तुम्हाला भेटणाऱ्या लोकांबरोबर त्यांची सुखदु:खे वाटून घ्यायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल! मोठे समाधान मिळेल आणि स्वत:बद्दल अभिमान वाटेल! जो माणूस स्वत:ला विसरून इतरांसाठी काही करतो त्याला जगण्यात खरा आनंद मिळतो.
मानसोपचारतज्ज्ञांकडे धाव घेणाऱ्या लोकांपैकी १/३ लोक स्वत:ला बरे करू शकतात; जर त्यांनी इतरांना मदत करण्याची रुची दाखवली तर! ही कल्पना माझी आहे का? नाही कार्ल युंगनेसुद्धा हेच म्हटले आहे, ‘माझ्या रुग्णांपैकी १/३ रुग्ण असे आहेत की, त्यांच्या आजाराचे निदान असे करता येत नाही, पण त्यांच्या जीवनात एक प्रकारची पोकळी आणि संवेदनशून्यता जाणवते.’ दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर त्यांची स्वप्ने खूप मोठी असतात, पण संधी त्यांच्या डोळ्यांसमोरून निघून जाते. मग ते त्यांच्या निर्थक वाटणाऱ्या आयुष्याबद्दल तक्रार करत मानसोपचारतज्ज्ञांकडे येतात. बोट निघून गेल्यामुळे त्यांना धक्क्यावर उभे राहावे लागते. मग ते इतरांना दोष देत राहतात.
आता तुम्ही म्हणाल की, मी अत्यंत सामान्य आयुष्य जगते-तो. दिवसाला आठ तासांची अत्यंत कंटाळवाणी नोकरी करते-तो. माझ्या आयुष्यात नाटय़मय असे काहीही घडलेले नाही. अशा वेळी इतरांना मदत करण्यात मला आनंद कसा मिळणार?
प्रश्न चांगला आहे. तुमचे आयुष्य कितीही सामान्य असले, तरी रोज तुम्ही काही लोकांना भेटताच की नाही? तुम्ही त्यांच्याशी कसे वागता? तुम्ही त्यांच्याकडे ओझरती नजर टाकता की त्यांना तुम्ही आवडलात का हे शोधण्याचा प्रयत्न करता. आपण पोस्टमनचेच उदाहरण घेऊ. पोस्टमन दर वर्षी शेकडो मैलांची पायपीट करतो. तुमचे विविध टपाल तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवतो; पण तुम्ही कधी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला का, की तो कोठे राहतो? किंवा तुम्ही कधी त्याला त्याच्या ‘बायकामुलांचे फोटो दाखव,’ असे म्हणालात का? तो दमलाय का किंवा कंटाळलाय का? असे तुम्ही कधी त्याला विचारले का?
त्याचप्रमाणे, तुमच्याकडे वर्तमानपत्रे टाकणारा, किराणा सामान पोहोचवणारा, बुटपॉलिश करणारा ही सगळी माणसेच आहेत ना! त्यांनाही अनेक समस्या आहेत. त्यांचीही अनेक स्वप्ने आहेत, इच्छा-आकांक्षा आहेत. तेसुद्धा त्यांची सुखदु:खे वाटून घेण्याची संधी शोधत असतात, पण तुम्ही त्यांना कधी तुमच्याबरोबर तसे करू दिले का? तुम्ही फ्लॉरेन्स नाइटेंगेल असण्याची गरज नाही; पण तुम्ही तुमचे खासगी जीवन तरी सुधारू शकता. तुम्ही उद्यापासूनच तुम्हाला भेटणाऱ्या लोकांबरोबर त्यांची सुखदु:खे वाटून घ्यायला सुरुवात करा.
त्यामुळे तुम्हाला काय फायदा होईल? खूप आनंद मिळेल! मोठे समाधान मिळेल आणि स्वत:बद्दल अभिमान वाटेल! या अशा प्रकारच्या दृष्टिकोनाला अॅरिस्टॉटलने ‘एनलाइटेड सेल्फिशनेस’ असे नाव दिले आहे. म्हणजे ही कृती स्वार्थासाठीच असते, पण तिला नि:स्वार्थीपणाचा मुलामा चढवलेला असतो. झोरोस्टर म्हणतो, ‘इतरांसाठी काही करणे हे कर्तव्य नसून तो आनंद आहे, कारण त्यामुळे तुमचे आरोग्य सुधारते व तुम्ही सुखी होता.’ तर बेंजामिन फ्रँकलिन साध्या शब्दांत म्हणतो, ‘तुम्ही इतरांशी चांगले वागता तेव्हा ती स्वत:च्या प्रति असलेली सर्वोत्तम वागणूक असते.’
न्यूयॉर्कमधील सायकॉलॉजी सव्र्हिस सेंटरचे डायरेक्टर लिहितात, ‘आत्मसमर्पण व शिस्त यामुळे मोठा आनंद मिळतो आणि आत्मशोध पूर्ण होतो हे शास्त्रशुद्ध रीतीने सिद्ध झालेले आहे.’ ते पुढे म्हणतात, ‘आधुनिक मानसशास्त्रातील या शोधाइतका महत्त्वाचा कोणताच शोध नाही.’
