‘दृष्टिभवन’ या अंधांच्या संस्थेतील तरुण मुलींना चन्द्रिका चौहान यांच्या ‘उद्योगवर्धिनी’च्या रूपाने एक दमदार, आश्वासक हात मिळालाय. आज या अंध मुली आपल्या पायावर उभ्या आहेत. ‘मंगल दृष्टीभवन’च्या रूपाने त्यांना माहेर मिळालेलं आहे. त्या स्वाभिमानाचे आणि आत्मविश्वासाचे आयुष्य जगत आहेत. त्यांच्याविषयी..
त्यां ना दृष्टीचे वरदान मिळाले नाही, पण म्हणून स्वत:वर दुर्दैवीपणाचा शिक्का मारून घेत याचनेची ओंजळ पसरून लोकांपुढे उभे राहणे त्यांना मंजूर नव्हते. त्यांना काम हवे होते. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी, संसाराला हातभार लावण्यासाठी आणि मुलांना शिकवण्यासाठी. त्यासाठी नवी कौशल्ये शिकण्यास त्या उत्सुक होत्या आणि कष्टांना त्यांचा नकार नव्हता. जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून हवी असते तेव्हा ती वाट शोधत तुमच्यापर्यंत येतेच असे म्हणतात. या मुलींच्या बाबतीत तसेच काहीसे घडले..
ही गोष्ट सोलापूरमधील ‘दृष्टिभवन’ या अंध संस्थेतील तरुण मुलींची. दृष्टिहीन मुला-मुलींसोबत गेल्या काही वर्षांपासून काम करणाऱ्या सतीश मालू यांच्या पुढाकाराने ही संस्था सुरू झाली. या मुला-मुलींसाठी पुस्तक वाचून दाखवणे, त्यांना अभ्यासात मदत करणे, या हेतूने दमाणी अंधशाळेत वारंवार जाणाऱ्या सतीश मालूंना एक बाब सतत खटकत होती. ती म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत दृष्टिहीन मुली शासकीय अंधशाळेत राहू शकतात. पण त्यानंतर काय? ज्या वयात मुलींना सर्वाधिक सुरक्षिततेची गरज असते त्या वयातील दृष्टिहीन मुलींच्या भवितव्याचा शासन दरबारी काहीही विचार झालेला नाही. अशा मुलींच्या निवासाची आणि पुढील रोजगाराच्या शिक्षणाची सोय करण्याचा ध्यास मग मालू आणि त्यांच्या मित्रांनी घेतला आणि ‘दृष्टिभवन’ उभे राहिले. जोपर्यंत शासकीय सोय आहे, मदतीची रसद सरकारकडून मिळते आहे, तोवर आम्हाला शिक्षण मिळेल, पण मदतीचा वाटा बंद झाला की आमचे कुटुंब आम्हाला घरात डांबून ठेवेल. आम्ही कुठे धडपडलो. हात-पाय मोडला तर बघायचे कोणी, यापेक्षा घरात कोंडून ठेवलेले बरे, असे वारंवार सांगणाऱ्या या तरुण मुलींची तगमग मालू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सतत काही तरी करण्यास प्रोत्साहित करीत होती.
