‘‘संगीतात ऐंशी र्वष काढल्यानंतरही हे विश्व मला सागराप्रमाणे अथांग वाटतं. त्याची खोली अजूनही कळत नाही. मी गायलेल्या एका बंदिशीचे शब्द आहेत, ‘ढुँढूँ बारे सैंया तोहे सकल बन बन.. बिदन तिहारी कोऊ न जाने..’ संगीताचं मर्म समजलंय असं वाटत असतानाच त्याची ओढ मात्र अजूनही स्वस्थ बसू देत नाही..’’ सांगताहेत, जयपूर-अत्रौली घराण्याच्या जेष्ठ गायिका धोंडूताई कुलकर्णी.
बनारसमधील गंगेचं विशाल आणि अथांग पात्र. नुसती नजर टाकली तरी भिरभिरावी असं. घाटावर जमलेला श्रोतृवृंद गाणं ऐकायला अधीर झालेला. आणि कलावंतासाठी व्यासपीठ कुठे, तर गंगेच्या पात्रात. होय, चक्कनदीच्या पात्रात तरंगत्या नौकेवर! या नौकेवर बसून गाणं म्हणायचं? मी चकित झाले. आजवर शेकडो मैफली केल्या. पण हा अनुभव अनोखा होता. संयोजकांना म्हणाले, ‘अहो या नावेत बसून मी कशी गाणार? नाव डगमगणार नाही का? आणि श्रोते एवढय़ा दूर. त्यांना गाणं ऐकू जाईल का?’  ते म्हणाले, ‘तुम्ही अजिबात चिंता करू नका. नाव डगमगणार नाही. आवाज श्रोत्यांपर्यंत व्यवस्थित जाईल.’ मी शंकित मनानंच त्या व्यासपीठावर बसले. नौकेला चहूबाजूंनी कंदील लावलेले. घाटावरून नौकेवर प्रकाशझोत सोडलेला. दोन बाजूंना बसलेल्या दोन नावाडय़ांनी होडी स्थिर ठेवलेली. समोर श्रोते, इकडे मी आणि मध्ये गंगेचा प्रवाह. त्या स्थितीत मी गायले. मनात विचार आला, अशी मैफल कुठल्या कलावंताची झाली असेल? त्या दिवशी गायले तो आनंद अलौकिकच होता. बनारस रेडिओचे मोठे अधिकारी आणि रसिकाग्रणी जयदेवसिंह हे माझ्या गाण्याचे चाहते होते. त्यांच्या निधनानंतर पहिला स्मृतिदिन माझ्याच गाण्यानं व्हावा, ही संयोजकांची इच्छा होती. बनारस हिंदू विद्यापीठातील आनंद कृष्ण यांनी ती इच्छा अशा प्रकारे पूर्ण केली. सोबत त्यांच्या संस्थेच्या वतीनं भलंथोरलं मानपत्र देऊन माझा गौरवही केला.
आठ वर्षांपूर्वीच्या त्या मैफलीची आठवण जागी झाली म्हणजे मनात विचार येतात.. गंगेच्या त्या पात्रासमोर मी केवढी, माझं गाणं केवढं! खरं तर वयाची ऐंशी वर्षे गाण्याखेरीज दुसऱ्या कशाचाच विचार केला नाही. पण एवढय़ा वर्षांच्या साधनेनंतरही त्या संगीत सागरासमोर स्वत:ला लीन समजण्याएवढा विनम्रभाव आला कोठून.. तर त्या संगीतातूनच!
