रोजचं आयुष्य आता भरधाव वेगाचं आहे. त्यात पळभर थांबून विश्रांती घेणं, स्वत:शी संवाद साधणं कठीणच. पण ‘सजगतेनं जगण्या’ची संकल्पना अमलात आणायची असेल, तर मात्र हे करावंच लागेल. ते ज्याचंत्यानंच समजूनउमजून करायला हवं. आयुष्याचा ताल आणि तोल सांभाळता यायलाच हवा!
‘सजगतेनं जगणं’ या संकल्पनेत जागरूकतेला मोठं महत्त्व आहे. मग ही जागरूकता आपल्या निर्णयांच्या आणि त्यांच्या परिणामांच्या बाबतीतली असो किंवा आपले विचार आणि कृती या बाबतीतली असो. जागरूकतेनं जगताना आपण निवडलेल्या पर्यायांसह आपल्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेणं अभिप्रेत आहे. सोप्या शब्दात सांगायचं, तर ‘सजगतेनं जगणं’ म्हणजे आपल्या आयुष्याचा वेग कमी करत, आपण कसं जगतोय याकडे अधिक बारकाईनं लक्ष देणं. इंग्रजीमध्ये ‘माइंडफुल’ हा शब्द प्रचलित आहे.
पण हे साध्य करायचं कसं? सगळं जग आपल्याला धावत सुटायला भाग पाडत असतं आणि आपणही कुठल्या ना कुठल्या ध्येयाच्या किंवा गोष्टीच्या मागे अथक धावत असतो. पण या भरधाव गतीमुळे आपण इतके गुंतून पडतो, की त्यातून चिंता, ताणतणाव आणि गुदमरून टाकणारा दबाव यात आपण अडकत जातो.
हेही वाचा…प्रगतीसाठी लिंगाधारित समानता!
एकदा गुंतवणुकीच्या संदर्भात निर्णय घेण्याविषयी वॉरन बफे म्हणाले होते,‘‘केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरण्यासाठी वेळ, शिस्त आणि संयम हे तिन्ही आवश्यक आहेत. कितीही कौशल्याने प्रयत्न केले तरी काही गोष्टींचे परिणाम दिसायला वेळ लागतोच!’’ असाच आणखी एक किस्सा, ‘अॅमेझॉन’च्या जेफ बेझोस यांनी एका मुलाखतीमध्ये वॉरन बफे यांना विचारलं होतं, ‘‘तुमच्या गुंतवणुकीच्या संकल्पना अमलात आणायला अतिशय सोप्या आणि फायदेशीर आहेत. मग सगळे जण त्याप्रमाणे का वागत नाहीत?’’ यावर ते हसून म्हणाले, ‘‘कारण कोणालाही हळूहळू श्रीमंत व्हायचं नाहीये!’’
आपल्या आयुष्यात तरी काय वेगळं घडत असतं? आपलं सगळं लक्ष आपल्याला अपेक्षित असलेले परिणाम झटकन कसे मिळतील याकडे असतं. पण घाईगडबडीत केलेल्या कोणत्याही कृतीचे समाधानकारक आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम दिसणं हे तसं अवघडच! एक गोष्ट सांगतो, कुणाल वर्माची.
कुणाल दिल्लीच्या गजबजलेल्या वातावरणात वाढलेला. लहानपणापासून ‘खडतर परिश्रम केल्यानंच यश मिळतं,’ असे संस्कार झालेले. ‘उत्तम, यशस्वी व्यावसायिक जीवन घडवणं हेच अंतिम ध्येय,’ हे आईवडिलांनी मनावर बिंबवलेलं. कुणाल अभ्यासात अतिशय हुशार. आई-वडीलसुद्धा त्याला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावायचे. त्याच्या ‘बायोडेटा’मध्ये अधिकाधिक चांगल्या गोष्टींची भर पडावी आणि कोणत्याही उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सहज प्रवेश मिळावा, हा उद्देश. शाळा, शिकवण्या, परीक्षा या सगळ्या चक्रात गुंतून पडल्यामुळे त्याला निवांत विचार करायला वेळच मिळत नसे. अखेर त्याला ‘आय.आय.टी.’मध्ये प्रवेश मिळाला आणि कष्टांचं सार्थक झालं! ‘आय.आय.टी.’मधलं वातावरण अटीतटीच्या स्पर्धेचं होतं. एक लेक्चर झालं की दुसऱ्या लेक्चरला पळणारे, प्रकल्पांवर रात्र-रात्र काम करणारे, सतत कुठल्या ना कुठल्या परीक्षेच्या, इंटर्नशिपच्या तयारीत मग्न असणारे विद्यार्थी, हे एकूण चित्र. कुणालनं स्वत:ला या चक्रात झोकून दिलं. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अभ्यासाच्या व्यापात तो बुडालेला असायचा. उत्कृष्ट मार्क मिळवून गलेलठ्ठ पगाराची, प्रतिष्ठित नोकरी मिळवायची, हा ध्यास. इतकी दमणूक होत असूनही यशस्वी होण्याचा केवळ हाच एकमेव मार्ग आहे, यावर त्याचाही दृढ विश्वास होता. त्या विश्वासावर तो सगळं रेटून नेत होता. पदवीधर झाल्यावर एका मोठ्या, बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये त्याला नोकरी मिळाली. साहजिकच या नोकरीच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षाही मोठ्या होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी त्याला वेळही तितकाच द्यावा लागत होता. एकापाठोपाठ एक मीटिंग्ज, न संपणाऱ्या चर्चा, डेडलाईन्स आणि सतत प्रवास यानं आयुष्य व्यापून गेलं. आठवड्याचे सत्तर तास तो काम करत असे. वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देणं राहून जात होतं.
