दुर्गाबाईंचा स्वभाव तसा भटक्या वृत्तीचा. पंढरपूरच्या जुनाट वास्तूची-मातीची तितकीच ओढ, विठ्ठल मंदिरात जाण्याइतके संस्कार नव्हते, अन् अध्यात्माचा पूर्ण अभाव. पण ‘आजोबांनी ग्रंथातून चोरून आणलेला विठ्ठल’ त्यांच्या मनाला साद घालू लागला. त्यातच काही लोककथांची जोड मिळाली.. अन् परंपरेचा थांग लागला.. आख्यायिका, लोकसाहित्य आणि स्वत:च्या अभ्यासातून विदुषी दुर्गाबाई भागवतांना जाणवलेला, आकळलेला विठोबा.. आषाढी एकादशीच्या निमित्ताने.
दुर्गाबाई भागवत मूळच्या पंढरपूरच्या, पण पंढरपूरच्या त्यांच्या घराण्याच्या वास्तूचा उल्लेख त्या ‘शापित’ म्हणून करत असत. त्यांच्या आजोबांनी त्यांच्या लहानपणीच, आईचा मृत्यू वडिलांच्या अन्यायी वागणुकीमुळे त्या वास्तूत घडल्यावर, त्या भूमीत पुन्हा पाऊल न ठेवण्याची कठोर शपथ घेत पंढरपूर कायमचं सोडलं. वार्धक्यात मात्र आजोबांनी धार्मिक ग्रंथवाचन भक्तिभावानं भरपूर केलं, न चुकता एकादश्या केल्या, पण देऊळ कायम वज्र्य. पंढरपुराबद्दल मनात कायमची अढी.. इतकी की त्यांच्या बाबांचं ‘पांडुरंग’ नावदेखील टाकलं! मूर्तीरूप विठोबादेखील त्यांच्यासाठी नव्हताच. तरी विठोबानं त्यांना कधीच दूर लोटलं नाही. ज्ञानेश्वर-तुकारामाच्या पोथ्यांतून त्यांना तो नित्य भेटायचा. त्यांच्यापुरता तो त्या ‘ग्रंथांच्या विटेवर’ कायम उभाच राहिला. एरवी प्रखर बुद्धिवादी असणारे आजोबा पारंपरिक भाविकतेने इतके कसे बदलले, याचं दुर्गाबाईंना कायमच आश्चर्य वाटायचं. दुर्गाबाईंचे वडील तर शास्त्रज्ञ होते. त्यामुळे ते आस्तिक असण्याचा तर प्रश्नच नव्हता.
दुर्गाबाईंची पंढरपूर ही जन्मभूमी नसली तरी कुळभूमी होती. तेच पंढरपूर आजोबांपासून सुटलं, कुळपरंपरा खंडित झाली. तरी एरवी तशा आस्तिक नसणाऱ्या दुर्गाबाईंना पंढरपूर पाहायचा ध्यास मात्र होता. ज्ञानेश्वर-तुकारामांचं शब्दब्रह्म, बुद्ध-वाङमय, आदि शंकराचार्य, व्यास याचं संस्कृत साहित्य आणि ‘लोकसाहित्य’ हे त्यांचे अभ्यासाचे विषय. ख्रिश्चन संस्थांतून शाळा-कॉलेजचं शिक्षण झाल्याने येशू ख्रिस्त हादेखील त्यांच्या कायम कुतूहलाचा विषय. तसंच केलेल्या संशोधनामुळे गौतम बुद्धांविषयी ओढ. (प्रकृती-अस्वास्थ्यामुळे त्यांची पीएच.डी. पूर्ण होऊ शकली नाही, परंतु त्यांनी लिहिलेल्या विपुल साहित्यावर कित्येकांनी ‘डॉक्टरेट’ मिळवली !) त्यांचा स्वभाव तर तसाही भटक्या वृत्तीचाच. आणि नाही म्हटलं तरी पंढरपूरच्या जुनाट वास्तूची-मातीची ओढ होतीच. विठ्ठल मंदिरात जाण्याइतके संस्कार नव्हते, अन् अध्यात्माचा पूर्ण अभाव. पण ‘आजोबांनी ग्रंथातून चोरून आणलेला विठ्ठल’ त्यांच्या मनाला साद घालू लागला. त्यात काही लोककथांची जोड मिळाली..अन् परंपरेचा थांग लागला.