जयपूर-अत्रौली घराण्याची बुजुर्ग गायिका म्हणून आज माझा गौरवानं उल्लेख केला जातो. आता लक्षात येतं, हा गौरव वाटय़ाला येण्यासाठी किती साधना करावी लागली. कोल्हापूरजवळच्या हिरवडे गावातील गणेश नारायण कुलकर्णी या सामान्य शिक्षकाच्या घरात जन्मलेली मी. योग्य वयात लग्न करून संसारी बाई म्हणून स्थिरावले असते तर आज कुणाच्या खिजगणतीतही नसते. पण माझी वाट वेगळी असावी. वडिलांना गाणं शिकायची खूप आवड होती. ते थोडंफार शिकलेही होते. पण प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे पुढे त्यांना जमलं नाही. पहिलं मूल होईल त्याला मी गाणं शिकवीन हा त्यांचा ध्यास होता. मुळात माझ्याआधीची तीन भावंडं जगलीच नाहीत. त्या काळी प्रथा अशी की, न जगलेल्या अपत्यांच्या पाठची मुलगी जगावी म्हणून तिला दगडधोंडय़ासारखं धट्टंकट्टं नांव द्यायचं. त्याच हेतूनं मला ‘धोंडूताई’ नाव मिळालं. जन्मदिवस होता २३ जुलै १९२७.  माझ्या पाठीवर एक भाऊ आणि एक बहीण झाली. पण गाणं मलाच मिळालं. वयाच्या पाचव्या वर्षांपासून गाणं शिकायला लागले. वडिलांनी माझ्यासाठी चांगल्या गुरूचा शोध सुरू केला. मला लहानपणापासूनच घराण्याची तालीम मिळावी हा त्यांचा प्रयत्न होता.
 पाचव्या वर्षांपासून मी कोल्हापुरात उस्ताद नत्थनखॉँ यांच्याकडे शिकले. आठव्या वर्षी ऑल इंडिया रेडिओ मुंबईवर माझं गाणं झालं. जयपूर-अत्रौली घराण्याचे थोर गायक उस्ताद अल्लादियाखॉँ यांचे चिरंजीव भूर्जीखॉँ हे त्या काळात कोल्हापूरला होते. महालक्ष्मी मंदिरात दररोज पहाटे काकड आरतीच्या आधी भूर्जीखाँ शास्त्रीय गायन करीत. कोल्हापूरच्या शाहूमहाराजांनीच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती. वडिलांनी मला शिकवण्यासंबंधी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला टाळण्याच्या हेतूने प्रचंड फी सांगितली. तेवढी फी देणं कल्पनेतही शक्य नव्हतं. मात्र, महालक्ष्मी मंदिरात रोज पहाटे त्यांचं गाणं ऐकायला जाणं हा आमचा नित्यक्रम बनला. एखाद्या वेळी भूर्जीखॉँ आजारी असले तर आम्ही तिथं गात असू. माझी ती जिद्द पाहून अखेर भूर्जीखॉँ कोणत्याही अटीविना मला शिकवायला तयार झाले. १९४० ते १९५० या काळात त्यांनी मला शिक्षण दिलं. जयपूर-अत्रौली घराण्याची गायकी मला शिकविली. याच काळात मी रेडिओची ए ग्रेड आर्टिस्ट झाले.
१९५० मध्ये भूर्जीखॉँ यांचं अकाली निधन झालं आणि त्यांच्यानंतर गुरू कोण हा प्रश्न उभा राहिला. तब्बल सात वर्षे मी कोणत्याही गुरूविना गाण्याची साधना केली. या काळात आमचं वास्तव्य हैदराबादला आमच्या मामाकडे होतं. तिथं खूप मैफली केल्या. रेडिओवर गायले. पण समाधान मिळत नव्हतं. सात वर्षांनी आम्ही पुन्हा कोल्हापूरला आलो. अल्लादियाखाँसाहेबांच्या शिष्या लक्ष्मीबाई जाधव – ज्या बडोदा दरबारच्या गायिका होत्या- नोकरी सोडून कोल्हापुरात आल्या होत्या. त्यांच्याकडे मी शिकू लागले. त्याच काळात भूर्जीखॉँसाहेबांचे चिरंजीव अजीजुद्दिनखॉँ यांना भेटले. त्यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळालं. तो तीन वर्षांचा काळ म्हणजे माझ्या संगीतशिक्षणाचा सुवर्णकाळच होता. अजीजुद्दिनखॉँ आणि लक्ष्मीबाई या दोघांनीही मला खूप स्नेह दिला. त्यांच्याच कृपेनं अल्लादियाखॉँसाहेबांना प्रत्यक्ष भेटायची संधी मिळाली. लक्ष्मीबाईंनी तर माझ्यावर मुलीप्रमाणे लोभ केला. त्या काळात लोक विचारत, ‘काय हो, लक्ष्मीबाईंनी तुम्हाला दत्तक घेतलंय का?’ लक्ष्मीबाई एवढय़ा थोर की, एका टप्प्यावर त्यांनी मला सांगितलं, ‘मी शक्य तेवढं तुम्हाला शिकवलंय. आता केसरबाई तुम्हाला शिकवतात का बघा.’
