गंगेसारखी जगण्यातल्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींना स्वत:त सामावून घेणारी.. आणि तरीही आजूबाजूला संपन्नताच पसरवणारी ‘ती’. वयाच्या १४ व्या वर्षांपासून लग्नाचे क्रूर चटके सहन करता करता कणखर होत जाणारी.. प्रसंगी स्त्रीबीज दान करून मुलांच्या शिक्षणाची तरतूद करणारी. पैसे कमवण्यासाठी तिनं लाडू करून विकले. जत्रेत पुरीभाजी, वडापावचे स्टॉल लावले. कंपनीत नाश्ता पुरवला, शिवणकाम केलं, लोकांच्या दारात रांगोळ्या काढल्या, रिक्षा, टमटमही चालवली, पण आता मुलं स्थिरावली आहेत आणि सासरीही मान मिळू लागलाय.. स्वत:च्या आयुष्याचं विश्लेषण ‘जिंकले मी’ असं करणाऱ्या या गंगेविषयी..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ती मला प्रवासात भेटली होती. दीड-दोन दिवसांच्या प्रवासात, निवांत गप्पांमध्ये तिची सारी जीवनकहाणी समजली.. आणि ती तिच्या कहाणीसह मनात घर करून राहिली. एखाद्या छोटय़ा गावातली, प्रगतीचा ध्यास घेतलेली, साधीसुधी स्त्री असावी तशीच. तिला कुठलंही नाव शोभलं असतं आणि कुठल्याही गावाच्या नावात ती फिट्ट बसली असती. तिला मराठी, हिंदी, गुजराती आणि कामचलाऊ इंग्रजी येत होतं. साऱ्यांचा लहेजा मात्र एकच होता. म्हणूनच म्हटलं नाव-गावापलीकडचा एक विशिष्ट प्रातिनिधिक चेहरा होती ती.
तिचे आई-वडील दोघंही पदवीधर, थोडय़ा वेगळ्या विचारांचे. दोघांनी सरकारी कारकुनी न पत्करता वेगानं वाढणाऱ्या इंडस्ट्रिअल इस्टेटजवळ हायवेवर एक धाबा टाकला. दोन मुली आणि एक मुलगा झाला. मुलं शाळेला जाऊ लागली की त्याला जवळच्या शहरात नानीकडे ठेवायचं, शाळेसाठी. ही तिची आजी फार शिस्तीची बाई. स्वत:ची खानावळ सांभाळून नातवंडांना रामायण, महाभारत शिकवायची.
ही अवघी सात-आठ वर्षांची असताना वडिलांना हायवेवर जबरदस्त अपघात झाला. त्यांच्या उपचारांत धाबा विकून कुटुंब कंगाल झालं. हिच्या दहाव्या वर्षी वडील गेले. पदवीधर आईनं नोकरीसाठी प्रयत्न केले, पण अनुभव नाही. शेवटी डबे तयार करून विकायला सुरुवात केली. मदतीला दहा आणि अकरा वर्षे वयाच्या दोन मुली. आईला मदत करणं तर होतंच. पण स्वत: शाळेत जाताना आपल्यापेक्षा लहान मुलांची ने-आण करायची, त्यांची शिकवणी घ्यायची, त्यांच्या घरची छोटी-मोठी कामं करायची. एकूण काय, ही दहाव्या वर्षीही कमावती मुलगी होती. कष्ट करायचे, काम शोधत राहायचं आणि नेकीनं काम करून पैसे आईच्या हातात आणून द्यायचे हेच जगण्याचं ध्येय झालं.
