अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतल्या पॅराग्वेमध्ये जन्मलेल्या एका तरुणीला बदल घडवून आणण्याच्या दुर्दम्य इच्छेने झपाटले. तिने काग्वाझू या ग्रामीण भागाचा कायापालट घडवून आणला. तर लूफा नावाच्या वनस्पतीवर अनेक प्रयोग करत महिला सबलीकरणाची मुहूर्तमेढ रोवली. इतकेच नाही तर देशातील गोरगरिबांना स्वस्तात घरं उभारण्याचं तंत्रज्ञान त्याद्वारे विकसित केलं. यामुळे घरबांधणीसाठी होणारी वृक्षतोड थांबली आणि पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास रोखता आला.
त्या एल्सा झाल्डिवारविषयी..
पॅराग्वे हा दक्षिण अमेरिकेच्या मध्यवर्ती भागातला, चहूबाजूंनी भूखंडानं वेढलेला अत्यंत दरिद्री देश आहे. या देशातील जवळजवळ तीन लाख लोकांना चांगला निवारा देणारी घरंसुद्धा उपलब्ध नाहीत. प्रचंड वृक्षतोड केल्यामुळे वनसंपत्तीचा ऱ्हास होऊन आता अरण्याची व्याप्ती देशाच्या दहा टक्के भागाइतकी कमी झाली आहे. या देशात घरबांधणीसाठी लागणाऱ्या १०,००० विटा भाजण्यासाठी चार प्रचंड मोठे वृक्ष नष्ट केले जात होते. या देशात १९५४ सालापासून १९८९ सालापर्यंत आल्फ्रेडो स्ट्रॉसनर या हुकूमशहाचं वर्चस्व होतं.
अशा प्रतिकूल परिस्थितीत, देशाची राजधानी असुन्सिथॉन इथं १९६० साली एल्सा झाल्डिवारचा जन्म झाला. तिची आई मनोरंजन क्षेत्रात काम करत होती आणि तिचे वडील लष्करी हुकूमशाहीविरुद्ध लढा देणारे सक्रिय कार्यकर्ते होते. बदल घडवून आणण्याच्या दुर्दम्य इच्छेनं, तिच्या पित्याप्रमाणेच एल्सालासुद्धा बालपणापासूनच झपाटून टाकलेलं होतं. आजूबाजूच्या वस्त्यांमधील गोरगरिबांना मदत करणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये तिनं सहभाग घ्यायला प्रारंभ केला. तिनं ‘कम्युनिकेशन्स’ विषयातली पदवी मिळवली आणि १९९२ पासून ‘काग्वाझू’ या भागात ग्रामीण विकास उपक्रम हाती घेतला. ‘काग्वाझू’ भागात त्यापूर्वीच्या चाळीस वर्षांमध्ये प्रचंड वृक्षतोड केली गेली होती आणि तो सारा टापू उजाड झालेला होता. साधेसे बदल घडवून लोकांची आयुष्य संपूर्णत: बदलण्याचे विविध प्रयत्न तिनं सुरू केले.
ती म्हणते, ‘‘आम्ही स्त्रियांच्या मदतीनं स्नानगृहं आणि शौचालयं बांधून घेतली. शंभर मीटर अंतरावर जावं न लागता, घरात किंवा घराजवळ स्नानगृहं उपलब्ध झाल्यामुळे स्त्रियांची आयुष्याची प्रत खूपच सुधारली. त्यांना इभ्रतीनं जगता येऊ लागलं, तसंच त्यांच्या मदतीनं आम्ही उभ्यानं स्वयंपाक करता येईल अशा चुलींची निर्मिती केली. खाली बसून विस्तवापुढे स्वयंपाक करण्याचे त्यांचे कष्ट दूर झाले.’’
एल्सा जाणून होती की, स्त्रियांना उत्पन्नाचं साधन मिळवून दिलं, तरच त्यांचं आयुष्य सुसह्य़ होऊ शकेल. इथल्या जमिनीतली कपाशीची पैदास थांबवून तिथं सोयाचं पीक घेतल्यामुळे जमीन अत्यंत नापीक झालेली होती. शेतीवर उपजीविका करणं अशक्य होऊन बसलं होतं. एल्सानं या भागात सहज वाढणाऱ्या लूफा नावाच्या वनस्पतीवर प्रयोग केले आणि या स्त्रियांना लूफाची लागवड करायला उत्तेजन दिलं. पूर्ण पिकण्यापूर्वी तोडलं, तर लूफा खाता येतं. परंतु एल्साच्या शिकवणीनुसार या स्त्रिया ही वनस्पती पूर्ण पिकू देऊन नंतर वाळवून त्यावर प्रक्रिया करत असत. प्रक्रियेनंतर जो खरखरीत स्पंजसारखा भाग उरत असे, त्याचा वापर प्रसाधनासाठी (फेशल स्क्रब) करता येत असेच, परंतु लूफाच्या तंतूंपासून चटया, पादत्राणं आणि अनेक अन्य वस्तू बनवून त्या परदेशात निर्यात करता येत असत. या स्त्रियांनी लूफावर ज्या नैसर्गिक रीतीनं प्रक्रिया केलेली असे, त्यायोगे दर्जेदार तंतू बनवता येत असत आणि चीन आणि इतर देशांतील मोठय़ा प्रमाणावरील लागवडीतून बनलेल्या लूफा-उत्पादनांपेक्षा या तंतूंपासून बनलेला माल अधिक चांगला असे. त्याला युरोपमधून उत्तम मागणी येत असे. अशा प्रकारे येथील स्त्रियांना चांगलं उत्पन्न मिळू लागलं लूफाची लागवड करून, त्यापासून बनवलेल्या वस्तू विकून ग्रामीण भागातील स्त्रियांचं सक्षमीकरण आणि आर्थिकदृष्टय़ा सबलीकरण होऊ लागलं.
उच्च दर्जाचा लूफा तयार करण्याचे आटोकाट प्रयत्न केले, तरी ३० टक्के माल कनिष्ठ प्रतीचा असे आणि त्याची निर्यात होऊ शकत नसे. प्रक्रियेनंतर तयार झालेल्या खरखरीत स्पंजपासून वस्तू बनवताना आणखी ३० टक्के माल वाया जात असे. अशा वाया जाणाऱ्या लूफा तंतूंचा अन्यत्र वापर कसा करता येईल, यावर एल्सा गंभीरपणे विचार करू लागली. तिनं प्रेडो पॅड्रॉस या औद्योगिक अभियंत्याची मदत घेतली आणि लूफाचा वाया गेलेला भाग वापरून घरबांधणीत भिंती आणि छतासाठी उपयुक्त ठरतील अशी फळकुटं बनवण्याचे प्रयत्न सुरू केले.
अनेक गोष्टी वापरून झाल्यावर प्रेडोनं एक नवाच प्रयोग केला. कचऱ्यात टाकलं गेलेलं प्लास्टिक वितळवून त्यानं त्यात लूफाचे आणि अन्य वनस्पतींचे तंतू मिसळले. शेकडो प्रयोगांनंतर त्यांना अशा फळ्या बनवणं शक्य झालं. हे तंत्रज्ञान विकसित झाल्यावर, प्रत्यक्ष उत्पादन करणारं यंत्र तयार करणं गरजेचं होतं. पॅराग्वेच्या पर्यावरण मंत्रालयाकडून आणि एल्साच्या सेवाभावी संस्थेकडून मदत मिळवून त्यांनी इंटर-अमेरिकन-डेव्हलपमेंट बँकेकडून अनुदान मिळवलं आणि अशा फळ्या बनवण्यासाठी यंत्र तयार केलं.
या यंत्रातर्फे चार कार्य होतात. प्लास्टिक वितळवलं जातं, त्यात इतर गोष्टी मिसळल्या जातात, तो लगदा फळ्यांच्या स्वरूपात बाहेर काढला जातो आणि त्याचे ठरावीक आकाराचे तुकडे पाडले जातात. हे यंत्र एका तासात अर्धा मीटर रुंदीची आणि १२० मीटर लांबीची फळी बनवू शकतं. अशा फळ्या बांधकामात वापरता येतात. वितळवलेल्या प्लास्टिकमध्येच रंग मिसळून या फळ्या रंगीत बनवता येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, मधाची पोळी किंवा माती मिसळून जास्त मजबुतीच्या फळ्या बनवणं शक्य होतं. प्लास्टिकची निवड नीटपणे केली तर या फळ्यांचा भुगा इंधनासाठी जाळताही येतो.
