शैक्षणिक संस्था या शिक्षण, करुणा आणि सुधारणा याचे केंद्र बनायला हव्यात. मुलांना तिथे सुरक्षित वाटलं पाहिजे. शिक्षकांनीही मुलं जिथे चुकतील तिथे चूक सुधारून ती बरोबर केली पाहिजे. मुलांना मारणं, त्यांना नाकारण्यापेक्षा समजवून घ्यायला हवं, कसं ते आजच्या ‘प्रेम, आयुष्य आणि अभ्यासा’च्या
दुसऱ्या भागात.

कला शाखेच्या तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या नसिमाच्या डोळ्यांत अनेक स्वप्नं तरळत होती, पण तिच्या पालकांना तिचं लग्न लावून देण्याची घाई झाल्याने नसीमा खिन्न होती. ती पुढे अशीच शिकत राहिली तर उद्या तिला नवरा मिळणं कठीण जाईल आणि सतत अभ्यास करून मुलीला चष्मा लागला तर, अशी भीती तिच्या आईला वाटत होती. ‘‘मला माझ्या आईसारखं सतत दुसऱ्यावर अवलंबून असलेलं आयुष्य जगायचं नाहीये. निर्णयस्वातंत्र्य सोडाच घरातले छोटे-मोठे निर्णयही आई घेऊ शकत नाही. ती सगळ्या बाबतीत माझ्या वडिलांवर अवलंबून आहे आणि हेच मला माझ्या आयुष्यात व्हायला नकोय. मला शिकून-सवरून स्वत:च्या पायावर उभं राहायचं..’’ रडत-रडत नसीमा मला सांगत होती.
संगीता सावंत या मुलीचीही नसीमासारखीच अवस्था होती. तिच्या आई-वडिलांनी तर ठरवूनच टाकलं होतं की, बारावीची परीक्षा झाली की लगेचच अमेरिकेत स्थायिक असलेल्या एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून द्यायचं.
पालक हे पूर्णपणे विसरतात की, शिक्षणाचा अभाव माणसाला दुर्बल करतो आणि ती जर स्त्री असेल तर मग शिक्षणाअभावी तिचं अतोनात नुकसान होतं. मग आयुष्यात तडजोडी करण्याचे प्रसंग आले तर तेही समर्थपणे हाताळता येत नाहीत. मुलींना संसारात कमी महत्त्व दिलं जातं आणि त्यांचा आदरही राखला जात नाही. दुर्दैवाने वैवाहिक आयुष्यात संकटं-समस्या उद्भवल्या तर त्याचा सामना करण्यासाठी त्या समर्थ नसतात. संकटातून बाहेर तर पडायचे असते, पण शिक्षणाअभावी बाहेर पडण्याचे मार्गच त्यांच्यासाठी खुंटलेले असतात.
समुपदेशन करताना या दोन्ही मुलींना त्यांचं म्हणणं आपल्या पालकांसमोर स्पष्टपणे आणि न घाबरता कसं मांडलं पाहिजे, याचं प्रशिक्षण देण्यात आलं. ‘‘आई-वडिलांचं न ऐकून मी त्यांना दुखावते आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय आणि ते जे करतील ते चांगलंच करतील. मी त्यांना माझ्यामुळे दु:खी झालेले पाहू शकत नाही.’’ एकीकडे अशा विचारांनी दोघी अस्वस्थ होत होत्या तर दुसरीकडे मनाविरुद्ध जगावं लागणार याचाही त्यांना त्रास होत होता. या द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेण्यात अडथळा येत होता. ‘तुमच्या पालकांची मानसिकता वेगळी आहे. ते ज्या काळात जन्माला आले, वाढले तेव्हाची पाश्र्वभूमी वेगळी होती म्हणून त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांचा काळ वेगळा होता.’ हे त्या मुलींना समजावून सांगितलं. ही पहिली पायरी होती तर या परिस्थितीचा दुसऱ्या बाजूनेही विचार करायला शिकवणं ही दुसरी पायरी होती. ‘तुम्ही चांगलं शिकून-सवरून, स्वत:च्या पायावर उभं राहूनही तुमच्या पालकांसाठी, त्यांच्या आनंदासाठी खूप काही करू शकता. तुम्ही सक्षम, सबळ झालात; आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झालात तर पालकांना आनंद होईल यात शंका नाही. मुलीच्या कर्तृत्वाचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच झळकेल. तेव्हा ते तुम्हाला जास्त आनंदी दिसतील.’ हा नवा दृष्टिकोन मुलींना दिला. त्यांच्या पालकांशी या विषयावर दीर्घ चर्चा केल्यानंतर कुठे ‘लोक काय म्हणतील’ या प्रश्नाचं भूत त्यांच्या मानगुटीवरून उतरलं आणि मुलींच्या स्वप्नांना बळ द्यायला हवं, त्यांच्या पंखात भरारी घेण्याची शक्ती आपण द्यायला हवी हे त्यांना पटलं. जुन्या जाचक रूढी-परंपरांना चिकटून राहण्यापेक्षा नव्या युगात जगणाऱ्या मुलींचं भविष्य फार महत्त्वाचं आहे हे एव्हाना त्यांनाही उमगलं.   
