सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
दहावी, बारावीच्या परीक्षा या सगळ्याच मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाच्या असतात. कारण मुलांचं करिअर त्यावर अवलंबून असतं. यशाचं कळस चढवायचा असेल तर त्यासाठीचा पाया मजबूत हवाच. म्हणूनच हे सदर सुजाण पालकांसाठी. आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्याकडून योग्य ते प्रयत्न कसे करून घ्यावेत हे सांगणारं. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी.
‘गणित’ या अनेकांना कठीण वाटणाऱ्या विषयासाठी प्रा. प्रकाश जकातदार गेली ३० हून अधिक वर्षे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. विशेष प्रावीण्यासह मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी (गणित) चे शिक्षण पूर्ण केले असून सिद्धार्थ महाविद्यालयात गणित विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काही काळ काम केले आहे. याशिवाय १९८५ सालापासून ते आय.आय.टी.साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. यासाठी अनेक कार्यशाळा व चर्चासत्रांचे आयोजन ते सातत्त्यने करत असतात.
गेली तीस वष्रे मी आय.आय.टी.जे.ई.ई. (Indian Institute of Technology Joint Entrance Exam) या स्पर्धात्मक परीक्षेसाठीचा गणित हा विषय शिकवत आहे. या प्रदीर्घ कालावधीत अक्षरश: हजारो मुलांना मी शिकविले असेल. या काळात मीदेखील या विद्यार्थ्यांकडून बरेच काही शिकलो. या विद्यार्थ्यांपकी बरीचशी मुलं आय.आय.टीत गेली. बरेचसे विद्यार्थी परदेशात गेले. काहींनी स्वत:च्या कंपन्याही काढल्या. त्याचप्रमाणे बरीच मुलं अपयशीही ठरली.
थोडक्यात, या विद्यार्थ्यांचं दोन वर्गात विभाजन होतं. या स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होणाऱ्यांचा एक वर्ग व दुसरा (निदान या प्रोजेक्टमध्ये तरी) अयशस्वी होणाऱ्यांचा वर्ग. मी जे काही शिकलो ते यासंदर्भात होतं. या यशस्वी मुलांची मानसिकता त्यांची वर्गातली व वर्गाबाहेरची वर्तणूक, शिक्षकांबरोबर किंवा इतर विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे असणारे संबंध त्यांची एकूणच शरीरबोली आणि यांच्या उलट अयशस्वी होणाऱ्यांची मानसिकता, त्यांचं वागणं यांच्यामधला फरक प्रकर्षांने जाणवायला लागला. बऱ्याच वेळा असंही झालं की, काही मुलं माझ्या मते आय.आय.टी.त जाण्याच्या योग्यतेची होती तरी ती मुलं हा स्पर्धात्मक परीक्षेसाठीचा कोर्स सोडून गेली. या उलट काहींचा बुद्धय़ांक कमी असून देखील केवळ चिकाटी आणि दृढनिश्चयाच्या बळावर आमच्याबरोबर शेवटपर्यंत राहिली आणि यशस्वी झाली. यातून सर्वात महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली ती ही की, कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळविण्याची लढाई आपण जिंकतो वा हरतो ते पूर्णपणे आपल्या बुद्धीवर अवलंबून नसून आपल्या मानसिक पातळीवर अवलंबून असते. तेव्हा मला जर जास्तीत जास्त यशस्वी विद्यार्थी घडवायचे असतील तर मला फक्त गणित, पदार्थ विज्ञान किंवा रसायनशास्त्र शिकवून चालणार नाही, तर त्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडवून आणणारी एक वेगळीच शिक्षणप्रणाली उभी केली पाहिजे. त्यातूनच मग बऱ्याचशा अनुभवांनंतर, वाचनानंतर आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याने मी काही कार्यशाळा आयोजित केल्या.