वारकऱ्यांच्या परंपरेविषयी कुतूहल निर्माण झालं. अभ्यासाच्या पाऊलवाटेवर श्रद्धाळू पावलंदेखील उमटू लागली. ‘या साऱ्या वाटा काय अखेर पंढरीलाच जातात का?’ असा त्यांना प्रश्न पडायचा. ऐतिहासिक भूमिका सरावानं सोडता येत नव्हती, अन् बौद्धिक जीवनाचा सांधाच ढासळू पाहात होता. तरी ऐतिहासिक दृष्टी हाच काय तो काल-आज-उद्याला जोडणारा दुवा होता.
असाच एक दुवा म्हणजे भीमा अथवा भीमरथी ही महाभारतकालीन पवित्र नदी. काठावरील पंढरपूर अन् तिथला पांडुरंग नंतरचे. त्याच्या पूजेअर्चेत बडिवार नाही. जात-पात, रंक-राव काहीही नाही. मराठी संत कधीच ‘वरलिया रंगा’ भुलले नाहीत. त्यामुळे भपका नाही. भक्तीबरोबरच्या साधेपणाचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजेच ‘विठ्ठल’. भक्तामध्ये पूर्णपणे गुंतलेला, कुटुंबवत्सल विठ्ठल तर कधी आईच्या ठायी असणारा पुरुषोत्तम विठ्ठल चक्क विठाबाई अथवा विठाई माउली! वेळप्रसंगी भांडण करताना, ‘विठय़ा, मूळ मायेच्या काटर्य़ा!’देखील सहज यायचं. ही मराठी संतांचीच मिरास. ही भक्तांशी जवळीक. कृष्णाचा ‘कृष्णाई’ हा दुसरा अपवाद. विठ्ठल हा कृष्णावतार मानतात तसा बुद्धावतारही मानतात. अगदी थेट गौतम बुद्ध नव्हे, तर बौद्ध विचारातला प्रज्ञावाद अन् मायावाद तत्त्वज्ञानातील मूळ अद्वैतवादाशी सहज मिसळून जातो म्हणून बुद्धावतार. तसेच कर्नाटक व आंध्रमधील लिंगायत संप्रदायामुळे वैष्णव आणि शैव संप्रदायातील वैर महाराष्ट्राच्या ‘विठ्ठल संप्रदायांत’ विरून जातं! या वारकरी संप्रदायातील विष्णूशी एकरूप झालेला शिव हा संहारक नसून, वैराग्याचं प्रतीक आहे. तिन्ही प्रांतातील इतर वैविध्यापलीकडे असणारी ही ‘एकरूपता’ एरवी दुर्मीळ!
‘राही अन रखुमाबाई’ या विठ्ठलाच्या आरतीत भेटणाऱ्या विठ्ठलाच्या दोन राण्या. राही ही कृष्णाची प्रेयसी राधा, पण विठ्ठलाची मात्र राणी. रखुमाबाई वा रुक्मिणी तर तशीही राणीच. पण दोघांची देवळं पंढरपुरात वेगळी. राही आल्यामुळे रुक्मिणी रुसली हे ओव्यांतून जनमानसात ठसलेलं कारण. पण विठ्ठल-रुक्मिणी यांच्या या चिरविरहाची विलक्षण लोककथा दुर्गाबाईंच्या ‘पैस’ या लेखसंग्रहात आहे, तिचा सारांश असा..