अनेक महत्त्वाकांक्षी मुली प्रेमात पडल्या की, अभ्यास वगैरे सारं काही सोडून घाईघाईने लग्न करून मोकळ्या होतात. काही जणींना वाटतं की अभ्यास वगैरे ना, तो काय लग्नानंतरपण करता येईल. पण हे वाटतं तितकं सोपं आणि प्रत्येकीच्या बाबतीत शक्य नसतं. किंबहुना बरेच वेळा ते अधिक कठीण असतं. मुलींनी, विशेषत: किशोरवयीन मुलींनी, हे समजलं पाहिजे की सर्वात आधी त्यांचं लग्न, शिक्षण आणि करिअरशी लागलेलं आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतरच नवऱ्याशी लग्न लागणार आहे. लग्न हे आयुष्यातील एकमेव ध्येय असू शकत नाही आणि मुलींच्या बाबतीतही ते तसं नसावंच. शिक्षणामुळे मिळणारा आनंद आणि सुख एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला शिक्षण अर्धवट सोडून लग्नाची घाई करणं म्हणजे नवऱ्यावर अवलंबून राहणं आणि मग घुसमट आणि अवहेलना यांना आमंत्रण.  
नारायण आणि रेणू एकमेकांचे चुंबन घेताना शाळेत पकडले गेले आणि त्यामुळे लगेचच त्यांना शाळा सोडण्यास सांगण्यात आलं. दोघांनी खूप गयावया केल्यानंतर प्राचार्यानी थोडा विचार केला आणि त्यांच्याकडून एक हमीपत्र लिहून घेतलं. शाळा त्यांच्या  विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक सोयी-सुविधा पुरविते किंवा शाळेचे विद्यार्थी म्हणून जे अधिकार बहाल करते ते सर्व अधिकार आणि सुविधा त्या मुलांकडून काढून घेण्यात येत आहेत असा त्या हमीपत्राचा आशय होता. आमच्याकडे ती मुलं आली तेव्हा शाळेच्या या कारवाईमुळे आपला आत्मसन्मान गमावून बसली होती. त्यांना योग्य प्रकारे समुपदेशनाद्वारे त्याचं काय चुकलं, का चुकलं, त्यांनी केलेली गोष्ट कशी अनुचित आहे याची जाणीव करून देण्यात आली.
गाणी, व्हिडीओ, चित्रपटांद्वारे किशोरवयीन मुलांच्या संवेदना उद्दीपित केल्या जातात आणि मग डोक्यात विचारांची आणि शरीरात हार्मोन्सची उलथापालथ सुरू होते. जी मुलं या गोष्टींच्या आहारी जातात त्यांचा समतोल  बिघडू लागतो आणि मग अपघात होतात. असे अपघात फार काळजीपूर्वक आणि संवेदनशीलतेने हाताळावे लागतात.
प्राचार्याच्या/शिक्षकांच्या कार्यशाळेत मी नेहमी प्रश्न विचारतो की, जर तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयाच्या आवारात दोन विद्यार्थ्यांना जरुरीपेक्षा एकमेकांच्या जास्त जवळ आलेले पहिले तर तुम्ही काय कराल ? या प्रश्नावर बहुतांशी शिक्षकांचं हेच उत्तर असतं की, आम्ही त्यांच्या थोबाडीत मारू किंवा मग लग्न करण्याचा सल्ला देऊ. आणि त्यांचं हे उत्तर ऐकून मला मोठा धक्काच बसतो.