या कार्यशाळांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या जवळून संपर्कात आल्यामुळे त्यांच्या समस्यांचे आकलन झाले. या सगळ्या विचारमंथनातून सध्याच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल एक गोष्ट जाणवली की, जवळ जवळ सगळ्या शैक्षणिक संस्था शाळा, महाविद्यालये किंवा खाजगी क्लासेस या सगळ्यांचा रोख विद्यार्थ्यांना ठराविक नेमून दिलेला अभ्यासक्रम शिकण्याकडे असतो. त्यासाठी चांगले शिक्षक नेमले जातात. मुलांना चांगल्या नोट्स देण्यात येतात. या सगळ्या सोयी सगळ्या विद्यार्थ्यांना सम प्रमाणात मिळत असून देखील सगळ्यांना मिळणारं यश मात्र सारखं नसतं. याची कारणे बऱ्याच वेळा व्यक्तीनुसार बदलत असल्यामुळे या संदर्भात आपण फारसे काही करू शकत नाही अशी शिक्षण संस्थांची धारणा असते. खरं तर मुलांना जे शिकवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यापकी जे काही ते खरोखरच शिकतात यात बरीच तफावत असते. याची कारणे अनेक असतात. त्यात शिक्षकांविषयीचा पूर्वग्रह, विषयाबद्दल वाटणारी अनास्था, स्वत:विषयीची असलेली न्यूनगंडाची भावना, आत्मविश्वासाचा अभाव अशा तऱ्हेचे अनेक मानसिक अडथळे त्यांना यशापासून परावृत्त करतात. या सगळ्याचे निराकरण करणे शक्य आहे का? तसे करण्यात शिक्षक आणि पालकांची भूमिका काय आणि कशी असावी. हे या लेखमालेत स्पष्ट करावयाचा मानस आहे.
ज्ञानाला जर बीजाची उपमा दिली तर ज्या मनोभूमीत ही बीजे रुजवणार आहोत त्यातून मिळणारे उत्पन्न वा उपज ही त्या बीजाची गुणवत्ता, त्यासाठी लागणारे पाणी व खते यावर तर अवलंबून असतेच पण मूलत: ती जमिनीच्या सुपीकतेवरदेखील अवलंबून असते आणि त्या मनोभूमीची सुपीकता वाढविण्यासाठी जोपर्यंत एखादी शिक्षणप्रणाली प्रयत्न करीत नाही तोपर्यंत ती परिपूर्ण होऊच शकत नाही.
इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचा विद्यार्जनाचा जो काळ असतो या काळात मुलांच्या करिअरची पायाभरणी होते. त्यांच्या एकंदरीत आयुष्याची जडणघडण या काळात होणार असते. मुलं पौगंडावस्थेतून तारुण्याकडे वाटचाल करीत असतात आणि पालक मात्र फक्त त्याच्या भवितव्याबद्दल चिंतेत असतात. या नाजूक स्थित्यंतराच्या काळात मुलांना व पालकांना अनेक ताणतणावातून जावे लागते. पालकांच्या मनात असलेली मुलांच्या भवितव्याबद्दल वाटणारी असुरक्षितता, बऱ्याचशा अवास्तव अपेक्षा आणि या अपेक्षांच्या ओझ्याखाली पिचून जाणारी मुलं आणि आत्मविश्वासाच्या शोधात असलेली मुलं यातून काही प्रसंगी आत्महत्येपर्यंत जाण्याचे अपघातदेखील घडतात. वास्तविक निसर्गाने मानवावर टाकलेल्या अनेक जबाबदाऱ्यांपकी एक अतिशय उदात्त अशी जबाबदारी म्हणजे ‘पालकत्व’.
सुजाण पालकत्वाची जर व्याख्या करायची झाली तर माझ्या मते ती अशी असेल तर, ‘‘आपल्या संस्कारांतून व संगोपनातून अशा व्यक्तीची निर्मिती करावयाची जी स्वत:च्या आयुष्यात होणाऱ्या सर्व घटनांची जबाबदारी स्वत:वर घेते. आपल्या जीवनात येणाऱ्या अपयशांचे खापर परिस्थिती किंवा वातावरणावर न फोडता स्वत:कडे घेत कर्त्यांची भूमिका निभावते. परिस्थितीचा गुलाम होण्यापेक्षा परिस्थितीवर मात करून यशस्वीतेकडे वाटचाल करते.’’ परंतु यासाठी एका अतिशय सकारात्मक दृष्टिकोनाची पालकांकडून अपेक्षा असते. तो कसा याचाही ऊहापोह या सदरात केला जाणार आहेच.
