भयंकर शारीरिक आणि मानसिक छळाचा आठ वर्षांचा संसार आणि घटस्फोट प्रक्रियेची सात र्वष.. परदेशातला या पंधरा वर्षांचा प्रवास तिच्यासाठी सोप्पा नव्हताच. दहशतीचं सावट आजही आहेच. परंतु मुलांना वाढवताना तिनं कटाक्षानं एक काळजी घेतली. ‘स्त्री’बद्दल आदर बाळगणं आणि तो जरूर तेव्हा व्यक्त करणं’ ही गोष्ट महत्त्वाची आहे हे बिंबवलं. मुलांचं ‘तिच्या’शी असलेलं घट्ट नातं हेच तिचं यश.
पुन्हा एकदा ‘ती’. म्हणजे तिचं नाव – गाव न सांगणं. तिच्या कहाणीतलं सारं सत्य उकलून न ठेवणं. मोडक्या-तोडक्या संसारावर पदर पसरवून हसून साजरं करणं. हे सारं कशासाठी? तर मुलांच्या भावनांसाठी, त्यांना समाजात त्रास होऊ नये म्हणून. असं करणाऱ्या अनेक स्त्रिया आपण बघतोच. पण आज जी कहाणी सांगतेय तिच्यावरचं दहशतीचं सावट मला दुरूनही जाणवत आहे. तिच्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. म्हणून आपण तिला नावच नको देऊ या.
तिला मी पंचवीस-तीस वर्षांपूर्वी तिच्याच लग्नात पाहिलं होतं. गुलाबाची कांती, अस्फुट हसू, अबोल, नम्र अशी ही नाजूक मुलगी. डोळ्यात कितीतरी सुंदर स्वप्न घेऊन इंजिनीअर नवऱ्याबरोबर परदेशात गेली, तिथल्या राहणीमानाशी जुळवून घेतलं. आपणही इंजिनीअर आहोत हे विसरून घरात रमण्याचा प्रयत्न केला. दुकानात, लायब्ररीत तासांवर काम केलं. पण तिला सारखं जाणवायचं ते त्याचं तिला तुच्छ लेखणं, बावळट, मूर्ख म्हणून हिणवणं आणि अनादरानं वागवणं. नवरा रागावला म्हणजे आपलंच काही तरी चुकलं असणार असं मानणाऱ्या पिढीतली नव्हती ती. सुशिक्षित आई-वडिलांनी स्वातंत्र्य देऊन स्वावलंबी बनवलेली मुलगी होती. पण तरीही सुरुवातीची काही र्वष त्याचा तापटपणा आणि वर्चस्व गाजवण्याचा स्वभाव समजून घेण्यात गेली. तोवर पाठोपाठ दोन मुलं झाली होती.
आजही भूतकाळातली ती आठवण सांगताना तिच्या अंगावरचा शहारा लपत नाही. तिची लहान मुलगी सांभाळायला तिच्या सासूबाई परदेशात आल्या होत्या. सोबत मिळाल्यावर तिनं छान नोकरी धरली एका नामांकित कंपनीत. संध्याकाळी घरी परतल्यावर पाहिलं तर क्षुल्लक चुकीवरून नवरा स्वत:च्याच आईला मारहाण करत होता. तिनं मध्ये पडून त्यांना सोडवलं. पण ती खरी हादरली जेव्हा सासूबाईंना यात काही गैर वाटलं नाही तेव्हा. त्या म्हणाल्या, ‘‘त्याचे वडील असेच तापट. खूप मार खाल्ला मी. अपमान गिळला. तेच पाहत हा मोठा झाला. हा तसंच वागणार.’’