मला नेहमी वाटतं की, शैक्षणिक संस्थांनी इतर सोयी-सुविधांबरोबरच आपल्या विद्यार्थ्यांना भावनिक पातळीवरही सुरक्षा आणि सुरक्षितता पुरवणे हे फार आवश्यक होऊन बसले आहे. एक उदाहरण देतो -महाराष्ट्रातल्याच एका आयसीएसई शाळेत शिकणाऱ्या दहावीतील मुलाने सुरक्षा रक्षकाचा डोळा चुकवून रात्री मुलींच्या वसतिगृहात प्रवेश केला आणि ज्या खोलीत त्याची गर्लफ्रेंड राहायची तिथे पोहोचला. दोघांनी  शरीरसुखाचा अनुभव घेतला. त्याच वेळी ते पकडले गेले. खरं तर ‘शाळेची प्रतिष्ठा, अब्रू’ या दृष्टीने ही खूप मोठी घटना होती पण याचा गाजावाजा न करता शाळेने फार हुशारीने आणि प्रगल्भपणे हा प्रश्न हाताळला. या घटनेची वाच्यता होऊ न देता दोन्ही मुलांना समुपदेशकाकडे रवाना केले. मी त्या मुलाला भेटलो तेव्हा मला कळलं की, तो मुलगा अभ्यासात अतिशय हुशार होता आणि त्याने उच्च टक्केवारीचे अनेक विक्रम रचले होते जे आतापर्यंत कुणीच पार करू शकलं नव्हतं. पण त्या मुलाच्या डोक्यात शरीरसुखाबद्दल फार चुकीच्या गोष्टी ठासून भरल्या होत्या आणि त्यामुळेच आपल्या गर्लफ्रेंडबरोबर वयाच्या पंधराव्या वर्षी शरीरसुख उपभोगण्यात त्याला काहीच गैर वाटत नव्हतं हे मला त्याच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवलं. मी त्याचं म्हणणं नीट ऐकून घेतोय हे कळल्यावर तो आणखी बोलता झाला. त्याच्या बोलण्यातून पुढे हेही कळलं की, अनेक प्रौढ विषयांची माहिती फार लहान वयातच त्याच्या समोर उघड झाली होती त्यामुळे त्याला त्याबद्दल फारसं काही वेगळं वाटत नव्हतं. ‘‘खरं प्रेम कधीच उतावीळ नसतं आणि खरं प्रेम नेहमी संयमाने वागतं.’’  हे समजून घ्यायला त्याला बराच वेळ लागला. त्याच्या डोक्यातली जळमटं काढून टाकण्यास आम्हाला फार वेळ लागला. गाडी चालवायला शिकणं आणि शरीर सुखाचा अनुभव घेणं या दोन्ही गोष्टींसाठी एक निश्चित वय व्हावं लागतं हे त्यांना पटवून दिलं. दोन्ही मुलं काही काळानंतर पूर्ण बरी होऊन पुन्हा शाळेत जाऊ  लागली.  म्हणूनच म्हटलं ना की, शैक्षणिक संस्थांनी इतर सोयी-सुविधांबरोबरच आपल्या विद्यार्थ्यांना मानसिक-भावनिक सुरक्षा आणि सुरक्षितता पुरवणं हे फार आवश्यक आहे.
शैक्षणिक संस्था या शिक्षण, करुणा आणि सुधारणा यांचे केंद्र बनाव्यात. मुलांना तिथे सुरक्षित वाटलं पाहिजे आणि शिक्षकांनी मुलं जिथे चुकतील तिथे त्यांची चूक सुधारून ती बरोबर केली पाहिजे. पण त्यांना नाकारू नका.
किशोरवयीन मुलांसाठी कामं करताना आम्ही पाच गोष्टी महत्त्वाच्या मानतो. पहिला मुद्दा म्हणजे – १) प्रत्येक मूल महत्त्वाचं आहे २) सगळी मुलं एकसारखी आहेत आणि प्रत्येक मूल आदराला पात्र आहे, ३) कोणाचंही मूल गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही ४) शिक्षण घेण्याचा अधिकार प्रत्येक मुलाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ५) प्रत्येक मुलात परिवर्तन घडून येणं शक्य असतं. या पाच गोष्टींवर माझा पूर्ण विश्वास आहे.
