या सदरलेखनाच्या प्रवासात वाचकांनी भरभरून साथ दिली. प्रेमानं मतभेद नोंदवले. अगदी एकच बाजू पाहून दोषही दिला. हे सारंच माणूस म्हणून मला समृद्ध करणारं होतं. केवळ मलाच नव्हे तर ज्यांची कहाणी मी लिहिली त्या स्त्रियांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही चतुरंगविषयी अनेक वेळा कृतज्ञता व्यक्त केली. या प्रवासातला सर्वात विलोभनीय क्षण म्हणजे, ऋ चा कुलकर्णीची दत्तक मुलगी श्रद्धा हिनं लेख वाचल्यावर म्हटलं, ‘तुमच्या शब्दांच्या प्रकाशात मला माझी आई वेगळीच दिसली. इतके दिवस ती आवडायची. पण आता आदर आणि विश्वास वाढला.

एकल पालकत्व म्हणजे अनेक शक्तींचा कस पाहणारी जबाबदारी. वेगवेगळ्या कारणांनी एकाकी झालेल्या, वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक स्तरातल्या, अर्थार्जनासाठी वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचा शोध मी या निमित्तानं घेतला. प्रत्येकीचा सामथ्र्यबिंदू आणि हळवे कोपरे आपल्याला सापडू शकतात का हे पाहिलं आणि जे हाती आलं ते माझ्या कुवतीनुसार शब्दांत पकडण्याचा प्रयत्न केला. या प्रवासात वाचकांनी भरभरून साथ दिली. प्रेमानं मतभेद नोंदवले. अगदी एकच बाजू पाहून दोषही दिला. हे सारंच माणूस म्हणून मला समृद्ध करणारंच होतं. केवळ मलाच नव्हे तर ज्यांची कहाणी मी लिहिली त्या स्त्रियांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही ‘चतुरंग’विषयी अनेक वेळा कृतज्ञता व्यक्त केली. या प्रवासातला सर्वात विलोभनीय क्षण आधीच सांगते.

ऋ चा कुलकर्णीची दत्तक मुलगी श्रद्धा हिनं लेख वाचल्यावर म्हटलं, ‘तुमच्या शब्दांच्या प्रकाशात मला माझी आई वेगळीच दिसली. इतके दिवस ती आवडायची. पण आता आदर आणि विश्वास वाढला.’

पहिला लेख सैन्याधिकाऱ्याची पत्नी ललिता देव हिच्यावर आला आणि दिवसभर ‘छान-छान’ असे फोन घेताना मला रडूच यायला लागलं. वाटलं, आपण दुसऱ्याचं दु:ख रंगवून सांगून लेखिका बनू पाहतोय की काय? पण लौकरच प्रत्येक कहाणीतलं सामथ्र्य शोधून सकारात्मक पैलू शोधण्याइतपत संयम मी मिळवला आणि लेखनप्रवास पुढे चालू राहिला. या सुमारे पंचवीस कहाण्यांसाठी मी अनेक स्त्रियांशी बोलले. भावनेच्या भरात बोलायचं पण नंतर छापायला नकार द्यायचा असं पुष्कळ वेळा झालं. पण ते नैसर्गिकच होतं. नंतर नंतर मीच आपणहून मुलींचीही संमती आधीच घ्यायला सुरुवात केली. पूर्वीचे लेख दाखवायचे.

आपला दृष्टिकोन समजावून द्यायचा आणि कहाणी टिपून घेतानाही काय छापायचं नाही ते स्पष्ट करून घ्यायचं. काही उल्लेख सूचक ठेवायचे तर काही प्रसंग गाळून टाकायचे. असं करत करत सर्वाना संमत कहाणी तयार झाली की मग संपादकांकडे पाठवून द्यायची. अनेक स्त्रियांनी ‘मी न सांगितलेलंही तुम्ही ओळखलं’ अशी कबुली दिली तिथे मैत्रीचा धागाच जुळायचा. अशा रीतीनं आता मला पंचवीस नवी कुटुंबं मिळाली. पूर्ण कुटुंबाच्या भावनांना जपण्याचा प्रयत्न मी करत राहिले. ती धडपड पोचली आणि आमचे बंध जुळले.

असेच बंध वाचकांशीही जुळले. तीन पिढय़ांचं पालकत्व करणाऱ्या ‘कुसुमताई’ वाचकांना खूप आवडल्या. आठ मुली आणि एक मुलगा वाढवणाऱ्या सलिना शेखला वाचकांनी मनोमन सलाम केला. कॉपरेरेट कंपनीची मालकीण वंदनाचं कौतुक करणारे  खूप ईमेल्स आले.

अकोल्याच्या जयश्री पंडय़ावर लेख आल्यावर त्यांच्या शाळेतल्या मित्राने फोन मागितला आणि अनेक वर्षांनी ही मित्रमंडळी पुन्हा भेटली.

सगळ्यात कठीण लेखन वाटलं ते घटस्फोटित कुटुंबाबद्दल. नयना, शैलजा यांच्या मुलींनी किशोरवयीनपासून द्विधा मन:स्थिती अनुभवली. आईची ओढ आणि बाबांच्या घरच्यांची सवय किंवा प्रेम या कात्रीत सापडलेल्या या मुलींच्या भावना दुखावू नयेत म्हणून काळजी घ्यावी लागली, पण आता मुली आईला किती जपतात तेही बघायला मिळालं.