अठरा वर्षांपुढील तरुण मुलींसाठी असलेली ही निवासी शाळा चार वर्षांपूर्वी सुरू झाली. शाळेत येणाऱ्या मुलींपैकी कोणी दहावी पास, तर एखादी बी.ए. किंवा डी. एड्.पर्यंत मजल मारून आलेली. पण रोजचे स्वावलंबी जीवन जगण्यासाठी हे पुस्तकी शिक्षण त्यांच्यासाठी पुरेसे नव्हते. स्वत:चे केस विंचरणे, चहा-नाश्ता करणे, स्वत:पुरती पोळी -भाजी बनवता येणे हे शिकायला मिळणे ही मुलींची गरज आणि मागणी होती. त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक मुलीला आधी वैयक्तिक स्वच्छतेबरोबर स्वत:चा चहा, नाश्ता, डाळ-भाताचे जेवण बनवण्याचे शिक्षण सुरू झाले आणि त्यापाठोपाठ परिसर स्वच्छतेचेही. घर झाडणे, पुसण्याचे हे साधे शिक्षणही आजवर मुलींना कधी मिळाले नव्हते कारण त्यांना ते जमणार नाही असाच कुटुंबाचा समज होता! या गोष्टी सफाईने जमू लागल्या तेव्हा या मुलींच्या मनातील स्व-प्रतिमा आधिकाधिक उजळत गेली. आता त्यांना काम हवे होते. नवे आव्हान आणि त्याबरोबरीने येणारा नवा आत्मविश्वास त्यांना खुणावत होता.. ‘दृष्टिभवन’च्या विश्वस्तांनी मग या तरुण मुलींना जमतील अशी काही कामे शोधली. कागदी पिशव्या करणे, तंबाखूचे गोटे करणे अशा प्रकारची. पण हवी तशी गती, दिशा त्या कामाला येत नव्हती. आपापले व्यवसाय-व्याप सांभाळून काम बघणाऱ्या विश्वस्तांना या मुलींनी बनवलेल्या वस्तूंचे मार्केटिंग करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता, इच्छा असूनही. त्यामुळे मुलींना मोबदलाही अगदी जुजबी मिळत होता. या मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन मग व्यवसाय मिळवून देण्यासाठी मदत करू शकेल अशा एखाद्या सहकाऱ्याचा शोध मग या विश्वस्तांनी सुरू केला आणि एक दमदार, आश्वासक हात पुढे आला तो चन्द्रिका चौहान यांच्या ‘उद्योगवर्धिनी’च्या रूपाने..
सोलापूरमधील वंचित स्त्रिया व वृद्धांसाठी विविध पातळ्यांवर काम करणाऱ्या चन्द्रिकाताईंना एव्हाना स्वप्ने पडू लागली होती, ती निराधार वृद्ध स्त्रियांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्याची. त्यामुळे ‘दृष्टिदान’ने त्यांना जेव्हा सहकारी होण्याची विनंती केली. तेव्हा चंद्रिकाताईंनी फारसा उत्साहवर्धक प्रतिसाद दिला नाही. पण मग ‘दृष्टिदान’च्या विश्वस्तांनी एक पाऊल पुढे टाकले आणि म्हटले, या दृष्टिहीन मुलींच्या वसतिगृहातच या वृद्ध, निराधार स्त्रियांची व्यवस्था करू या! निराधार आज्यांना नाती मिळतील आणि नातींना आजीची माया..
आज ‘दृष्टिभवन’चे रूपांतर ‘मंगल दृष्टी भवन’मध्ये झाले आहे. तीन निराधार वृद्धा आता इथे कामासाठी येणाऱ्या ९-१० नातींबरोबर दिवस घालवतात. आतापर्यंत ‘दृष्टिभवन’मध्ये राहायला आलेल्या सात मुली लग्न करून आपापल्या घरी राहायला गेल्या आहेत आणि आता तेरा अंध मुली सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळात इथे येऊन रोजगाराचे शिक्षण घेत, काम करीत, आपल्या पायावर उभ्या राहत आहेत.
चंद्रिकाताईंनी या मुलींमध्ये आधी आत्मविश्वासाची प्रखर ठिणगी चेतवली. कोणतेही काम त्यांच्यासाठी अवघड-अशक्य नाही असे सांगत! आणि मग त्यांच्या हाती सोपवले शिवणाचे मशिन. आधी टीप घालायला शिकवली. मग पिशव्या शिवण्याची कला शिकवली. सफाईने, सरळ टीप घालता येईल की नाही अशी स्वत:बद्दलच शंका घेणाऱ्या या मुली आता अगदी आत्मविश्वासाने पिशव्या शिवू लागल्या आहेत. सोलापूरमधील स्त्रिया म्हटल्यावर जे काम नक्कीच शिकावे लागते ते शेंगदाणा-चटणी कुटण्याचे. थोडी भरड, थोडीशी ओलसर आणि चविष्ट चटकदार अशी ही सोलापूरची शेंगदाणाचटणी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या सीमा ओलांडून इंग्लंड-अमेरिकेत गेली आहे. प्रचंड मागणी असलेली ही चटणी या मुलीही आता मोठय़ा सफाईने कुटू लागल्या आहेत. दाणे सोलणे, पाखडणे, मग कुटणे आणि मग परत तिखट-मीठ घालून कुटणे असे हे दुहेरी कांडणाचे काम या सगळ्या करतात. पाच किंवा दहा किलोच्या मापाने त्यात घालायचं तिखट-मीठ काढून देण्याचे काम त्यांच्या रेक्टर असलेल्या रजनीताई भाटिया करतात. या मुलींनी कुटलेली चटणी आज सोलापूरच्या दुकानांखेरीज सांगली-पंढरपूपर्यंत जाते आहे.
