अचानक झालेल्या पती निधनाने त्या पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या स्त्रीसाठी सगळंच संपलं होतं, मात्र दार उघडलं ते पतीच्या जागी मिळालेल्या नोकरीच्या संधीने. ती नोकरी करण्याच्या एका निर्णयाने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या जगण्याची दिशाच बदलली. त्याने जयश्रीताईंना इतकं कणखर, इतकं उदार बनवलं की त्यांनी संपूर्ण समाजच आता आपला मानला आहे. म्हणूनच अकोल्याच्या गुजराती समाजात जयश्रीताई पंडय़ा हे नाव आदरानं घेतलं जातं.
नवरात्रीचा सोहळा नुकताच संपला आहे. अजूनही वातावरणात स्त्रीशक्तीचा जागर आणि कौतुकाचे स्वर भरून राहिले आहेत. देवीची स्तोत्रं आणि त्याचे समकालीन अर्थ – अन्वय मनात गुंजत राहिले आहेत. सामान्यांमधलं असामान्यत्व शोधण्याचीसुद्धा एक परंपराच बनू लागली आहे. त्या परंपरेतूनच मीही सहजपणे या महिन्यासाठी एक साधीसुधी (?) गृहिणी मैत्रीण निवडली, जयश्री पंडय़ा.
जयश्रीताईंशी बोलल्यापासून माझ्या मनाला एक प्रश्न सारखा सतावतो आहे. एक निर्णय- अवघा एक निर्णय आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो? केवळ पुढे जाणं नव्हे तर विकासाचा प्रशस्त मार्गच कवेत घेऊ शकतो? आणि असा निर्णय घेण्याची प्रेरणा कुठून येते? कसं जमतं हे धाडस? की ते स्वभावातच असतं, आणि परिस्थितीची आच लागल्यावर त्याला अंकुर फुटतात? बरं नुसते अंकुर फुटून थांबता येत नाही. त्या रोपटय़ाचा वृक्ष होऊन अनेकींचा आधार बनू शकतो? कशी घडते ही किमया? अवघ्या एका निर्णयाने?
जयश्रीताईंची कहाणी तशी साधीसुधीच आहे. त्यांचं माहेर म्हणजे भोरच्या बालाजी मंदिराचे पुजारी घराणं. मोठं एकत्र कुटुंब. त्या पाच बहिणी आणि एक भाऊ. मुली जास्त असल्यामुळे मॅट्रिक झाल्याबरोबर वडिलांनी सगळ्यांची लग्नं लावून दिली. जयश्रीताई अकोल्याला पंडय़ांच्या सूनबाई झाल्या. त्यांचे सासरे बँकेत होते आणि पती दीपक पंडय़ाही पदवीधर होऊन नुकतेच बँकेत लागले होते. नोकरी बदलीची होती.
अकोल्याला आल्याबरोबर जयश्रीताईंना जाणवलं की घराची जबाबदारी पूर्णपणे त्यांच्यावरच पडणार आहे. दीर-नणंद होते. पण सासूबाई बऱ्याचदा आजारी असायच्या. सासरे त्यांना खूप जपायचे. पण दुर्दैवाने वर्षभरातच सासऱ्यांचं निधन झालं. त्यानंतर दीपक यांनी आपल्या तिसऱ्या बहिणीचं लग्न करून दिलं. नणंदेच्या लग्नानंतर सगळी जबाबदारी एकटय़ा जयश्रीताईंवर पडली. अकोल्याच्या जवळची शाखा मिळाली तर दीपक शनिवार-रविवार यायचे. बाकी जयश्री खंबीर आहे, सेवावृत्तीची आहे, खूप करते असं म्हटलं की विषय संपायचा.
