तणावपूर्ण घटनेतही फायदा बघणारा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मन:स्थिती तणावरहित राहण्यास मदत होते. खूपदा नुकसान खूप जास्त असते; पण प्रत्येक वेळेस त्यात काही ना काही फायदाही असतोच. अशा छोटय़ाशा लपलेल्या फायद्याला शोधायला शिका.
रोजच्या व्यवहारात प्रेरणा किंवा उत्तेजन मिळाले नाही तर माणसाला कंटाळा येऊ लागतो. स्वारस्य वाटत नाही आणि त्याची कार्यक्षमता कमी होते; पण उत्तेजना एका ठराविक मर्यादेबाहेर गेली तर त्याचे तणावात रूपांतर होते. परिणामी कार्यक्षमता एकदमच ढासळते. परिस्थिती बदल घडविण्यास आपणही काही सकारात्मक पावले उचलू शकतो. नवीन सकारात्मक संबंध वाढवू शकतो. याचा अर्थ असा की, प्रेरणा उपयुक्त असते; पण तणाव नाही.
तीन ‘अ’ चे सूत्र –
विश्लेषण करणे (Analysis)- समस्या छोटी असो किंवा मोठी, त्याची फोड करणे, योग्य विश्लेषण करणे आवश्यक असते. दुसऱ्याला दोष देऊ नका. शांत मनाने, थंड डोक्याने आलेल्या अडचणीचा अभ्यास करा. सर्व बाजू तपासा. त्यातल्या चांगल्या तसेच वाईट गोष्टींकडेही बघा.
स्वीकार करणे- अडचणीकडे कानाडोळा करण्यापेक्षा त्यांना आहे त्या परिस्थितीत स्वीकारा. आपली मूळ जबाबदारी स्वीकारा.
कर्म करणे- अडचणीची किंवा त्रासदायक घटनांना बसल्या बसल्या नुसते न्याहाळू नका. काहीतरी ठाम पाऊल उचला. आयुष्यातल्या लहान किंवा महान घटनेचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या फायदाच होत असतो. अडचणींमधून होणारे फायदे शोधण्याची सवय लावून घ्या. काही बाबतीत कदाचित आपल्याला प्रत्यक्ष फायदा दिसणार नाही; परंतु अप्रत्यक्ष लाभ नक्कीच होईल. कोणत्याही व्यक्तीस सर्व परिस्थितीमध्ये नेहमीच सफलता मिळेलच असे नाही. सचिन तेंडुलकर एका वेळी दोन शतके ठोकतो आणि दुसऱ्या वेळी कमी धावांवर त्रिफळा उडून बाद होतो. जर तो निराश होऊन बसला असता तर तो आज जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज झालाच नसता.
तणावपूर्ण घटनेतही फायदा बघणारा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. खूप वेळा असेही होऊ शकते की, नुकसान खूप जास्त असते; पण प्रत्येक वेळेस काही ना काही फायदाही त्यात असतोच अशा छोटय़ाशा लपलेल्या फायद्याला शोधायला शिका. म्हैसूरच्या सीएफटीआरआयचे माजी निर्देशक स्वर्गीय डॉ. मुजुमदार हिमालयात माउंट अबू येथे ब्रह्मकुमारीच्या मुख्यालयात तीन दिवसांच्या शिबिरीसाठी गेले. परत येताना त्यांना अतिसार झाला. यामुळे त्यांची खूप गैरसोय झाली. खरेतर या घटनेत नुकसान जास्त जाणवते; परंतु आपला अनुभव व्यक्त करताना ते म्हणाले, ‘माउंट अबूच्या शिबिरात मी सकारात्मक विचार करायला शिकलो, त्यामुळे मी तसा विचार करू लागलो. त्या काळात माझ्या अंगातील मेदामुळे माझे वजन बरेच वाढले होते. अतिसारामुळे जवळजवळ सात दिवसांच्या अवधीत ही वाढलेली चरबी कमी झाली. अतिसाराचा शाप वास्तवात माझ्यासाठी वरदान ठरला.’ नावडत्या घटनांमध्ये फायदा बघण्याचे हे सकारात्मक उदाहरण आहे.
डॉ. रॉबर्ट शुलर यांनी बरीच प्रेरणादायक पुस्तके लिहिली. त्यांचे वडील एक साधे शेतकरी होते. एकदा त्यांनी अर्धी गाडी भरून मक्याचे बी पेरले. दुष्काळाच्या संकटाने खूप मेहनत घेऊनही त्यांना अर्धीच गाडी मक्याचे पीक मिळू शकले. खरे पाहता ही दुर्दैवाची बाब होय. बऱ्याच जणांनी याबद्दल निराश होऊन आपल्या नशिबाला दोष दिला असता; परंतु डॉ. शुलर यांच्या पित्याने आपल्या मनात नकारात्मक विचार येऊच दिले नाहीत. त्यांची भावना अशी होती की, ‘अर्धी गाडी पीक हे काही न मिळण्यापेक्षा कितीतरी चांगले. जितके बी पेरले, ते मला परत मिळाले. मला फायदा जरी झाला नसला तरी मी काही गमावलेही नाही.’ दु:ख आणि निराशा वाटणाऱ्या प्रत्येकाने त्यांची ही प्रार्थना लक्षात ठेवावी. ‘माझ्या प्रिय ईश्वरा, मी तुला धन्यवाद देतो. कारण या वर्षी मी काहीच गमावले नाही. तू माझे सर्व बी मला परत दिले. धन्यवाद!’
