कुठल्याही ‘सोळाव्या वरीसाची’ कहाणी आणि पुढचा प्रवास असतो तसंच शैलजाचं आयुष्य! त्यावर मात करत तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं, समुपदेशक म्हणून कार्य करायला सुरुवात केली. आता तिचं स्वप्न आहे ते अनाथ, निराधार, अपंग, आजाऱ्यांसाठी प्रेमळ निवारा उभारण्याचं. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. स्त्रीशक्तीच्या जागराचा प्रारंभ! आलेल्या संकटानं गांगरून न जाता पालकत्वाची जबाबदारी पार पाडतानाच स्वत:ची ताकद वाढवत नेऊन सामथ्र्यशाली बनण्याचं उदाहरण आपल्याला शैलजा निजपच्या रूपात दिसतं आहे.
मुंबईतल्या एका नामांकित सार्वजनिक रुग्णालयाची अनेक दालनं ओलांडत मी पुढे चालले होते. नावं वाचत आणि दरवाजातून आत डोकावत डोकावत. अचानक एका दालनाचा काचेरी दरवाजा उघडला तर आतून थंड हवेचा झोत आला. आतलं दृश्य एकदम आकर्षक होतं. खूप रंगीबेरंगी खेळणी, छोटीशी घसरगुंडी, बसायला मऊ जाड लाल लाल जाजम आणि त्यावर छोटी छोटी मुलं खेळत होती. कोणत्याही बालवाडीतलं दृश्य असंच तर असतं. मुलं खुशीत खेळत असतात. त्यांच्या प्रसन्न कलकलाटानं मन आनंदित होतं. इथेही मुलं हसत होती. पण चेहरे काळवंडलेले, डोळे ओढलेले. उत्साहात मात्र कणभरही कमतरता नाही. हसरी मुलं फक्त त्यांचं तेज एचआयव्ही किंवा थॅलसेमियानं झाकोळलेलं.
समोर काचेच्या छोटय़ा छोटय़ा केबिन्स. ४-५ जण समुपदेशक, त्यांच्यासमोर एकेक पालक बसलेला. त्यातल्या एकीनं मला पाहून हात केला. ‘पाचच मिनिटं थांबा’ अशी खूण केली. हीच असणार आपली शैलजा. मी तिची वाट पाहात थांबले. काचेतून मला दिसत होतं, समोरच्या पालक स्त्रीला काहीतरी पटवून सांगायचा शैलजाचा आटापिटा चालू होता. ती आर्जवं करत होती, थोडी रागावतही होती. पण शांतपणे, संथपणे. त्या स्त्रीला निरोप देऊन शैलजानं मला आत बोलावलं. शैलजा या वॉर्डमध्ये असणाऱ्या लहान मुलांच्या पालकांची समुपदेशक होती. आरोग्य – आहारापासून ते पालकांना मानसिकदृष्टय़ा उभं ठेवण्यासाठी तिची टीम धडपडत असते. ‘‘अवघड आहे गं तुझं काम’’ मी कौतुकानं म्हटलं. शैलजा सहज म्हणली, ‘‘त्या स्त्रीला आम्ही आत्महत्येपासून मागे ओढलंय.’’ हे सांगून ती एकदम हसायला लागली. माझ्या चेहऱ्यावरचा विस्मय पाहून म्हणाली, ‘‘तुम्हाला खरं नाही वाटणार, पण मी स्वत: दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.. आज इतरांना वाचवतेय. हे सारं योग्य त्या शिक्षणामुळे बरं.’’
कुठल्याही ‘सोळाव्या वरीसाची’ कहाणी आणि पुढचा प्रवास असतो तसंच शैलजाचं आयुष्य! सोळाव्या वर्षी रिक्षावाल्याच्या प्रेमात पडली. अठरावं संपलं त्याच दिवशी पळून जाऊन लग्न, वर्षांच्या आत मुलगी, नंतर एकदोन गर्भपात, लगेच दुसरा मुलगा. नंतर धुणं, भांडी, भजी विकणं, मुलं सांभाळणं..कष्ट..कष्ट..कष्टच!
शैलजा म्हणते, माणसं वाईट नव्हती. सासू- सासरे आणि नणंदेनंही खूप सांभाळून घेतलं. पण मध्यमवर्गीय सुखवस्तू मुलीसाठी ते जगणं अवघडच होतं. एका खोलीत नऊ माणसं, नवरा कामचुकार. त्यामुळे शैलजा एकदम कष्टकरी आयुष्यात ढकलली गेली. परिस्थिती परीक्षा बघत होती. त्यातही टिकून होती तिची शिकण्याची इच्छा. नवऱ्याच्या मागे तगादा लावायची. त्याच्यासाठी ती नोकरी शोधायची. आहे यापेक्षा वर जाऊया या तिच्या हट्टामुळे नवरा चिडायचा. शैलजा म्हणते, ‘‘आता उमजतं, शिक्षण नव्हतं त्यामुळे अहंकार हेच त्याचं एकमेव शस्त्र, आणि बायको म्हणजे पायातली वहाण हाच विचार.’’
शैलजाला तिच्या वडिलांच्या मित्राने आपल्या इस्टेट एजंटच्या ऑफिसमध्ये नोकरी दिली. या नाना सरमळकर यांच्यामुळे शैलजा आणि मुलांचे ग्रह पालटले. नानांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारे शैलजाचं शिक्षण चालू ठेवलं. पुढे नोकरी सांभाळून ती बी. ए. झाली. अक्षता कुलकर्णी या बाईंमुळे आणि पार्ले महिला संघातल्या क्लासेसच्या शैक्षणिक वातावरणामुळे शैलजा मानसशास्त्रात
एम. ए. झाली आणि कोर्स करून समुपदेशक बनली.
लग्नानंतर पंधरा र्वष मुलांबरोबर आईही शिकत होती. घरकाम, आजारी सासऱ्यांची सेवा, नानांकडची नोकरी, संध्याकाळी स्वत:चे क्लासेस आणि रात्री मुलांचा अभ्यास. या दिनक्रमात नवऱ्याला काही स्थानच नव्हतं. त्यानं राग राग करणं, संशय घेणं, नोकरीच्या ठिकाणी जाऊन त्रास देणं, सर्व काही केलं. अखेर कंटाळून शैलजानं मुलांसह घर सोडलं. तिचा मुलगा तन्मय त्या वेळी चौथी- पाचवीत होता. शैलजा मुलांना भाईंदरहून पाल्र्याला घेऊन यायची, त्यांना शाळेत सोडून ऑफिसला जायची. ‘‘वह्य़ा – पुस्तकं- डबा..आईनं आम्हाला काही कमी पडू दिलं नाही.’’ अधिक उणं तेव्हा नाना आजोबा बघायचे. मुलांना छत्री- रेनकोट, औषध- पाणी वेळप्रसंगी तेच करायचे. तन्मय सांगतो.
शैलजाला वाटतं की मुलांना सचोटीनं कष्ट करणं आणि शिक्षणाचं ध्येय ठेवणं एवढंच देणं माझ्या हातात होतं आणि मी ते दिलं. शैलजा घरातून बाहेर पडल्यावर नवऱ्यानं दुसरं लग्न तर केलंच, पण नांदायला येत नाही म्हणून हिलाही न्यायालयात खेचलं. मुलीला घेऊन तिथे जावं लागायचं हे शैलजाच्या जिव्हारी लागलं. पण मुलीनं या सगळ्यात फार समजूतदारपणा दाखवला. नंतर तिचा पती दुसऱ्या बायकोला घेऊन दूर निघून गेला.
तन्वीनं, शैलजाच्या मुलीनं स्वत:च्या आजी आणि आत्याशी बोलून आईला पुन्हा सन्मानानं सासरच्या घरात नेलं. एकच खोली पण शैलजा आणि मुलांना हक्काचं छप्पर मिळालं. शैलजा- सासू आणि मुलं आनंदानं एकत्र राहिले. मागच्याच महिन्यात तिच्या सासूबाई वारल्या. पलीकडेच राहणाऱ्या नणंदेनं या कुटुंबाला नेहमी आधार दिला. या सगळ्यात प्रकर्षांनं जाणवलं की शैलजानं मुलांना फक्त पुस्तकी प्रशिक्षण नाही दिलं. तन्वीनं घरातले प्रश्न फार तीव्रतेनं अनुभवले. एवढंच नाही तर तिच्या परीनं सोडवलेही. नानांचा आणि स्वत:च्या आत्याचा आधार घट्ट पकडून ही माय-लेकरं शैक्षणिक प्रगती करत राहिली.
मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेतर्फे विशेष प्रशिक्षण घेऊन शैलजा समुपदेशक बनली. स्वत: केलेल्या एका चुकीचे परिणाम तिनं पुढचं आयुष्यभर भोगले. लग्नगाठीनं तिचं जीवनच बदलून गेलं. तसंच अनेक एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांचंही असतं. कधीतरी अजाणता केलेल्या चुकांची शिक्षा ती माणसं..त्यांची मुलं..पूर्ण कुटुंब भोगत असतं. भूत-वर्तमान आणि भविष्याचा प्रत्येक क्षण कसा जोडलेला असतो याचा तो विदारक अनुभव असतो. इथे यू टर्न नसतो. सुधारायची संधी किंवा करुणामय क्षमाही नसते. अशा लोकांना आधार देऊन उभं करणं, वास्तवाचा स्वीकार करून मुलांना अधिकाधिक नॉर्मल आयुष्य देणं यासाठी हे समुपदेशन फार महत्त्वाचं. शैलजा तर आता टेलिमेडिसिन विभागात, डॉक्टरांनी औषधं सांगितली की त्यानंतर खेडय़ापाडय़ातल्या रुग्णांशीही दूरस्थ संवाद साधते.
शैलजाच्या मुलीनं तन्वीनं एकदा आपल्या महाविद्यालयातल्या मित्रमैत्रिणींना आईचं काम बघायचं होतं म्हणून तिच्या रुग्णालयात नेलं. ती म्हणाली, ‘‘त्यांच्या डोळ्यात मला पुन्हा एकदा कळलं की माझी आई किती ग्रेट आहे. ती फक्त नोकरी नाही करत, तर ती दुसऱ्यांच्या उपयोगी पडते हे त्या मुलांनाही जाणवलं.’’
शिक्षणाची आईची ओढ मुलांपर्यंत नेमकी पोचलीय. तन्वी बारावी झाली तेव्हा तिनं आपणहून बँकेत एक तात्पुरती नोकरी धरली, आईचं एम. ए. पूर्ण व्हावं म्हणून. आई एम. ए. झाल्यानंतर तन्वीनं बी. ए.पर्यंत शिक्षण पूर्ण करून आता ती स्पर्धात्मक परीक्षांना बसते आहे. काही काळापुरती आई- मुलीच्या नात्यातली ही अदलाबदली किती विलोभनीय आहे.
आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. स्त्रीशक्तीच्या जागराचा प्रारंभ! मुलांसाठी प्रत्येक आई धडपडतच असते. पण आलेल्या संकटानं गांगरून न जाता पालकत्वाची जबाबदारी पार पाडतानाच स्वत:ची ताकद वाढवत नेऊन सामथ्र्यशाली बनण्याचं उदाहरण आपल्याला शैलजाच्या रूपात दिसतं आहे. अकरावी ते एम. ए. एवढय़ावरच शैलजा थांबणार नाही. तिला तिचं स्वप्न विचारलं.. ते आहे अनाथ, निराधार अपंग आजाऱ्यांसाठी प्रेमळ निवारा उभारण्याचं. तिला असा एक सुसज्ज आश्रम उभारायचा आहे. संहारक किंवा लढाऊ शक्तीचं हे सर्जक आणि करुणामयी दर्शन आहे. शैलजाच्या स्वप्नाच्या रूपानं आपल्याला घडलेलं!