व्यसनामुळे संसार तुटलेल्या दोन कहाण्या मी मुद्दाम निवडल्या. पहिल्या कहाणीत स्त्रीचं मातृरूप प्रभावी होतं तर दुसरीत पत्नीरूप. व्यसनी नवऱ्याची मारहाण असहय़ होऊन प्रफुल्लाताईंनी मुलांसाठी घर सोडलं आणि मुक्तांगणमध्ये काम करून अनेक कुटुंबांना आधार दिला. तर व्यसन हा मानसिक आजार आहे असं म्हणत ज्युली डी’मेलो यांनी आयुष्यभर नवऱ्याला रुग्णाप्रमाणे सांभाळलं. त्याचबरोबर स्वत:चा विकास करत उत्कृष्ट शिक्षकाचं राष्ट्रपती पदक मिळवलं. स्त्रियांसाठी अनेक आघाडय़ांवर काम उभं केलं.

चार लेख निनावी नायिकांवर होते. हा निर्णय घेतला त्यांच्या मुलांच्या संसारात काही वादळं उठू नयेत म्हणून. स्त्रीबीज दान करून संसार चालवणारी गंगा, देवदासी दुर्गा, दहशतीच्या सावटाखाली परदेशात वावरणारी ‘ती’ आणि ‘मानिनी आजीबाय’! यातला मुद्दा समजून न घेता एक विचित्र प्रतिक्रिया आली, ‘काय, या आठवडय़ाला कुणी खरी भेटली नाही वाटतं, काल्पनिक पाटय़ा टाकल्या.’ पण ती काल्पनिक वाटावी इतकं त्यांचं आयुष्य जिवंत होतं. तर ‘मानिनी आजीबाय’नं संसार मोडून मुलांचं नुकसान करण्याऐवजी संसार सांधायचा प्रयत्न करायला हवा, त्यांचं कौतुक कसलं करता?’ अशीही प्रतिक्रिया आली.

सर्वात सकारात्मक प्रतिक्रिया म्हणजे आर्थिक मदतीची. आपल्याच आयुष्याचं वर्णन ‘गोंधळ’ असं करणाऱ्या मालनबाईंच्या आजारी नातवासाठी अनेक  जणांकडून आर्थिक मदत आली. अमरावतीच्या एका प्राथमिक शिक्षकानं आपला पूर्ण एक महिन्याचा पगार मालनबाईंच्या खात्यात जमा केला. याउलट घरकाम करणाऱ्या गीताच्या दोन्ही मुलांचं कॉलेज शिक्षण करण्याची जबाबदारी घेण्याची इच्छा आजोबांनी कल्याणहून व्यक्त केली. गीतानं नम्रपणे नकार दिला. ‘मुलगा नोकरी करायची म्हणतोय, उगाच कशाला त्यांचे पैसे घेऊ?’ तिचा हा प्रामाणिकपणा मनाला स्पर्शून गेला.

संसारात रमलेल्या आणि नवऱ्याच्या आर्थिक-मानसिक गुंतवणुकीनंतर खचलेल्या ‘जुईनं आम्हा तरुण मुलींना सावधगिरीची दिशा दाखवलीय.’ अशी प्रतिक्रिया एका लग्नाळू मुलीनं दिली. ‘एवढं सोसूनही जुईच्या चेहऱ्यावरचं हास्य किती लोभस राहिलं,’ अशा भावना अनेकांनी भेटीत व्यक्त केल्या.

पांढरपेशा वर्तुळाबाहेर पडून मी जे प्रयत्न केले तेही वाचकांना आवडले. पण ‘‘शकुंतलाबाई नगरकरांच्या संघर्षांला तुम्ही पूर्ण न्याय दिला नाहीत. लेखिका म्हणून तुम्ही स्वत:ला बंधनात ठेवणं चूक आहे. तो संघर्ष आम्हाला वाचायचा आहे.’’ ही प्रतिक्रियाही योग्य होती. मात्र इथे हाडामांसाची सजीव पात्रं आहेत. त्यांचं मानसिक स्वास्थ्य जपावं म्हणून मी लेखिका कमी पडली’ हा आरोप आनंदानंच स्वीकारला.

सलिना शेखच्या मुलीनं अपरात्री अस्वस्थ होऊन मला फोनवर विचारलं होतं, ‘हे छापून तुम्हाला नाव मिळेल, आम्हाला काय मिळणार?’ मी तिला सांगितलं होतं, ‘विफलतेच्या वाटेवर चालताना विकल होऊन कोसळणाऱ्या कुणाला पुढे चालण्याची उमेद मिळेल. अंधाऱ्या निराशेत एखादी आशेची ठिणगी चमकेल आणि प्रगतीचा मार्ग दिसू लागेल’ बस्स एवढंच. तिचं समाधान झालं असावं.

मला एका तरुण विधुर बापाचा ईमेल मिळाला. ‘हे सगळं मी मनापासून वाचतो आणि वाटतं की त्यांच्यातली आई जर अनेक भूमिका करते तर मी स्वैंपाक का करू नये. मी प्रेमळ आई का होऊ नये? धुणं का धुवू नये?’

बस्स. माझं मन समाधानानं भरून आलं. सकारात्मक ऊर्जेची पणती लावताना सारा आसमंत उजळून जावा हीच तर इच्छा असते. अशा प्रकाशशलाकांना मी शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकीच्या लढाईचे काही अंश माझ्यात झिरपत राहिले. माझ्या मनाची ताकद वाढली.

या कथा म्हणजे मानसिक जीवनसत्त्व आहेत. त्या निराशेच्या व्हायरसला आणि पराभवाच्या आजाराला दूर ठेवतील. सदर संपत असलं तरी ज्यांना या कहाण्या आवडल्या होत्या. अशा वाचकांनी अशा प्रकाशशलाकांच्या शोधात राहावं. त्यांच्याविषयी आस्था-कौतुक ठेवावं मनात. हेच या लेखमालेचं फलित असेल.

सदर समाप्त

 

वासंती वर्तक

vasantivartak@gmail.com