ती सुपर मॉडेल.. डौलाने रॅम्पवॉक करताना जग जिंकायचा प्रयत्न करणारी ती स्वत:च्या जगात मात्र ठेचकाळली, जखमी झाली.. मात्र पुन्हा उठून उभी राहिली ती आपल्या मुलासाठी. मॉडेलिंग करताना आपल्या मुलाला माणूस म्हणून मोठं करण्यासाठी त्याची माताही झाली आणि पिताही.. आयुष्यातल्या घटनांनी ‘स्ट्राँग’ बनलेल्या सुपरमॉडेल अॅलिशिया राऊतविषयी..
पडद्यामागच्या अंधारातून ती प्रकाशात येते अन् रॅम्पवर आपल्या दिशेनं चालू लागते. सारा दिमाख तिनं स्वत:त सामावलेला असतो.. प्रत्येक पावलातून डौल नुसता ओसांडणारा, अवघी ८-१० पावलंच चालते ती, स्टेजच्या अगदी टोकाजवळ येते.. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळलेल्या.. ती एक क्षण थांबते. नजर वर उचलते. त्या एका नजरेत जगाला कवेत घेण्याची ताकद असते.. साऱ्या दुनियेला जिंकायचं असतं तिला. ती जिंकते.. अन् काहीच न घडल्याच्या आविर्भावात पुन्हा डौलदार लयीत पावलं टाकत, माघारी जाते. ती असते ‘रॅम्पची राणी’ सुपर मॉडेल हे बिरुद पटकावणारी एक सुंदरी. आपल्या दृष्टीनं हा काही क्षणांचा नजरबंदी करणारा खेळ असतो, पण त्यामागे असतात खूप कष्ट आणि असामान्य मनोबल! आणि ‘ती’च्या बाबतीत तर ती असते प्रचंड मोठी तपश्चर्या!
सगळय़ा फॅशनजगत आणि मॉडेलिंगच्या विश्वाची हीच कहाणी आहे. प्रचंड स्पर्धा, सतत स्वत:ला अनेक शारीरिक आणि मानसिक कसोटय़ांवर सिद्ध करणं आणि सर्व ताणतणाव लपवत जगजेत्त्याच्या आविर्भावात वावरणं, ही तर या व्यवसायातली प्राथमिक कसोटी आहे. अशा विश्वात स्वत:चं वय आणि ९ वर्षांचा मुलगा असणं न लपवता एक आई अभिमानानं रॅम्पवर चालते तेव्हा तिच्या यशानं आपलीच मान ताठ होते. मुंबईच्या रॅम्पवर दीर्घकाळ आपलं स्थान राखून असणारी आणि मॉडेलिंगच्या विश्वातली ती ‘सुपर मॉडेल’ आहे, अॅलिशिया राऊत. अॅलिशियाचे वडील विजय राऊत एव्हिएशन इंजिनीयर तर आई नताशा राऊत एरोबिक्स ट्रेनर. आपल्या रशियन आईकडून अॅलिशियाला भरपूर उंची आणि कमालीची तलम, गोरी अंगकांती लाभली. शाळेत तिला लेडी अमिताभ म्हणत असत. फुंकर मारली तर उडून जाशील, असं चिडवायचे तिला सारे. मुळातच अबोल अॅलिशिया त्यामुळे मिटून जायची.
पण मुंबईत कॉलेजच्या पहिल्या दोन वर्षांतच अॅलिशियाला मॉडेलिंगच्या ऑफर्स यायला लागल्या. आणि पदवी मिळण्यापूर्वी म्हणजे १८-१९ वर्षांची असताना मॉडेलिंगच्या क्षेत्रात अॅलिशियानं स्वत:चं स्थानही निर्माण केलं होतं. अॅलिशिया म्हणते, ‘‘एखाद्या नोकरीसाठी जसं तुमच्या विषयातली पदवी, अद्ययावत् ज्ञान, हजरजबाबीपणा आदी गोष्टी किमान गरजेच्या, तसंच मॉडेलिंगमध्ये उंची, बांधा, डौल, नितळ त्वचा, बोलका चेहरा आणि तीव्र बुद्धिमता, तत्पर प्रतिसाद यासारख्या पायाभूत गोष्टी असतात. उंची, बांधा आणि नितळ अंगकांती ही मला आईकडून लाभली होती, (आजही ती टिकून आहे) त्यामुळे मला भराभर संधी मिळत गेल्या.’’
