प्रतिभा वाघ
लहानपणी आईवडिलांना मदत व्हावी म्हणून बालपण विसरून मोलमजुरीचं काम करणाऱ्या, लहान वयातच लग्नाचे आणि संघर्षांचे चटके सोसून माहेरी परतावं लागलेल्या दुलारीदेवी. चित्रकारांच्या घरी काम करण्याच्या निमित्तानं त्या जातात, कला शिकतात आणि ती कला मनापासून फुलवतात.. बिहारमधील दुलारी देवींचा ‘पद्मश्री’ पुरस्कारापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.
अंगणातल्या मातीवर पाणी शिंपडून ती ओलसर करून वाळलेल्या काटकीनं त्यावर चित्र काढत बसणारी एक छोटीशी मुलगी. आईवडील तिला रागानं म्हणत, ‘‘मजुरी करायला येणार आहेस की दिवसभर चित्रंच काढत बसणार आहेस?’’ मग ती मुलगी आईबरोबर लोकांच्या शेतात मजुरीसाठी जाई, लोकांच्या घरी भांडी घासायला जाई. बिहारमधील मधुबनी जिल्ह्य़ामधील राटी या छोटय़ा गावातील ही मुलगी एका मासेमारी करणाऱ्या कुटुंबातील. वडील आणि भाऊ यांच्याबरोबर ती मासे पकडायला, मासे विकायलाही जाई. अतिशय गरिबीची परिस्थिती असल्यामुळे कधीकधी उपाशीपोटी झोपावं लागे. आईवडिलांनी वयाच्या बाराव्या वर्षीच तिचं लग्न लावून दिलं. नवरा आणि सासू खूप त्रास देत. सहा-सात वर्ष कशीबशी रेटली. त्यानंतर तिनं एका मुलीला जन्म दिला, पण सहा महिन्यांची असतानाच मुलीचा मृत्यू झाला. नंतर ती माहेरी परत आली ती कायमचीच.
हे सगळं सोसणारी ‘ती’ मुलगी म्हणजे दुलारी देवी. या वर्षी त्यांना मधुबेनी पेंटिंगकरिता ‘पद्मश्री’ घोषित झाली. त्यांचं जाहीर अभिनंदन करण्यासाठी बिहार सरकारनं एक कार्यक्रम आयोजित केला. त्या वेळी त्यांचे खूप फोटो काढले गेले. दुलारी देवींच्या डोळ्यांत अश्रू दाटले, ते पुसत त्या उद्गारल्या, ‘‘माझे खूप खूप फोटो काढावे असं मला लहानपणी वाटत असे आणि ती माझी इच्छा आता या ‘पद्मश्री’मुळे पूर्ण झाली!’’ दुलारी देवींशी संपर्क साधल्यावर अतिशय मोकळेपणानं आणि आत्मविश्वासानं त्या बोलत होत्या. त्यांच्या आवाजातून आनंद ओसंडत होता. त्या म्हणाल्या, ‘‘पद्मश्री मिळेल असं मला वाटलं नव्हतं.’’ त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवली. निसर्गातील नदीनाले, पशूपक्षी आपल्याला खूप शिकवतात, निर्भयपणे पुढे जायला मदत करतात. अनुभवाच्या विश्वविद्यालयात दुलारी देवींसारख्या व्यक्ती मनापासून, तळमळीनं, संकल्पसिद्धीच्या निर्धारानं जी पदवी मिळवतात त्यापुढे विश्वविद्यालयातील सर्वश्रेष्ठ पदवीसुद्धा फिकी पडते!
‘मधुबनी’ ही कला रामायण काळापासून आहे असं मानलं जातं. मिथिला हे जनकाचं राज्य, सीता ही त्यांची ‘दुलारी’ आणि याच मिथिलेमधील आज ‘पद्मश्री’ मिळवणाऱ्या या दुलारी देवी! काय योगायोग पाहा! मधुबनी चित्रं द्विमित असतात. आकाराची बाह्य़रेषा दुहेरी असते. या दोन रेषा म्हणजे सत्य आणि शिव या दोघांनी मिळून सृष्टीची रचना होते, असं मधुबनी चित्रकार मानतात. नैसर्गिक पद्धतीचे रंग, भिंत, कागद, कापड हा पृष्ठभाग आणि पौराणिक, सामाजिक, नैसर्गिक विषय. आईकडून मुलीकडे, सासूकडून सुनेकडे आलेली, स्त्रियांनी जपलेली ही कलापरंपरा असून सर्वाधिक चित्रं रामायण या विषयावर आणि आवडता विषय ‘सीता स्वयंवर’ असतो.
दुलारी देवी सांगतात, ‘‘मी चित्र करायला शिकले तेव्हापासून चित्रनिर्मितीला मी देवपूजा मानते. एक दिवस जरी ही पूजा माझ्या हातून घडली नाही तरी मी अस्वस्थ होते.’’ दुलारी देवींचं आयुष्य नाटय़मय आहे असंच म्हणावंसं वाटतं. कारण माहेरी परत आल्यावर त्या आपल्या आईसोबत घरकाम करू लागल्या ते दोन मधुबनी चित्रकर्तींच्या घरात! पद्मश्री महासुंदरीदेवी आणि त्यांच्या जाऊबाई चित्रकार कर्पूरीदेवी. केर-लादी करताना, भांडी घासताना अधूनमधून दुलारी देवी त्या दोघींच्या चित्रांचं निरीक्षण करत. ‘मलाही असं चित्रकार व्हायचं आहे,’ हा विचार सतत त्यांच्या मनात रुंजी घाली. पण कागद घेण्यासही पैसे नसत. त्यांना सहा रुपये महिना पगार मिळत असे. शिवाय मधुबनी चित्रकला कायस्थ ब्राह्मणांची मक्तेदारी समजली जात असे. त्यामुळे तीव्र इच्छा असूनही त्याविषयी त्या बोलू शकत नव्हत्या. पण कर्पुरीदेवींनी त्यांना मुलीप्रमाणे मानलं आणि खूप प्रेम दिलं. दुलारी देवी त्यांना ‘दायजी’ म्हणत.