इतरांबद्दल विचार केल्याने तुमच्या फक्त काळज्याच कमी होतात असे नाही, तर तुम्हाला अनेक मित्र मिळतात व तुम्ही मौजमजा करू शकता. कसे? मी येलमधील फेल्पस या प्रोफेसरला ‘‘तुम्ही हे सगळे कसे साध्य केले?’’ असे विचारले असता तो म्हणाला, ‘‘मी कधीही कोणत्याही हॉटेलमध्ये गेलो, कटिंग सलूनमध्ये गेलो किंवा एखाद्या स्टोअरमध्ये गेलो, तर तेथे भेटणाऱ्या लोकांच्या पसंतीस उतरेल असे काही तरी बोलतो. मी असे काही तरी बोलण्याचा प्रयत्न करतो, की ज्यामुळे त्यांना त्यांचे आयुष्य एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून भावेल; कंटाळवाणे वाटणार नाही. कधी तरी स्टोअरमध्ये माझ्यासाठी थांबलेल्या मुलीला ती छान दिसतेय, तिचा ड्रेस छान आहे, अशी प्रतिक्रिया देतो. मी न्हाव्याला विचारतो, दिवसभर उभे राहून तुझे पाय दुखत नाहीत का? किंवा तो या व्यवसायात कसा शिरला? त्याने आत्तापर्यंत किती लोकांची डोकी भादरली आणि मग बोटे मोजायला मीपण त्याला मदत करतो. माझ्या हे लक्षात आले की, लोकांमध्ये आपण रुची दाखवली, की त्यांना आनंद होतो. ओझे वाहणाऱ्या रेल्वेच्या हमालाशीसुद्धा मी हस्तांदोलन करतो. त्यामुळे त्यालाही नवी उमेद येते व तो ताजातवाना होतो. एका कडाक्याच्या उन्हाळ्याच्या दुपारी मी जेवणासाठी न्यू हेवन रेल्वेच्या डायनिंग कारमध्ये गेलो. तेथील कूक आमच्या टेबलापाशी आला व मेनू सांगू लागला तेव्हा मी म्हणालो, ‘खरेच आज तुम्हाला भटारखान्यात उकाडय़ामुळे खूप त्रास होत असेल ना?’ त्याचबरोबर त्याला भरून आले. तो म्हणाला, ‘हे देवा! कोणाला तरी याची जाणीव आहे! लोक येथे येतात आणि जेवण चांगले नाही, सव्र्हिस भिकार आहे अशा तक्रारी करत जातात. आज तुम्ही मला प्रथमच असे भेटलात की, ज्यांना आमच्याबद्दल सहानुभूती वाटते.’ एक चिनी म्हण आहे, ‘तुमच्या हाती गुलाब असतील, तर त्यांचा सुगंध तुमच्या हातांवर रेंगाळणारच.’
केंब्रिज विद्यापीठाचे प्रोफेसर ए.ई. हाऊसमन. ते त्यांच्या काळातील बुद्धिवंत म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी १९३६ मध्ये केंब्रिज विद्यापीठात जे भाषण दिले त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘या जगातील सर्वात श्रेष्ठ सत्य आणि नैतिक मूल्ये असलेली गोष्ट जिझसने सांगितली आहे. ‘जो स्वत:साठी जगला त्याचे जीवन व्यर्थ आहे आणि ज्याने इतरांसाठी आपले जीवन वेचले तोच खऱ्या अर्थाने जगला.’’ जर अजूनही तुम्ही हाऊसमनशी सहमत नसाल, तर आपण दुसरा, एकविसाव्या शतकातील निरीश्वरवादी तत्त्ववेत्ता काय म्हणतो ते पाहू. त्याचे नाव थिओडर ड्राईसर. थिओडर सर्व धर्माची चेष्टा करतो व त्यांना परिकथा म्हणतो. ‘आयुष्य म्हणजे मूर्खाने सांगितलेली गोष्ट होय!’ असे तो म्हणतो. ‘ज्या गोष्टीत भय आहे आणि कोलाहल आहे आणि कोणताच महत्त्वाचा अर्थ नाही.’ तरीसुद्धा थिओडरने एक तत्त्व सांगितले आहे जे जिझसनेच शिकवले आहे. ‘जर माणसाला आयुष्यात आनंद मिळवायचा असेल, तर त्याने स्वत:साठी नव्हे, तर इतरांसाठी अधिक चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, कारण त्याचा आनंद इतरांवर अवलंबून असतो आणि इतरांचा त्याच्यावर!’
जर आपण इतरांसाठी काही चांगल्या गोष्टी करणार असू, तर लवकरात लवकर करा. वेळ वाया घालवू नका, कारण आयुष्य एकदाच मिळणार. म्हणून मला जी काय दया दाखवायची असेल, जे काही सत्कृत्य करायचे असेल, ते आत्ताच करायला हवे. त्याकडे मी दुर्लक्ष करता कामा नये, कारण पुन्हा मला हा जन्म मिळणार नाही.
सकारात्मक विचारांनीच आपले आयुष्य समृद्ध होणार आहे, हे विसरता कामा नये. आपल्या शत्रूचासुद्धा सूड घेण्याचा विचार करू नये, कारण असे केल्याने त्याच्यापेक्षाही अधिक वेदना आपल्याला होतात. जनरल एसिन्होवरने जे केले तेच आपण करू. आपल्याला जे लोक आवडत नाहीत त्यांचा विचार करण्यात आपण एक मिनिटसुद्धा घालवायचे नाही. खरा आनंद कृतज्ञतेची अपेक्षा धरण्यात नाही. उलट देण्यातील आनंद शोधण्याचा आहे. चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा. संकटांना विसरून जा.
(डेल कार्नेजी यांच्या ‘चिंता सोडा सुखाने जगा’ या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या अॅड. शुभदा विद्वांस यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा