जन्माने येणाऱ्या नात्यांपेक्षा अनाम, रक्तापलीकडच्या नात्यांचं मला फार फार गूढ आकर्षण आहे. अशा अनाम नात्यांनी एकमेकांना जोडली गेलेली आणि एकमेकांच्या ‘जंगलात’ एकमेकांची ‘कृष्ण’ बनलेली अशी तीन अनोखी माणसं पाहिलीत मी..
लहानपणी माझा मामा मला एक गोष्ट सांगायचा. कृष्णावर अपार भक्ती असणारी एक बाई असते. तिचा एकुलता एक मुलगा असतो. त्याचं घर आणि त्याची आश्रमशाळा याच्यामध्ये एक भलंमोठं जंगल असतं. त्या जंगलातून दररोज एकटय़ानेच शाळेच जायची त्या मुलाला खूप भीती वाटत असते. एकदा तो आईला म्हणतो, ‘‘आई, मला एकटय़ाला जंगलातून जायची खूप भीती वाटते.’’ आई त्याला सांगते, ‘‘घाबरू नकोस. जंगलात तुझा एक दादा राहतो. भीती वाटली तर दादाला हाक मार.’’ दुसऱ्या दिवशी तो मुलगा, त्याचं नाव मला वाटतं गोपाळ असतं, गोपाळ आश्रमशाळेत जायला निघतो. जंगलात आत आत जातो. ते जंगल इतकं घनदाट असतं की आत गेल्यावर झाडांमधून सूर्यप्रकाशसुद्धा मुळीच पोहोचत नसतो. दिवसासुद्धा मिट्ट अंधार असलेलं, कुठल्या कुठल्या प्राण्यांचे आवाज येणारं ते भीतीदायक जंगल.. गोपाळ जंगलाच्या मध्यावर पोहोचतो आणि त्याला खूप भीती वाटायला लागते. एकदम आईचं बोलणं आठवतं. तो हाक मारतो, ‘‘दादा!’’ काहीच आवाज येत नाही. तो पुन्हा हाक मारतो, ‘‘दादा!’’ आणि आवाज येतो, ‘‘काय रे?’’ गोपाळ म्हणतो, ‘‘मला भीती वाटते!’’ तो आवाज म्हणतो, ‘‘घाबरू नकोस, मी आहे.’’ गोपाळ शांत मनाने पुढे चालायला लागतो. गोष्ट पुढे चालू राहायची, पण माझ्यासाठी ती इथेच संपलेली असायची. त्या लहान वयात वाटायचं, नक्की कुणाचा असतो तो आवाज.. कृष्णाचा का.. का खरंच त्याचा दादा असतो त्या जंगलात? पण त्या घनदाट जंगलात भ्यालेल्या त्याने हाक मारली की त्याला प्रत्युत्तर येतं, हे माझ्या मनात पक्कं बसून गेलं होतं. त्याने मला खूप हायसं वाटून गेलं होतं.
मला वाटतं, ही गोष्ट मुळात सानेगुरुजींची होती. आता या वयात त्या गोष्टीचे अनेक अर्थ आहेत, असं वाटतं. माझ्या स्वत:च्या आयुष्याकडे बघताना जाणवतं, घनदाट जंगलातून जाताना अशा अनेक न दिसणाऱ्या आवाजांनी मला साथ केली आहे. मी हाका न मारताही मी जंगलात आहे म्हटल्यावर न सांगताही असे कित्येक आवाज धावून आले आहेत. अनेक ओळखीच्या, अनोळखी माणसांच्या रूपात.. नात्यांच्या रूपात..
आई गोपाळला सांगते, ‘‘तो दादा ‘आहे’ म्हणून, पण मला त्या दादाचं न दिसणं आणि नुसतं ‘असणं’ जास्त आवडतं. तो त्या नात्यापलीकडचा कुणीतरी आहे. नंतर पुढे त्या गोष्टीत त्याला तो दादा दिसतो, पण मला तो न दिसणाऱ्या दादाचा आवाजच जास्त भारून टाकतो. आपल्याला गरज असताना आपल्याला सावरणारा तो आवाज.. कधी कधी तो एखादं नातं बनून येतही असेल.. ‘दादा’सारखं.. पण त्याचं ते वेळेला धावून येणं त्याला त्याच्या ‘दादा’ असण्याच्या पलीकडे घेऊन जातं. म्हणजे, धर्मवीर भारतींची एक कविता आहे ‘कनु, तुम मेरे हो कौन?’ राधा कृष्णाला विचारते आहे, ‘‘कृष्णा, तू माझा आहेस तरी कोण?’’ मला हा प्रश्न खूप आवडतो. म्हणजे.. आयुष्यात जन्माने काही नाती येतात. त्या नात्यांच्या मागे काही कर्तव्य येतात. मुलांनी आई-वडिलांचं करायलाच हवं, नवरा-बायकोने एकमेकांचं करायलाच हवं, एकमेकांसाठी धावून जायलाच हवं.. पण ही अशी कर्तव्याची कुठलीच बेडी पायात नसताना ते असं काय असतं, ज्याने एक जीव दुसऱ्यासाठी काही करू जातो.. मला कृष्ण खूप आवडतो. कारण त्याने बऱ्याचदा हे नात्यापलीकडचं बरंच काही असोशीनं, दैवी प्रेमानं सांभाळलं आहे. गोपाळच्या आईचं आणि कृष्णाचं भक्तीचं नातं जपत तो गोपाळासाठी जंगलात धावतो.
मला इंदिरा संतांची एक कविता आठवते-
‘अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ..?
मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भणभण
अध्र्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकून अपुले तनमन
विश्वच अवघे ओठा लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधले थेंब सुखाचे
हे माझ्यास्तव.. हे माझ्यास्तव..!’
‘गोकुळ, राधा सगळे झोपलेले असताना या अवेळी पैलतीरावर कृष्णाची ही जी बासरी वाजते आहे, ही बासरी फक्त माझ्यासाठी!’ असं म्हणणारी कुब्जा.. कृष्णाच्या आयुष्यातला तो विवक्षित वेळ फक्त त्या कुबडय़ा, कुरूप कुब्जेचा. त्या वेळी ती बासरी फक्त तिच्यासाठी वाजवीत तिचं-त्याचं अनाम नातं तो जपतो. जन्माने येणाऱ्या नात्यांपेक्षा या अनाम, रक्तापलीकडच्या नात्यांचं मला फार गूढ आकर्षण वाटत आलेलं आहे.
अशा अनाम नात्यांनी एकमेकांना जोडली गेलेली आणि एकमेकांच्या ‘जंगलात’ एकमेकांची ‘कृष्ण’ बनलेली अशी तीन अनोखी माणसं पाहिलीत मी.. त्या तिघांनी मला माझ्या या वयात गोपाळच्या गोष्टीचा अर्थ नीट उकलून दाखविला आहे.
मृत्यू.. मृत्यूहून गूढ जंगल दुसरं कुठलं असेल? इतर जंगलांमध्ये हाका घातल्या तर मदतीचे हात, आवाज येतील. इथे मात्र ‘त्या’ एका वेशीनंतर प्रेमाचे सगळे हात मागे सोडून एकटय़ानेच पुढे पाऊल टाकायचं. सोडायला येणारे सगळे आज जंगलाच्या वेशीबाहेर निरुपायाने.. दु:खाने.. कधी शांतपणे.. कधी हतबल.. कधी गोठून.. कधी समजून उभे. यापुढे त्यांना प्रवेश नाही. यापुढचा प्रवास त्या त्या गोपाळाचा एकटय़ाचा.
माझी एक मैत्रीण होती. एका जीवघेण्या रोगाने तिचा हात धरला आणि एक-एक करून आम्हा सगळ्यांचे हात सोडत ती अकालीच या मृत्यूच्या जंगलात निघून गेली. ती असताना कधी तिच्यापाशी मनाने थांबताच आलं नाही, असं आता वाटतं. ‘ती निघाली आहे’ हे जीवघेणं वाटणं सतत तिच्यात आणि आमच्यात दत्त म्हणून उभं असायचं. तिचा हात हातात घेतल्यावर वाटायचं, अजून किती दिवस.. आणि आपल्या मनातलं वाटणं तिला ऐकू तर गेलं नसेल म्हणून उसनं हसत सैरावैरा धावायचं मन. आता ती गेली आहे. तिच्या जंगलात एकटीच. तेव्हा वेशीबाहेरून तिला निरोप देणारी मी तिचा वेशीपर्यंतचा प्रवास पुन्हा एकदा पाहते आहे.
तिचा नवरा माझा पण जिगरी दोस्त. तिची आणि तिच्या नवऱ्याची पहिली भेट सिंहगडावर झाली. त्या दोघांच्या एका कॉमन मित्रामुळे. या कॉमन मित्राने माझ्या मैत्रिणीच्या आणि तिच्या नवऱ्याच्या जगावेगळ्या प्रेमकथेत दोन महत्त्वपूर्ण कामं केली. एक म्हणजे त्या दोघांची सिंहगडावर पहिली भेट घडविली आणि दुसरं- त्याच दिवशी या कॉमन मित्राने नवीन कॅमेरा घेतला होता. त्याची चाचणी म्हणून त्याने या दोघांच्या पहिल्या भेटीचे सिंहगडावर फोटो काढले. आज ‘ती’ नसताना त्या फोटोंना डोंगराएवढं मोल आहे.
त्यांचं लग्न झालं आणि थोडय़ा दिवसांनी त्यांच्या कुटुंबात अजून एकजण राहायला आली. ती त्या दोघांहून खूप लहान, त्या दोघांचीही जिवाभावाची मैत्रीण. तिच्या कामामुळे तिला त्यांच्या शहरात यावं लागलं आणि राहायला जागा नव्हती म्हणून सुरुवातीला ती त्या दोघांबरोबर राहायला लागली. नंतर त्या तिघांचं नातं असं घट्ट बनत गेलं की त्या नात्याचं वर्णन करायला पुन्हा ‘कनु, तुम मेरे हो कौन?’ असंच विचारावं लागेल.
माझ्या मैत्रिणीला त्या जीवघेण्या आजाराने धरल्यानंतर तिचा नवरा आणि तिची ही छोटी मैत्रीण या दोघांनी तिला जी साथ दिली, त्याचं वर्णन शब्दांत शक्य नाही. एक नावाचं आणि एक बिननावाचं नातं तिला तिच्या मृत्यूच्या बरोबर सावरत राहिलं. यातलं रक्ताचं कुणीच नव्हतं. माझ्या मैत्रिणीचा आजार तिला तिच्या नवऱ्यापासून दूर नेत असताना, त्या सगळ्या जीवघेण्या चढ-उतारात तिच्या नवऱ्याने तिच्यावर जे प्रेम केलं त्या प्रेमाला कुठल्याही एका नात्याच्या आकारात सीमित करणं शक्य नाही. तिच्या शेवटच्या दिवसांत तिच्या त्या छोटय़ा मैत्रिणीने तिच्यासाठी ज्या धडपडीने केलं त्याची मी साक्षी आहे.
दिवसभर तिचा नवरा तिच्याजवळ असायचा हॉस्पिटलमध्ये. तेव्हा दिवसा स्वत:ची न टाळता येणारी कामं वणवण फिरत करून रात्रीची हॉस्पिटलमघ्ये टक्क जागी बसणारी ती छोटी मैत्रीण.. अवघी पंचविशीची, पण फार मोठय़ा दिलाची..
माझ्या मैत्रिणीच्या शेवटच्या दिवसांत तिच्या हातामध्ये उपडय़ा बाजूला रात्रंदिवस एक सुई खुपसलेली होती. त्याला एक नळी जोडून त्याद्वारे कसलंसं औषध रात्रंदिवस तिच्या शरीरात ठिबकत असायचं. ती गुंगीत असायची. तिला ती नळी, ती सुई नकोशी व्हायची आणि नकळत, झोपेत ती ती सुई काढण्याचा प्रयत्न करायची. तिने तसं करू नये म्हणून सतत तिच्यावर लक्ष ठेवायला लागायचं. ते लक्ष दिवसा तिचा नवरा आणि रात्रीची ही छोटी मैत्रीण डोळ्यांत तेल घालून ठेवायचे. एके रात्री मी हॉस्पिटलमध्ये झोपायला गेले. माझ्याबरोबर ती छोटी मैत्रीण होतीच. दुसरं कुणी असलं तरी ती छोटी दर रात्री असायचीच. मी तिला म्हटलं, ‘‘तू खूप रात्री जागलीस. आज मी आहे तर तू झोप.’’ ती आडवी झाली खरी, पण दर १५-२० मिनिटांनी ती ताडदिशी झोपेतून उठून बसायची. माझी जाणारी मैत्रीण तिला हाक मारते आहे, असा तिला भास व्हायचा. सारखी उठून ती तिच्या हाताची नळी नीट आहे ना, हे चाचपून बघायची.
माझी गेलेली मैत्रीण हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होण्याआधीचा तिचा तिच्या घरातला शेवटचा दिवस मला लख्खं आठवतो. ती तिच्या घरातल्या कॉटवर बसली होती. तिचा आवाज अगदी लहान मुलीसारखा येत होता. ती म्हणाली, ‘‘मला ना, माझ्या गावची लाल माती आठवतीये..’’ असं म्हणणारी ती आणि तेव्हा तिचा बाप का कोण माहीत नाही होऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवणारा तिचा नवरा मी विसरू शकत नाही..
ती लहान होती खूप, गेली तेव्हा. त्या मृत्यूच्या जंगलातून इतक्या लहान वयात एकटी जायला किती घाबरली असेल असं वाटून गलबलायला होतं. पण आता त्या सगळ्याचा विचार करताना खात्रीने वाटतं, तिने तिथून हाक मारली असेल, तेव्हा तिच्या नवऱ्याचे आणि त्या छोटय़ा मैत्रिणीचे हात तिथे नाही पोहोचले तरी त्यांचे आवाज तिथे नक्कीच पोहोचले असतील. तेवढी त्या तिघांच्या नात्याची मिळकत नक्कीच आहे. तो कृष्णारव तिला ऐकू गेला असेल खचितच, आणि ती शांतपणे पुढे चालू लागली असेल. हीच आशा.. हाच दिलासा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा