डॉ. रोहिणी पटवर्धन 

‘वल्र्ड बँक’ आणि ‘यू एन पॉप्युलेशन’नुसार २०२३ नंतरच्या पुढच्या २३ वर्षांत भारतातल्या व्यक्ती सरासरी ७५ वर्षे जगतील, तर कुटुंबातली मुलांची संख्या मोठय़ा प्रमाणावर कमी होईल. या साऱ्यांचे वृद्धांवर होणारे परिणाम गंभीर असतील. यासाठी गरज आहे ती ‘वृद्ध कल्याण शास्त्रा’च्या अभ्यासाची. वृद्ध कल्याण शास्त्र म्हणजे वृद्धत्वाच्या प्रक्रियेचा आणि समस्यांचा जीवशास्त्रीय, वैद्यकीय, कायदा, मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, अर्थ आणि राजकीय अशा सर्व दृष्टिकोनातून केलेला शास्त्रशुद्ध अभ्यास. नुकताच १ ऑक्टोबरला ‘आंतरराष्ट्रीय वृद्धांचा दिवस’ साजरा केला गेला. त्यानिमित्ताने या शास्त्राविषयी..

stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
Child Marriage, Supreme Court, Child Marriage Prevention Act,
बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?

सध्या आजूबाजूला सहज अनुभवायला येणारे काही प्रसंग- घरात आजींसाठी केअरटेकर आहे. आजी सारखे तेच तेच प्रश्न विचारतात, खायला दिले तरी खायला दिले नाही- चहा प्यायला तरी प्यायलाच नाही- म्हणतात. केअरटेकर चिडते. म्हणून मग आजीही ‘मला केअरटेकर नको’ म्हणून अडून बसतात. दुसरी आणायची तरी कशी? आणि टिकेल याची काय खात्री?

  खुब्याच्या सांध्याचे ऑपरेशन झाल्यानंतर फिजिओथेरपी अपरिहार्य असते. फिजिओथेरपिस्टने घरी येऊन व्यायाम सुरू केला, की आजोबा ‘खूप दुखते’ म्हणून ओरडतात. पुढच्या वेळी तो आला, की मान वळवून पडून राहतात. व्यायामाला तयारच होत नाहीत. आपोआप सुधारणा होत नाही. मग नव्या समस्यांची सुरुवात होते.

विसरणे, माणसे न ओळखणे, दिशा न कळणे, असा त्रास एखाद्या वृद्धाला सतत होतो आहे, असे लक्षात आले म्हणून मानसोपचारतज्ज्ञाची अपॉइंटमेंट घेण्यासाठी चौकशी करावी, तर लगेच अपॉइंटमेंट मिळत नाही. तोपर्यंत कसे करायचे, हा प्रश्नच आहे. फिजिशियनकडे तर ४०-४० नंबर असतात. त्या वृद्धाचा नंबर येईपर्यंत त्याला काय होतेय हे सांगायचे पुरेसे आठवत नाही, डॉक्टरांनाही नीट माहिती मिळत नाही.

या सर्व प्रसंगांमध्ये दोन गोष्टी समान आहेत, त्या म्हणजे रुग्ण वृद्ध आहेत आणि सेवा करणाऱ्याला किंवा सल्ला देणाऱ्या व्यक्तीला असे का होते आहे हे समजून घेता येतेच असे नाही. या दोन्ही गोष्टी होतात, कारण वृद्ध हा एक स्वतंत्र वेगळा गट आहे. त्याच्या स्वत:च्या काही मर्यादा आहेत, समस्या आहेत. त्यामागे काही प्रमाणात शास्त्रीय कारणेही आहेत आणि मुख्य म्हणजे याबद्दल सर्वच स्तरांत असणारी अनभिज्ञता किंवा साध्या, सरळ शब्दांत म्हणावे तर अज्ञान!

 वृद्धपर्व येऊ घातले आहे, सावधान; असे म्हणायची वेळ आली आहे हे निश्चित! सध्या आपल्या आजूबाजूला शहरात काय किंवा खेडय़ातही जाणवणारी गोष्ट म्हणजे वृद्धांची संख्या! त्यामध्ये खूप वाढ होते आहे आणि त्याच्याबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात येते आहे, ती म्हणजे झपाटय़ाने कमी होणारी एकत्र कुटुंबपद्धती! शहरात तर नाहीच, पण आता खेडेगावामध्येसुद्धा एकत्र कुटुंबपद्धती तेवढी परिणामकारक दिसत नाही. कुटुंब वेगळे झाले, की वृद्धांची काळजी घेण्याची जबाबदारी, हा प्रश्न निर्माण होतो. सध्या हे प्रश्न खूपच वाढत चालले आहेत. त्याची कारणेही अनेक आहेत; पुरेशी स्पष्ट आहेत; पण नुसती कारणे लक्षात येऊन, दिसून काही उपयोग नसतो, कारण त्यावर उपाय शोधला तरच त्याचे निराकरण होते. आयुष्यमान वाढले म्हणून पिढय़ाही वाढल्या. नातवंडेच काय, पण पतवंडेही आपण पाहतो, पण आई-वडिलांची काळजी किंवा सेवा कुणी करायची? हा प्रश्न येतोच. कारण काही कुटुंबांत त्यांचा मुलगा किंवा मुलगी स्वत:च ६०-७०-८० वर्षांचे असतात.

वृद्धांसाठी काय?

 मुळात समाजात हा एक मोठा गट आहे, त्यांचा विचार वेगळय़ा दृष्टीने करायची गरज आहे, याची जाणीव स्वत: वृद्ध, समाज, राज्यकर्ते कोणालाच नाही, हे कटू सत्य आहे! येणाऱ्या काळात या संख्येच्या वाढीमुळे प्रत्येकालाच आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, हे जाणून घ्यायला हवे; पण म्हणजे नेमके काय करायला हवे? याचे कारण शोधले तर लक्षात येते, की ‘वृद्ध’ या घटकाचा स्वतंत्रपणे अभ्यास करणाऱ्या ‘वृद्ध कल्याण शास्त्रा’ची माहितीच अनेकांना नाही.

शारीरिक, सामाजिक, मानसिक सर्वच बाबतींत वृद्ध हा समाजातला वेगळा घटक आहे तो कसा आहे? तसा का आहे? याचा स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि त्यानुसार समाजातल्या प्रत्येक घटकाने वागण्याची आवश्यकता आहे. ही आवश्यकता स्वत: वृद्धांपासून ते डॉक्टर, वकील, फिजिओथेरपिस्ट, सायकॉलॉजिस्ट, नर्सेस, कर सल्लागार, प्रशिक्षक या कुणालाही तेवढय़ा तीव्रतेने जाणवत नाही का? खरे तर प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीचे ग्राहक ‘वृद्ध’ या गटातील आहेत; पण सेवा पुरवणाऱ्या घटकांना वयामुळे त्यांच्या शरीरात, मेंदूवर काय परिणाम होतात, समाज-मत आणि मनाचा काय संबंध आहे, याबद्दल माहिती नाही, असे वाटते.

वृद्ध वैद्यकशास्त्र तज्ज्ञांनासुद्धा (Geritrician) ‘वृद्ध कल्याण शास्त्रा’ची स्पष्ट आणि पुरेशी जाणीव नाही याचा अनुभव येतो आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वृद्ध कल्याणाची अगदी संक्षिप्त ओळख आणि त्याचा अभ्यास कसा आणि का करायचा हे सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

 वृद्ध कल्याणशास्त्र म्हणजे वयोवर्धनाच्या प्रक्रियेचा आणि समस्यांचा जीवशास्त्रीय, वैद्यकीय, मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, कायदा, अर्थ आणि राजकीय अशा सर्व दृष्टिकोनांतून केलेला शास्त्रशुद्ध अभ्यास. वृद्ध कल्याण शास्त्र शारीरिक, मानसिक, यांबरोबरच सामाजिक परिस्थिती आणि लोकहितासाठीच्या धोरणांचा, परिणामांचाही विचार करते. हे सर्व काम करताना परस्परसंवाद आणि करुणा यांसारख्या सर्व शास्त्रांत उपयुक्त असणाऱ्या कौशल्यावर वृद्ध कल्याण शास्त्र लक्ष केंद्रित करते. समस्या सोडवण्याचे कौशल्य आणि संवाद-कौशल्यांबद्दल यात मार्गदर्शन केले जाते.

नोबेल पुरस्कार मिळवलेल्या रशियन जीवशास्त्रज्ञ, प्राणीशास्त्रज्ञ   Eile Metchnikoff यांनी १९०३ मध्ये प्रथम ‘वृद्ध कल्याण शास्त्र’ (Gerontology) ही संज्ञा वापरली. मानसशास्त्र, समाजशास्त्र, शरीरशास्त्र, अर्थशास्त्र अशा प्रत्येक क्षेत्रातला अभ्यासक वृद्ध कल्याणशास्त्रज्ञ होऊ शकतो, असे त्यांनी आग्रहाने सांगितले. उपयोजित (applied) वृद्ध कल्याणशास्त्रज्ञ कुटुंबाबरोबर संवाद साधतात, तर व्यवस्थापनशास्त्रज्ञ वृद्ध कल्याणाची योजना तयार करून राबवतात, त्यानं वृद्धांचे जीवन समृद्ध व्हायला मदत  होते.

वृद्ध कल्याणाच्या माहिती-अभ्यासामुळे वृद्ध आपल्या आयुष्याचे योग्य नियोजन करू शकतात. त्यामुळे ते गुणवत्तापूर्ण आयुष्य जगू शकतात, समस्या योग्य रीतीने हाताळू शकतात आणि योग्य प्रकारे योग्य व्यक्तींशी संपर्कही साधू शकतात. अमेरिका आणि युरोपातील प्रगत राष्ट्रांमध्ये वृद्ध कल्याण शास्त्राचा अभ्यास केला जातो. ते एक प्रगत शास्त्र म्हणून मानले जाते. त्या देशांमध्ये याचे अगदी दोन-तीन महिन्यांच्या अल्प मुदतीपासून ते पीएच.डी.पर्यंतचे दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम आहेत. वृद्धांच्या कल्याणासाठी त्या देशांनी केलेल्या प्रयत्नांची, उपायांची माहितीसुद्धा आपल्याकडे करून घेतली जात नाही.

   वैद्यकीय क्षेत्र, मानसशास्त्र या विषयांतील तज्ज्ञ व्यक्ती आणि मार्गदर्शनाची गरज असणारे वृद्ध यांचे प्रमाण फार व्यस्त आहे. एकूणच आपल्याकडे लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांचे प्रमाण खूप कमी आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे. याचा विचार करता वृद्ध कल्याण शास्त्राच्या अभ्यासामुळे सर्वच क्षेत्रांतल्या लोकांना मदत होऊ शकते. वृद्धांनी आणि त्यांना सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींनी वृद्धकल्याणाचा अभ्यास करून शास्त्रशुद्ध माहिती घेतली, तर समाजामध्ये जागरूकता निर्माण होईल. वृद्धांची योग्य वेळी योग्य काळजी घेतली जाईल. परिणामी, पुढची गंभीर परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी काही प्रमाणात हातभार तरी लावला जाईल.

सरकारी धोरणांमध्ये ‘वृद्धकल्याण’ म्हणजे बस, रेल्वे तिकिटात सवलत किंवा वृद्धाश्रमांना उभारणीसाठी सहाय्य या प्रकारचे उपाय योजले जातात. त्यांपैकी बहुतेक वेळा सवलतींचा फायदा सधन वृद्धच घेऊ शकतात. गरीब, ग्रामीण भागात राहणारे किंवा जे हिंडू-फिरू शकत नाहीत, ज्यांना औषधे घेणे परवडत नाही, हॉस्पिटलचा खर्च आवाक्याबाहेर जातो आहे, त्यांच्यासाठी काही नियोजनबद्ध उपाय सुचवले जात नाहीत.

  पूर्ण भारतात अशा प्रकारचे शिक्षण अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. टाटा इन्स्टिटय़ूट आणि इतर तुरळक विद्यापीठे फक्त पदविका अभ्यासक्रम घेतात. गेली किमान वीस वर्षे प्रत्यक्ष वृद्धसेवा क्षेत्रात कार्य करत असल्याने वृद्धकल्याणसंदर्भात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून मी ‘आपल्यासाठी आपणच’ आणि ‘आनंद स्वर ज्येष्ठांसाठी’ ही दोन पुस्तके लिहिली. त्याच्या आवृत्त्या निघाल्या. ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी गेली बारा वर्षे ‘सनवल्र्ड करंडक एकांकिका’ आणि इतर स्पर्धा मी माझ्या ‘सनवल्र्ड फॉर सीनियर्स’ या संस्थेतर्फे विनामूल्य घेते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, त्यावरून याची गरज आहे हे सिद्ध होते. वृद्ध एकमेकांशी जोडले जातात. ‘संहिता साठोत्तरी’ या ‘चतुरंग’मधल्या सदरास वाचकांच्या आलेल्या प्रतिक्रियानंतर अशा प्रशिक्षणाची गरज माझ्या लक्षात आली. यासाठी मी वृद्धांसाठी दोन दिवसांची ‘समृद्ध जीवन प्रशिक्षण शिबिरे’ सातत्याने विनामूल्य घेते आहे. ज्येष्ठांना त्याचा खूप फायदा होतो, हे त्यातून लक्षात आले. त्यामध्ये विविध व्यवसायांतील आणि वयाचे लोक विद्यार्थी म्हणून सहभागी झाले. यातून प्रशिक्षकही तयार होत आहेत. त्याचे मूर्त परिणाम  लक्षात येत आहेत.

या प्रशिक्षणानंतर वृद्धांच्या समस्या दूर करण्याच्या दृष्टीने अनेक  व्यक्ती कार्यरत झाल्या आहेत. ‘मेमरी क्लब’सारखी मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त अशी संकल्पना पुण्यात आणि पुण्याबाहेर आणि  इतकेच नव्हे तर परदेशीही पोहोचत आहे. ३० वर्षे वकिली करणाऱ्या अॅड. नीलिमा म्हैसूर या वैद्यकीय इच्छापत्राच्या प्रसारासाठी कार्य करीत आहेत. कोणी वृद्धाश्रमाचे  कार्यक्षम व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. मला हे आग्रहाने प्रतिपादन करायचे, की समाजात अनेक लोकांकडे ज्ञान आहे, त्यांना काम करायची इच्छाही आहे; पण योग्य दिशा सापडत नाही. समाजातही काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. अशा वेळी वृद्ध कल्याण शास्त्राचे शिक्षण प्रशिक्षण किंवा अभ्यासक्रम केल्याने समाजातली खूप मोठी अडचण दूर होऊ शकते. कारण काम करू इच्छिणाऱ्यांना योग्य वाव मिळतो. शिवाय सतत कार्यक्षम राहिल्याने त्यांची स्वत:चीही मानसिक आणि शारीरिक स्थिती उत्तम राहते. म्हणजे एका अर्थाने विन विन सिच्युएशन आहे.

 ‘वल्र्ड बँक’ आणि ‘यू एन पॉप्युलेशन’ यांनी प्रसिद्ध केलेल्या अभ्यासक्रमानुसार २०२३ नंतरच्या पुढच्या २३ वर्षांत भारतातल्या व्यक्ती सरासरी ७५ वर्षे जगतील. एकूण लोकसंख्येपैकी ५० टक्के लोक शहरांकडे धाव घेतील. २०२३ पेक्षा तिप्पट व्यक्ती परदेशी नागरिकत्व स्वीकारतील आणि दर कुटुंबातली मुलांची संख्या ४० टक्क्यांनी कमी होईल. या साऱ्यांचा वृद्धांवर होणारे परिणाम गंभीर आहेत हे लक्षात घ्यायलाच हवे.

वृद्ध कल्याण शास्त्राकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करणे अत्यावश्यक आहे. तो कसा करायचा हे समजून पावले कशी उचलायची? हा स्वतंत्र आणि सविस्तर विचार करण्याचा विषय आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वृद्ध कल्याण शास्त्र हा विषय बीएसडब्ल्यू नर्सिग, फिजिओथेरपी, फायनान्स, वृद्ध मानसशास्त्र, वृद्ध समाजशास्त्र, कायदा, व्यवस्थापन यांसारख्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये एक क्रेडिट कोर्स म्हणून समावेश करता येईल त्यामुळे समाजातील एक मोठी गरज पूर्ण होऊ शकेल.

लेखिका वृद्ध कल्याण शास्त्र तज्ज्ञ (जरेंटॉलॉजिस्ट) आहेत