वयाची अठरा वर्षे पूर्ण होताच मध्य प्रदेशात सतना इथल्या श्रीवास्तवांचीच ‘बहू’ झालेल्या मधू लग्नानंतर जवळपास सात-आठ वर्षांनी मुंबईला आल्या आणि ‘दूरदर्शन’मध्ये निर्मिती सहायक म्हणून काम करू लागल्या. पतीनिधनानंतर मुलांना वाढवणं, नोकरीत स्वत:लाही वाढवणं आणि यातून यशाकडे सतत झेपावत राहणं, हे मधूजींनी सातत्याने केलं. त्यामुळेच खासगी जाहिरात कंपन्यांमध्ये मधू श्रीवास्तव म्हणजे ‘मार्केटिंग मास्टर’ असं समीकरण तयार झालं होतं.
आजोबा इतिहासतज्ज्ञ, वडील कायद्याचे अभ्यासक, एका बडय़ा कंपनीत उच्च पदावर, शिक्षण मुंबईच्या एका कॉन्व्हेंटमध्ये! नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये वादस्पर्धा, खेळ, नाटक आणि हो, अभ्यासातही आघाडीवर असणारी मधू नक्की आयएएसला जाणार याची तिच्या वडिलांना खात्रीच होती. आपल्या गोड बोलण्यानं आणि मृदू स्वभावानं आपली मुलगी प्रशासकीय सेवेत, लोकसेवेत उत्तम कामगिरी करेल असं वाटायचं त्यांना.
एका विवाह सोहळ्यात परिचित कुटुंबाकडून मधूला मागणी आली तेव्हाही मधूच्या आई-वडिलांनी शिक्षण पूर्ण करण्याचा आग्रह धरला होता, पण चांगलं ‘स्थळ’ नाकारलं नव्हतं. तेवढय़ात मधूच्या होणाऱ्या सासूबाई आजारी पडल्या आणि त्यांनी लौकरात लौकर हे लग्न उरकण्याचा घोशाच लावला. मधू अठरा वर्षांची झाली आणि लगेच हे लग्न झालं. मुंबई आणि नागपुरातल्या आधुनिक बंगल्यात, नोकर-चाकर आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा राबता असलेल्या श्रीवास्तवांची कन्या, मध्य प्रदेशात सतना इथल्या श्रीवास्तवांचीच ‘बहू’ झाली. माणसं सगळी चांगली, पण सासूबाईंचा आजार आणि गावाकडच्या ‘बहू’कडून असणाऱ्या अपेक्षा या दोन्हीत मधू अडकली. सात नणंदा, दोन दीर, आलं-गेलं.. सारं खटलं अंगावर आलं तिच्या. चुलीवरचा स्वयंपाक, चेहऱ्यावरचा घुंगट, मोठय़ांदा बोलायचं नाही, हसायचं नाही.. अशा आयुष्याची कल्पना मधूच्या आईनंसुद्धा केली नव्हती. पण काय करणार!
सहा-सात वर्षांनी आपल्या इंजिनीअर जावयाला मधूच्या वडिलांनी मुंबईत आणलं. मुंबई ‘दूरदर्शन’जवळच्या ‘सिएट टायर्स’मध्ये अशोक श्रीवास्तव रुजू झाले. दोन मुलांसह मधूनं मुंबईत आपलं घर सजवलं. मुंबईत मधूची भेट नागपूरमधल्या कलाविश्वात भेटलेल्या हरीश भिमाणी यांच्याशी पुन्हा झाली आणि हरीशजी आग्रहानं मधूला हिंदी बातम्यांच्या विभागात निर्मिती सहायक म्हणून घेऊन गेले. १९७७-७८ मध्ये ‘दूरदर्शन’वर चांगलं प्रेझेंटेशन करणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत होत असे. नियमबद्ध आणि कप्पेबंद कारभार नव्हता. आरोग्य कार्यक्रमांचं संचालनही मधू करीत असे.
‘तृष्णा’ नावाच्या दूरदर्शन मालिकेत मधूचा मोठा सहभाग होता.
पण हे सारं.. मुलं शाळेत गेल्यावर जायचं, १२ ते ८ डय़ुटी करायची, असं हौस; हौसेचंच होतं. इथेच मधूला भेटल्या ज्येष्ठ कलाकार सुधा चोपडा. सुधाजी म्हणजे मधूसाठी ‘फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड’ ठरल्या. नेहमीसाठीच. ‘‘दुसऱ्यांना प्रेम आणि आदर देऊन कामं करवून घेण्याची कला मी नकळत सुधाजींकडून शिकले,’’ मधू सांगते. सुधाजींनी प्रेमानं आणि काहीशा दूरदृष्टीनं म्हणू या, मधूला खासगी जाहिरात कंपनीत नेलं आणि मधूचं करिअर तिथे खऱ्या अर्थानं फुललं. ‘दूरदर्शन’चा निर्मितीचा अनुभव तिथे मोलाचा ठरला.
१९८२ मध्ये अशोक श्रीवास्तव यांना हृदयविकारानं गाठलं आणि ८७ मध्ये ते गेले. नेमकी हीच र्वष मधूच्या करिअरच्या दृष्टीनं आणि मुलांच्या शाळांच्या दृष्टीनं मोलाची होती. खूप तणावाचा काळ होता तो. खूप धावपळ व्हायची. मुलांच्या वाढत्या अभ्यासासाठी मधूनं टय़ुशन्स लावल्या. घरात तिच्या आई-वडिलांनी खूप आधार दिला. याच काळात मधूला ‘मैत्री’ हे मूल्य किती रुजवावं लागतं ते कळलं. मालिकांमधल्या मित्रमैत्रिणींनी दिनेश ठाकूर, प्रिया तेंडुलकर रवी वासवानी, करण राजदान या सर्वानी मधूला उभं ठेवलं. सुधा चोपडा आणि राम सहगल यांच्यासारख्या गुरूंकडून मधू खूप शिकली. आपल्या तरुण सहकाऱ्यांचं आयुष्य समृद्ध करणारे हे अधिकारी होते, मधू सांगते.
याच खडतर काळानं मधूमधले कलागुण आणि माणसं जोडण्याची, कामाला लावण्याची शक्ती पुन्हा जागृत केली. राख झटकून निखाऱ्यानं फुलावं तशी खासगी जाहिरात कंपन्यांमध्ये ‘मधूजी श्रीवास्तव म्हणजे मार्केटिंग मास्टर’ असं समीकरण तयार झालं. ‘मालगुडी डेज’, ‘स्वयंसिद्धा’,‘ कबीर’, ‘एक शून्य शून्य’ पासून मधूजींच्या मार्केटिंगमधल्या यशाची कमान चढती राहिली. त्याचवेळेला मधूजींची निर्मिती-दिग्दर्शन असलेल्या ‘हऱ्या नाऱ्या’, ‘कुकरी शो’, ‘साजन सजनी’,‘मुझरिम कौन’ या मालिकाही गाजत होत्या. निर्माता-दूरदर्शन-स्पॉन्सर यांची मोट वळण्याचं अवघड कसब मधूजींना साध्य झालं होतं. देशभर प्रवास होत होता. प्रायोजित मालिकांच्या प्रारंभीच्या काळात या कामाचा कुणालाच अनुभव नव्हता. मधूजींकडे तर मार्केटिंगची पदवी वगैरे नव्हतीच. कलेवरचं प्रेम, निर्मितीचं महत्त्व जाणणं आणि गोड बोलून प्रत्येक अडचणीतून तोडगा काढण्याची मनोमन इच्छा या बळावर मधूजी काम करीत राहिल्या. त्यांनी १०० मालिकांचा आकडा सहज पार केला.
मुलांची शाळा संपेपर्यंत पालक सभा, वेगवेगळ्या शिकवण्या, संगीताचे क्लासेस यांना हजर राहण्यासाठी ‘आई’ म्हणून खूप कसरत करावी लागली. पण मुलं लवकर स्वावलंबी झाली. अभ्यासावरून कधी बोलावं लागलं नाही. मधूजींचा मोठा मुलगा ‘समीर’ सॉफ्टवेअर इंजिनीअर झाला. गिटार उत्तम वाजवतो. आज अमेरिकेत त्याची स्वत:ची कंपनी आहे. पूर्वी एक स्वत:चा ‘हॅझर्ड’ म्हणून रॉक ग्रुप होता. त्या स्पॉन्सरशिपसाठी फिरल्या. समीरही म्युझिक प्रोग्रॅम्ससाठी प्रायोजक शोधत असायचा. आज तो स्वत:च अनेक कार्यक्रम प्रायोजित करतो, कंपनीचा मालक म्हणून, याचा मधूजींना केवढा मोठा अभिमान वाटतो. ‘‘आईनं जे कष्ट केले, जी दिशा दिली ती अगदी योग्यच असणार. नाही तर आम्हाला एवढं यश कसं मिळालं असतं?’’ समीर विचारतो.
धाकटा शिशिर हॉस्पिटॅलिटीमध्ये उच्च शिक्षण घेऊन ‘ताज ग्रुप’मध्ये रुजू झाला, नाव मिळवलं. आज तो ‘फिनिक्स कंपनी’मध्ये व्हाइस प्रेसिडेंट आहे. शिशिरला वाटतं, ‘‘टाइम मॅनेजमेंट, प्लॅनिंग आणि घर तसंच काम यातला समतोल हे मी माझ्या आईकडूनच शिकलो आहे. आहे त्या पोझिशनवरून सतत विकासाच्या दिशेनं झेप घेणं हेही माझ्या आईचंच वैशिष्टय़ं.’’ खरं आहे शिशिरचं.
मधूजींनी मार्केटिंग करणं सोडलं, पण काम नाही सोडलं. रेडिओवरच्या ‘क्लिनिक प्लस’, ‘व्हिक्स’, ‘पँटीन’, ‘सर्फ’, ‘रिन’, ‘एरियल’ आदी अनेक जाहिरातींचं लेखन आणि आवाज देणं यातून मधूजी आपल्याला आजही, जवळजवळ रोजच भेटत असतात. एफएम रेडिओचं नवीन मार्केटही त्यांनी सोडलं नाही. जे काम मिळेल ते उत्तमच करायचं हा त्यांचा ध्यास. त्यासाठी भरपूर कष्ट आणि गोड बोलून माणसं जोडण्याची कला यामुळेच पदरात कोणतीही पदवी नसताना मधूजींनी यश मिळवलं. यशाचे नवे नवे मार्ग चोखाळले. एवढंच नाही तर मुलांनाही ‘जाऊ तिथे यशस्वी होऊ’ हा मूलमंत्र दिला.
यश फक्त व्यावसायिक नसतं, ते कुटुंबापर्यंत झिरपावं लागतं. मनात मुरावं लागतं. तेव्हाच ते अंगी लागतं. यशाचं समाधान माणसाला अधिक नम्र बनवतं. चांगला माणूस म्हणून विकसित करतं. मधूजी आणि मुलांकडे पाहून आपल्याला याची प्रचीती येते.
वासंती वर्तक vasantivartak@gmail.com