ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की तुमच्या सुख-दु:खाचे निर्माते तुम्हीच आहात, त्या दिवशी तुम्ही स्वत:चे मालक व्हाल. (खऱ्या अर्थी स्वतंत्र व्हाल). त्या दिवशी जीवनाचा खरा प्रारंभ होईल. आता निवड तुमच्या हाती.
नियतीमध्ये फक्त विषाद आणि वैफल्याची लांबलचक शंृखला लिहून ठेवली आहे, असं काहींना वाटतं. खरं तर हे तुमच्या हाती असतं. तुम्ही जसं लिहीत जाल तशी अक्षरं उमटत जातील. विषाद तुम्हाला इतर कुणी देत नाही. तर ती तुमची निवड असते. तुम्ही स्वत: तो स्वीकारला आहे. आनंदसुद्धा अन्य कुणी देणार नाही. तुम्ही निवडला तर मिळेल. तुम्ही जे शोधता (निवडता, स्वीकारता) तेच तुमचं भाग्य असतं. मी काय म्हणतो ते थोडं समजून घ्या.
भाग्य कुणी दुसऱ्यानं तुमच्या भाळी लिहिलं आहे, असं भाग्याबद्दलची जुनी धारणा सांगते. माझं असं म्हणणं आहे, की भाग्य लिहिलेलं नाही. रोज लिहावं लागतं. ते आणखी कुणी लिहीत नाही. तुम्हीच ते लिहीत असता. कदाचित ते लिहिताना तुम्हाला जाणवत नाही. त्याचं भान तुम्हाला नसतं. कदाचित इतक्या अजाण पातळीवर तुम्ही ते लिहीत असाल की लिहिलं गेल्यावर ध्यानी येतं की काही तरी लिहिलं गेलं आहे. लिहिते वेळी तुम्ही स्वत:ला पकडू शकत नाही. आपली जाण, आपलं भान कमी पडतं.
इतर कोणी आपलं भाग्य लिहीत असेल तर सारा धर्म व्यर्थच म्हणायचा. मग तुम्ही काय करणार? तुम्ही एखाद्या असहाय मासोळीसारखे आहात असं म्हणावं लागेल. वाळवंटात फेकलं तर तिथं तडफडत राहाल. कुणी जलाशयात टाकलं तर ठीक! थोडक्यात काय, तुम्ही कुणाच्या तरी हातचं खेळणं आहात. कठपुतळी आहात. मग तुम्ही कितीही मुक्त व्हायचं म्हटलंत तरी कसे होणार? तुमच्या भाग्यात मुक्ती लिहिली असेल तर मिळेल, नाही तर कशी मिळणार?
भाग्यात लिहिली म्हणून मिळाली तिला काय मुक्ती म्हणायचं? कुणाला विवशतेनं मुक्त व्हावं लागलं तर तशी मुक्तीसुद्धा एका अर्थी पारतंत्र्यच म्हणावं लागले. कुणी आपल्या स्वत:च्या इच्छेनं स्वत: निवड करून नरकात गेला, कुणी स्वत:हून कारागृहात निवास करणं पसंत केलं, तर आपण निवड करून स्वीकारलेलं ते कारागृहसुद्धा स्वातंत्र्यसूचक असतं. मुक्ती हे काही स्थान नाही. कारागृह हेही स्थान नव्हे. तुमच्या अंगी निवडीची क्षमता असणं, स्वत: निवड करणं, त्यानुसार आचरण करणं या गोष्टीत मुक्ती सामावली आहे. आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य नसेल आणि माणूस केवळ भाग्याच्या हातचं खेळणं असेल तर मुक्ती अशक्य आहे मग तुम्ही पुण्य करा, तुम्ही भानावर या, जागृत व्हा वगैरे सांगण्यालाही काय अर्थ उरला? असेल नशिबात तर येईल जाग! येईल भान!
