पारुल आणि जयराम दोघंही ठाणे महानगरपालिकेत सफाई कामगार. जयराम वारला तेव्हा तीनही मुलं लहान होती. त्यातली नीता आणि योगेश मूकबधिर. या मुलांच्या नि:शब्द जगात अनुभवाची शक्ती ओतण्याचा पारुलचा आटापिटा आहे. मुलांना कणखरपणे उभं करणं तिचं ध्येय आहे. मूकबधिर आईला समजून घेतल्यानंतर आता मुलाचं शब्दांपलीकडचं जग पारुल समजून घेते आहे..
ठाण्याच्या ज्ञानेश्वरनगर या गजबजलेल्या बैठय़ा घरांच्या वस्तीत, छोटय़ाशा पायवाटेवरून मी पारुलबेनचं घर शोधत शोधत पोचले. जरा वाकूनच घरात प्रवेश केला आणि पारुलबेनला हाक मारली. स्वयंपाकघराचा पडदा बाजूला सारून पारुलबेन ‘ओ’ देतात तोच पोटमाळ्याच्या जिन्यावरून दडदड धावत एक गोरीपान, हसरी मुलगी खाली आली. माझ्याकडे अर्धवट बघत आईला डोळ्यांनी काही विचारू लागली. पारुलबेनचा चेहरा थोडा नाराज, मुलीचा चेहरा थोडा प्रश्नार्थक. पारुलनं स्वत:च्या खांद्याला स्पर्श केला. मुलगी गर्रकन वळली. दडादडा धावत वर गेली. दोघींचा हा दृश्य संवाद मी डोळ्यांनीच टिपत होते. तोच मुलगी परत खाली आली. हसऱ्या चेहऱ्यानं माझ्याकडे बघू लागली आता तिच्या दोन्ही खांद्यावर ओढणी होती. पारुल म्हणाली, ‘ही आमची नीता’ पारुलनं नजरेनं खुणावलं. नीता चटकन पाया पडली. उठताना तिनं स्वत:च्या एका तळव्याचा कागद करून दुसऱ्या हातानं त्यावर लिहिण्याचा अभिनय केला आणि माझ्याकडे पाहून तर्जनी आणि अंगठा जुळवून ‘सुंदर’ असं सांगितलं. आईनं नजरेनंच ‘हो हो, आगाऊपणा नको, त्या मोठय़ा आहेत,’ असं दटावलं बहुतेक, नीताच्या नजरेत ‘सॉरी’ उमटलं.
एवढय़ात जिन्यावरून हळूच आवाज न करता दोन मुलं खाली उतरली. आईनं म्हणजे पारुलबेननं ओळख करून दिल्यावर दोघांनी नमस्कार केला. अस्फुटसं हसली. मोठा गोपाल, बारावी झालाय. धाकटा योगेश यंदा दहावी करतोय. बारा वर्षांपूर्वी पारुलचा पती जयराम सोलंकी अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं वारला. अवघ्या तिशीत. पारुल आणि जयराम दोघंही ठाणे महानगरपालिकेत सफाई कामगार. जयराम गेला तेव्हा तीनही मुलं लहानच होती. त्यातली दुसरी मुलगी नीता आणि तिसरा योगेश हे मूकबधिर. दु:खात आधार एवढाच की पारुल आधीपासूनच नोकरी करत होती आणि जयरामच्या आईनं नुकतंच हे दोन खोल्याचं घर खरेदी केलं होतं.