हेही वाचा…विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?
एका संध्याकाळी पाऊस पडत होता आणि दिवसभराच्या कामानं दमलेला कुणाल त्याच्या गाडीतून घरी परतत होता. डोक्यात ऑफिसच्या प्रोजेक्टसंबंधी काही विचार सुरू होते. त्याला ते दुसऱ्या दिवशी ‘क्लायंट’समोर मांडायचे होते आणि त्याच्या तयारीसाठी लवकर घरी पोहोचायचं होतं. त्या विचारांत त्याला सिग्नलचा लाल दिवा दिसलाच नाही. चौकात समोरून येणाऱ्या भरधाव गाडीची त्याच्या गाडीला जोरदार धडक बसली. कुणालला जबर मार लागला. त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दहा आठवडे तो रोजच्या धकाधकीच्या आयुष्यापासून दूर नुसता पडून होता. पण यामुळे एक झालं, की मनात चाललेला विचारांचा कोलाहल ऐकणं त्याला भाग पडलं. हे त्यानं आजवर कधीच केलं नव्हतं.
हा अपघात कुणालच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. इथून पुढे काहीही झालं तरी इतकं भरधाव वेगानं धावत सुटायचं नाही आणि आयुष्याला इतकं गृहीत धरायचं नाही असा त्यानं निश्चय केला. आयुष्याची गती हळूहळू कमी करत, काही वेळ फक्त स्वत:साठी काढायला त्यानं सुरुवात केली. कामाला मर्यादा घालून घेतल्या. ऑफिसमधलं काम घरी आणायचं नाही, ऑफिसच्या बाहेर पडल्यावर ‘ई-मेल्स’ पाहायचे नाहीत, त्याचबरोबर आपल्या छंदांसाठी आणि आप्तेष्टांसाठी शनिवार-रविवार राखून ठेवायचे, असे काही बदल जाणीवपूर्वक केले. वाचनाचा आणि ड्रम वादनाचा जुना छंद पुन्हा जोपासायला सुरुवात केली. यातून त्याला अतिशय आनंद, निवांतपणा मिळू लागला.
जेव्हा आपल्या डोक्यावर कुठल्या तरी संकटाचा धोंडा कोसळतो, तेव्हाच आपण त्यातून काहीतरी शिकतो. त्याआधी मिळणारे सगळे धोक्याचे संकेत आपण धुडकावून लावतो. जेव्हा छप्परच कोसळतं, तेव्हाच आयुष्यातले सगळ्यात मोलाचे धडे आपण गिरवतो. पण आयुष्य जगायला नव्यानं सुरुवात करण्यासाठी, उत्तम निर्णयक्षमता विकसित करण्यासाठी कुठलं तरी संकट यायलाच हवं का?
हेही वाचा…सांधा बदलताना : निवृत्तीचा काळ सुखाचा…
आपण सगळे सवयीचे गुलाम आहोत. रोज उठून त्याच त्या गोष्टी तोपर्यंत करत राहतो, जोपर्यंत त्यात बदल करायला आपल्याला भाग पाडलं जात नाही! आयुष्य म्हटलं, की बारीकसारीक तक्रारी, अडचणी असायच्याच. त्या स्वीकारत, त्यांच्याशी जुळवून घेत आपण पुढे जात असतो. अचानक आपल्या आयुष्याला एखाद्या संकटामुळे हादरा बसतो. पण खरंतर त्यामुळेच सुखासीनतेतून बाहेर पडून आपण नवीन काही तरी करून बघायला प्रवृत्त होतो. पण जेव्हा आपण सजगतेनं जगायला सुरुवात करू, तेव्हा रोजच्या आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या अनेक गोष्टी आपल्याला दिसतील, आठवतील. त्या अमलात आणण्यासाठी कुठलंही संकट येण्याची वाट न बघता आपण त्या प्राधान्यानं करून मोकळे होऊ शकतो! शरीर, मन, भावना आपल्याला वेळोवेळी सूचना देतच असतात. त्यांच्याकडे वेळीच लक्ष दिलं, तर कधी आणि कोणता बदल करणं गरजेचं आहे, हे सहज लक्षात येऊ शकेल.