माणसानं भाग्याची ही धारणा स्वीकारली कारण त्यामुळे त्याची मोठी सोय झाली. त्याला कुठलंच उत्तरदायित्व घेण्याची गरज उरली नाही. सारी जबाबदारी दूर झाली. नि कुणी दुसऱ्याच्या खांद्यावर गेली. आपल्या खांद्यावरची जबाबदारी परमात्म्याच्या अंगावर टाकून तुम्ही मोकळे होता. तुम्ही स्वत:च कर्म करत असता. जे तुम्ही करता तेच घडतं. तुम्ही निवड करता. तुम्ही बीज पेरता. तुम्हीच पीक घेता. पण परमात्म्याला मध्ये आणून त्या कृत्यांबद्दलच्या जबाबदारीचा स्वत:चा भार हलका करता.
पण असे असहाय होऊन तुम्ही स्वत:लाच फसवत असता. मनाची ही फार मोठी चलाखी असते. जबाबदारी कुणा दुसऱ्याच्या अंगावर झटकून स्वत: मोकळं व्हायचं. ही युक्ती आपल्या आत इतकी खोलवर रुजलेली असते, की आस्तिक परमेश्वरावर भार टाकून मोकळा होतो. नास्तिक निसर्गावर जबाबदारी टाकून स्वत: नामानिराळा होतो. कम्युनिस्ट इतिहासावर जबाबदारी ढकलतात. फ्रॉइडसारखा मानसशास्त्रज्ञ अचेतन मनावर भार टाकून आपण वेगळा होतो. कुणी अर्थशास्त्रावर तर कुणी राजकारणावर. अशी कशाकशावर जबाबदारी झटकून माणूस मोकळा राहू पाहतो. हे सारे एकाच युक्तीचे विविध अवतार आहेत. पण जबाबदारी टाळायला सगळे एका पायावर तयार असतात.
थोडा विचार करा. ज्या क्षणी तुम्ही जबाबदारी झटकता त्या क्षणी तुम्ही तुमच्या आत्म्याला हरवून बसता. तुम्ही स्वत: निवड करता. त्यानुसार आचरण करण्याची जबाबदारी स्वीकारता आणि परिणामांचीही जबाबदारी स्वीकारता, तेव्हा तुम्ही स्वतंत्र असता. नशीब, भाग्य इत्यादी गोष्टींपासून सावधान राहा. नशीब, भाग्य वगैरे धार्मिक माणसाच्या धारणा नव्हेत.
म्हणूनच सांगतो, तुम्ही स्वत:चं भाग्य लिहीत असता. त्यावर तुम्ही अक्षरं कोरत असता. कदाचित काल लिहिलेलं विस्मृतीत गेलं असेल. पण मी खात्रीनं सांगतो की जरा काळजीपूर्वक शोध घेतलात तर तुम्हाला आपण लिहिलेली अक्षरं सहज लक्षात येतील. त्यांच्यात थोडाबहुत बदल झाला असलाच तरी ओळखू न येण्याएवढा नसेल. आपणच आपलं भाग्य लिहितो हे तुमच्या लक्षात येईल.
ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की तुमच्या सुख-दु:खाचे निर्माते तुम्हीच आहात, त्या दिवशी तुम्ही स्वत:चे मालक व्हाल. (खऱ्या अर्थी स्वतंत्र व्हाल). त्या दिवशी जीवनाचा खरा प्रारंभ होईल. आता निवड तुमच्या हाती असेल. दु:खी व्हायचं असेल तर तुम्ही त्याची निवड करा. मी पुन्हा एकदा तुम्हाला सतर्क करतो. नीटपणे निवड करा. (दु:ख निवडायचं तर) थोडंसं, थेंबथेंब दु:ख कशाला, दु:खाचा समुद्र अंगावर घ्या. छातीवर दु:खाचा हिमालय ठेवा. थेट नरकात बुडा. जो काही निर्णय घ्यायचा तो आपणच! हे एकदा निश्चित झालं की मग दु:खाचं पीक आपणच घ्यायला हवं. तुमचा तो निर्णय असल्यानं तुम्हाला वाटत असेल त्या दु:खातच सुख वाटतंय तर ते ठीकच आहे. पण एक गोष्ट ध्यानी ठेवा. चुकूनसुद्धा म्हणू नका की तुमची नियती दुसऱ्याच कुणी तरी ठरवली आहे.