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने जीवनात यशस्वी व्हावं असं वाटतं. परंतु यश म्हणजे काय आणि ते कशावर अवलंबून असतं याविषयी फारसा विचार मात्र होत नाही. जर तुम्ही स्वत:ला हा प्रश्न विचारला की कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळणारं यश कशावर अवलंबून असतं तर याचं उत्तर पटकन लक्षात येतं ते म्हणजे प्रयत्न. आपण एखाद्या प्रोजेक्टसाठी किती प्रयत्न करू हे आपण साध्य करू इच्छित असलेल्या ध्येयावर अवलंबून असतं. उदा. एखाद्या मुलाला एफ. वाय. बीकॉमच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचंय, परंतु दुसऱ्याला आय.आय.टी.च्या परीक्षेत निवडून यायचंय, तर दुसऱ्याचे प्रयत्न खचितच जास्त असतील! तेव्हा एक गोष्ट निश्चित की जितकं ध्येय उच्च, तेवढे त्यासाठी घेण्यात येणारे परिश्रम जास्त असतात आणि जेवढे जास्त परिश्रम तेवढी यश मिळण्याची शक्यता जास्त असते. पण एखादा माणूस आपल्यासाठी कुठले ध्येय ठरवितो हे कशावर अवलंबून असतं? तर मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, याविषयी प्रत्येकाच्या मनात काही दृढ कल्पना असतात. स्वत:च्या क्षमतेबद्दल असलेल्या सर्व कल्पनांची गोळाबेरीज म्हणजे स्वप्रतिमा! तेव्हा एक गोष्ट निश्चित जर अलौकिक यश मिळवायचे असेल तर स्वप्रतिमा असामान्य असायला हवी.
प्रत्येक अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला मी माझ्या पहिल्या लेक्चरमध्ये नेहमी एक साधा प्रयोग करतो. मी पहिला प्रश्न विचारतो, ‘वर्गातील किती मुलं बोर्डात पहिला यायचा प्रयत्न करत आहेत. तर याला उत्तर म्हणून एका स्मशानशांततेला सामोरं जावं लागतं. मग मी विचारतो, ९५ टक्केच्या वर मार्क्स मिळवण्यासाठी किती जण प्रयत्न करीत आहेत? आता मात्र एक-दोन हात बिचकत – बिचकत वर येतात. किती जण ९० टक्केच्या वर मार्कस मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तेव्हा थोडे जास्त हात वर येताना दिसतात. असा हा प्रवास जेव्हा ६० टक्क्यांवर येऊन ठेपतो तेव्हा संपूर्ण वर्ग उभा राहिलेला असतो! याचा अर्थ सरळ आहे जेवढे ध्येय उच्च तेवढे ते गाठण्याची आकांक्षा असलेली मुलं कमी असतात. यातून ९० टक्के मुलांच्या मानसिकतेबद्दल आपल्याला सहज अंदाज बांधता येतो की, या मुलांची स्वप्रतिमा आपण अतिशय सामान्य असतो अशीच असते. आपण अतिशय सामान्य आहोत अशी स्वप्रतिमा असलेली व्यक्ती कधीही असामान्य ध्येय ठेवू शकत नाही आणि सामान्य उद्दिष्टच जर गाठायचं असेल तर त्यासाठी केलेले परिश्रमसुध्दा यथातथाच असतात आणि जुजबी प्रयत्नांतून मिळालेलं यश हे देखील सामान्यच असतं. यश सामान्य मिळालं असल्यामुळे आपण सामान्य आहोत हे जे आपल्याला वाटतं ते अधिकच बरोबर वाटायला लागतं, हे एक दुष्टचक्र आहे तेव्हा आपल्याला जर आयुष्यात काही घडवून आणायचं असेल तर आपल्या स्वप्रतिमेत आमूलाग्र बदल घडवून आणावा लागेल.
इयत्ता आठवी ते बारावी म्हणजेच १४ ते १८ या वयाच्या नाजूक स्थित्यंतरातून जाणाऱ्या पाल्याला प्रत्येक पालक एक अतिशय समर्थ अशी मानसिकता प्राप्त करून देऊ शकतात आणि आयुष्यभर पुरेल अशा आत्मविश्वासाची इंधन निर्मिती करू शकतात! कसे ते आपण पुढील लेखात (२३ फेब्रुवारी) पाहू.