स्त्रियांसाठी रोजगाराच्या नव्या संधी आणि मार्ग शोधणाऱ्या चंद्रिकाताईंनी या मुलींना आणखी एक कौशल्य शिकवले आहे, ते कापडी फुलांचे गुच्छ बनवण्याचे. मणी, मोती, तारेत ओवून केलेले हे गुच्छ खऱ्या फुलांच्या गुच्छाइतके डौलदार आणि आकर्षक दिसू लागले, बनू लागले; तेव्हा त्याचेही जोरदार मार्केटिंग ‘उद्योगवर्धिनी’ने सुरू केले.
आज ‘मंगलदृष्टी’मध्ये काम करणाऱ्या मुली सोलापूर शहराच्या वेगवेगळ्या वस्त्यांमधून येतात. सुजाता सुरवसेसारखी एखादी तरुणी दोन बसेस बदलून सकाळी येते. सकाळी पोळी-भाजी खाऊन निघालेल्या या तरुण मुलींना दिवसभर काम करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेसाठी पुरेशा इंधनाची गरज आहे, हे चंद्रिकाताईंच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी स्वत:हून दुपारी मुलींना आमटी-भाताचे साधे, पण पोटभर जेवण सुरू केले आणि त्याचा निश्चित दृश्य परिणाम मुलींकडून केल्या जाणाऱ्या कामावर आला. चार घास गरम जेवण आणि कामाच्या मानधनात थोडीशी वाढ होताच या मुली दुप्पट वेगाने कामाला लागल्या. आणि वरण-भातावर मायेने तुपाची धार सोडावी तशी आणखी एक छोटीशी कृती चंद्रिकाताईंनी केली. श्रावणातील शुक्रवारी सगळ्या मुलींना पुरणा-वरणाचे जेवू घालून त्यांची ओटी भरली. सवाष्णींची ओटी घरोघरी भरतात तशी. ऊब देणारे माहेरही पाठीशी नसलेल्या अनेक मुली पुरणपोळी खाता-खाता रडत होत्या..!
आज या मुलींपैकी प्रत्येक जण दिवसाला कमीत कमी ७५ रुपये मिळवतात. ‘मदत म्हणून साडी-चोळी किंवा पैसे देणारे खूप भेटतात पण आम्हाला दया नको होती. काम हवे होते. ताठपणाने उभे करणारे,’ असे एखादी सुजाता किंवा माया म्हणते तेव्हा स्वाभिमानाने जगण्याची त्यांची इच्छाच त्यातून व्यक्त होत असते. या इच्छेला तथास्तु म्हणण्यासाठी कोणी तरी पुढे व्हावे लागते. सुजातासोबत माया रणसुभे, गीता जाधव, सरला मराठे, ललिता गायकवाड, सुरेखा कांबळे, सुरेखा पाठक, प्रियांका मेंडके, अरुणा सुगरे, चैताली झळकोटे, कुसुम पांचाळ, लक्ष्मी अवनुरे, रुक्मिणी चननाळ या सगळ्या जणींचे भाग्य असे, की सतीश मालू आणि चंद्रिकाताई आशीर्वाद होऊन त्यांच्या आयुष्यात लाभले आहेत..