डॉ स्मिता दातार

भय आहे तरच प्रगती आहे, अशा संकल्पनेत भीतीला बसवलं की तिचा विक्राळपणा आपोआप मऊ होऊन जातो. भीती आपल्याला नुसता मार्गच दाखवते असं नाही. कित्येकदा ती नको ते घडण्यापासून वाचवतेही. भीतीला शरण जाण्यापेक्षा तिच्याशी संवाद करत मैत्रीचं नातं सांधता येईल. मग ती लपूनछपून ‘भो’ करत घाबरवणार नाही, तर गुरूसारखी कानात भल्याच्या चार गोष्टी सुचवत जाईल…

‘‘डॉक्टर, काही घाबरण्यासारखं नाही ना?’’ निधीची लवकरच प्रसूती होणार होती. निधीनं हा प्रश्न गेल्या तीन दिवसांत एकविसाव्या वेळी विचारला होता. तिला तिची केस व्यवस्थित समजावून दिल्यावरही तिची भीती कायम होती. ती होती अज्ञाताची भीती, कल्पनांची भीती. अस्तित्वाला किंवा जगण्यालाच धोका पोहोचेल, अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा भय वाटतं. भय- भीती, हा शब्द उच्चारला की त्याचा अर्थ सांगावा लागत नाही…

chaturang article, modern child rearing, Daily Struggles of Feeding child, child feeding, child rearing, marathi article
सांदीत सापडलेले.. : पूर्णब्रह्म!
chaturanga anti aging marathi news
कारी बदरी जवानी की छटती नहीं…
My friend Half a century of friendship
माझी मैत्रीण : मैत्रीचं अर्धशतक!
loksatta chaturang letter dialogue live concept point of view
जिंकावे नि जगावेही : मीच लिहिले पत्र मला!
Social Process, post-violence,
‘समाजप्रक्रिया’ हिंसेनंतरची आणि पूर्वीचीही
सांधा बदलताना: वैष्णव जन…
chaturang article, children first bike, children desire for bike in age of 16, Valuable Lesson in Gratitude, electric scooter, new generation, Changing Dynamics of Childhood Desires,
सांदीत सापडलेले.. ! वाढदिवस
father and daughter connection shown in indian films
उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना…

भय ही सजीवांची आदिम भावना आहे. भय म्हटलं की सहसा अंगावर चाल करून येणारी काळी, सुनसान रात्र, वडाच्या पारंब्या ठसठसलेल्या जुनाट भिंती, पडका वाडा, करकर आवाज करत उघडणारा जीर्ण, लाकडी दरवाजा, पांढऱ्या साडीतली अंधूक दिसून नाहीशी होणारी स्त्रीची आकृती, केस पिंजारलेली, थिजल्या डोळ्यांनी बघणारी एकांड्या खोलीतली म्हातारी, असंच सगळं आठवायला लागतं. कारण हे आपण वाचलेलं, पाहिलेलं, ऐकलेलं असतं. परंतु याखेरीज काहींना उंचीचं भय असतं, काहींना पाण्याचं, तर काहींना आगीचं भय वाटतं. काहींना इंजेक्शनचं भय वाटतं, काहींना लोकांसमोर बोलण्याचं भय वाटतं. अगदी संस्कारांचं आणि धर्माचंही भय वाटतं! हत्ती आणि दृष्टिहीनांच्या गोष्टीसारखा प्रत्येकाला भयाचा अनुभव वेगळ्या प्रकारे येतो. कारण आपण अनुभवलेल्या प्रसंगांच्या भीतीदायक आठवणींना ‘भय’ असं नाव देतो. आपल्या मनानं अशा प्रकारचे अनुभव भय-भीती या लॉकरमध्ये जमा केलेले असतात! एखादा ‘हॉरर’ चित्रपट बघून आलं की रात्री घरात या खोलीतून त्या खोलीत जाताना भीती वाटते. अशा वेळी जराशा आवाजानं दचकण्याचा अनुभव आपल्यातल्या कित्येकांनी घेतला असेल. ऐन परीक्षेत काही आठवत नाहीये, उंचावरून पडतोय, अशी स्वप्नं पडण्याचे अनुभवही अनेकांना आले असतील. कारण तेच- भयाच्या तिजोरीत जमलेल्या आठवणी.

हेही वाचा…स्त्री ‘वि’श्व: मासिक पाळीच्या रजेचे प्रश्न

मी चार-पाच वर्षांची असेन. गावाला माझ्या मावशीचं लग्न होतं. लग्नघरी परसदारी एक खूप खोल विहीर होती. सगळ्यांचं लक्ष चुकवून मी त्या विहिरीत पाय सोडून मजेत लाडू खात बसले होते. माझ्या आईनं लांबून मला बघितलं आणि ती विलक्षण घाबरली. तिनं मला मोठ्यानं हाका माराव्यात, तर आवाजानं दचकून मी विहिरीत पडायची शक्यता होती आणि मी आपणहून उठून यायचा प्रयत्न केला, तरी निसरड्या काठावरून तोल जाऊन आत पडले असते. शेवटी मामानं सावध पावलं टाकत येऊन मला मागच्या मागे खेचून घेतलं. मी विहिरीत पडता पडता वाचले. याचा अर्थ, माझ्या बालमनाला आधी विहिरीच्या खोलीची, पाण्याची भीती वाटली नव्हती. पण त्यानंतर मिळालेल्या ओरड्यात ती भीती घातली गेली असावी. आजतागायत मला पाण्याची भीती वाटते. पोहता येत नाही.

