकथा रोमांचकारी आहे. एकदा ध्वनिमुद्रण संपवून मी बसने घरी येत होतो. प्रवास सुरू असताना मनात काही वेगळेच चालले होते. एक सुरावट जन्म घेत होती. मग खिशातील पेन काढून बसच्या तिकिटाच्या मागे मी नोटेशन लिहिले. घरी आल्यानंतर संवादिनी घेऊन मी ते गायलो. चाल पक्की झाली. आता त्याला शब्द हवे होते. हे गाणे कोण लिहू शकेल असा विचार करताना माझ्या डोळ्यासमोर संगीतकार यशवंत देव यांचे नाव आले. या चालीला समर्पक शब्द संगीताची जाण असलेले देवसाहेबच देऊ शकतील अशी माझी पक्की खात्री झाली. देव हे त्या वेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर काम करीत होते. मी देवसाहेबांना दूरध्वनी केला आणि त्यावरच मी त्यांना नोटेशन ऐकविले. त्यांनी मला पत्राद्वारे नोटेशन पाठविण्यास सांगितले. त्यांचे उलट टपाली पत्र आले आणि शब्द होते ‘स्वर आले दुरूनी.. जुळल्या सगळ्या त्या आठवणी’. गाण्याचे शब्द खरोखरच दुरून आले होते. हे गीत गाण्याची मी बाबूजींना विनंती केली. त्यांनी या गीताचे सोने केले हे मी वेगळे सांगायला नको. त्याच्या जोडीला दुसरे गीत हवे म्हणून पुन्हा देवांनाच गळ घातली आणि त्यांनी ‘प्रिया आज माझी नसे साथ द्याया’ हे गीत मला दिले. तेही बाबूजींनी अप्रतिम गायले आहे.
प्रपंच चालविताना पैसे लागतात. सुधीर फडके यांच्यासमवेत काम करताना पैसे मिळायचे. पण वाढत्या घरखर्चाची आवश्यकता ध्यानात घेता गरजा भागविण्यासाठी मिळणारे पैसे पुरायचे नाहीत. मग बाबूजी यांच्याशी चर्चा करूनच मी हिंदूी चित्रपटसृष्टीमध्ये वादक म्हणून दाखल झालो. आघाडीच्या सर्वच संगीतकारांच्या स्वररचनांमध्ये व्हायोलिनवादनासाठी मला निमंत्रण असायचे. मदन मोहन यांना माझे वादन आवडत असे. तर ‘मी केव्हा उपलब्ध आहे हे जाणून घेऊनच मग ध्वनिमुद्रण निश्चित करावे,’ असे भूपेन हजारिका आपले साहाय्यक अनिल मोहिले यांना सांगायचे. मी मुंबईमध्ये गेलो तो काळ ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांचा होता. अशा चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक आणि संगीतकार एस. एन. त्रिपाठी खूपच लोकप्रिय होते. त्यांच्याकडेही काम करण्याची संधी मिळाली. ते माझ्याशी छान गप्पा मारत असत. ‘इतना फास्ट नोटेशन लिखनेवाला म्युझिशियन हमने देखा नहीं,’ अशा शब्दांत माझे कौतुक झाले. त्यामुळे मदन मोहन, सज्जाद, एस. डी. बर्मन, रोशन, ओ. पी. नय्यर यांच्यापासून आर. डी. बर्मन, जयदेव, राजेश रोशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, रवींद्र जैन ते अगदी नव्या पिढीेचे म्हणता येतील असे अन्नू मलिक, नदीम-श्रवण, आनंद-मििलद अशा सर्व संगीतकारांबरोबर मी काम केले आहे.
माझ्यासाठी आश्चर्यकारक गोष्ट घडली जेव्हा दादा कोंडके यांनी मला बोलावले तेव्हा. ‘दाम करी काम’ हे सुधीर फडके यांच्या आवाजातील गीत ऐकून दादांनी मला बोलावले होते. मला आश्चर्य वाटले कारण त्यांच्या ‘सोंगाडय़ा’ आणि ‘एकटा जीव सदाशिव’ या चित्रपटांचे संगीत राम कदम यांचे होते. ते त्या वेळी ‘आंधळा मारतो डोळा’ या नव्या चित्रपटाची जुळवाजुळव करीत होते. ते स्वत: गीतकार होते आणि प्रेक्षकांची नस जाणणारे कलाकार होते. त्यामुळे एखादी स्वररचना झाल्यानंतर ती त्यांच्या गळी कशी उतरवायची, दादांना पटवायचे कसे हा माझ्यासाठी काही वेळा त्रासाचा भाग असायचा. या चित्रपटातील सगळीच गाणी आणि माझे संगीत गाजले. ‘हिल हिल हिल हिल पोरी हिला’ या गीताने तर ‘एचएमव्ही’ कंपनीच्या कॅसेट विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला. मात्र हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर दादांनी मला चित्रपट संगीतासाठी कधी बोलावले नाही. याचे गुपित मला त्यांच्या एका मुलाखतीमध्ये वाचायला मिळाले. ‘नवीन माणूस अल्प मानधनात काम करतो. सांगेल तसे ऐकतो आणि आपल्याला हवा तेव्हा उपलब्ध होतो,’ पक्के व्यवहारी असलेल्या दादा कोंडके यांनी ‘पुन्हा प्रभाकर जोग यांना का घेतले नाही,’ या प्रश्नाला अशा शब्दांत उत्तर दिले होते.
पुण्यामध्ये वास्तव्याला आल्यानंतर मी ‘गाणारं व्हायोलिन’ हा वाद्यवृंदासह कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्याचे आतापर्यंत ८०हून अधिक प्रयोग झाले आहेत. फाऊंटन म्युझिक कंपनीने ‘गाणारं व्हायोलिन’ या मराठी कार्यक्रमाच्या सात आणि ‘गाता रहे मेरा व्हायोलिन’ या हिंदूी गीतांच्या सुरावटींच्या पाच सीडी प्रकाशित केल्या आहेत. स्वराधीन आयुष्य लाभले याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे. ते असंच सुरात राहील याची खात्री आहे..

शब्दांकन – विद्याधर कुलकर्णी
vidyadhar.kulkarni@expressindia.com