जयराम आधीच हळव्या मनाचा, साधा-सरळ. या विशेष मुलांची त्याला फार काळजी वाटायची तेव्हा पारुलच त्याला धीर द्यायची. मी मुलांना पुष्कळ शिकवीन तुम्ही काळजी करू नका म्हणायची. पण बहुधा त्याचाच जबरदस्त ताण तो सहन करू शकला नसावा. लहानपणापासूनच पारुल धीटुकली, हुशार, मस्तीखोर, हसरी आणि बडबडी. नरसिंग मगन मकवाना यांची मुलगी. वडील ठाण्यातच सफाई कामगार म्हणून स्थायिक. कामगारांच्या हक्कासाठी लढणार, ठाण्याच्या भाषा-संस्कृतीशी एकरूप. शाळेत पारुल सर्व खेळात आघाडीवर, भरपूर बक्षिसं मिळवायची. वडील पुरोगामी विचारांचे. घरात नेतेमंडळींची जा-ये. त्यांनी समजून उमजून कंकूबाई या सद्गुणी पण मूकबधिर मुलीशी लग्न केलं. ते म्हणाले, ‘संसार उत्तम झाला.’ कंकूबाई सर्व नातवंडांचं संगोपन करून अलीकडेच वारल्या. कदाचित याच कारणामुळे असेल, पण पारुलनं मुलांचं ‘अबोल पालकत्व’ चटकन स्वीकारलं.
जयरामना आणि त्यांच्या आईला मात्र हे स्वीकारणं थोडं जड गेलं. मुलं लहान असताना हे कुटुंब सफाई कामगारांच्या चाळीत राहात असे. तिथून ‘झवेरी ठाणावाला मूकबधिर विद्यालय’ पाच मिनिटांच्या अंतरावर. पारुलच्या आईनं आणि सासूबाईंनीही मुलांचं व्यवस्थित केलं. कारण पारुल आणि जयराम सकाळी सहा वाजता डय़ूटीवर हजर होत असत. डय़ूटी रस्त्याची असली तर ठीक. पण गटारं साफ करण्याची असेल तर? पारुल म्हणते, ‘‘गर्भारपणात थोडं कठीण वाटायचं. पण पुरुष सहकारी नेहमीच सांभाळून घेतात. स्त्रिया आत उतरत नाहीत. वर काढून ठेवलेले ढीग वाहून नेतात.’’ आता सोयी खूप झाल्यात. स्वच्छतेचे धडे दिले जातात. हातमोजे, केरभरणी, ढकलगाडय़ा, रेनकोट.. पूर्वी एवढय़ा सोयी नव्हत्या. पारुलनं १७ वर्षे कंत्राटी कामगार म्हणून काम केलं तेव्हा कुठे नोकरीत कायम झाली.
पारुलचे वडील नरसीभाई हे सुरुवातीपासून दवाखान्यात काम करायचे. सारं घर सफाई व्यवसायात असूनही घराचं आरोग्य राखण्यात त्यांची सजग वृत्ती उपयोगी पडली. पारुल दुपारी अडीच-तीन वाजता घरी येते. आधी आंघोळ, मग घरकाम आणि जेवण. मुलं लहान असताना संध्याकाळी अभ्यासाला बसवायचं आणि एकीकडे स्वयंपाक करायचा. गोपाल सांगतो, ‘‘बाबा खूप लाड करायचे. रात्री तिघांची दप्तरं भरून ठेवायचे. आई एकदम कडक. ती अभ्यासासाठी कठोर. पण बाबा गेले आणि आई एकदम मऊच झाली.’’
आजोबा नरसीभाई.. मुलांचे ‘बापूजी’ हे त्यांचे मित्रच आहेत. योगेश आणि नीताशी त्यांचा विशेष संवाद अगदी प्रेक्षणीय असतो. झवेरी शाळेच्या वेलणकर बाई आणि विशेष शिकवणी घेणाऱ्या मुलुंडच्या काटदरेबाई यांच्याविषयी नरसीभाई खूप भरभरून बोलतात. मुलं लाडकी असली तरी त्यांना स्वयंपूर्ण करण्यावर या घराचा विशेष कटाक्ष.