असं म्हटलं जातं, की भय वाटण्याची काही ढोबळ कारणं असतात. भूतकाळातले अनुभव, समान भय असलेले सोबती, तणाव, व्यसनं आणि बरीच इतर कारणं. ही कारणं माणसाच्या कोऱ्या मनाला भयाची ओळख करून देतात. मग निर्भीड मन भयाच्या अधीन होत जातं. या भीतीच्या विरोधातले काही सुरक्षा मंत्रही माणूस आपोआप शिकत जातो. स्वत:चं संरक्षण ही प्रत्येक प्राणिमात्राची अंत:प्रेरणा. आगीपासून भय वाटून दूर जाणं, उंची किंवा खोली असली तर त्यातला धोका ओळखणं, हिंस्रा प्राण्यांपासून संरक्षण करणं, हे भयातूनच निर्माण झालेलं सुरक्षाकवच आहे. ही भीतीदेखील कधी नकारात्मक असते, तर कधी सकारात्मक. यातील सकारात्मक भीतीचा वापर करूनच मानव आणि प्राणी स्वत:चं रक्षण करतात. सरड्याचं रंग बदलणं, पालीनं शेपूट तोडून पळून जाणं, काही झाडांनी विशिष्ट गंधाचं रसायन सोडणं, ही सगळी त्यांनी भयावर मात करण्यासाठी योजलेली सुरक्षा यंत्रणा असते. घाबरल्यावर माणसांची किंवा प्राण्यांची पहिली प्रतिक्षिप्त क्रिया असते- पळून जाणं. पळायला जमत नाही असं वाटलं तर लढणं, प्रतिकार करणं. मैदान सोडून पळणं, ‘रणछोडदास’ होणं, हे कधी तरी तुमचा जीव वाचवू शकतं.

मानवाच्या उत्क्रांतीत भय आणि त्यापासून बचाव, याचा वाटा मोठा आहे. शिकार, शेती, घर बांधणं, अशी मानवाची प्रगती होण्यासाठी भय कारणीभूत ठरलं असावं. प्रजोत्पादन हादेखील वंशवाढ न होण्याच्या भयावरचा उतारा आहे. प्राणी, पक्षी तर भूकंपाचा धोका ओळखून, भयानं स्थलांतरही करतात. झाडांचं पाणी तोडलं तर वंशवृद्धी होणार नाही या भयानं त्यांना फुलं-फळंही धरतात. निसर्गातला प्रत्येक घटक जिवाच्या भयामुळे निसर्गसाखळीत पुढे पुढे जात राहतो.

हेही वाचा…‘ती’च्या भोवती..!: ‘ठरलेल्या’ जगण्याला आव्हान देणारी ‘मित्रा’!

मात्र या भयाला नेहमी काळा रंग दिला गेला. मुलं लहान असताना त्यांना अंधाराचा, राक्षसाचा, अभ्यासाचा बागुलबुवा दाखवला जातो. ही असते भयाच्या अनुभवांशी त्यांची पहिली ओळख. ते तितकंसं योग्य नाही. आपले अनुभव त्यांच्यावर लादण्यापेक्षा मुलांना जग स्वत: अनुभवू द्यावं. परंतु लहान मुलांना शिक्षकांची भीती, घरातल्या माणसांची भीती वाटत असेल, तर नक्कीच त्याचं कारण शोधलं पाहिजे. माणसातल्या पशूचं भय त्यांना नक्कीच कळलं पाहिजे.
भीतीचा उपयोग कधी कधी आनंद देण्यासाठीसुद्धा केला जातो. उंचावरून आकाश पाळण्यातून खाली येताना किंचाळणारी माणसं पाहिली आहेत ना? भयपट मुद्दाम पाहणारी माणसंही असतातच की! लंडनमध्ये वेस्टमिनिस्टर ब्रिज इथे ‘लंडन डंजन’ (अंधारकोठडी) हा प्रकार प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी निर्माण केलाय. तिथे भीषण पेहराव केलेली माणसं समोर न येता अरुंद गल्ल्याबोळांतून सावलीसारखी तुमचा पाठलाग करतात, रक्त (कृत्रिम) सांडवतात, तिथे मृतदेह (खोटे-खोटे) लटकवलेले असतात, रक्त-मांसाचा दर्प असतो, तुमचा जीव घेण्याचे (कृत्रिम) प्रयत्न होतात, आरसे वापरून आभास केले जातात. बघणारे किंचाळत असतात. थोडक्यात क्रौर्य, भुताटकी निर्माण करून, पैसे घेऊन भयाचा अनुभव! कारण काही लोक त्या अवस्थेचा आनंदही घेत असतात. भीतीमुळे त्यांच्या मेंदूने निर्माण केलेलं डोपामाईन संप्रेरक (हॉर्मोन) त्यांना ती उन्मनी अवस्था देऊन आनंद देत असतं.

