सोशल मीडिया आणि अतिस्मार्ट फोन्स यांच्या व्यसनाकडे झुकणाऱ्या सवयीमुळे ‘आपल्याला बरेच माहिती आहे’ हा आभास आणि दिखावा या दोन गंभीर आजारांची लागण होते. पहिली गोष्ट ‘अहं’ला जन्माला घालते आणि दुसरी अप्रामाणिकपणाला. नातेसंबंध टिकवताना- फुलवताना अहं आणि अप्रामाणिकपणा हे दोन सर्वात मोठे अडथळे असतात. त्याच गोष्टींना आपली सोशल मीडिया आणि मोबाइलची व्यसनाकडे झुकणारी सवय खतपाणी घालणार असेल तर यांना वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे. अन्यथा आभासी संबंध प्रत्यक्षात उद्धस्थताच आणतील.
तू अजून माझा फोटो ‘लाइक’ केलेला नाहीस. उच्चस्वरात आसावरीने बोलायला सुरुवात केली.
‘अगं मला वेळच झालेला नाही,’ सिद्धार्थने समजूत काढायचा प्रयत्न केला.
‘अहाहा! याच वेळी बरा वेळ नाही तुला. गेल्या आठवडय़ात त्या स्नेहाचा फोटो अपलोड झाल्यानंतर तीस सेकंदांत तू तिचं कौतुक करणारी कमेंटपण केली होतीस. इथे एकशेदहा लाइक्स आणि पन्नास कमेंट्स आल्या आहेत माझ्या फोटोवर. तुला मात्र काहीच नाही. लोक म्हणत असतील काय बॉयफ्रेंड आहे.. एवढंही करत नाही आपल्या गर्लफ्रेंडसाठी.’ आसावरीच्या तोंडाचा पट्टा हा असा चालूच!
माझ्या पिढीतल्या अनेकांना वाटेल, मी हे उदाहरण अतिरंजित करून लिहिलं आहे की काय. पण आपल्या मुलामुलींशी जर गप्पा मारल्यात, त्यांच्याकडे जरा डोळसपणे पाहिलंत तर तुमच्या हे सहज लक्षात येईल.
नुकतीच एक बातमी वाचनात आली. अमेरिकेमध्ये ३८ टक्के जनता वेब आणि सोशल मीडियाच्या या जबरदस्त व्यसनात अडकली आहे. आपला देशसुद्धा याबाबतीत मागे आहे असे म्हणण्याचे कारण नाही.
गेल्या आठ-दहा वर्षांत इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाचा झपाटा एवढा वाढला आहे की अगदी दमछाक होऊन जावी. ‘ऑर्कुट’पासून खऱ्या अर्थाने सोशल मीडिया लोकप्रिय व्हायला सुरुवात झाला आणि हळूहळू ऑर्कुट बाद ठरून त्यांची जागा फेसबुक आणि ट्विटरने कधी घेतली हे कळलंही नाही. मोबाइल फोन रंगीत स्क्रीनचा असणं आणि त्यावर एखादं गाणं िरगटोन म्हणून ठेवणं ही मोबाइलमधली क्रांती आहे असं वाटेपर्यंत टच स्क्रीन मोबाइल आले आणि मग हाताहातात स्मार्ट फोन दिसायला लागले.
हे स्मार्ट फोन जणू शरीराचाच एक अवयव होऊन बसले.
इंटरनेट मोबाइलवरच आले. हातातल्या मोबाइलवरून ई-मेल्स बघता येऊ लागले, फेसबुकवर वेळ घालवता येऊ लागला, लिखाण करता येऊ लागले, खेळता येऊ लागले, आणि अशा असंख्य गोष्टी.. ज्यासाठी पूर्वी कम्प्युटर, वर्तमानपत्र, टीव्ही, वही-पेन या गोष्टींची गरज पडत होती त्या सगळ्याला मिळून एकच यंत्र हातात आलं- मोबाइल! एखाद्या आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर भरपूर वेळ घालवलात की मग त्या व्यक्तीची सवय होते. तसंच मोबाइलचं! मोबाइलची सवय ही व्यसनात कधी बदलते कळतही नाही. कित्येकजण उगीचच हातातला मोबाइल उघडून परत बंद करताना दिसतात. फोन किंवा मेसेज आला तर तो वाजणार असतोच. पण तरीही अस्वस्थपणे ‘काही आलंय का?’ असं बघणारे असंख्य आहेत. हा अस्वस्थपणा म्हणजे व्यसनच आहे एक प्रकारचं. शिवाय मोबाइल ऑन करून बघतात याचा अर्थ अनेकदा फेसबुक-ट्विटर उघडून बघतात. कारण सोशल मीडियाचीही सवय लागते, जी पटकन व्यसनात बदलू शकते. दिवसभरात फेसबुक उघडलं नाही तर अस्वस्थपणा येणारे तर कित्येक आहेत.