अकारावीत शिकणाऱ्या एका मुलाला परीक्षेत कॉपी करताना शिक्षकांनी पकडलं आणि प्राचार्यासमोर उभं केलं. प्राचार्यानी त्याला धमकावून, चारचौघांत त्याचा पाणउतारा करून घरी पाठवून दिलं. घरी जाऊन त्या मुलाने आत्महत्या केली. परीक्षेत कॉपी करताना पकडले गेल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या मुलांची संख्या आज दुर्दैवाने वाढते आहे. केलेल्या कृतीची लाज, पालकांची भीती, समाजाची भीती आणि या सगळ्याचा भविष्यावर काय परिणाम होईल ही आत्महत्येमागची कारणं असतात. जेव्हा कॉपी करताना मुलाला किंवा मुलीला पकडता तेव्हा प्राचार्याच्या केबिनमध्ये नेऊन त्या मुलांना नुसतं बसवा. त्यांना धमक्या देऊन, मारहाण करून किंवा पाणउतारा करून हा प्रश्न सुटणार नाही. ही मुलंसुद्धा मुळात वाईट नसतात हे आधी कुणी तरी समजून घेतलं पाहिजे असं माझं कळकळीच सांगणं आहे. आणि मग त्यांना त्यांनी कसं अनुचित, चुकीचं काम केलंय याची योग्य प्रकारे आणि योग्य शब्दांत पण त्या मुलांचा अनादर न करता समज दिली पाहिजे. शिक्षकांना काय करता येईल तर कारुण्यपूर्ण भावनेने आपल्या शाळा-कॉलेजमधील चुकणाऱ्या मुलांना विश्वासात घेऊन, आपले हात त्यांच्या मदतीसाठी पुढे करून त्यांच्याशी बोलता येईल. त्यांच्या चुकांची पालकांना माहिती देऊन त्या सुधारण्यासाठी पालकांना मार्गदर्शनही करता येईल.   
 मुलांना मिळणाऱ्या शैक्षणिक सोयीसुविधांचा लाभ मुलांना नि:संकोचपणे घेऊ  द्यावा. जी मुलं परीक्षेत कॉपी वगैरे करण्यासारखे अनुचित प्रकार करून बसतात अशा मुलांना सुधारण्याची पहिली पद्धत म्हणजे या मुलांना दूर न लोटता त्यांना दयाळूपणे हाताळणारे शिक्षक. शिक्षकांकडून मिळणाऱ्या वागणुकीतून मुलं बरंच काही शिकतात आणि मग त्यांना त्यांची चूक कळून येते. मुलांना धमकाविणं किंवा जोरजोरात त्यांच्या अंगावर ओरडणं यामुळे मुलांचा संताप वाढतो आणि पुन्हा ती तीच चूक करायला प्रवृत्त होतात. मुलांशी जुळवून घेणारे आणि सतत त्यांच्या संपर्कात राहणारे चांगले शिक्षक असतात पण अडचणीत असलेल्या, गरीब असलेल्या, अकार्यक्षम असलेल्या, बंडखोर असलेल्या मुलांबरोबर जे शिक्षक वेळ घालवितात आणि त्यांच्यात परिवर्तन घडवून आणतात तेच खरे आदर्श शिक्षक मानले जातात.
गांजलेल्या मुलांना स्वीकारणे आणि त्यांना चांगली वागणूक देणं हे ‘प्रौढ’ समाजाचं कर्तव्यच आहे. याचा अर्थ असा नाही की, त्यांच्या चुकांवर पांघरून घालून त्यांचा स्वीकार करावा, पण परिवर्तन घडवून आणण्याची सगळ्यात पहिली पायरी जर कुठली असेल तर ती म्हणजे त्या मुलांनाही आदराने वागवा. परिवर्तन होण्यासाठी काही दिवस, काही महिने कदाचित काही र्वष जावी लागतील, पण जे शिक्षक, पालक आणि समाज प्रयत्नांची कास धरतात आणि हा प्रश्न तडीस नेतात त्याच समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडून येतं.
(क्रमश:)
नोंद – लेखातील मुलांची नावं बदललेली आहेत.
 डॉ. हरीश श़ेट्टी -harish139@yahoo.com
शब्दांकन- मनीषा नित्सुरे-जोशी
   

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?