शाळेत लाजरीबुजरी असणारी अॅलिशिया या व्यवसायातल्या यशानं फुलत गेली. दरम्यान, भेटलेल्या एका रशियन मित्राच्या प्रेमात पडली आणि भर्रकन लग्न करून रशियाला पोचलीसुद्धा. पापण्यांमध्ये वसणाऱ्या स्वप्नांना जेव्हा सत्याचे दाहक वारे पोळून काढतात तेव्हा तिथून दूर पळ काढणं एवढंच माणसाच्या हातात उरतं. दोघांमधील प्रेमाच्या नात्याला सुरुंग लागू लागला. सुरुवातीला अॅलिशियाला वाटलं, ‘‘दोन संस्कृतीतला फरक आहे, वातावरणातला बदल आहे, आपण घेऊ जुळवून.’’ प्रेमाची जादू सारं विश्व सुंदर करते, पण ती जादू फार काळ टिकली नाही. दिवस भरलेल्या अॅलिशियाला शारीरिक मारहाणीला तोंड द्यावं लागलं, तेव्हाच तिनं ठरवलं की आपल्या बाळाच्या वाढीसाठी हे वातावरण घातक ठरेल. अन् तिनं भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. पण बॅग भरून आईच्या घरी जाणं एवढं ते सोपं नव्हतं. रशियन कायदे स्त्रियांना पूर्ण संरक्षण देणारे होते. त्यानुसार एक मूल असलेला पती ३ र्वष घटस्फोटासाठी अर्ज करू शकत नाही. आणि दोन मुलं असतील तर तो घटस्फोट देऊन जबाबदारी टाळू शकत नाही. अॅलिशियानं जर पोलिसात तक्रार दिली असती तर तिच्या रशियन पतीला अनेक वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली असती पण तिनं असं काही केलं नाही. दोन महिन्यांच्या चिमुरडय़ा ‘मार्क’ ला घेऊन ती भारतात परतली. यात तिला भारतीय दूतावासानं खूप मदत केली. पुढे तिनं घटस्फोट घेतला. अॅलिशियाला आई-वडिलांनी लग्नाचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं, तसंच भारतात परत येताना भक्कम आधार दिला. आईच्या पाठिंब्यामुळेच अॅलिशिया चार महिन्यांच्या मार्कला घरी ठेवून पुन्हा मॉडेलिंगमध्ये परतली. ती सांगते, ‘‘इथे फक्त तुमच्या गुणांचाच विचार होतो. त्यामुळे आई होऊन विद्ध मनानं परतलेल्या माझंही इंडस्ट्रीने स्वागतच केलं.’’
या काळात ती स्वत: स्वत:ची गुरू झाली. आपल्या मनाला सकारात्मक वाटेवर खेचून ठेवलं तिनं. बाळाला घरी सोडून गाडीत बसताना रडू यायचं तिला. काम लांबलं तर मेक-अप् रूममध्ये जाऊन, दूध काढून घरी बाळासाठी पाठवून द्यायचं, पण बाळाला आईच्या दूधापासून वंचित ठेवलं नाही तिनं. बाळाची काळजी, स्वत:ची काळजी, व्यावसायिक स्पर्धेचा ताण..पण या सगळय़ा घटनांनी ‘मला खूप स्ट्राँग बनवलं’ असं अॅलिशिया सांगते. अॅलिशिया लेखिका किंवा अभिनेत्री असती तर या असफल प्रीतीच्या व्यथा-वेदना, त्या जीवघेण्या अनुभवांचं कलाविष्कारात संक्रमण करणं हे तिच्या कलेच्या दृष्टीनं वरदानच ठरलं असतं. पण मॉडेलिंगची दुनिया वेगळी. इथे सदैव हवा उमलत्या फुलाचा ताजेपणा! एखाद्या प्रवाही प्रकाशमय ज्योतीसारखं तुमच्या व्यक्तिमत्त्वानं क्षणार्धात आसमंत उजळून टाकावा लागतो. जर मनातच अंधार असेल तर ते ओतप्रोत चैतन्य, प्रकाश कुठून आणि कसा उसना आणणार?
अॅलिशियाला ती ताकद तिच्या बाळाच्या निरागस स्पर्शानं, त्याच्या प्रेमळ अस्तित्वानं दिली. एक अनामिक शांती आणि स्थैर्य तिच्या मातृहृदयात आलं. हे आईपणाचंच वरदान आहे, असंच ती मानते. त्या वरदानाच्या जिवावरच ती या क्षेत्रात टिकून राहू शकली. स्वत:बरोबर मुलाला वाढवत राहिली. तरीही मार्कची गळा मिठी सोडवून कामाला निघणं हे सर्वात कठीण असायचं. त्याहून कठीण प्रसंग उद्भवतात अनेकदा, ‘धावताना पडलेल्या मुलाला ‘आई’ होऊन गोंजारायचं की ‘बाप’ म्हणून ‘ऊठ, काही विशेष लागलं नाहीय तुला.’ असं म्हणायचं तेच अॅलिशियाला उमगायचं नाही.