मग भीतीची नकारात्मक बाजू काय? तर भय वाटलं की मेंदू ती भीती ओळखतो आणि कामाला लागतो. तो मज्जासंस्थेला सावध करतो आणि भयाला प्रतिसाद म्हणून Adrenalin आणि Cortisol सारखी संप्रेरकं सोडतो. त्यामुळे श्वास जलद होतात, रक्तदाब वाढतो, रक्तप्रवाह हृदयापासून दूर हातापायांकडे नेला जातो, कारण आता पळण्यासाठी किंवा लढण्यासाठी हातापायांना शक्ती देणं गरजेचं असतं. धोकादायक परिस्थिती ओळखून पुढचा अॅक्शन प्लॅन शरीर तयार करत असतं. परिणामी घसा कोरडा होतो, पोटात गोळा येतो, छातीत धडधड होते. अतिभयाच्या अवस्थेत मेंदूची निर्णयक्षमता निष्प्रभ होते. ही भीती प्राणघातक नाही, याचं आकलन न झाल्यामुळे भूत, हडळ अशा विविध कल्पनांवर विश्वास बसायला लागतो. ही अवस्था फार काळ टिकली तर अपायही होऊ शकतो. काही माणसं नैराश्याकडे वाटचाल करायला लागतात आणि आत्मविश्वास गमावतात. अशा वेळी भयामुळे दु:ख पदरी येतं.

हेही वाचा…स्त्रियांचे न्याय्य प्रतिनिधित्व हवे

आपल्या देशाचा ‘आनंद निर्देशांक’ (Happiness Index) आहे १३६ मध्ये १२६ वा. भय बाळगण्याचं प्रमाण भारतीयांमध्ये ४.२ टक्के आहे, असं एक अहवाल सांगतो. म्हणजे १०० माणसांत चार जणांना भयानं ग्रासलेलं आहे. ‘आनंद निर्देशांका’त शेवटून दहावा नंबर येण्याचं एक कारण सतत असलेली भीती असेल का? घराबाहेर गेलेला माणूस सुखरूप येईल ना? कुटुंबाचं पोट भरता येईल ना? पाहिजे तिथे शिकायला प्रवेश मिळेल ना? नोकरी मिळेल ना? लग्न होईल ना? झालं तर टिकेल ना?… अशा भीतीनं ग्रासल्यामुळे जगण्यातला आनंद घ्यायचं राहून जातं.

संत तुकाराम म्हणतात,
‘भय वाटे पर न सुटे संसार। ऐसा पडिलो काचणी, करी धावा म्हणउनी।
विचारता काही तो हे मन हाती नाही, तुका म्हणे देवा। येथे न पुरे रिघावा।

सामान्य माणसाची व्यथा आहे, की संसाराच्या व्यापतापांची त्याला भीती वाटते. मोक्ष, शांतता दूरच राहते. कारण त्याचं मन ताब्यात नसतं. काही जणांच्या बाबतीत एकदा भयानं मनात घर केलं की भीती मोठी व्हायला लागते. तिचं मानसिक आजारात रूपांतर व्हायला लागतं. म्हणून सांगितलं जातं, की भीती मान्य करा! तिच्याशी दोन हात करा, तिच्यावर मात करा. भयाचं रूपांतर सवयीत झालं तर ती दुर्बलता ठरते. ते अपयशाचं कारण ठरतं. भयाची ‘फोबिया’कडे (अकारण भीती, घृणा) वाटचालही होऊ शकते.

हेही वाचा…एकमेकींच्या आधाराचा पूल

भयावर मात करून मन ताब्यात ठेवण्यासाठी मनाचा समतोल महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी सकस वाचन, माणसांशी संवाद, निसर्गाचा आणि माणसांचा सहवास, ध्यानधारणा, योग अंगीकारून मन शांत आणि सक्षम ठेवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. गरज लागली तर भयावर उपचार करून घेतले पाहिजेत. मन आतून मजबूत झालं तर बाहेरून मनावर होणारे भयाचे आघात त्याला झेपतील. कारण हे भय आपल्या काबूत ठेवलं तर त्याचं भूत होऊन मानगुटीवर बसणार नाही. या भयाविषयी बोललं गेलं तरच न घाबरण्याचा उपाय सापडेल.

जीवन आहे म्हणजे मृत्यू येणारच… मग मृत्यूच्या भयानं जगणं विसरून कसं चालेल?
संत कबीर म्हणतात,
‘डर करनी डर परम गुरु, डर पारस डर सार।
डरत रहे सो उभरें, गाफिल खाई मार।’

अर्थात- पापाच्या भयानं माणसं कर्तव्यपथावर चालतात. भय एक मोठा गुरू आहे, तो तुम्हाला धीट करतो. भय एक परीस आहे, भय असलं तर प्रगती आहे. जो गाफील राहील त्याचं नुकसान निश्चित आहे.
त्यामुळे भयाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायलाच हवा!

drsmitadatar@gmail.com