जवळच्याच त्या औद्योगिक वसाहतीपलीकडे एक खेडं होतं. थोडी शेती, स्वत:चं घर असलेल्या एका मुलानं हिला मागणी घातली. बाकी काही नको. मुलगी अन् नारळ द्या. आम्हाला मुलगी आवडलीय असा लकडा लावला. अन् नाही नाही म्हणत आईनं, मुलीचं भलं होतंय या भावनेनं लग्न लावून दिलं, अवघ्या चौदाव्या वर्षी. नवराही शाळा सोडलेलाच होता. त्याची कंपनी बंद पडल्यावर घरात बसून खायला लागला. मग रोज भांडणं, वादावादी, मारहाण.. भरीला सासू चटके द्यायची, शेत गहाण पडलेलं.. एकूण काय, बडा घर पोकळ वासा! मी तिला कळवळून विचारलं, ‘‘अगं पण मारहाणीचं कारण तरी काय?’’ तेव्हा ती सहजपणे म्हणाली होती, ‘‘कारण जरुरी नसतं. ते कुटुंबच अशिक्षित, अडाणी होतं. त्यात प्रतिकूल परिस्थितीचा राग, तो माझ्यावरच निघायचा.’’
एक मूल पदरी होतं. तिनं लाडू करून विकले. जत्रेत पुरीभाजी, वडापावचे स्टॉल लावले. कंपनीत नाश्ता पुरवला, शिवणकाम केलं, लोकांच्या दारात रांगोळ्या काढल्या. पण खेडेगावात पैसा मिळवण्याचे मार्ग फार तोकडे हाच अनुभव आला. आईकडून पैसे घेऊन, थोडं कर्ज काढून नवऱ्याला रिक्षा घेऊन दिली. पण तो जेमतेम ४-५ तास काम करी, अन् ही १८ ते २० तास राबत असे. आहे या परिस्थितीतून वर उठायचं ही तिची जिद्द होती, ‘किती अडथळे येवोत वा कडे कोसळोत, नदी पुढे वाहतेच ना, तसं आपण पुढे पाहायचं’ हे तत्त्वज्ञान जेव्हा तिच्या तोंडून ऐकलं होतं तेव्हाच मला गंगेच्या विशाल प्रवाहाची आणि खळाळत्या चैतन्याची आठवण झाली होती.
तशातच दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. तिच्या एका मैत्रिणीनं शहरातल्या नव्यानं झालेल्या मोठय़ा हॉस्पिटलमध्ये चांगलं काम मिळतंय, पैसेही भरपूर मिळतील म्हणून नेलं. हिला वाटलं की हे काम मिळालं तर मुलाला आजीकडे ठेवीन, नोकरी करीन. दारोदार वणवण तरी थांबेल. मोठय़ा आशेनं ती काम बघायला गेली. तिची निरोगी कांती आणि कडेवरचं सुदृढ बाळ बघून तिथली डॉक्टरीण खूश झाली. तिनं ‘स्त्री-बीज’ दान करणं ही संकल्पना या दोघी मैत्रिणींना समजावून सांगितली. जे नाहीतरी वायाच जाणार ते दान करून तुम्ही एखाद्या जोडप्यासाठी अपत्यप्राप्तीला मदत करता हे किती मोठं पुण्य आहे ते मनावर बिंबवलं. हिच्या नवऱ्याला ते लगेचच पटलं. कारण दरमहा १५-२० हजार रुपये सहज मिळणार होते. ती म्हणते, ‘‘त्यावेळी तरी माझ्या मनात मुलांना उत्तम शिक्षण द्यायचं एवढाच विचार होता, म्हणून मी ते काम स्वीकारलं.’’
तिच्या तोंडून तिची कहाणी ऐकता ऐकता आलेलं हे वळण पचवायला मला थोडा वेळच लागला. इतका वेळ मला गंगेची नुसती आठवणच येत होती. पण साऱ्या आसमंताला कवेत घेत, चढउतारांना पार करत पुढे पुढे जाण्याचा तिचा ध्यास पाहिला अन् मी तिला ‘गंगा’ म्हणूनच हाक मारायला सुरुवात केली. गंगाला वाटलं तेवढं हे काम सोपं नव्हतं. सुरुवातीच्या तपासण्या झाल्यावर १५ दिवस रोज इंजेक्शन आणि चेकअप्साठी शहरात जावं लागायचं. यावेळी छोटय़ा मुलीची शाळा नवऱ्यानं मनापासून सांभाळली. गंगेनं या दोन वर्षांत भाडय़ानंच पण स्वत:चं घर केलं. नवऱ्याला भागीदारी, टेंपो घेऊन दिला. आता तिचं लक्ष मुलीच्या शाळेत गुंतलं होतं. संध्याकाळी घरी गेल्यावर ती मुलीला गोष्टी सांगायची. गृहपाठ करून घ्यायची. नवऱ्याचा अडाणीपणा आणि स्वत:ची सुटलेली शाळा यानं ती मुलांच्या शिक्षणाबाबत फार हळवी झाली होती. तिच्याबरोबर शहराच्या खेपा करून छोटय़ा मुलाचं आयुष्य बस-प्रवासात जखडलं गेलं होतं. यातून वेगळा मार्ग शोधायला तिचा चाणाक्षपणा उपयोगी पडला.
तिच्या लक्षात आलं की या हॉस्पिटलची माहिती देणारी मैत्रीण या व्यवहारात चांगले पैसे मिळवते. गंगानं चक्क आता प्रचार-पत्रक छापलं. त्यात स्वतचा मोबाइल क्रमांक दिला. महिन्याला चार पाच स्त्रियांना हॉस्पिटलपर्यंत नेलं तरी तिला व्यवस्थित पैसे मिळू लागले. तिची इंजेक्शनं आणि टेस्ट वाचल्या. पण यानं तिच्या खेपा कमी नाही झाल्या. या चार पाच स्त्रियांची ने-आण करून सर्व काळजी तिलाच घ्यावी लागे. आधीच इंजेक्शन्स आणि दगदगीने तिचं शरीर कमकुवत होऊ लागलं होतंच, तेव्हा मात्र तिनं धीर करून नवऱ्याला हे काम सोडून देणार आहे, असं स्पष्ट सांगितलं. त्या रात्री जी मारहाण झाली ती शारीरिक, मानसिक वेदनेसह कधीच विसरता न येणारी! गंगाच्या मुलीनं फोन करून तिच्या आईला बोलावून घेतलं आणि दोन्ही मुलांसह गंगानं घर सोडलं.
१२-१३ वर्षे तुफानाशी सामना करून गंगा अखेर पुन्हा मूळ भूमीच्या आश्रयाला आली. खरं तर इतकी र्वष इतकं काही भोगल्यावर त्याची सल ओठातून उमटायला हवी. दु:खाच्या साचलेपणानं मनही एखाद्या डोहासारखं हिरवट कडूशार व्हायला हवं. पण गंगा बोलून गेली ‘झालं ते बरंच झालं. त्या दिवशी झालेल्या अतिरेकानं मी माझं स्वातंत्र्य परत मिळवलं.’ सुरुवातीला आईकडे राहून तिनं मुलांना चांगल्या शाळेत घातलं. पालकसभेला आई आणि बाबा बनून जाताना ती जराही डगमगली नाही. मुलांनीही वडिलांविषयीचे प्रश्न धिटाईनं टोलवले. तिच्या मुलीनं एकदा सांगितलं होतं, ‘‘माझी आई तर कुणाच्या वडिलांपेक्षाही जास्त स्मार्ट आहे.’’ अगदी सुरुवातीला गंगानं घरगुती पदार्थ करून विकले, पण तेवढय़ानं भागणार नाही हे तिला समजून चुकलं.
आळशी नवऱ्यापायी तिनं स्वत:च्या ऑर्डर्स पोचवण्यासाठी अनेकदा रिक्षा चालवली होती. औद्योगिक पट्टय़ात तिनं टमटमही चालवली होती. तिनं रीतसर जाहिरात देऊन स्त्रियांना ड्रायव्हिंग शिकवायला सुरुवात केली. वाढत्या शहरात तिला कामही भरपूर मिळालं. एका ट्रान्सपोर्टच्या कंपनीचं काही काम, सुपरविजन ती घरी बसून करते. तिनंच धडपड करून त्यांचा व्यवसाय वाढवून दिलाय. हे सगळं करत करत दिवस जात होते. मुलं मोठी होत होती. पण प्रत्येक दिवस अनुभवांचा होता..
आता गंगा आणि दोन मुलं असं शांत आयुष्य सुरू झालंय. तिची आई जवळच राहते. गंगाचा तिला आधार वाटतो. जगाच्या शाळेत भरपूर शहाणी झालेली गंगा फार कडक शिस्तीची पालक आहे असं मुलं सांगतात.
मुलीमधला तापटपणा कधी कधी तिला चिंतेत टाकतो. पण ती आता पदवीधर झालीए. गंगाला कुणीतरी शिक्षणाबद्दल टोकलं. त्यामुळे बाहेरून परीक्षा देऊन तीही पदवीधर होणार आहे. बोलणाऱ्याचं तोंड धरण्यापेक्षा कृतीनं उत्तर देण्याची तिची जिद्द विलक्षणच म्हटली पाहिजे.
एकदा दगड पाण्यात पडला तर तळाशी जातो. पण लाकूड.. स्वत: तरतं आणि इतरांना तारतं. गंगानं डबे बनवण्याच्या आपल्या कामातून अनेकींना स्वत:च्या पायावर उभं केलंय.
गंगेच्या क्षमाशीलतेला तर तोडच नाही. ज्या सासूनं तिला नेहमी डागलं, पोळलं ते सासू-सासरे आता गंगाच्या येण्याकडे डोळे लावून बसतात. तिच्या गावकऱ्यांची शहरातली कामं गंगाच करते. मुलांनाही तिनं सासरपासून तोडलं नाही. ती म्हणते ‘‘खूप पाणी वाहून गेलं. आता मला कुणी मोडू शकणार नाही. माझी मी स्वतंत्र आहे. मग नाती कशाला तोडू?’’ मुलगा म्हणतो, ‘‘माझ्या आईला माझ्या शाळेत खूप मान होता. आई फार कणखर आणि विचारी आहे. जगावं कसं ते तिच्याकडूनच शिकावं.’’
जीवनातलं शाश्वत-अशाश्वत, नित्य-अनित्य यांच्यापलीकडचं तत्त्वज्ञान गंगेच्या जीवनात आपल्याला सापडतं. एक मुलगी, एक पत्नी, आई, पालक आणि नागरिक म्हणून तिनं सतत प्रगतीचाच ध्यास धरला. अडथळे आणि साचलेपण दूर सारत, खळाळत राहिली, निर्मळपणे हसतमुखाने. खऱ्या गंगेचं प्रतीक होऊन!
मुलं ज्याअर्थी आजी-आजोबांकडे प्रेमानं जातात, वडिलांशी व्यवस्थित वागतात त्याअर्थी त्यांच्या मनात गंगानं त्यांची चांगलीच प्रतिमा ठेवली असणार. घर सोडलं तरी सासू-सासऱ्यांचं हवं नको नियमित पाहणारी गंगा परिसरातल्या वृद्धांना खूप मदत करते. मुलांवर हा संस्कार नकळत होतोच आहे. छोटय़ा छोटय़ा सुखदु:खात न अडकणारी गंगा कशानं सुखावते विचारलं, तर म्हणली ‘शेजारीपाजारी जेव्हा माझ्या मुलांचं कौतुक करतात तेव्हा ‘जिंकले मी’ असं वाटतं. बस्स, आणखी काय हवं.’
पालकत्वाचा जीवनगौरव म्हणायचा तो हाच.
vasantivartak@gmail.com