ती म्हणते, ‘‘मार्कचा वाढदिवस नोव्हेंबरमध्ये येतो. तेव्हा तीन दिवस सुट्टी काढण्यासाठी मी जूनपासून माझ्या कामाचं प्लॅनिंग करते.’’ इतकंच नाही तर शाळेची एक पालकसभा अटेण्ड करता यावी यासाठीही तिला खूप धावपळ करावी लागते. तिनं बऱ्याच वेळा मुद्दाम मार्कला शूटिंग पाहायला नेलं. त्यातले कष्ट, मेहनत, एकाग्रता याची त्याला जाणीव व्हावी हा हेतू. त्यामुळे तो आपल्या आईच्या कामाचा आदर करायला लागला. एकदा गोव्यात शूटिंग होतं. खूप प्रयत्नांनी एका शॉटचं टेकिंग मनासारखं जमलं. सर्वानी टाळय़ा वाजवल्या. छोटा मार्क आईकडे धावत गेला. एखाद्या आजोबासारखं त्यानं आईला जवळ घेऊन ‘वेलडन डिअर, यू आर टू गुड’’ अशी शाबासकी दिली. यासारखे क्षणच तिला आयुष्य पेलायला मदत करीत आहेत.
दहा ते पाच नोकरी करण्यापेक्षा आपल्या आईचं काम वेगळं आहे हे मार्कनं समजून घेतलं आहे. मात्र रविवार हा फक्त माय-लेकांचा असतो. आपल्या आईलाही अॅलिशिया रविवारी पूर्ण विश्रांती घ्यायला लावते. कारण अॅलिशिया बाळ घेऊन भारतात परतली त्या क्षणी तिच्या आईनं स्वत:ची कामं बंद केली. आई-वडील यांच्या आधारामुळेच आपलं पालकत्त्व सुकर झालंय हे ती जाणते. हल्लीची मुलं फार तल्लख, थेट आणि स्पष्ट वागणारी आहेत. त्यांच्याशी मोकळेपणानं आणि स्पष्टपणानंच वागावं लागतं. या मुलांना भावनात्मक गुंते आवडत नाहीत. पण नऊ वर्षांच्या मार्कनं नाती समजून घ्यावी आणि रोजची शिस्त पाळावी यासाठी अॅलिशिया आग्रही असते. वडील या शब्दाविषयी मार्कला अनादर वाटेल असं काहीच तिनं मार्कला कधी सांगितलं नाही. वडील नाहीत म्हणून त्याचे अधिक लाडही केले नाहीत. मार्कचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अॅलिशिया खूप काम करते आहे. त्याला उत्तमातलं उत्तम शिक्षण मिळावं अशी तरतूद करते आहे. त्याचबरोबर त्याला आणि आपल्या आई-वडिलांना पुरेसा वेळ देता यावा, यासाठीही धडपडते आहे. जीवनात प्रतिकूलता जेवढी अधिक तेवढी धडक देण्याची जिद्द वाढते हा तिचाही अनुभव आहे.
खरं तर अॅलिशियाचा व्यवसाय आणि तिचं पालकत्व यात एक अंतर्विरोध आहे. खूप कपडे, मेकअप अनेक प्रोजेक्ट मीटिंग्ज, पाटर्य़ा, डिस्को ही तिच्या व्यवसायाची गरज आहे. पण तिच्यातली आई कामाखेरीजचा हा सगळा वेळ फक्त ‘मुलासाठीच द्यावा’ असं मानते. ती म्हणते, ‘‘एकदा का कॅमेरे बंद झाले, रॅम्पवरून खाली उतरले आणि मेकअप काढला की मी एक सर्वसाधारण आई आणि प्रेमळ मुलगी होते.’’ हे भानच अॅलिशियाला इतरांपासून वेगळं काढतं.. आई म्हणून तिला कुठे कमी पडू देत नाही. एका मोठय़ा संकटानं स्वत:ची पूर्ण ओळख झालेली अॅलिशिया म्हणून तर एखाद्या नाजूक फुलासारखी कोमल, भिंगरीसारखी तरल- चपळ, आई म्हणून परिपूर्ण तर बाप म्हणूनही खंबीरपणे उभी राहते. आत्मतेजानं उजळते. हेच तिच्या यशाचं रहस्य आहे!
– वासंती वर्तक
vasantivartak@gmail.com