देशी दारू पिणाऱ्या माणसाने उंची परदेशी दारू घ्यायला सुरुवात केली तर त्याचे दारूचे व्यसन सुटले असे म्हणले जात नाही, तसेच कालचे ऑर्कुटचे व्यसन आज फेसबुकमध्ये बदलले, आजचे फेसबुकचे व्यसन परवा ट्विटरमध्ये बदलेल, तेरवा अजून काहीतरी आले म्हणून व्यसन सुटले असे होत नाही. गेल्या वर्षभरात स्मार्टफोन आहे पण त्यावर ‘वॉट्स अप’ नाही असा मनुष्य सापडणे मुश्कील. काय आहे हे? एक भन्नाट अॅप्लिकेशन अगदी लाइव्ह गप्पा मारण्यासाठी. पण जेव्हा गप्पिष्ट लोक इथेच तासन्तास गप्पांचे फड रंगवू लागतात तेव्हा याचा धोका वेळीच ओळखणे गरजेचे आहे.
नातेसंबंधात सहजपणे असणाऱ्या ‘पझेसिव्ह’ वागणुकीला खतपाणी मिळेल अशा या तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करायला हवा.
मी श्रेष्ठ आहे, असा आभास दारू प्यायल्यावर अनेकांना होत असला तरी नशा उतरल्यावर तेसुद्धा जमिनीवर येतात. इथे मात्र जमिनीवर यायला जागाच नाही. कारण सगळेच हवेत उडणारे. याचा जबरदस्त फटका बसू पाहतोय नातेसंबंधांवर. आजकाल थेटपणे व्यक्त होण्यापेक्षा आडूनआडून स्क्रीनच्या मागून बोलणं अनेकांना सोयीस्कर वाटू लागलं आहे.
आदित्य गेले दोन महिने सुजाताशी मेलवर गप्पा मारत होता. पण लग्नाच्या संदर्भात निर्णय काही देत नव्हता. अवांतर गप्पा चालू होत्या, मधेच कधीतरी मनातल्या गप्पादेखील व्हायच्या. हळूहळू सुजाता त्याच्यात गुंतत चालली होती. प्रत्यक्ष न भेटताही तिला त्याच्याबद्दल काही खास वाटू लागलं होतं. त्यामुळे खूप काही ती त्याच्याशी शेअर करायला लागली आणि एक दिवस आदित्य तिला म्हणाला की ‘‘आपण नको पुढे जायला, कारण आपले जमेल असं नाही वाटत मला.’’
सुजाताचा विश्वासच बसेना. आधी राग, मग दु:ख आणि नंतर नराश्य अशा सगळ्या नकारात्मक भावनांच्या भोवऱ्यात ती अडकली. यातून बाहेर पडणं तिला खूप जड गेलं.
लग्नाच्या बाबतीत अशा अनेक घटना घडताना दिसतात. फोटो काढण्याचा उद्देश हा आपल्या आठवणी जतन करणं हा न राहता फेसबुकवर मांडणं हा होतो तेव्हा काहीतरी गडबड आहे असे समजावे. यामुळे होतं काय की, आपण अधिकाधिक ‘दिखावा’ करू लागतो. आठवणीपुरतेच फोटो असतील तर ते अधिक नसíगक असतात, असा माझा अनुभव आहे. फेसबुकसाठीचा फोटो असे म्हणले की त्यात एक अनसíगकपणा येण्याची शक्यता वाढते. येतोच असे नव्हे, पण डोक्यात कुठेतरी मागे हा विचार सुरू असतो की या सहलीचे फोटो घरी गेल्या गेल्या फेसबुकवर टाकणार. मी सतत लोकांना दिसत आहे- फोटोमधून असेन, माझ्या स्टेटस अपडेटमधून असेन, नाहीतर इतर काही गोष्टींमधून असेन, पण मी सतत लोकांना दिसत आहे ही गोष्ट आपल्याला आपल्याही नकळत अनेकदा दिखावा करायला भाग पाडतात.