केसरबाईंकडे गाणं शिकायचं? नुसत्या कल्पनेनंच मी मोहरून उठले. पण अनामिक भीतीनं दडपणही आलं. मुळात उस्ताद अल्लादियाखॉँसाहेब हेच पहाडासारखं व्यक्तिमत्त्व. त्यांची शागिर्दी भल्याभल्यांना मिळत नसे. त्यांच्या पट्टशिष्या केसरबाई हे तर त्या काळी तळपणारं नाव होतं. ‘तुमच्याकडून मी एकटी शिकणार, दुसऱ्या कुणालाही तुम्ही शिकवायचं नाही,’ अशी अट अल्लादियाखॉँसाहेबांना घालून त्याप्रमाणे तब्बल दहा र्वष त्यांची तालीम घेतलेल्या केसरबाई! प्रकांड बुद्धिमत्ता, तेजस्वी गायन, श्रोत्यांना जरबेत ठेवणारा मनस्वी स्वभाव ही केसरबाईंची गुणवैशिष्टय़ं ऐकून माहीत होती. त्यांची नजर म्हणजे ‘हंड्रेड पॉवरचे दोन दिवे’.. दहा दहा र्वष तालीम घेतलेले लोक दहा मिनिटंदेखील त्यांच्यासमोर उभे राहू शकत नाहीत.. असं बरंच ऐकून होते. अत्यंत मेहनतीचं गाणं होतं केसरबाईंचं. पहाटे तीन वाजता उठून सात वाजेपर्यंत रियाझ, मग थोडासा नाश्ता करून दुपापर्यंत पुन्हा रियाझ हा त्यांचा दिनक्रम असे. अनेक तरुण गायिकांना त्यांनी शिकवायला नकार दिला. गाणं शिकवणं हे बाईमाणसाचं काम नव्हे, गाणं उस्तादांनीच शिकवावं असं त्या म्हणत. अतिशय विद्वान बाई. कोण किती पाण्यात आहे, हे त्यांना लगेच कळायचं. अशा या केसरबाईंकडे मी कशी गेले याची एक कथाच आहे.
 १९६०-६१ चा काळ असेल. दादर-माटुंगा सर्कलमध्ये केसरबाई केरकरांचं गाणं होतं.‘लोकसत्ता’चे तेव्हाचे संपादक ह. रा. महाजनी श्रोत्यांमध्ये होते. गाणं झाल्यावर महाजनी केसरबाईंना म्हणाले, ‘बाई, तुमचं गाणं ऐकून अल्लादियाखॉँसाहेबांची आठवण होते. पण तुमच्यानंतर पुढे कोण?’ केसरबाईंना तो प्रश्न आवडला नसावा. पण त्या शांतपणे म्हणाल्या, ‘महाजनी, आज शिकून उद्या रेडिओवर गाणारे कधी उस्ताद बनू शकतात का? मी ज्याप्रमाणे मेहनत घेतली तेवढी मेहनत घेणारं कुणी आलं तर मी जरूर शिकवीन. असा कुणी मिळाला तर तुम्ही माझ्याकडे घेऊन या.’
महाजनी-केसरबाई भेटीचा हा वृत्तांत ‘लोकसत्ता’मध्ये छापून आला. केसरबाई केरकरांचं आव्हान वाचून कुणीही त्यांच्यापर्यंत जाण्याचं धाडस केलं नाही. त्या वेळी मी इंदोरला होते. अल्लादियाखॉँसाहेबांचे नातू अजीजुद्दिनखॉँ यांनी ‘लोकसत्ता’च्या बातमीचं कात्रण पत्रासोबत मला पाठवलं आणि केसरबाईंचं हे आव्हान पेलण्याची ताकद केवळ तुमच्यात आहे, तुम्ही त्यांना पत्र लिहा. असंही कळवलं. मी केसरबाईंना पत्राद्वारे माझी सर्व माहिती कळवली. तुम्ही शिकवणार असाल तर मुंबईला यायची माझी तयारी आहे, असं लिहिलं. त्यांच्याकडून उत्तर येणार नाही या भ्रमात मी होते. पण माझ्या सुदैवानं उत्तर आलं. धडधडत्या हृदयानं मी पत्र वाचू लागले. त्यांनी लिहिलं होतं, ‘इतक्या लोकांकडे गाणे शिकूनही तुम्हाला अजूनही शिकावेसे वाटते, याचे मला कौतुक वाटते. तुम्हाला माहीतच असेल, या घराण्याची तालीम कशी दिली जाते. आता मी बहात्तर वर्षांची आहे. या वयात मी शिक्षण देऊ शकेन का याविषयी शंका वाटते. पण तुम्ही या. जमेल तेवढे शिकवू.’ ते वर्ष होतं १९६२.
केसरबाईंनी होकार देताच माझ्या वडिलांनी कोल्हापूरचं घरदार विकून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. बाईंना भेटण्यासाठी आम्ही गेलो तेव्हा बिर्ला मातुश्री सभागृहात त्यांचं गाणं होतं. अजीजुद्दिनखॉँ आम्हाला त्यांच्याकडे घेऊन गेले. आम्हाला पाहताच बाईंनी माझ्या येण्याचा हेतू ओळखला असावा. मला त्यांनी तानपुऱ्यावर साथीला बसायला सांगितलं.
केसरबाईंची तालीम हा माझ्या गायनशिक्षणाचा कळसाध्याय होता. तब्बल दहा र्वष, म्हणजे त्यांच्या मृत्यूपावेतो त्यांनी मला शिक्षण दिलं. मी त्यांच्याकडे कशाकरिता गेल्येय हे त्यांना पुरेपूर माहीत होतं. म्हणूनच पहिल्या दोन वर्षांत त्यांनी मला जे हवं होतं ते शिकवलंच नाही. माझी परीक्षाच घेत असाव्यात जणू. दोन वर्षांनंतर मात्र त्यांची खात्री पटली आणि लोणावळ्याच्या एक महिन्याच्या मुक्कामात त्यांनी मला सगळं काही शिकवलं. व्हॉइस कल्चर म्हणजे काय, मैफलीत रंग कसा भरावा, रागाचं सादरीकरण कसं असावं, अशा अनेक गोष्टी त्यांनी शिकवल्या. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याच्या बदल्यात त्यांनी माझ्याकडून एक पैसादेखील घेतला नाही. मरताना त्या म्हणाल्या, ‘धोंडूताई, मी माझं गाणं विश्वासानं तुझ्याकडे सोपवलंय. माझं गाणं तू रस्त्यावर आणू नकोस. आपण मुलगी कोणाला देतो, तर जो मुलगा तिचा आयुष्यभर तिचा सांभाळ करेल त्यालाच. गायनविद्या ही माझी मुलगी आहे. तिला मी तुझ्या हाती सोपवतेय..’
केसरबाईंची ही शिकवण मी आयुष्यभर जोपासली. असंख्य मैफली केल्या. घराण्याचं नाव वाढवलं. शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना मनापासून शिकवलं. पण ग्लॅमरच्या, पैशाच्या मागे आम्ही कधी लागलो नाही. केसरबाईच म्हणायच्या, मैफल कधीही पडू देऊ नये. आपण जर वाजवून बिदागी घेतो तर गाणंदेखील वाजवून गायला हवं. माझ्याकडे शिकणाऱ्यांना मी हेच सांगते, ग्लॅमरच्या मागे लागू नका. ते फार काळ टिकणार नाही. ग्लॅमर आणि यश यात फरक आहे. मला वयाच्या आठव्या वर्षी व्ही. शांतारामांकडून ‘कुंकू’ सिनेमासाठी ऑफर आली होती. घसघशीत पगार आणि सिनेमाचं ग्लॅमर. पण वडिलांनी त्यांना सांगितलं, ‘आम्हाला या क्षेत्रात यायचंच नाही. तिनं शास्त्रीय संगीतातच नाव काढावं अशी माझी इच्छा आहे.’
केसरबाईंची एक आठवण. एकदा त्यांच्या मैफलीत पहिल्या रांगेत बसलेले गृहस्थ वही-पेन्सिल घेऊन गाण्याची प्रत्येक ओळ न ओळ सरगमसहित लिहून घेत होते. केसरबाईंच्या ते लक्षात आलं. गाणं न थांबवता मांडी घातलेल्या स्थितीतच त्या पुढे सरकत गेल्या आणि खालमानेनं टिपणं घेणाऱ्या त्या गृहस्थाच्या हातावर फटका मारला. वही-पेन्सिल वर उडाली आणि ते महाशय भांबावून बघत राहिले. ‘बुवा, असं लिहून घेऊन गायक होता येत नाही. त्याला तालीम लागते.’ केसरबाईंनी त्यांना सुनावलं. आज कॅसेट-सीडी ऐकून शास्त्रीय संगीत शिकणाऱ्यांना मी हेच सांगते, ‘बाबा रे, सीडी ऐकून तुम्ही फक्त कॉपी करू शकाल. पण एखाद्या रागाचा विचार, तो मांडण्यामागचं शास्त्र तुम्हाला गुरूकडूनच कळू शकेल.’
एवढय़ा वर्षांच्या संगीतसाधनेनं मला काय दिलं तर आध्यात्मिक शक्ती दिली. संगीत हेच माझं अध्यात्म आहे. या शक्तीमुळे मला कशाचीही भीती वाटत नाही. लग्न न करता आयुष्यभर मी एकटी राहिले. पण त्याची मला खंत नाही. लग्न केलं असतं तर संसारातच गुरफटले असते. दिवसातून आठ आठ तासांची मेहनत शक्यच झाली नसती. ‘जोड राग’ गाण्यात माझा हातखंडा आहे, असं म्हणतात. दोन रागांचा एक राग, त्याप्रमाणेच तीन, चार, पाच असे अनेक राग एकत्र करून गाण्याला ‘जोड राग’ म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं दहा रागांपर्यंत एकत्र गाण्यात मी पारंगत होते. हे सगळं साध्य झालं ते बहुधा संगीत आणि संसार यांचा ‘जोड राग’ न केल्यामुळेच!
जयपूर-अत्रौली घराण्याची शिस्त मोठी कडक. इथं खोटेपणा चालत नाही. कृत्रिम, चोरटा आवाज लावून गाण्याची आमची रीत नाही. त्यासाठीच ‘व्हॉइस कल्चर’वर आम्ही वर्षांनुर्वष मेहनत घेतो. गेल्या तीस-चाळीस वर्षांत घराण्याच्या भिंती मोडण्याची, सगळी  घराणी एक करण्याची भाषा सुरू झाली आहे. पण त्यामुळे शास्त्रीय संगीताची केवढी दुर्दशा झालीय ते आपण बघतोच आहोत. आमच्या घराण्याचं गाणं समजायला कठीण असं म्हणतात. पण तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला कळेल ना! खरं गाणं हे घराणेदार गाणंच हवं. ज्यांना ‘भेळपुरी’ खायचीय त्यांनी त्यात खुशाल आनंद मानावा.
संगीतात ऐंशी र्वष काढल्यानंतरही हे विश्व मला सागराप्रमाणे अथांग वाटतं. त्याची खोली अजूनही कळत नाही. मी गायलेल्या एका बंदिशीचे शब्द आहेत, ‘ढुँ ढूँ बारे सैंया तोहे सकल बन बन.. बिदन तिहारी कोऊ न जाने..’ (हे श्रीकृष्णा मी तुला किती बरे शोधू? तुझं ब्रीद काय आहे, हे अजून कुणालाही कळत नाही.) संगीताचं मर्म समजलंय असं वाटत असतानाच त्याची ओढ मात्र अजूनही स्वस्थ बसू देत नाही..    
(शब्दांकन : सुनील देशपांडे)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा