रूढार्थानं त्या एकटय़ा पालक नव्हत्या, पण पतीच्या व्यसनापायी दोन्ही मुलींची जबाबदारी त्यांचीच होती. खरं तर त्यांचं पालकत्व १४ व्या वर्षीच सुरू झालं होतं. नणंद आणि दिरांच्या त्या आई झाल्या, नंतर शिक्षिका, मुख्याध्यापिका होऊन अनेक मुलांच्या आधार झाल्या आणि पुढे त्यांचं हे पालकत्व विस्तारतच गेलं.. ज्युली डिमेलो यांचं आयुष्य असं सगळ्यांवर आभाळ पांघरण्यात जातंय..

ईश्वरनिष्ठा, प्रेम, करुणा, क्षमा, शांती, आत्मसमर्पण हे येशूच्या शिकवणुकीचं सार आहे. येशू ख्रिस्त म्हटलं की, ही सारी शिकवण आपल्या मनात जिवंत होते; पण अवचित एखादी व्यक्ती अशी भेटते की, आपल्या मनात उपदेश म्हणून रुजलेले शब्दच सजीव साकार होऊन सामोरे यावेत. माणूस विलक्षण श्रद्धेनं साऱ्या गोष्टी आचरणात आणू शकतो, यानं अचंबित व्हायला होतं आपल्याला. ज्युली अँथनी डिमेलो यांना भेटल्यावर तीच भावना निर्माण होते.
वसईच्या माळुंगीवाडी इथल्या रहिवासी ज्युली डिमेलो. वडिलांचे पानमळे. आईही मळ्यात पानं तोडायला जायची. पूर्वी पानं निर्यात व्हायची. त्यामुळे लहानपणी सुबत्ता होती घरात. वडिलांची पहिली पत्नी सात मुलांनंतर वारली. ज्युलीची आई दुसरी. तिलाही आठ मुलं झाली. ज्युलीनं आईला कधी स्वस्थ बसलेलं बघितलंच नाही. सतत कामात. १५ मुलांना शिस्तीत मोठं केलं तिनं. मळ्यातील एक काटकीसुद्धा वाया जाऊ द्यायची नाही आई; पण तिच्या पाखरांना जसजसे पंख फुटले तशी ती दूर उडाली. जो कमावता तो वेगळा झाला अन् घराची रया गेली. वडील म्हातारे होऊ लागले अन् ‘कसं व्हायचं एवढय़ा मोठय़ा कुटुंबाचं’ असा आईनं धसका घेतला. ज्युली १४ वर्षांची असताना वडील अन् आई पाठोपाठ गेले. ज्युलीनं आणि तिच्या मोठय़ा बहिणीनं नन् व्हायचं ठरवलं होतं. तसं त्यांनी चर्चमध्ये बोलून दाखवलं होतं. नंतर मोठी बहीण नन् झाली आणि ज्युलीनं भावंडांची जबाबदारी घेतली.
डी.एड्. झाल्याबरोबर ज्युलीला मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत नोकरी मिळाली, कारण डी.एड्.ला ज्युली पहिली आली होती. तिच्या शाळेच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर उभं राहून अँथनी डिमेलो या तरुणानं ज्युलीला मागणी घातली. घरचे पानमळे, भांडुपच्या फॅक्टरीत नोकरी.. वसईतच राहून आपल्या भावंडांकडे लक्ष राहील. तेव्हा नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. लग्नाच्या वरातीतच ज्युलीला कळून चुकलं की, अँथनी आणि त्याचे मित्र प्रचंड दारू प्यायले आहेत. त्यांच्याकडच्या सण-सोहळ्यात दारू पिणं मंजूर होतं, पण अँथनी अल्कोहोलिक होता. हे सत्य त्याच्या आई-वडिलांनी स्वीकारलं होतं. रात्री वाट पाहून ज्युली झोपल्यावर आई हळूच दार उघडून अँथनीला घरात घ्यायची. कधी रस्त्यात पडलेल्या त्याला अनोळखी माणसं घरी आणून टाकायची.
ना नव्याची नवलाई ना सणवार.
दु:खात सुख म्हणजे इथेही पाच दीर. दोन शाळकरी नणंदा. त्यांच्या शिक्षणात ज्युलीनं खूप लक्ष घातलं. त्याही मुलींनी वहिनीला प्रेम दिलं. सारा दिवस शाळेत जायचा, पण संध्याकाळनंतर अंधाराबरोबरच भीतीही दाटून यायची. तरीही घटस्फोटाचा विचार मनात कधी आलाच नाही हे कसं? लहानपणापासूनचे दया-करुणेचे, क्षमेचे संस्कार आणि एकत्र मोठय़ा कुटुंबात राहिल्याने माणूस आहे तसा त्याला स्वीकारण्याची सवय.. यामुळेच बहुधा, लग्नबंधन तोडायचा विचार नाही आला. कधी वाटायचं आपण नन् नाही झालो म्हणून ही शिक्षा तर नसेल केली?
पहिल्याच वर्षांत मुलीचा, अर्चनाचा जन्म झाला. तान्ही अर्चना खूप आजारी होती. मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये तीन महिने होती. त्या काळात डिमेलोनं कर्ज काढलं, उपचारात कमतरता नव्हती. मुलीच्या आजारानंतर डिमेलोनं दारू सोडायची शपथ घेतली, पण तात्पुरतीच. अशा शपथा घेणं, ट्रीटमेंट घेणं आणि कोसळणं हे चक्र पुढची दहा-बारा र्वष चालूच राहिलं. त्यामुळे नवरा असूनही ‘एकला चलो रे’ सुरूच होतं. दरम्यान, दुसऱ्या मुलीचा जन्म झाला.