विठ्ठलाची मूळ राणी पद्मावती अर्थात ‘पदुबाई’. एकदा ‘माळीराया’ हा विठ्ठलाचा भक्त ५०० सहकाऱ्यांसह विठ्ठलदर्शनासाठी येत असल्याचं कळल्यावर, विठ्ठलानं घरी स्वागताच्या तयारीसाठी निरोप धाडला. पदुबाईचा नकार आला, ‘काही नाही दळणार नि कांडणार. जळून तुमच्या भक्तांचा कोळसा होवो!’ हा निरोप दुसऱ्यांकडून कानी पडताच, माळीराया विठ्ठलाला न भेटताच परतला. विठ्ठलानं पदुबाईला भयानक शाप दिला, ‘आज माझा संसार बुडाला. बायकोनं सत्त्व घालवलं. ऐक पदुबाई, तुझं-माझं नातं तुटलं.. तू वेडी होऊन रानांत एकटी मरशील. कुणी तुझ्या प्रेताला शिवणार नाही..!’ दुसऱ्याच दिवशी तसं झालं. पदुबाई मेल्यावर भयंकर पाऊस पडून तिच्या अस्थी समुद्रात वाहून गेल्या. ही हकीकत ऐकून माळीरायाच्या काळजाचं पाणी झालं. तो ‘आईच्या’ वियोगात समुद्राकाठी तप करीत बसला. १२ वर्षांनी पदुबाईच्या अस्थी समुद्राने माळीरायाला देऊन त्या चंद्रभागेत टाकायला सांगितल्या. त्याने त्या तिथल्या पद्मतीर्थ तळ्यांत टाकल्या. तिथं एक कमळ उगवलं.. राज्य सोडून विरहात भटकणाऱ्या विठोबाला ते सुंदर कमळ दिसलं. त्यानं ते तोडताच पदुबाई उभी राहिली.. पण आता तिचं नाव ‘रुक्मिणी’ होतं! विठोबा तिला म्हणाला, ‘आपला संसार तुटला तो तुटलाच. आपण आता एकत्र राहायचं नाही. रोज भेटू, बोलू. भक्ताचं भलं करू!’ पंढरपुरांत ‘पद्मळे’ हे तळे अन् पद्मवतीचं देऊळ आहे. ही लोककथा फारशी कुणाला माहीत नाही, पण धनगरांनीच ती अजून जपली आहे.
तशीच तुळशीसंबंधीची लोककथा कुणब्यांनी जपली आहे. तुळशी ही दरिद्री ब्राह्मणाची काळी मुलगी. घरचं दारिद्रय़ं. लग्न होईना. ती अनाथ झाल्यावर पंढरपूरच्या ‘गवळी’ विठोबारायाने तिला आश्रय दिला. रुक्मिणीने मत्सराने कट-कारस्थान केलं. ते जिव्हारी लागून तुळशी भूमीत गडप होत असताना, विठोबाने तिचे केस धरून तिला वर ओढलं. तेव्हा एक सावळं झाड वर आलं, तेव्हा विठोबाच्या हातांत मंजिऱ्या होत्या! तुळशीला मानवी स्वरूपात दिलेलं लग्नाचं वचन विठोबाने त्या झाडाशी लग्न लावून पूर्ण केलं! विठोबाच्या गळ्यातील तुळशीमाळेची अर्थात वैजयंतीमालेची अन् तुळशीच्या लग्नाची ही लोककथा. दोन्ही लोककथांचा हा केवळ सारांश.
या कथा अतिशय विस्ताराने सांगून दुर्गाबाई म्हणतात, ‘कथा खऱ्या नसतीलही, परंतु त्या मागचं काव्यमय सत्य अविचल आहे. त्यामुळे विठोबाचं मानव्य मला अधिकच भावू लागलं.. अन् एक दिवस अचानक पंढरपूरला जायचा योग आला! अध्र्या तासाचीच वस्ती होती. विटेवरच्या पांडुरंगाचे दर्शन घेतले. भक्तीचा उमाळा नव्हता. आनंद नव्हता. दु:खही नव्हते. मन अगदी स्तब्ध झाले होते. असे निराकार ते क्वचितच होते.. चंद्रभागेशी ओळख कायम झाली.. गावच्या शिवेवर आम्ही आलो. एक काळा प्रौढ धनगर, डोईवर मुंडासे घातलेला, समोरून येत होता.. रंग तुकतुकीत काळा. मान आखूड. खांदे व छाती भरदार. दंड पिळदार. मिशा चेहेऱ्याच्या काळेपणात हरवलेल्या. डोळे लहान पण चमकदार. पाय जाड खांबासारखे, पण पूर्ण जिवंत. जिथे पडतील तिथे रोवले जातील, रोवले जातील तिथे रुजतील.. थेट विटेवरच्या विठोबाचे मानवी ध्यान ऐहिकातून चालले होते.. आजवर तुकारामाने या अक्षरश: कुरूप मूर्तीला ‘सुंदर ते ध्यान’ असे का म्हटले ते मला कळले नव्हते, त्याचा थोडासा उमज पडला. ते ‘ध्यान’ पाहिले अन् माझे तुंबलेले मन मोकळे झाले! काळ्या मातीवर हुकमत चालविणारा काळा पाषाण सजीव झाला होता!.. पंढरीच्या विठोबाचे अन् माझे पिढय़ांचे आंतरिक नाते नव्याने उजळले!’
४५ वर्षांपूर्वी १९७० साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘पैस’ या ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळालेल्या अतिशय छोटेखानी ललितलेख संग्रहात, दुर्गा भागवतांनी त्यांच्या धार्मिक आणि व्यक्तिगत अनुभवांवर असे काही लेख लिहिले आहेत. ‘पैस’ म्हणजे अवकाश. गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांमधल्या एका लहानशा भागातल्या एका साध्या गावात एक अद्भुत प्रतीक आहे, खांबाचे. ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाला ज्ञानेश्वरांनी ‘पैस’ हे नाव दिलं. तो हा लहानखुरा ‘पैसाचा खांब’. कुणी ‘ज्ञानोबाचा खांब’ म्हणतात, तर कुणी ‘ज्ञानोबा’च म्हणतात. ख्रिस्ताचं प्रतीक जसा ‘क्रूस’ तसा हा ज्ञानेश्वराचं प्रतीक हा खांब. त्याबद्दल दुर्गाबाई म्हणतात, ‘वारकरी पंथ ख्रिस्ती धर्माप्रमाणे जगभर पसरला असता तर, क्रूसाप्रमाणे हा खांबही वेगळ्या स्वरूपांत मिरवला असता. पण बरे झाले तसे नाही घडले ते! अजून वारकऱ्यांना हा खांब बघायला इथेच यावे लागते.. ख्रिस्ताचा क्रूस हे बलिदानाचे प्रतीक आहे, तर हा स्थाणुतुल्य खांब जीवनाच्या अमर अस्तित्वाचे प्रतीक आहे. आमच्या तत्त्वज्ञानात मरणाचे स्थान तात्पुरते असते. जीवन अखंड असते.. नाथपंथानेच ज्ञानदेवाला स्फूर्ती दिली. खुद्द नाथपंथातच बौद्ध मताचा एक धागा गुंफला गेला होताच.. त्यामुळे वारकरी संप्रदायांत विठोबाला बौद्ध-अवतार का म्हणतात, तेही लखकन् आकळले!.. बुद्धाचे दीर्घायुष्याचे व नैसर्गिक मरणाचे आणि ज्ञानेश्वरांच्या अल्पायुष्याचे व समाधिस्थ मरणाचे दृश्य आविष्कार विरोधी वाटले तरी त्याची सांगता एकच निर्वाणात अथवा महाशून्यात होते.’
तसे बुद्ध, ज्ञानेश्वर, तुकाराम वगैरे दुर्गाबाईंचे नंतरचे अभ्यासाचे विषय. पण त्यांची ‘येशूची’ ओळख शाळेपासूनच झाली होती. शाळेत शिस्त म्हणून येशूची प्रार्थना म्हटली तरी, ही काही आपली प्रार्थना नाही अशी रुखरुख लागे. प्रार्थना संपली की हायसं वाटे. कृष्णाच्या बाळलीलासारख्या येशूच्या बालपणाविषयी काही माहीत नव्हतं, पण शाळेतल्या बाई येशूच्या मरणाची कथा सांगत तेव्हा ज्ञानदेव व त्याची समाधी घेणारी भावंडे आठवत. सदेह वैकुंठाला जाणारे तुकोबा आठवत. ही सारी मरणे एकसारखी का, याचं कुतूहल शाळेपासूनच होतं. पुढे तरुण वयात देशासाठी प्राण देणारे, ‘संत’ नसतानाही जास्त प्रेरक वाटू लागले. बुद्धिवादाचे वारे मनात खेळायला सुरुवात झाली.. कल्पनेतला देव फिका होत नाहीसा झाला, तरी प्रार्थनेतला देव मात्र तसाच होता. भयभीत झाला, पण हलला नाही.. देवळेरावळे आडभिंती वाटू लागल्या. व्यावहारिक ईश्वर गेला नि त्या भिंती पडल्या. पण मन मोकळे झाले नाही.. विचारांची गुंतागुंत अन आचारांची ओढाताण वर्षांनुवर्षे झाली. वय प्रौढावलं. त्याविषयी दुर्गाबाई सांगतात, ‘साम्राज्यशाहीची वैरी मी लहानपणापासूनच होते. म्हणून ख्रिस्ताचा लळा असूनही तो या साम्राज्याचा प्रतिनिधी बनलेला पाहिला की मला धक्का बसत असे.. प्रौढ वयात एके दिवशी तळपत्या उन्हात, मनाची तगमग असताना मी नकळत सेंट थॉमस केथ्रेडलच्या दारी येऊन उभी राहिले.. दारावरची नेहमीची पाटी.. ‘बा, आत येणाऱ्या तू कुणीही अस, पण आत आल्यावर एक गोष्ट कर. गुडघे टेक आणि प्रभूची प्रार्थना कर!’ चर्चच्या दरवाजावर लिहिलेले हे शब्द मी वाचले, अन् कुतूहलाला श्रद्धेची जोड देत मी आत गेले. भारतीय धर्मगोतावळ्यातला आता ‘येशू’ एक झाला होता.. हाच तो मरियापुत्र – देवपुत्र येशू, याचा राजसत्तेशी संबंधच का असावा? त्याचं सनातन नातं तर त्रस्त, शांत, दुबळ्या मानवतेशी !.. मी गुडघे टेकले. ‘ईश्वरा.’ एव्हढंच म्हटले. पुढे प्रार्थिण्यासारखं माझ्याकडे काहीच नव्हते ! त्या क्षणी ऑर्गनच्या धर्मसंगीताचे स्वर सुरू झाले.. त्या शीतल छायामय मंदिरात त्या सौम्य सुरांनी अतीव मधुर आश्वासन निर्माण केलं.. असू देत हे सूर सदा पाठीशीच, असं म्हणून मी मंदिरातून बाहेर पडले व भल्यामोठय़ा स्वप्नाचे एक पर्व संपल्याचा अनुभव घेत फिरून गर्दीत मिसळून गेले!’ ..पंढरपूरच्या विठोबाचा अनुभव वेगळा नव्हताच!
म्हणूनच दुर्गाबाई म्हणतात, ‘हे उसळते मानवी जीवन इतके विशाल आहे, अनंत आहे की त्याचे समग्र आकलन कोणा याज्ञवल्क्याला, बुद्धाला, महावीराला किंवा ख्रिस्तालाही होणे शक्य नाही. स्वत:पुरते तात्त्विक समाधान मात्र जो तो मिळवू शकतो.. मानव हा क्षणांच्या लहरीवर नाचू पाहतो. कधी तो क्षणांचा स्वामी होतो. कारण प्रत्येक क्षण हा अनंताचा एक अविभाज्य अंश आहे, अमर आहे!’
एकदा प्रयाग तीर्थावरील नैनी पुलावरून रेल्वेनं जाताना.. भाविक नाणी, सुपाऱ्या, नारळ खाली गंगेत टाकत होते, हात जोडून भक्तिभावाने नमस्कार करत होते.. तसं इतर प्रवाशांनी त्यांना सांगूनदेखील दुर्गाबाईंनी काहीच केलं नाही. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला.. हात जोडण्यासारखी दुसरी कठीण गोष्ट या दुनियेत कुठली तरी आहे?
प्रभाकर बोकील -pbbokil@rediffmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा