आंतरधर्मीय लग्नानंतर दोन घरांतल्या अगदी भिन्न वातावरणाचा बाऊ न करता नयना घरात रुळली, पण नवरा कसलीच जबाबदारी घेत नाही म्हटल्यावर तिनं मुलीसह घर सोडलं. एकटीनं मुलीला वाढवताना तिची स्वतंत्र वृत्ती जोपासत तिला प्रगल्भ केलं. म्हणूनच भलेही दोघी जणी एकत्र राहात नसल्या तरी एकमेकींच्या जिवलग आहेत.
‘‘हो, हे खरंय की, कधी आईकडे, कधी वडिलांकडे असं करत राहिल्यामुळे मला भावनिक संघर्षांला तोंड द्यावं लागलं असेल कदाचित, पण मी कुणालाच तोडून टाकू शकले नाही. रोजच्या जगण्यात ‘ग्रे शेड्स’ जास्त असतात. कुणीच पूर्ण काळं किंवा पांढरं नसतं. मी या ‘ग्रे शेड्स’ खूप लहानपणीच स्वीकारल्या. मी आईकडे फारशा तक्रारी केल्या नाहीत, कारण माझ्या तक्रारीवर आईकडे उत्तर किंवा मार्ग नाही हे मला कळायचं. तिची झुंज मला कळत नसेल, पण जाणवत निश्चित होती त्या वयातही.’’ माझ्यासमोर बसलेली माधवी शांतपणे, स्वच्छपणे आणि मोकळेपणानं विचार व्यक्त करत होती.
नयनानं माधवी चार वर्षांची असताना तिला घेऊन सासरचं घर सोडलं होतं. नयनाचा विवाह आंतरधर्मीय. नयनाचे वडील ती बारा वर्षांची असतानाच गेले. वडिलांचं पेन्शन मिळत होतं, पण आईला आधार देऊन जगाशी व्यवहार करणं नयनाच करत होती. दोघी बहिणी लहान आणि आई हळवी, भित्री. घराचं कर्तेपण घेणारी नयना कदाचित बाहेर भावनिक आधार शोधत असावी. त्यामुळे एका ट्रेकिंगच्या ग्रुपचा लीडर, ट्रेकमधलं मनमोकळं वातावरण, ‘त्या’ची मित्रांना मदत करण्याची वृत्ती यामुळे नयना भारावून गेली आणि माहेरच्या विरोधाला न जुमानता हे लग्न तिनंच पुढाकार घेऊन केलं.
लग्नानंतर दोन घरांतल्या अगदी भिन्न वातावरणाचा बाऊ न करता नयना घरात रुळली, पण हौशीखातर ट्रेक आखणं वेगळं आणि घर चालवणं वेगळं. तिचे सासरे पैसा राखून होते. कमी काही नव्हतं. नवरा सदैव स्वत:च्या धंद्याची मोठमोठी स्वप्नं बघायचा आणि सासू-सासरे त्याला विरोध न करता पाठिंबाच द्यायचे. ‘‘तो कसलीच जबाबदारी घेत नाही. माझ्याशी त्यानं काही स्वतंत्र नातं निर्माण केलंच नाही. मी त्याच्या घरातली एक नवीन वस्तू झाले,’’ अशी भावना तिच्या मनात घर करून राहिली. त्यात घरच्या एका धार्मिक कृत्यात तिच्या धर्माबदलाचा एक छोटासा संस्कार करण्यात आला. तिचं म्हणणं- ‘‘त्यामुळे रोजच्या जगण्यात काहीच फरक पडला नाही, पण मला विचारलं नाही, विश्वासात घेतलं नाही याचा ओरखडा सलायला लागला.’’ जनगणनेची माणसं घरी आल्यावर तिनं माझा धर्म हिंदू, असं ठासून सांगितलं.
नयनाला एलआयसीमध्ये चांगली नोकरी होती. तिनं विचार केला, स्वतंत्र बिऱ्हाड केलं तर तो स्वत:च्या संसाराची जबाबदारी घेईल. म्हणून तिनं त्याचं एक मश्रूम फार्मचं ड्रीम प्रोजेक्ट होतं त्याच्याजवळ पळस्पे गावात खोली घेतली आणि त्याला सहा महिने मुदत दिली. या सहा महिन्यांत तू व्यवस्थित गृहस्थ होऊन दाखव, अशी आर्जवं केली, पण झालं उलटंच. रेशनकार्ड मिळण्यासाठी व गॅस, रॉकेलसाठीही नयनाला त्याच्याशी संघर्ष करावा लागला. तो चार चार दिवस घरीच यायचा नाही. शेजारी मुलगी ठेवून नयना ऑफिसला जाई.
पनवेल त्यामानाने राहायला योग्य. म्हणून एक दिवस तिच्या नवऱ्याने सारं घर आवरून दोघींना पनवेलला नेलं, पण जागेची सोय झालीच नाही. मायलेकी दोघी २ महिने लॉजवर राहिल्या. शेवटी नयनानंच जागा शोधली आणि घर लावलं. मोठय़ा उत्साहाने लग्न केलं खरं पण झाला तो अवघा ६-७ वर्षांचा संसार!
या सगळ्या चढउतारांमध्ये नयनाच्या दोघी बहिणी अलका आणि सुलेखा यांची मोठी साथ होती. संध्या गोखले या मैत्रिणीनं भाडय़ाऐवजी ओनरशिपचं घर घे म्हणून आग्रह धरला. संध्या, गीता, छाया या मैत्रिणींमुळे मी पनवेलमध्ये स्थिरावले, असं नयना सांगते. ट्रेकिंगच्या पूर्ण ग्रुपनं ‘मित्रावर प्रेम आहे, पण आमचा पाठिंबा नयनालाच आहे’ असं मीटिंग घेऊन ठरवलं. माधवी सांगते, ‘‘पनवेलच्या ‘किनारा’ सोसायटीतले दिवस फार छान होते. माझी शाळाही खूप छान होती, पण शनिवार-रविवार सारे जण आपापल्या कुटुंबात मग्न असायचे. मग आई मला स्कूटरवरून खूप फिरवायची. नदीकाठी बसणं, कर्नाळ्याला पक्षी दाखवणं असं आईनं खूप केलं. आईला पनवेलमध्ये पाठीशी पोर बांधून फिरणारी एकटी स्त्री म्हणून झाशीची राणी म्हणायचे.’’
अधूनमधून नवरा येऊन मुलीला घेऊन जायचा. शाळा बुडवून तिकडेच ठेवायचा. आत्या खूप लाड करायची. त्यामुळे नयना मुलीच्या शिस्तीबद्दल जागरूक व्हायला लागली. त्यावरून खटके उडायला लागले. लहान मुलीला बाबांच्या घराची, एकत्र कुटुंबाची, सतत साजऱ्या होणाऱ्या समारंभाची ओढ असणं साहजिक होतं. त्यामुळे माधवी आईच्या शिस्तीवर नाराज होऊ लागली. नयनाचं पालकत्व अशा घटनांमुळे अवघड होत चाललं. मायलेकींमध्ये सतत होणारे मतभेद दोघींसाठी ताण उत्पन्न करायचे. आईनं अभ्यास कर म्हटलं, की माधवीची प्रतिक्रिया व्हायची- ‘‘अभ्यास न करता ८० टक्के मिळवते ना, कटकट करू नकोस.’’ खरं तर घरोघरी असं चालतंच, पण नयनाच्या एकल पालकत्वामुळे हे अवघड दुखणं असायचं.
माधवी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये असताना स्वेच्छेने वडिलांकडे राहायला गेली. आता त्यांची नोकरी चांगली होती. दुसरं लग्न झालं होतं आणि एक लहान मुलगी होती. माधवी त्या लहान बहिणीत रमली. सावत्र आईनंही आक्षेप घेतला नाही, पण.. शेवटी दोन वर्षांनी ती परत आईकडे आली.
माधवी म्हणते, ‘‘माझी आई स्वतंत्र विचारांची, दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणारी, मदतीला धावून जाणारी, दुसऱ्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणारी आहे. त्यामुळे आमचं नातं अतिशय प्रगल्भ आहे.’’
नयना म्हणते, ‘‘माझी मुलगी अत्यंत हुशार आहे. मी तिला सगळं काही एकटीनं द्यायचा प्रयत्न केला, पण कौटुंबिक प्रेम, माणसांनी भरलेलं घर यामुळे असेल कदाचित, पण ती वडिलांकडे जात राहिली. त्याचा त्रास आम्हाला दोघींना झाला.’’
या सगळ्यामध्ये दोघींची प्रगती सुरूच होती. नयनाचा विम्याच्या क्षेत्रात मिलियन डॉलर राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये सत्कार झाला, तर माधवीनं
‘जे. जे. स्कूल’मधून टेक्स्टाइल डिझायनिंग करून ब्रिटिश कंपनीत उत्तम नोकरी मिळवली. माधवीचं म्हणणं, ‘‘माझ्या आईनं अर्थार्जन, माझं शिक्षण, मित्रमैत्रिणी, नातेसंबंध हे सगळं छान सांभाळलं. माझ्या मैत्रिणी माझा हेवा करतात, कारण की आई सतत तिला स्वत:ला आणि मलाही अनेक अंगांनी वाढवत राहिली. स्वतंत्र आणि कणखर व्यक्ती म्हणून आम्ही एकमेकींचा आदर करतो.’’
दोघींचंही वागणं-बोलणं ऐकल्यावर दोघीही एकमेकींना सांभाळण्याबाबत हळव्या वाटल्या. त्याचा ताण दोघींवर असेल का? एखादी अदृश्य रेषा बोचत असेल?
अर्थातच आहे. दोघींमध्ये संवादाच्या पातळीवर मतभेद किंवा दरी असेल? पण तसं म्हणावं तर माधवी म्हणते, ‘‘मी प्रत्येक गोष्ट आईला मोकळेपणानं सांगते, चर्चा करते हे आईचंच यश आहे.’’ नयनाला वाटतं, हुशारीच्या मानानं ती यश मिळवत नाही, कारण बेशिस्त; तर माधवी म्हणते, ‘‘आईच्या आणि माझ्या यशाच्या कल्पना वेगळ्या!’’
म्हणून तर माधवीनं प्रतिष्ठेची, भरपूर पैशाची नोकरी सोडून फॅशन डिझायनिंगमध्ये आणखी पदविका घेतली आणि ती स्वत:चं बुटिक उघडते आहे, स्वतंत्र राहते आहे. याच काळात २-३ वर्षांत कर्करोगग्रस्त वडिलांची तिनं खूप मनापासून सेवा केली. अलीकडेच वडील वारले तरी सावत्र आई आणि बहिणीशी तिचं नाते टिकून आहे. नयनानं एलआयसी सोडून विम्याचा स्वतंत्र व्यवसाय भरभराटीला आणला आहे. नयना म्हणते, ‘‘माझं आयुष्य मी आनंदाने जगते आहे. माझे छंद, माझे मित्रमैत्रिणी आहेतच, पण माझं एकटेपण मी आनंदानं भटकंती करत घालवते.’’
या मायलेकींच्या नात्यातलं वेगळेपण हेच की, खूप सारा विसंवाद असूनही त्या एकमेकींचा आदर करतात, स्वातंत्र्य जपतात. ‘एकत्र राहाणं नको बाई’ असं म्हणत छोटय़ा छोटय़ा गोष्टी शेअर करतात. एकमेकींना आनंदी ठेवण्यासाठी धडपडतात. तुझं माझं जमेना.. असं म्हणत म्हणत ‘जीवसख्या’ झाल्या आहेत दोघी. एका आईला दुसरं काय हवं असतं?
– वासंती वर्तक