लग्नानंतरच्या पहिल्या एक-दोन वर्षांतच तिचे वडील खूप आजारी झाले अन् नंतर वारले. त्या काळात आई-वडिलांना त्रास नको म्हणून ही गप्प राहिली. पण नंतर तिच्या वहिनीला बऱ्याच गोष्टी कळल्यावर वहिनीनं तिला घटस्फोटाचाच सल्ला दिला. तिच्या आजूबाजूचे भारतीय मित्र-मैत्रिणीही हाच आग्रह धरत होते. ‘घटस्फोट’ हा शब्द ऐकल्यावर तो इतका बिथरला की तिचा तर छळ वाढलाच पण तिला मदत करू इच्छिणाऱ्या मित्रमैत्रिणींना, स्वत:च्या मुलांनाही वाटेत गाठून धमक्या द्यायला त्याने सुरुवात केली. हे प्रकार फार वाढल्यावर तिनं वकिलाकडे धाव घेतली. पहिली सुनावणी अयशस्वी ठरली कारण पुरावे नव्हते. पुढे वकिलाच्या सल्ल्याने प्रत्येक गोष्टीचे पुरावे जमवण्याची धडपड करावी लागली. तिची लढाई किती आघाडय़ांवर होती पाहा.. स्वत:ची नोकरी टिकवणं, मुलांच्या शाळा आणि अभ्यास, शाळेच्या वाटेवरची त्यांची सुरक्षा, पुरावे गोळा करणं, वकिलाची फी देणं आणि दबक्या पावलांनी गाठून नवऱ्याकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून स्वत:चं संरक्षण करणं, त्यातही होईल तेवढं मुलांचं कोवळं मन जपणं.. एक ना अनेक. यातली प्रत्येक गोष्ट आपल्या देशात करणं आणि परदेशात करणं यात प्रचंड फरक आहे. परदेशात भारतीयांकडे पहाताना ‘या लोकांमध्ये कौटुंबिक हिंसाचार असतोच त्यात कशाला पडा’ अशी दृष्टी असते. त्याच्या धमक्यांमुळे तिला ३-४ नोकऱ्या बदलाव्या लागल्या. सगळ्यात कसोटी होती मंदीच्या काळात. पण तिनं लव्हाळ्याचं रूप धारण केलं आणि ती तरून गेली.
तिच्याच शब्दात सांगायचं तर ‘या काळात अर्धवेळ समाजसेवी संस्थेत काम केलं आणि स्वत:चं कन्सल्टिंग सुरू केलं. ते इतक्या कमी मोबदल्यात, कमी अपेक्षांत की त्यामुळे बऱ्यापैकी काम मिळालं. वकिलांच्या गलेलठ्ठ मोबदल्याला मी पुरून उरले.’ ती घरातून बाहेर पडली तेव्हा मुलगी पहिलीत आणि मुलगा दोन वर्षांचा होता. त्यांच्या पाळणाघरात, शाळेत त्यांच्या सुरक्षेसाठी कागदपत्रं सादर करावी लागत. सुदैवाने एका न्यायाधीशाने ‘तिचा पती दुभंग व्यक्तिमत्त्वाचा असून मुलांसाठी धोकादायक ठरू शकतो’ असा शेरा दिल्यामुळे तिला ही कागदपत्रं बनवणं सोपं जायचं. त्यानं प्रारंभी मुलांना सुट्टीसाठी भारतात नेण्याची परवानगी मागितली. सुरुवातीला ती मिळाली. तिला पुन्हा न्यायालयात धाव घ्यावी लागली. खूप लढून तिनं ती परवानगी रद्द करून घेतली. संसाराच्या सुरुवातीला गरीब गायीसारखं वागणाऱ्या पत्नीला तिचा भाऊच उचकवतो असं वाटून त्यानं, नव्यानंच परदेशात स्थायिक झालेल्या तिच्या भावाच्या कुटुंबालाही खूप त्रास दिला. तिची हळवी आई त्यामुळे पार खचली. शेवटी तिनं आपली लढाई आपणच लढायची असं ठरवलं. काही मित्रमंडळी मात्र यातही खंबीरपणे पाठीशी उभी राहिली.