शासनातर्फे मधुबनी चित्रकलेचा एक प्रशिक्षण कार्यक्रम कर्पुरीदेवींकडे राबवला जाणार होता. ‘त्या कार्यक्रमात मला घ्यावं,’ अशी इच्छा दुलारी देवींनी दायजींकडे व्यक्त केली आणि ती पूर्णही झाली. बॉर्डर, रेषा, स्केच या गोष्टी दुलारी देवी शिकल्या. दायजींनी त्यांना स्वत:चं नाव आणि गावाचं नाव लिहिण्यासही शिकवलं. दायजींची मुलं नोकरीनिमित्त दिल्लीत स्थिर झाल्यामुळे त्या एकटय़ाच राहात होत्या. दुलारी देवी सांगतात की, कर्पूरीदेवी स्पृश्य-अस्पृश्य भेद मानत नसत. त्यांनी त्यांच्या घरी मला राहाण्यास सांगितलं, आईसारखी माया दिली. दुलारी देवी उत्तम चित्रं काढू लागल्या. १९९९ मध्ये त्यांच्या चित्राला ललित कलेचा पुरस्कार मिळाला. २०१२ मध्ये राज्य पुरस्कार मिळाला. शिक्षाकला माध्यम संस्थेद्वारे बंगळूरुमधील विविध शिक्षण संस्था, सरकारी, गैरसरकारी इमारतींच्या भिंतींवर मधुबनी चित्रं काढण्याचं काम सलग पाच वर्ष त्यांनी केलं. भारतात अनेक ठिकाणी मधुबनी चित्रांच्या कार्यशाळा घेतल्या. बिहारची राजधानी पटना येथील कलासंग्रहालयात त्यांचं ‘कमलेश्वरी’ हे कमलानदी पूजेचं चित्र आहे. ‘तारा बुक’तर्फे ‘फॉलोइंग माय पेंट ब्रश’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. यात दुलारी देवीची आत्मकथा चित्ररूपात आहे. मार्टिन ली कॉज यांच्या ‘अ मिथिला’ या फ्रेंच भाषेतील पुस्तकात दुलारी देवींच्या पेंटिंगचं सुंदर वर्णन आलं आहे.
बिहारमधील मधुबनीसाठी दुलारी देवींना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा असा सातवा पुरस्कार आहे. यापूर्वी सहा चित्रकर्तीना तो मिळाला आहे आणि राटी गावातील दुलारी देवी या तिसऱ्या पद्मश्री मिळवलेल्या चित्रकर्ती आहेत. राटी गावातील मधुबनी चित्रांचं वैशिष्टय़ म्हणजे फक्त एका रंगातील, रेषांमधील चित्र. या प्रकाराला ‘कझनी’ असं म्हणतात. तर रंग भरलेल्या चित्राला ‘भरनी’ असं म्हणतात. कझनी आणि भरनी या दोन्ही तंत्रांत दुलारी देवी कुशल आहेतच, याशिवाय ‘धरती भरना’ (पार्श्वभूमी पूर्णपणे रंगवणं), चित्राच्या सर्व बाजूंनी विस्तृत किनार, उत्स्फूर्तता, सहजता, हे सर्व त्या उत्तम प्रकारे साधतात. त्यांची कल्पनाशक्ती, सर्जनशक्ती वाखाणण्याजोगी आहे.
५४ वर्षीय दुलारी देवी हसतमुखानं, गाणी गात चित्रनिर्मिती करतात. त्यांनी प्रचंड मेहनतीनंतर यश मिळवलं आहे. अंगणातील जमिनीपासून सुरुवात करून कागद, कॅनव्हास, भिंतीवरील अठरा फुटांची चित्रंही त्या लीलया रंगवतात.
२५ ते ३० वर्षांची अखंड साधना त्यांच्या चित्रांमागे आहे. त्यामुळे सारी चित्रं परिपूर्ण असतात. त्यांच्या चित्रात फक्त धार्मिक विषयच नाही, तर समकालीन विषयही आढळतात. ‘बेटी बचाव’, ‘बेटी को पढाइयें’ अशा अनेक विषयांवर त्या चित्रं काढतात. यांनी काढलेले गणपती कलारसिकांना खूपच आवडतात. दुलारीबाई हसत हसत सांगतात, ‘‘मी ‘गणेशजी’ रंगविले की कोणी ना कोणी तरी ते विकत घेतात. गणेशजी मेरे पास रहतेही नहीं!’’
आपलं हरवलेलं बालपण त्या लहान मुलांमध्ये शोधतात. मातृप्रेमाची ओढ त्यांना मुलांमध्ये रमवते. त्यांनी आतापर्यंत अनेक मुलांना ‘मधुबनी’साठी मार्गदर्शन केलं. त्या सगळ्यांचे त्यांना पद्मश्री जाहीर झाल्यावर अभिनंदनाचे फोन आले होते, हे सांगताना त्यांचा चेहऱ्यावर वेगळंच तेज दिसतं. त्यांच्या अंगणात अनेक मुलं चित्रं काढायला येऊन बसतात, त्यांच्याकडे पाहून दुलारी देवींचं आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न निश्चितच पूर्ण होईल याची खात्री वाटते.
plwagh55@gmail.com