माझे रुग्ण शहा यांनी काही प्रतिष्ठित कंपन्यांचे पन्नास हजार रुपयांचे शेअर्स खरेदी केले. काही वर्षांतच त्यांच्या पन्नास हजार रुपयांची किंमत वाढून पाच लाखांवर गेली. तरीही त्यातील जाणकार लोकांनी त्यांना शेअर्स तसेच ठेवण्याचा सल्ला दिला. अचानक काही दिवसांतच शेअर बाजारात बरीच घसरण झाली. त्यांना केवळ एक लाख रुपये मिळाले. शहा फारच निराश झाले. मी त्यांना विचारले , तुमचे किती नुकसान झाले? त्यांनी सरळ सरळ सांगितले, ‘मी चार लाख रुपये घालवले.’ शहा आणि डॉ. शुलर ही दोन उदाहरणे परस्परविरोधी आहेत. खरे पाहता शहा यांना शंभर टक्के फायदा झाला आहे. दोन वर्षांत त्यांनी गुंतविलेल्या पन्नास हजारांचे एक लाख रुपये झाले. कोणत्याही बँकेत इतके व्याज मिळाले नसते; परंतु नकारात्मक दृष्टिकोनाचे लोक अशा सोप्या हिशोबाकडे पूर्ण कानाडोळा करतात.
वरील उदाहरणाच्या स्पष्टीकरणात मी माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो. २८ वर्षांपूर्वी माझे वजन असायला हवे त्यापेक्षा फारच कमी होते. भारतातील वेगवेगळय़ा ठिकाणी भाषणे देण्याचा माझा कार्यक्रम असे. त्याच दिवसात मला क्षयाच्या मस्तिष्कदाहाने ग्रासले. ज्यामुळे मी काही आठवडे बेशुद्धावस्थेत काढले. सतत उलटी आणि अतिसार सुरू होते. यातून पूर्णपणे बरे होण्यास मला ३-४ महिने लागले. माझे आणि माझ्या कुटुंबाचे फार नुकसान झाले. तसे पाहता आम्ही अतिशय तणावाचा सामना करत होतो; परंतु मी या परिस्थितीत शक्य तेवढे फायदे शोधले. मला पाहिजे होते तसे माझे वजन ५ ते ७ किलो वाढले होते. या सर्व घटनेनंतर मी विचार केला की, जे काही घडले ते माझ्या फायद्याचेच ठरले. आता माझे वजन सामान्यत: पाहिजे तेवढे आहे. अतिशय तणावपूर्ण घटनेतदेखील सकारात्मक दृष्टी ठेवून आपला फायदा बघणे, याचे हे एक जिवंत उदाहरण आहे.
आणखी एक व्यक्तिगत घटना जी प्रारंभी फारच ओढग्रस्तीची वाटत होती; पण नंतर माझ्यासाठी जीवनाचे वरदान ठरली. ती अशी : वैद्यकीय शाखेत प्रवेश घेताना माझ्या डोक्यावरचे केस गळू लागले. माझे मित्र माझी टिंगलटवाळी करू लागले. होते त्यापेक्षा माझे वय पाच वर्षांनी जास्त दिसू लागले. जेव्हा मी वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली तेव्हा मात्र माझे नकोसे असलेले हे व्यक्तिमत्त्व माझ्यासाठी वरदान ठरले. मुंबईत अतिशय स्पर्धा असणाऱ्या वैद्यकीय व्यवसायात सुरुवातीला चांगला जम बसविणे फारच कठीण असते; परंतु सुरुवातीलाच माझ्या पोक्त दिसण्यामुळे रुग्णांनी मला एक अनुभवी, वरिष्ठ चिकित्सक मानले आणि त्यांचा माझ्यावर विश्वास बसला. या अनुभवामुळे मी जीवनाबद्दल आशावादी आणि सकारात्मक झालो. जे होते ते चांगल्यासाठी होते, या उक्तीचे मी एक खरेखुरे उदाहरण आहे.
आपण त्या राजाची गोष्ट वाचली असेल, ज्याचा प्रधान खूपच आशावादी होता. तो नेहमी सांगे की, आयुष्यात जे काही घडले त्या चांगले नक्कीच असते. एक दिवस अचानक राजाची करंगळी कापली गेली. हे समजल्यावर प्रधान म्हणाला, ‘काळजी नसावी, जे होते ते भल्याकरिताच होते.’ राजा हे ऐकल्यावर खूप रागावला आणि त्याने प्रधानास तरुंगात टाकले.काही दिवसानंतर राजा शिकारासाठी गेली आणि जंगलातील आदिवासी लोकांनी त्याला पकडले. देवीला राजाचा बळी देण्याचा त्या जंगली लोकांचा मानस होता; परंतु बळी दिला जाणारा माणूस संपूर्ण असणे आवश्यक होते आणि राजाचे एक बोट कापले गेलेले होते. यामुळे राजा बळी देण्यासाठी अयोग्य ठरला. राजा खूपच आनंदित झाला. राजाने कारागृहात जाऊन प्रधानाला सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर प्रधान म्हणाला, ‘तुम्ही मला तुरुंगात ठेवले म्हणून मी सुरक्षित आहे. कारण तसे नसते तर तुमच्या जागी मी बळी गेलो असतो.
(‘साकेत’ प्रकाशनच्या राजश्री खाडिलकर यांनी अनुवादित केलेल्या ‘स्ट्रेस मॅनेजमेंट- तणावातून मन:शांतीकडे’ या पुस्तकातून साभार)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा