पतीचा अपघाती मृत्यू झाला तेव्हा एक मूल पदरात तर दुसरं पोटात होतं. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडल्यावर नंतरची पालकत्वाची जबाबदारी होती नातवाला सांभाळायची. तीही पार पाडल्यानंतर जबाबदारी आली ती पणतीला सांभाळायची. आपल्या सैन्यातल्या नातू आणि नातसूनेलाही भरभक्कम आधार देणाऱ्या कुसुम ताहराबादकर यांनी तीन पिढय़ांच्या पालकत्वाचं व्रत प्रेमाने जपलं.
नाशिकजवळचा देवळाली कॅम्प म्हणजे लष्कराची छावणी. लष्कराच्या गाडय़ांची इथे नेहमीच वर्दळ. अशाच एका छोटय़ा ट्रकसमोर रस्त्यानं चालणाऱ्या दोन तरुणांपैकी एकानं स्वत:ला अवचित झोकून दिलं. काय होतंय हे कळायच्या आत दुसऱ्या तरुणानं त्या लष्करी गाडीला थांबा असा हात करत, स्वत:ला झोकून पहिल्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. आपल्या देहाचं आच्छादन करून आपल्या आजारी भावाला वाचवण्याचा तो प्रयत्न सफल होणं शक्य नव्हतं. चालकाच्या डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोवर हे सारं घडून गेलं. या अपघातात आपल्या भावाला डॉक्टरकडे घेऊन जाणारा तरुण, गणेश त्र्यंबक ताहराबादकर हकनाक बळी गेला. भाऊ वाचला.
घरी दोन वर्षांचा मुलगा दिलीप आणि पत्नी कुसुम. कुसुमचे दिवस पूर्ण भरलेले. गणेशजींच्या तेराव्या दिवशीच कुसुम प्रसूत होऊन तिला मुलगी झाली. काळ तर मोठा कठीण आणि दु:ख पहाडाएवढं. पण माणसं चांगली भेटली. गणेशजी नाशिक जिल्हा आरोग्य विभागात कर्मचारी होते. त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांत्वनाला गेल्यावर कुसुमताईंच्या बंधूंना बाजूला घेऊन सांगितलं. ‘‘पत्नी मॅट्रिक झालेली आहे. अनुकंपा तत्त्वावर याच जागेवर सामावून घेतो.’’ अवघ्या वीस दिवसांत नेमणूकपत्र हातात पडलं आणि दोन महिन्यांच्या आत बाळंतपण संपवून दोन लहान मुलं घरी सोडून कुसुम गणेश ताहराबादकर सरकारी नोकरीत हजर झाली.
ज्येष्ठ बंधू कमलाकर जोशी आणि इंदुवहिनी यांनी कुसुमताईंना आधार दिला. वहिनींनी प्रेमानं मुलांची जबाबदारी स्वीकारली. कुसुमचं विश्वच उलटंपालटं झालं, पण भावंडांनी कोसळू दिलं नाही. शाळेत खेळणं, पोहणं, सायकलिंग आणि अभ्यास, सर्वच आघाडय़ांवर उत्तम असणारी कुसुम सायकलवरून ३-४ मैल दूर ऑफिसात जाऊ लागली. मुळात नाजूक प्रकृती, त्यात मानसिक आघात आणि नोकरीतील कामाचा ताण यामुळे आयुष्यभर तब्येतीच्या कटकटी आणि अॅनिमिया यांनी पाठ सोडली नाही.
मामींच्या निगराणीत दिलीप आणि सुरेखा वाढत होते. पण ६-७ वर्षांनंतर कुसुमताईंनी स्वतंत्र घर केलं. अवघ्या ९-१० वर्षांच्या दिलीपनं तेव्हा वाणसामान, भाजी आणणं, नळदुरुस्ती.. एक ना अनेक कामं अंगावर घेतली आणि अतिशय जबाबदारीनं निभावली. ‘आई जाते कामाला अन् बापाविना पोरं उंडारतात,’ असं कुणी म्हणू नये म्हणून कुसुमताई अतिशय दक्ष असत. मुलांनीही सहसा कधी रागावायची वेळ आणली नाही. जवळच ग्रंथालय होतं. वाचन आणि व्यायाम या दोन गोष्टी सक्तीच्या. एवढं सोडलं तर आईची शिस्त जाचक नव्हती. एकदा दिलीपच्या वाढदिवसाला कुसुमताईंनी त्याला ‘श्यामची आई’ पुस्तक भेट दिलं. संध्याकाळपर्यंत पुस्तक वाचून संपव मग सर्व जण मराठी चित्रपटाला जाणार आहोत, असं त्याला सांगितलं. सुट्टय़ांचे दिवस असल्याने १० वर्षांचा दिलीप खेळण्यात रमला. संध्याकाळी सर्व जण चित्रपटाला गेले, पण दिलीपला घरी पुस्तक वाचत बसावं लागलं. अन् त्यानंही हट्ट न करता, न रडता तीन तासांत पुस्तक वाचून संपवलं.
अशा सावध शिस्तीचा परिणाम उत्तमच झाला. दिलीप पुढे आर.सी.एफ.मध्ये उत्तम नोकरीत लागला आणि मुलगी सुरेखा मराठी आणि संगीत विषयात द्विपदवीधर, प्रत्येक वेळी विद्यापीठात प्रथम आली. त्या काळात संगीत घेऊन करिअर करावं, असं सुरेखाच्या मनानं घेतलं. म्हणून कुसुमताईंनी तिला मॅट्रिकनंतर पुण्याला हॉस्टेलला ठेवून शिकवलं. उत्तम गुरूकडे पाठवलं. अवघ्या तीन-चारशे रुपयांच्या कर्मचाऱ्याच्या नोकरीत हे किती अवघड असेल. पण ‘आईनं आम्हाला काही कमी पडू दिलं नाही,’ म्हणून सुरेखा कृतज्ञ आहे. ती म्हणते, ‘‘माझ्याच नव्हे तर माझ्या मैत्रिणींच्याही आयुष्यातल्या चढउतारांमध्ये आईनं नेहमीच अबोलपणे आधार दिला. कष्टानं, पैशानं सतत दुसऱ्यांचं करत राहिली.’’ तिच्या या निरपेक्ष कष्टाळू आणि जबाबदारी घेण्याच्या वृत्तीचा खोल संस्कार संपूर्ण कुटुंबावर अजूनही आहे. दोन्ही मुलं शिकली. त्यांचे संसार मार्गी लागले. एका अर्थानं पालक म्हणून पन्नाशीतच कुसुमताई मोकळ्या झाल्या. पण असं मोकळं होणं त्यांच्या स्वभावात बसणारं नव्हतं.
दिलीप-मानसीला पहिली मुलगी झाली आणि पाठोपाठ दुसरा मुलगा. मानसीही शाळेत शिकवत होती. कुसुमताईंची नोकरी अजून बाकी होती, तशीच सूनबाईंच्या म्हणजे मानसीच्या आईही शाळेत शिकवत होत्या. अशा वेळी सुनेला मदत करण्यासाठी कुसुमताईंनी एक धाडसी निर्णय घेतला. तान्ह्य़ा नातवाला ललितला त्यांनी नाशिकला नेऊन सांभाळलं. त्यांच्याच वाडय़ातल्या मावशी पाळणाघर चालवत, त्यांचा आधार झाला. दुपारच्या उन्हातून घरी जा-ये करून, पण कुसुमताईंनी ही पालकत्वाची दुसरी इनिंग एकटीने आणि हिमतीने निभावली. दुधापेक्षा दुधावरची साय जास्त जपावी लागते तशी. पण या सगळ्याचं श्रेय स्वत: न घेता त्या सहज म्हणतात, ‘‘गोकुळात कृष्ण वाढावा तसं आमचा वाडा ललितच्या आगमनानं गोकुळ होऊन गेला. मला काही कठीण नाही गेलं.’’
त्या काळात ‘परमवीर चक्र’ नावाची मालिका लोकप्रिय होती. आजी आणि नातू एकत्रच ती सीरियल बघायचे. खूप गप्पागोष्टी व्हायच्या. आज ललित सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल आहे आणि सेना मेडलनं (गॅलंडरी) त्याचा सन्मान झालेला आहे. ललितचं आणि कुसुम आजीचं विशेष नातं आहे. ते न बोलताही एकमेकांनाच नव्हे, तर बघणाऱ्यांनाही जाणवतं. ललित सांगतो की, ‘‘आजीमुळे मी उत्तमोत्तम वाचन केलं. पुस्तक पूर्ण झालं की आजी त्याचा सारांश लिहायला लावायची. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व मिळवता आलं. दर आठवडय़ाला आजीला एक पत्र गेलंच पाहिजे. असा आमचा दोघांचा आग्रह असे. त्यामुळे उत्तम भावना मांडता आल्या, नातं सांभाळणं समजलं. ज्याचा माझ्या यशात मोठा वाटा आहे.’’