घरातही वाटणी झाली आणि त्या वेळी गावाबाहेर दूरच्या जमिनीवर जेमतेम घर बांधून ज्युलीचं कुटुंब तिकडे राहायला गेलं. ज्युलीचं पालकत्व खरं तर भावंडांची जबाबदारी घेतली तेव्हा, चौदाव्या वर्षीच सुरू झालं. अर्चना आणि ज्योनिताला वाढवणं कठीण मुळीच नव्हतं. शिक्षिकेच्या नोकरीमुळे घरात किमान नियमित पगार होता. मुली हट्टी नव्हत्या. या काळात कामाला गुलाब नावाची प्रेमळ बाई मिळाली, त्यामुळे ज्युलीची नोकरी चालू राहिली.
मुलींची शाळा, अभ्यासबाह्य़ उपक्रम याबाबत ज्युली जागरूक होती, पण वडिलांचं विपरीत रूप बघणं, लोकांचे टोमणे खाणं यानं मुली बावरून जायच्या. त्यांना न्यूनगंड येऊ नये म्हणून ज्युली सतत संवाद साधायची, पण अर्चना थोडी मिटलेलीच राहिली. कॉलेजमध्ये जायला ती तयार नव्हती. ज्योनिता मात्र सर्व तऱ्हेचे नृत्य प्रकार शिकली. कॉम्प्युटर्समध्ये मास्टर्स डिग्री मिळवून ती अमेरिकेत गेली.
गावाबाहेर घर बांधल्यावर एकदा पिऊन पडलेल्या अँथनीला माणिकपूर कॉन्व्हेटच्या मदरनं दयाळूपणे स्वत: अल्कोहोलिक अ‍ॅनानिमसच्या मीटिंगमध्ये नेऊन पोहोचवलं. इथून ज्युलीच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला. ए.ए.मध्ये तिला उत्तम मार्गदर्शन मिळालं. मुलींना अ‍ॅलेटिन ग्रुपमध्ये तिनं मुद्दाम घातलं आणि घरातलं वातावरण एकदम बदलून गेलं. ज्युलीनं आपल्या पतीचा कधीच राग-राग केला नव्हता. त्याच्या वागण्याचा त्रास करून न घेणं हे ती शिकली. व्यसन हा आजार असतो हे एकदा स्वीकारल्यावर, आजारावरचे उपचार आणि मर्यादा समजल्या. घायाळ पक्षिणीनं आपला अडकलेला पंख सोडवून झेप घ्यावी आभाळात, तशी ज्युली या टप्प्यानंतर बी.ए., बी.एड्., एम.ए., एम.एड्. झाली. पीएच.डी.ला शिष्यवृत्ती मिळवून अभ्यासाला सुरुवात झाली; पण तेवढय़ात शाळेत मुख्याध्यापक म्हणून बढती मिळाली. पीएच.डी. राहिली.
याच काळात मुलीही प्रशिक्षण घेऊन बाबांशी प्रेमानं पण अंतर राखून वागायला शिकल्या. ज्योनिता सांगते, ‘‘आई प्रचंड कष्टाळू आहे. पहाटे स्वत:चा अभ्यास, नंतर आमचा अभ्यास, शाळा आणि संध्याकाळी ए.ए.चं सामाजिक कार्य एवढं करून ती प्रसन्न मुद्रेनेच घरी यायची.’’
वांद्रे ईस्टच्या मुंबई महापालिकेच्या शाळेत ज्युली रुजू झाली तेव्हा पटावर ७५० मुलं, पडकी जुनी बिल्डिंग आणि शाळा कशीबशी चालू होती. ज्युलीनं हा पट ३५०० वर नेला. आधी महापौर पुरस्कार आणि नंतर तत्कालीन राष्ट्रपती, ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कारानं ज्युली यांचा गौरव झाला. कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल यांच्यासोबत सुरू केलेल्या सामाजिक कार्याचा खूप विस्तार झाला आहे. ज्येष्ठ नागरिक संघ, विधवांची संस्था, शिक्षक संघ- एक ना अनेक संस्थांमध्ये ज्युली मॅडम भरपूर काम करत आहेत. अखेरच्या काळात ज्युली मॅडमच्या पतीनंही पत्नीच्या या समाजकार्याचं मनापासून कौतुक केलं.
अर्चनाच्या लग्नानतंर डिमेलोंची दारू सुटली. नंतरचा काळ त्यांनी अर्चनाच्या दोन मुलांबरोबर आनंदात घालवला, पण एव्हाना ज्युली मॅडमचं पालकत्व खूप विस्तारलं होतं. अनेक शैक्षणिक प्रकल्प, अनेक सामाजिक संस्थांचं अध्यक्षपद, परिसरातल्या प्रत्येक अडल्यानडल्याच्या प्रश्नांची सोडवणूक एक ना अनेक कामं!
आज अर्चना म्हणते, ‘‘आई रूढार्थानं एकटी पालक नव्हती, पण जबाबदारी तिची एकटीचीच होती. आईचा सेवेचा गुण माझ्यात काही अंशी आला तर मी आईला अधिक आनंद देईन.’’
ज्युली मॅडमना वाटतं, ‘‘ए.ए.ची बारा तत्त्वं आहेत. त्यात सूक्ष्मपणे आणि निर्भयपणे आपल्या चुका मान्य करण्यापासून प्रभूला शरण जाऊन आपलं दैनंदिन जीवन बदलण्यापर्यंत उपदेश आहे. मी तशी वागले. म्हणून आज आहे अशी झाले.’’
मी वाईटाशी लढले, असं म्हणण्यापेक्षा मी चांगल्याची एक पणती हातात धरली, असं म्हणणारं व्यक्तिमत्त्व आहे हे, ज्युली डिमेलो यांचं!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

vasantivartak@gmail.com

vasantivartak@gmail.com