आठ वर्षांच्या अथक लढाईतून अखेर घटस्फोट मिळाला. या सगळ्या वर्षांमध्ये ती मुलांना हेच सांगत राहिली, ‘‘तुमचे बाबा व्यसनी नाहीत. त्यांचं काही अफेअर नाही. पण आमचे स्वभाव जुळत नाहीत. म्हणून आम्ही वेगळे राहतो.’’ मुलाला वाढवताना तिनं कटाक्षानं एक काळजी घेतली. ‘स्त्रीबद्दल आदर बाळगणं आणि तो जरूर तेव्हा व्यक्त करणं’ ही गोष्ट महत्त्वाची आहे हे बिंबवलं.
तिच्या पतीनं घटस्फोटाआधीच दुसरं लग्न केलं. त्याची मुलगी हिच्या मुलापेक्षा थोडी लहान. त्यानं मुद्दाम याच मुलांच्या शाळेत घातली. कधी तरी हिच्या मुलानं ‘ती बाई आणि तिची मुलगी मला आवड नाहीत’ असा उल्लेख केल्यावर हिनं आपल्या मुलांना समजावून सांगितलं. कुणाला चूक-बरोबर ठरवणं हे पूर्णत: खरं नसतं हेच त्यांना शिकवलं.
परदेशातले दोन मोठे प्रश्न म्हणजे डेटिंग आणि ड्रग्ज. पण आईची लढाई मुलांनी उघडय़ा डोळ्यांनी पाहिली होती. मुलांचं आईशी नातं फार घट्ट. इतकं की मित्र-मैत्रिणी हेवा करतात. मुलं सल्ल्यासाठी आईकडेच येतात. त्यामुळे मुलांनी आपल्या आईपासून कधीच काही लपवलं नाही. तिनं अनेक गावं बदलली, नोकऱ्या बदलल्या. पतीनं प्रत्येक ठिकाणी तिचा पाठलाग केला. तिनं मुलांना सर्व तऱ्हेच्या प्रश्नोत्तरांसाठी तयार केलं. दप्तर भरताना, युनिफॉर्म घालताना लहानपणापासूनच ती हळूहळू मुलांशी बोलत राहायची. लोकांकडे लक्ष द्यायचं नाही शिकवायची. पण कुणी त्रास दिला तर लोकांची मदत मागायची, गप्प बसायचं नाही हे ही शिकवलं.
आई एकटी कमावते, असं मुलांना वाटू नये म्हणून तिनं जिवापाड काळजी घेतली. प्रत्येक क्लासची, प्रत्येक कलेची फी भरली. मोठी स्वप्नं बघायला शिकवलं मुलांना. ‘‘हजारो डॉलर्स फी भरीन मी, पण आवडीचं उच्च शिक्षण घ्यायचंच.’’ असा तिचा आग्रह. पण मुलं इतकी हुशार.. दोघांनी ‘फुल राइड’ म्हणजे निवासखर्चासकट स्कॉलरशिप मिळवली आहे.
भयंकर शारीरिक आणि मानसिक छळाचा आठ वर्षांचा संसार आणि घटस्फोट प्रक्रियेची सात र्वष.. या पंधरा वर्षांनी तिला उच्च रक्तदाब, नैराश्य, पाठीचं दुखणं अशा भेटी दिल्या. पण या साऱ्यातून तरून जाऊन तिनं बरंच काही मिळवलं. प्रकृतीसाठी तिनं चाळिशीनंतर धावायला सुरुवात केली आणि मॅरेथॉनची विजयीवीर ठरली. आत्मसन्मान मिळवला. आत्मविश्वास बाळगला. स्वत:चा बंगला बांधला. मुलांना उत्तम शिक्षण दिलं. एका बडय़ा कंपनीत ती उच्चाधिकारी आहे. खूप प्रवास करते आणि मुख्य म्हणजे ‘कौटुंबिक हिंसाचारा’विरुद्ध लढणाऱ्या समाजसेवी संस्थेत काम करते. इतरांना आधार देते.
तिचा पती पुन्हा तिच्याच गावात राहायला आला आहे. दहशतीचं सावट अद्याप आहे, पण ते ओलांडून जाऊन ताठपणे उभं राहण्याचं बळ आता तिच्यात आहे. जे फार मौल्यवान आहे.
vasantivartak@gmail.com