पॅराग्वेतील गोरगरिबांना या फळ्यांच्या साहाय्यानं स्वस्तात घरं उभारणं शक्य झालंय. घराच्या भिंती आणि छप्पर अशा वजनानं हलक्या आणि मजबूत फळ्यांनी बनवल्यामुळे भूकंपानंतर जीवितहानी होणं टळलंय. अशा फळ्या वापरून घरं बनवता आल्यामुळे, घरबांधणीसाठी किंवा विटा भाजण्यासाठी होणारी वृक्षतोड थांबली आहे. एल्सानं एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. वृक्षतोड थोपवून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवलाच आणि त्याबरोबरच गोरगरिबांना निवारा मिळवून देता देता त्यांना उपजीविकेचं नवं साधन मिळवून दिलंय.
एल्सा झाल्डिवारनं मोठय़ा कल्पकतेनं गोरगरिबांना उत्पन्न आणि निवारा मिळवून दिला. या कार्यात तिला कोणत्या अडथळ्यांना आणि समस्यांना तोंड द्यावं लागलं, हा प्रश्न विचारला असता ती म्हणते की, १९५४ ते १९८९ दरम्यानच्या लष्करी हुकूमशाही राजवटीत त्यांना सारी सामाजिक कार्य लपूनछपून किंवा वेश बदलून करावी लागत असत. कोणत्याही सामाजिक उपक्रमाकडे ‘सरकारविरोधी विध्वंसक कृती’ म्हणून बघितलं जात असे. एल्सानं आपलं आयुष्य ग्रामीण लोकांना मदत करण्यात सत्कारणी लावलं. त्यासाठी तिनं कोठून संप्रेरणा मिळवली असा प्रश्न विचारला असता, ती उत्तर देते, ‘‘माझे वडील राजकारणात होते आणि आई मनोरंजन क्षेत्रात होती. आम्हा सातही भावंडांचा जन्म झाला, तेव्हा आमच्या देशात अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं जात नव्हतं. सृजनशीलतेची गळचेपी केली जात होती. या र्निबधांविरुद्ध आवाज उठवून पॅराग्वेत लोकशाही आणि स्वातंत्र्य आणण्यासाठी लढा देण्याची संप्रेरणा आम्हाला आमच्या आईवडिलांनी दिली. अठराव्या वर्षीच मी ‘ख्रिश्चन यूथ असोसिएशन’मध्ये सहभागी झाले आणि गरजूंसाठी मदत करणाऱ्या समाजसेवी प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ लागले. पुढली वाटचाल आपोआप घडत गेली.’’ तिच्याच शब्दात तिच्या कार्याचा सारांश सांगायचा तर : ‘‘गरिबांना परवडतील अशी पर्यायी घरं बनवणं आणि त्यांच्या शेतकी-मालाला नव्या बाजारपेठा मिळवून देणं हे आमचं उद्दिष्ट होतं. त्यांचा उत्कृष्ट समन्वय साधण्याचा हा मार्ग आम्हाला गवसला आहे.’’
एल्साला २००८ सालचा रोलेक्स पुरस्कार देऊन तिच्या कल्पक तंत्रज्ञान-वापराबद्दल तिचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार-निधी वापरून तिनं तीन आदर्श घरांची मॉडेल उभारली आहेत. त्यांनी बनवलेल्या फळ्या वापरून तयार केलेली ही घरं शहरी आणि ग्रामीण जनतेला या फळ्यांच्या मजबुतीची आणि चतुरस्र उपयुक्ततेची खात्री पटवून द्यायला मदत करतील व ज्यांना हे तंत्रज्ञान वापरात आणायचे असेल, त्यांना मार्गदर्शक ठरतील. आजच्या जगात अशा अनेक कल्पक आणि समर्पित एल्सांची नितांत आवश्यकता आहे!
कल्पकतेचे प्रयोग
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतल्या पॅराग्वेमध्ये जन्मलेल्या एका तरुणीला बदल घडवून आणण्याच्या दुर्दम्य इच्छेने झपाटले. तिने काग्वाझू या ग्रामीण भागाचा कायापालट घडवून आणला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-07-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elsa zaldivar combine loofah and plastic waste to make low cost housing