अनघा आणि प्रतीक हनीमूनसाठी केरळला गेले होते. तिथल्या निसर्गरम्य वातावरणात खरेतर दोघेही चांगलेच रमले होते, पण हातातल्या स्मार्ट फोनवरून तिच्या प्रत्येक मूडचा फोटो तो फेसबुकवर टाकत होता. सुरुवातीला अनघाच्या हे लक्षात आले नाही. पण त्याच्या हातात सारखा फोन पाहून ती वैतागली. तर तो म्हणाला की, अगं फेसबुकवर टाकतोय फोटो. ते ऐकून तर ती जास्तच अपसेट झाली. म्हणजे तू मनाने माझ्याबरोबर नाहीयेस. नुसतं शरीरच आहे तुझं माझ्याबरोबर, अशा विचाराने तिचा मूड गेला तो गेलाच.
या आणि अशाच अनेक गोष्टी आजूबाजूला घडताना दिसून येत आहेत. मोबाइल नावाचं खेळणं हे आता सर्रास सगळ्यांच्याच हातात दिसू लागलं आहे.
मोबाइलच्या वापरामुळे अजून एक अतिशय महत्त्वाचा धोका सध्या समाजात दिसू लागला आहे. तो म्हणजे विवाहबाह्य़ संबंधांचा. फक्त याच विषयावर दोन-तीन लेख होऊ शकतात.
सहजपणे हातात आलेल्या या खेळण्यामुळे घरातल्या आपल्या जिवलगांबरोबर असलेल्या नात्यात अंतर पडताना दिसून येत आहे.
सूरज कुठल्याशा निमित्ताने एका ऑफिसमध्ये गेला होता. तिथे त्याची अपर्णाशी ओळख झाली. तीन-चार भेटींमध्ये त्यांची मत्री जुळली. दोघांनी आपापले फोन नंबर आणि ईमेल आय.डी दिले. आणि झाली दोघांचीही व्हर्चुअल मत्री सुरू. दोघेही वयाने ४५/४७ वर्षांचे असावेत. दोघांचीही लग्ने झाली होती. खरंतर दोघेही आपापल्या संसारात सुखी होते. तसे नवरा-बायको नात्यात असतात तशी भांडणे त्यांच्यातही होतीच. लांबून फोनवरून आणि मेलवरून अपर्णाला त्याच्या तथाकथित दु:खावर फुंकर घालणं सहज शक्य होतं. त्यालाही ती फुंकर हवीहवीशी वाटणारी. आणि तोही मेलवर, फोनवर तिच्याशी जवळीक साधू शकत होता. व्हर्चुअल रोमान्स करायला मेल आणि फोन प्रकरण खूपच सोयीचे असते. हळूहळू दोघेही एकमेकांमध्ये भावनिक दृष्टीने गुंतत चालले.
अशा स्वरूपाची अनेक उदाहरणे आपल्या आसपास घडताना दिसतात. इथे जर मानसिक प्रगल्भता नसेल किंवा दूरदृष्टी नसेल, माझ्या हिताचं काय आहे, हे कळण्याची पात्रता नसेल तर संसार मोडू शकतात. वाहवत जाण्याची वृत्ती असेल तर आयुष्याचं नुकसान होऊ शकतं.
थोडक्यात, सोशल मीडिया आणि अतिस्मार्ट फोन्स यांच्या व्यसनाकडे झुकणाऱ्या सवयीमुळे ‘आपल्याला बरेच माहिती आहे’ हा आभास आणि दिखावा या दोन गंभीर आजारांची लागण होते. पहिली गोष्ट ‘अहं’ला जन्माला घालते आणि दुसरी अप्रामाणिकपणाला. नातेसंबंध टिकवताना-फुलवताना अहं आणि अप्रामाणिकपणा हे दोन सर्वात मोठे अडथळे असतात. त्याच गोष्टींना आपली सोशल मीडिया आणि मोबाइलची व्यसनाकडे झुकणारी सवय खतपाणी घालणार असेल तर यांना वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे. कारण तुमचा जोडीदार तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे.. त्याच्या/ तिच्यासोबतच तुम्हाला सुखी संसार करायचा आहे. फेसबुकवर ‘लाइक’ करणाऱ्यांसोबत नव्हे! आणि लांबून भावनिक सपोर्ट देणं खूपच सोपं.
शेवटी सर्व ई-व्यसनी लोकांना एकच नम्र विनंती- ‘लाइक’ आणि ‘शेयर’ कराच, पण शांतपणे विचारही करा!
chaitragaur@gmail.com
ई-व्यसन
सोशल मीडिया आणि अतिस्मार्ट फोन्स यांच्या व्यसनाकडे झुकणाऱ्या सवयीमुळे ‘आपल्याला बरेच माहिती आहे’ हा आभास आणि दिखावा या दोन गंभीर आजारांची लागण होते.
First published on: 19-10-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E addiction