सासरे वारल्यानंतर वर्षभरातच जयश्रीताईंना मुलगा झाला आणि त्या घरात पूर्णपणे गुरफटल्या. दिरांनी विवाह केला नाही. त्यांची सोबत होती. पण आधार नव्हता. ते स्वभावानं हळवे आणि जबाबदारीचं दडपण घेणारे आहेत. मुलगा झाल्यानंतर जयश्रीताईंनीच पुढाकार घेऊन, दीपकजींच्या मागे लागून, बँकेचं कर्ज मिळतंय तर घ्या म्हणून गावाबाहेर स्वत:चा बंगला बांधला. पण त्या बंगल्यात राहायला गेल्यावर तीन-चार वर्षांतच दीपक यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं अचानक निधन झालं. पती गेले तेव्हा मोठा मुलगा संदीप दहावीत आणि धाकटा गौतम पाचवीत होता. जयश्रीताई घरातून बाहेर पडायच्या त्या फक्त बाजारहाट, डॉक्टर आणि महिला मंडळापुरत्याच. बाकी बाहेरचं जग फारसं अनुभवलं नव्हतं. दीपकजी एकटे कमावणारे अणि घरात माणसं सहा. त्यामुळे शिल्लकही फारशी नव्हती. ढगफुटीसारख्या अवचित कोसळलेल्या या प्रसंगी दु:ख करायचं की भविष्याची काळजी करायची.. काही सुचणं शक्यच नव्हतं.
अशा वेळी अनुकंपा तत्त्वावर बँकेत पत्नीला किंवा मुलाला नोकरी देईल असा प्रस्ताव आला. जयश्रीताई फक्त मॅट्रिक आणि मुलगा पंधरा वर्षांचा. तो सज्ञान होईपर्यंत बँक त्याचा ‘क्लेम’ ठेवायला तयार होती. पण तोपर्यंत घर कसं चालणार हा प्रश्न होता. जयश्रीताईंसारख्या मध्यमवयीन गृहिणीला नोकरी जमेल, असं कुणीच म्हणत नव्हतं.
जयश्रीताईंची धाकटी बहीण ज्योती त्यांच्या चुलत दिराला दिली होती. ज्योती आणि गिरीशनं दूरचा विचार केला. उद्या मुलगा शिकून नोकरी करेलच. पण जयश्रीताईंना कोण संधी देईल? त्या स्वत: कमावत्या होणं, स्वावलंबी होणं अधिक गरजेचं आहे हे हेरून त्यांनी जयश्रीताईंचं मन वळवलं. ‘‘तू महिला मंडळात भाषण करतेस, उत्तम निबंध लिहितेस मग बँकेचं कामही शिकशील.’’ असा धीर दिला आणि महिन्याभरातच जयश्रीताईंनी ही नोकरी स्वीकारली.
‘मुलाचं कल्याण करायचं का स्वत: पुरतं बघायचं’ अशी टीकाही त्यांच्यावर झाली. पण आपलं दु:ख बाजूला सारून हे नवं आव्हान जयश्रीताईंनी स्वीकारलं. बुजरेपण होतं, पण लाज न बाळगता अगदी शिपायाकडूनसुद्धा त्या अनेक गोष्टी शिकल्या. पतीच्या सहकाऱ्यांनी खूप सांभाळून घेतलं. बँकेनं प्रशिक्षणाला पाठवलं. वर्षभरातच जयश्रीताई पहाटे घरकाम, दिवसभर नोकरी, रात्री मुलांकडे अणि सासूबाईंकडे विशेष लक्ष देणं अशा दिनक्रमात रुळल्या. बँकेतील नोकरी स्वीकारण्याच्या निर्णयानं त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या जगण्याची दिशाच बदलली. दैनंदिन कर्तव्यांच्या पलीकडे जाऊन स्व-विकासाचं ध्येय या टप्प्यावर जयश्रीताईंना खुणावू लागलं.
त्यांचे बँकेतले वरिष्ठ, खूप उत्तेजन देणारे, नव्या गोष्टी शिकवणारे होते. त्यांच्या पत्नी शिक्षिका. त्यांनी जयश्रीताईंना पटवून दिलं की क्लर्कच्या पगारात मुलांचं शिक्षण अवघड आहे. तेव्हा जयश्रीताईंनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी मिळवण्याचं ठरवलं. यात त्यांना भाचीनं, ज्योतीच्या मुलीनं मदत केली आणि मोठय़ा, मुलाच्या, संदीपच्या लग्नाच्या वेळी जयश्रीताई पदवीधर झाल्या. हे शिक्षण चालू असतानाच सासूबाईंना सात फ्रॅक्चर्स झाली. कर्करोग झाला. भरपूर सेवा केली. पण परीक्षेतलं यश हा सासूबाईंचा आशीर्वाद असंच जयश्रीताई मानतात.
त्यांचा मोठा मुलगा संदीप सांगतो, ‘‘आईला ‘नाही’ हा शब्द माहीतच नाही. कितीही अडचण असली किंवा कितीही काम असलं तरी ती होईल, करू या, केलं म्हणजे होतं असंच म्हणते.’’ जयश्रीताईंना वाटतं घरातले सततचे ताणतणाव आणि आईची धावपळ बघून संदीपचं बालपण कोमेजलं. तो अतिशय हळवा आणि बुजरा झाला. तरीही आज एका खासगी कंपनीत संदीप अधिकारपदावर आहे आणि औरंगाबादला स्वत:च्या घरात राहातआहे, याचं त्यांना समाधान वाटतं. जयश्रीताईंनी बँकेतली नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि पुढच्याच वर्षी अनुकंपा तत्त्वावरची भरती बंद झाली. त्यांचा निर्णय योग्य वेळी, अचूक ठरला. नाही तर मुलाची संधी गेलीच असती आणि त्याच्यासाठी जयश्रीताईंचा त्यागही वाया गेला असता.
जयश्रीताईंच्या नोकरीमुळे धाकटा गौतम जास्त करून चुलत सासऱ्यांकडे वाढला. त्या जोडप्यानं जयश्रीताईंनाही खूप पाठिंबा दिला. गुजराती ब्रह्मसमाज महिला मंडळाच्या कामात गुंतवलं. ज्योती आणि गिरीशकाकांमुळे गौतम एकदम धीट आणि स्वावलंबी झाला. त्याचे वडील वारले तेव्हा घरातली ज्येष्ठ नातेवाईक मंडळी ‘‘आता कसं होणार’’ असं म्हणताना ऐकून हा ९ वर्षांचा मुलगा म्हणाला, ‘‘अजून माझी आई आहे ना, ती करेल आम्हाला खूप मोठं.’’ असं बोलून गेला. त्याचे हे शब्द जयश्रीताईंनी सार्थ ठरवले. भरपूर फी भरून त्यांनी गौतमला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण दिलं. आज तो औरंगाबादच्या ‘ताज’ हॉटेलमध्ये अधिकारी आहे.
बँकेच्या नोकरीनं जयश्रीताईंचा वेळ बांधला गेला, त्यातूनही त्यांनी समाजकार्य चालूच ठेवलं. घरात गुंतणाऱ्या स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. प्रशिक्षणवर्ग आयोजित केले. मुलांसाठी-वृद्धांसाठी स्पर्धा, आरोग्य शिबिरांपासून ते समूहयज्ञ आणि मुंजींपर्यंत अनेक धार्मिक महोत्सव केले. संघटनेचं बळ वाढवलं. अकोल्याच्या गुजराती समाजात जयश्रीताई पंडय़ा हे नाव आदरानं घेतलं जातं.
जयश्रीताईंची मुलं औरंगाबादेत स्थिरावली. त्यांनीही ‘दूर पडतं’ म्हणून बंगला विकून अकोला शहरात फ्लॅट घेतला. पण मनानं हळव्या आणि एकटय़ा दिराची जबाबदारी आपलीच मानून त्या निवृत्तीनंतरही अकोल्यातच राहिल्या. त्या म्हणतात, ‘‘कधी कधी वाटतं, पतीचा सहवास नाही मिळाला. माझं लग्न त्यांच्याशी झालं पण संसार मी पूर्ण कुटुंबाचा केला. मनापासून केला.’’
परंतु एक नोकरी स्वीकारण्याच्या निर्णयानं जयश्रीताईंना इतकं कणखर, इतकं उदार बनवलं की त्यांनी संपूर्ण समाजच आता आपला मानला. पंडय़ा कुटुंबाची जबाबदारी संपली की त्या समाजाचा संसारगाडा ओढतच राहतील. हेच तर त्यांचं वेगळेपण आहे.
vasantivartak@gmail.com