जीवनाची भरधाव गती नियंत्रणात आणायची असेल, तर शिस्त असायलाच हवी. स्वत:साठी काही वेळ आवर्जून काढण्याची सवय लावून घेतल्यानं प्रचंड वेगानं धावणारं आयुष्य थोडं संथ होतं. सततच्या व्यग्रतेतून काही वेळ बाजूला होऊन, स्वत:च्या शरीराला आणि मनाला भोवतालाशी जुळवून घेण्यासाठी अवकाश मिळतो. मजा अशी, की मोबाइल, लॅपटॉप अशा अनेक अत्याधुनिक यंत्रांच्या गराड्यात आपण सतत असूनही स्वत:साठी मोकळा वेळ काढण्याची आठवण मात्र एकही यंत्र करून देत नाही! केवळ एकाच गोष्टीच्या मदतीनं हा वेळ काढता येऊ शकतो, ती म्हणजे शिस्तबद्धता!
दिवसभर कितीही व्यग्र असलो आणि तरीही त्यातून थोडा वेळ स्वत:साठी काढायचा असेल, तर स्वयंशिस्त गरजेची आहे. काही गोष्टी अवघड असल्या किंवा तुम्हाला आनंद देणाऱ्या नसल्या तरी त्या वेळच्या वेळी पार पाडण्यासाठी शिस्त आवश्यक आहे. ऑफिसचं काम घरी न आणणं, मोबाइल, लॅपटॉपसाठी विशिष्ट वेळ निश्चित करणं, ती वेळ झाल्यावर ही उपकरणं बंद करून बाजूला ठेवून देणं, स्वत:ला आनंद देणाऱ्या गोष्टीसाठी आवर्जून वेळ काढणं, हे यात आपसूक आलंच. थोडक्यात काय, तर आपल्या आयुष्याच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करताना नियोजित पद्धतीनं काम करायला हवं, पण त्याचबरोबर स्वत:लाही आवश्यक तेवढी मोकळीक द्यायला हवी आणि ती देता यावी यासाठी शिस्त हवीच.
हेही वाचा…स्त्री ‘वि’श्व : मातृत्वाच्या रजेतील ताणेबाणे
कुणालच्या बाबतीत शिस्तबद्धतेचा अर्थ रोजच्या व्यग्रतेतून काही वेळ शांतपणे, स्वत:बरोबर घालवणं, त्यासाठी आयुष्याची घडी पुन्हा बसवणं, असा होता. त्यानं रोज सकाळी ध्यान करायला सुरुवात केली. त्यामुळे सुस्पष्ट विचार आणि एकाग्रता, यांसह दिवसाची सुरुवात होऊ लागली. संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर तो फेरफटका मारायला जात असे. या निमित्तानं दिवसभराच्या घडामोडींबद्दल शांतपणे विचार करायला त्याला वेळ मिळू लागला. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन या दोन्हींच्यामध्ये स्वत:साठी हवा असलेला मोकळा वेळ मिळू लागला. शनिवार-रविवार आधी म्हटल्याप्रमाणे स्वत:च्या छंदांसाठी आणि मित्रमंडळींसाठी राखीव ठेवलेले होतेच. यातून आयुष्याचा ताल आणि तोल उत्तम सांभाळला जाऊ लागला.
दैनंदिन जीवनात या चांगल्या सवयींचा समावेश केल्यामुळे कुणालच्या कार्यक्षमतेत वाढ झालीच, पण त्याचबरोबर त्याचं वैयक्तिक आयुष्यही तो अतिशय समाधानानं, तृप्ततेनं जगू लागला. यातून एक मोलाची शिकवण मिळते, ती म्हणजे जेव्हा आपण जीवनाचा वेग नियंत्रित करू, सावकाशपणे एकेक क्षणाची मजा अनुभवू, तेव्हा साहजिकच आपली निर्णयक्षमता सुधारते, अनावश्यक ताणतणाव कमी होतात आणि खोलवर समाधानाचा अनुभव येतो.
हेही वाचा…इतिश्री : कसोटीनंतरचा नात्यांचा पडताळा!
थोडक्यात, ‘सजग जीवन’ म्हणजे आतल्या, खऱ्या ‘स्व’ला प्रोत्साहित करणारे, उत्तेजन देणारे पर्याय जाणीवपूर्वक स्वीकारणं. यासाठी जीवनाचा वेग हळूहळू कमी करत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. शिस्तबद्धतेचा अंगीकार केल्यामुळे आणि आत्मचिंतनासाठी काही वेळ काढल्यामुळे आपण अधिक संतुलित आणि समाधानी आयुष्य जगू शकतो. त्यासाठी आपल्यावर कुठलं संकट येण्याची आणि त्यामुळे होणारे बदल अपरिहार्यतेनं स्वीकारण्याची मुळीच आवश्यकता नाही!
sanket@sanketpai.com