ललितच्या इंजिनीअर पत्नीनंही सैन्यदलात प्रवेश केला. कांचन आणि ललितला एकच पोस्टिंग एकत्र मिळालं ते महूला. तिथे त्यांना मुलगी झाली. सहा महिन्यांच्या विवाला सांभाळायला म्हणून कुसुमआजी महूला गेल्या. पणजीच्या भूमिकेत त्यांची पालकत्वाची तिसरी इनिंग सुरू झाली. ही इनिंग जबाबदारीची होतीच, पण आनंददायी होती. आजी आल्यामुळे ललित बदलीच्या ठिकाणी निश्चिंत मनानं गेला.
कुसुम आजींची नातसून म्हणते, ‘‘माझं सारं करिअर आजींमुळे झालं. नुकतीच ती ‘मेजर’च्या पोस्टवरून सैन्यदलातून बॉण्ड पूर्ण करून बाहेर पडली आहे. तिची मुलगी विवा सात वर्षांची आहे. कांचन सांगते, ‘‘नोकर-माणसं असतात, नसतात पण आजींवर मुलगी टाकून निश्चिंतपणे ३-३ दिवस मी घर सोडून डय़ुटीवर जायचे. मला अपराधी वाटलं तर आजी म्हणायच्या, ‘‘तुझी डय़ुटी तू निष्ठेनं करतेस ना तशीच माझी डय़ुटी मी निष्ठेनं करते. तुझं कर्तव्य तू पूर्णत्वानं पार पाड.’’
एरवी आजी शिस्तीच्या. त्यांचे जप-वाचन, गीता, ज्ञानेश्वरीच्या वेळा ठरलेल्या. पण विवाचं करताना हे वेळापत्रक त्यांनी गुंडाळून ठेवलं. एक-दोन नव्हे सात र्वष त्यांनी नातसुनेची पाठराखण केली. कांचनला त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं, ‘‘प्रेम आणि संसार दोघांना एक करतोच. पण दिवसाचा काही वेळ फक्त स्वत:साठी ठेव. तुझं एक स्वतंत्र अकाऊंट असू दे. घर असो वा ऑफिस, आत्मसन्मानाबाबत जागरूक राहा.’’ कांचन म्हणते, ‘‘आजी विवाच्याच नव्हे तर सर्वार्थानं माझ्याही पालक झाल्या. माझ्या तर त्या आजी, आई, मैत्रीण, मार्गदर्शक सर्व काही आहेत.’’
कुसुमआजींनी पालकत्वाच्या तीन इनिंग्ज यशस्वीपणे पार पाडल्या. पहिल्या वेळेला खूप ताण, तेव्हा आई-वडिलांची एकत्र जबाबदारी होती. नोकरीचे कष्ट झेपत नव्हते. मुलं समजूतदार होती. ही जबाबदारी निभावली. एकटेपणानं पार पाडली. ललितचं करण्यात कष्ट होते पण ताण नव्हता. आयुष्य स्थिरावलं होतं. आर्थिक ओढाताण नव्हती. ललितनं आजींना नेहमीच आनंद दिला.
तिसऱ्या इनिंगनं तर त्यांना भरभरून यशच दिलंय. विवाची प्रगती बघणं आणि ललित-कांचन ज्या
निष्ठेनं देशसेवा करतात, कर्तव्यतत्परता दाखवतात त्या साऱ्याचा साक्षीदार असणं. ललितला जेव्हा
सेना मेडलनं (गॅलंडरी) गौरवलं गेलं तो सोहळा अनुभवणं हे सारं कृतार्थ करणारंच होतं. साऱ्या कुटुंबानं मिळून आजींचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा केला तो अंदमानमध्ये. आजींच्याच इच्छेनुसार. त्या प्रखर सावरकर भक्त आहेत. अंदमानला सावरकरांच्या तुरुंगकोठडीत त्यांनी काही तास शांतपणे घालवले. कदाचित त्याही मनात म्हणत असतील, ‘‘हे पालकत्वाचं व्रत मी आपणहून घेतलं आणि व्यवस्थितपणे पार पाडलं. आता हे सतीचं वाण नव्हतं तर तो एक आनंदसोहळा होता. असा आनंदसोहळा सर्व पणज्यांना अनुभवायचं भाग्य
लाभू दे.’’
– वासंती वर्तक
vasantivartak@gmail.com