नीता दहावीला असताना एकदा बसनं मुलुंडला काटदरेबाईंकडे टय़ूशनला गेली. वेळ उलटून गेली तरी परत आली नाही. गोपाल जाऊन बसस्टॉपवर उभा राहिला. पारुलची घालमेल. तिनं नरसीभाईंना फोन लावला. त्यांनी काटदरेबाईंना नेमका प्रश्न विचारला ‘‘मुलींच्या काही गप्पा तुम्ही ‘पाहिल्या’ का? कुणाचा वाढदिवस, किंवा देवळात जाणं..चाट खायला जाणं..’’ बरोब्बर धागा जुळला. एका मुलीचा वाढदिवस होता, साऱ्यांनी नीताला आग्रहानं तिकडे नेलं होतं. पारुलनं नीताला चांगलीच समज दिली. पण बापूजींनी दोन्ही मुलांना साधेसे मोबाइल घेऊन दिले आणि प्रथम मेसेज करायला शिकवलं. आता दिवसभर मुलं आई आणि आजोबांशी जोडलेली असतात. त्यांनी मुलांना एक संगणकही घेऊन दिला आहे. आता नीता महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षांला, योगेश दहावीत आहे. आणि गोपालला वडिलांच्याच जागी अनुकंपातत्त्वावर, वीस वर्ष पूर्ण झाल्यावर कंत्राटी नोकरी लागली आहे.
देशभर सफाई कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. ठाण्यातही आहेत. पण तुलनेनं ठाणं अधिक पुढारलेलं आहे. गोपाल पहिल्या दोन महिन्यांतच हिवतापानं आजारी पडला. रजा घ्यावी लागली. त्याला पुढे शिकायचं आहे. वेगळी नोकरी हवीशी वाटत असणार. पण आजोबांचं म्हणणं ‘‘आधी मिळतंय ते पदरात पाडून घे.’’
पारुल कौतुकानं नीताची चित्रं, भरतकाम, योगेशचं शिवणकाम दाखवत होती. शाळा मुलांना स्वावलंबी बनवतेच, पण मुलांना रिक्षांने, बसनं पाठवणं, बाजारहाट करायला लावणं, पैशांची बचत करणं हे पारुलनं कठोरपणे शिकवलं आहे. तिच्या लहानपणी आईशी संवाद साधताना तिचं काही अडलं नाही. पण आपल्या मुलांचा अभ्यास घेण्यासाठी ती झवेरी स्कूलमध्ये जाऊन खुणांची भाषा शिकली आहे. तिचे वडील, एकेकाळचा कामगार-युनियनमधला लढाऊ कार्यकर्ता या मुलांसाठी ‘प्रेममूर्ती’ बनला आहे. संध्याकाळी मुलं घरी येईपर्यंत अजूनही पारुलचा जीव घाबरतो, पण तेवढय़ापुरताच. तिचं म्हणणं, ‘‘एकलपणाचं कौतुक करायला वेळ कुठे आहे? जयरामच्या तेराव्यानंतर लगेच कामाला जाऊ लागले मी. बसून-खचून कसं चालेल?’’
खरं आहे. आपल्याला नोकरी होती आणि सासूबाईंनी डोक्यावर छप्पर दिलं, छत्र धरलं यासाठी पारुल आयुष्याशी कृतज्ञच आहे. आरशासारखं लख्ख घर, हफ्त्यानं घेतलेल्या सर्व सोयी, आज्ञाधारक निरोगी आणि सद्गुणी मुलं हे पारुलच्या कष्टाचं यश आहे. पारुलच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य हे दुसऱ्याला उमेद देणारं आहे. मुलांच्या नि:शब्द जगात अनुभवाची शक्ती ओतण्याचा पारुलचा आटापिटा आहे. बोलक्या पण हळव्या गोपालला कणखरपणे पायावर उभं करणं तिचं ध्येय आहे.
भावनेला शब्दांचे पंख असतील तर ती दूरवर भरारी घेते हे खरंच, पण शब्दांवाचून ती कधी कधी समोरच्याच्या हृदयात कशी थेट उतरते याचा अनुभव पारुलच्या कुटुंबानं दिला. याच शक्तीच्या जोरावर पारुलची मुलं आयुष्यात यशस्वी होतील. याची तिला खात्री वाटत असणार.
वासंती वर्तक
vasantivartak@gmail.com