पण मग जाणूनबुजून कुणी दु:ख निवडणार नाही. हीच गंमत आहे. जोवर जबाबदारी दुसऱ्यावर टाकता येते तोवर दु:ख निवडायला ना नसते. ज्या दिवशी तुम्ही विचार कराल की सुख असो की दु:ख त्याची जबाबदारी माझीच असेल, त्या दिवशी दु:खाची निवड कोण करील? अमुक तमुक गोष्टीत दु:ख त्याची जबाबदारी माझीच असेल, त्या दिवशी दु:खाची निवड कोण करील? अमुक तमुक गोष्टीत दु:ख आहे हे समजून उमजूनही कोण ती गोष्ट करायला जाईल? आपल्याला माहीत नाही. ती नियती दुसराच कुणी ठरवतो, मग येऊ दे दु:ख! अशी मनोधारणा असते. साप, विंचू म्हणजे हिरे, माणकं असं वाटून तुम्ही त्यांना भले गोळा कराल, तिजोरीत टाकाल! पण हे साप विंचू आहेत असं जाणून, समजून त्यांना जवळ घ्याल का? गोळा करत बसाल का?
एकदा तुम्ही हे लक्षात घेतलंत की मीच सगळय़ांचा निर्णय करणार आहे, माझं दैव मीच लिहितो, माझी नियती म्हणजे मी केलेली निवड आहे, त्या क्षणी दु:ख निरोप घेईल. सुखाची पहाट उगवेल. सुखाचा सूर्य उदयाला येईल. चमकू लागेल आणि सुख आपल्याच हातात असल्यावर थेंब थेंब सुख कशाला घ्यायचं? सुखाचे मेघ वर्षू देत.
हे सगळं तुमच्याच निर्णयावर अवलंबून आहे. आणि हा अतिशय मूलभूत निर्णय आहे. तुम्हाला वाटतं, आपल्या भाळी दु:ख, वैफल्याची साखळी लिहिलेली आहे. ही कोण लिहिणार? कुणाला काय पडलं आहे? तुम्हाला दु:ख द्यायला कोण उत्सुक आहे? एक गोष्ट निश्चित आहे. जर कुठं परमात्मा असेल तर तो काही तुम्हाला दु:ख द्यायला उत्सुक नाही. परमात्मा जर दु:ख द्यायला उत्सुक असला तर त्याच्यात आणि सैतानात फरक तो काय राहिला? लक्षात घ्या, तुम्हाला दु:ख द्यायला उत्सुक असलेला परमात्मा दु:खवादी असणार. तो स्वत:ही दु:खाचेच लेख लिहिणार. सगळीकडे दु:खाचा वर्षांव करणाऱ्याच्या अंगावर दु:खाचे तुषार उडल्याशिवाय राहतील का? सगळय़ांच्या आयुष्यात अंधार करणारा, दिवे विझवत जाणारा असेल, त्याच्या स्वत:च्या वाटय़ाला अमावास्येचा अंधारच येईल. परमात्मा कुठं असलाच तर तो ही चूक मुळीच करणार नाही. परमात्मा असलाच तर तो तुमच्या जीवनात सुख असावं अशीच इच्छा धरेल. दु:खाची इच्छा धरणार नाही. कारण त्यामुळे त्याच्या आयुष्यात सुख निर्माण होण्याची शक्यता राहील. परमात्मा न म्हणता पुरं अस्तित्व म्हणा. अस्तित्वही सुखाची आकांक्षा करेल. कारण तुम्ही अस्तित्वाचा अंश आहात. तुमचे दु:ख अंशत: अस्तित्वाच्या खांद्यावर पडेल.
( मनोविकास प्रकाशनाच्या ‘विचारतरंग’ या माधवी कुंटे अनुवादित पुस्तकातील हा संपादित भाग, साभार)
तुमचं भाग्य तुम्हीच लिहिता
ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की तुमच्या सुख-दु:खाचे निर्माते तुम्हीच आहात, त्या दिवशी तुम्ही स्वत:चे मालक व्हाल.
आणखी वाचा
First published on: 23-11-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Edit this part of the book vichartarang translated by madhavi kunte