‘आश्वासक मानसशास्त्र’ अर्थात वेदनेच्या देणगीचा सखोल अभ्यास. अनेकदा संकटातून बाहेर पडलेली माणसं नंतर म्हणतात, जे घडलं ते वाईटच होतं, पण तरी त्यातून खूप शिकायला मिळालं. हे जे ‘शिकणं’ असतं त्यातून माणसं आमूलाग्र बदलू शकतात.

कौरव-पांडवांमधलं द्यूत संपलं. १२ वर्षांचा वनवास आणि एक वर्षांचा अज्ञातवास पत्करून पांडव हस्तिनापूरचा त्याग करून निघाले. वेशीजवळ त्यांनी कुंतीचा निरोप घेतला. तेव्हा भीष्म तिला म्हणाले, ‘पांडव निघाले असले तरी तू राजमाता आहेस. तुझी जागा राजवाडय़ात आहे. तू तिथेच राहा.’ तेव्हा ती म्हणाली , ‘नाही, मी विदुराकडे त्यांच्या घरातच राहणार.’ भीष्म म्हणाले, ‘मग तुला काय हवं ते तू माग, ते देण्याची मी व्यवस्था करतो.’ कुंतीने शांतपणे सांगितले, ‘मला दुख हवं आहे. कारण मी जर सुखात, आरामात जगले, तर मला त्याची चटक लागेल. मग मला त्याशिवाय जगणं अवघड होईल. मी माझं कर्तव्य विसरेन. दुख मला माझ्यातल्या अपूर्णत्वाची, माझ्या राहिलेल्या कर्तव्यांची आठवण करून देत राहील!’
‘दुख’ कुणाला हवंहवंसं वाटेल? कुंतीसारखं ‘दुखाचं वाण’ मागून जगणारे लोक विरळेच असणार. आपल्यासारखे सर्वसामान्य लोक सहसा दुखाला चार हात लांब ठेवण्याचाच आटोकाट प्रयत्न करत असतात. कल्पना करून बघा-आपल्या मनात असे विचार कधी आवर्जून आणतो का?
* या परीक्षेत मी सपाटून मार खायला हवा.
* याच्यावर माझं खूप प्रेम आहे, पण त्याचं तोंडही मला बघायचं नाही.
* माझ्या जवळची व्यक्ती या जगातून नाहीशी होणार आहे (ते घडावं.!)
* मला आजार कधी होणार?
आपल्याला काय वेड लागलंय का असे अभद्र विचार करायला? शिवाय दुख नको म्हणून प्रत्यक्षात आपलं जीवन वेदनारहित असू शकतं का? आयुष्यात कमालीचे, टोकाचे चढउतार येणार नाहीत का? अशा चढउतारांमधून गेल्यानंतर माणसाच्या जाणिवा बदलतात का?
या सगळ्या प्रश्नांना  ‘आश्वासक मानसशास्त्र’ भिडलं आहे आणि त्यातून वेदनेच्या देणगीचा सखोल अभ्यास सुरू आहे. अनेकदा संकटातून /तीव्र दुखद अनुभवातून बाहेर पडलेली माणसं नंतर म्हणतात, जे घडलं ते वाईटच होतं, पण तरी त्यातून मला/आम्हाला खूप शिकायला मिळालं. हे जे ‘शिकणं’ असतं त्यातून माणसं आमूलाग्र बदलू शकतात.
काही वेळा एखाद्या प्रसंगातून खूप काहीतरी चांगलं, सुखद घडण्याची अपेक्षा असताना विपरीत घडते. धक्का बसतो. आपण उन्मळून पडू की काय असं वाटतं. उदाहरणार्थ, एखाद्या रम्य ठिकाणी सहलीला जायचं आपण ठरवतो. मनात तशी चित्रं रंगवतो, जय्यत तयारी करतो, प्रत्यक्षात मात्र असं लक्षात येतं की काही अपरिहार्यतेमुळे आपण भलत्याच ठिकाणी पोचलो आहोत. रम्य हिरवाईच्या जागी उजाड वाळवंट आहे. सुखद गारव्याऐवजी तळपतं ऊन किंवा झोंबरं वारं आहे. सुरुवातीला या अपेक्षाभंगावर आपण खूप चडफडतो, दुखी होतो. ‘आता कसं करणार’ या कल्पनेनं खूप असाहाय्य वाटतं, पण मग जेव्हा त्या परिस्थितीला स्वीकारण्याची मनाची तयारी होते तेव्हा त्या वाळवंटांचं वेगळं सौंदर्य दिसायला लागतं. त्या सौंदर्याचा आस्वाद घेताना आपण आपल्याच िपजऱ्यातून बाहेर पडतो. दुखातून खूप मोलाचं असं एक जीवनभान मिळवत जातो.
विशेष मुलांचं पालकत्व निभावणाऱ्या आई-बाबांना, गंभीर आजाराचा सामना करणाऱ्यांना, आपल्या अगदी निकटच्या प्रियजनांचा मृत्यू पाहणाऱ्यांना-अशा आपल्यातल्या अनेकांना प्रथम ही परिस्थिती असह्य़ वाटणं स्वाभाविकच आहे. अशा प्रसंगानंतर आपण अनेकदा ‘दुखाची उजळणी’ करत राहातो. असे अनुभव आपल्या काही गृहीतकांना गदगदा हलवत असतात आणि मनात  प्रतिक्रिया उमटतात. माझ्या बाबतीत असं घडूच शकत नाही (आता काहीही घडू शकतं.!) आयुष्य नेहमीच अर्थपूर्ण, सुरळीत असायला हवं. (जग अन्यायानेच भरलंय!) मी एक चांगली व्यक्ती आहे. (मी क्षुल्लक, कपदार्थ आहे.) विचारांची अशी पाठशिवणी आपल्याला दमवून टाकते. असाहाय्य वाटायला लावते. पण अशाच वेळी खरी गरज असते ती आपल्या मनातल्या आंदोलनाकडे साक्षी भावानं, तटस्थेनं, पण आपुलकीनं पाहण्याची! अशा निरीक्षणानंतर काही जण म्हणतात, ‘हा प्रसंग म्हणजे माझ्या वाटय़ाला आलेली ईश्वराची एक देणगीच आहे.’ अर्थातच यात त्या व्यक्तीला जे भोगायला लागतं त्याचा अपमान नसतो तर त्यातूनही ‘वाढायच्या’ संधी मिळू शकतात याची जाणीव होत असते.
रस्त्यावर कितीतरी अपघात होत असतात. अनेकांचे जिवलग त्यात कायमचे अंतरतात. काही जण त्यात उद्ध्वस्त होतात तर काहीजण त्यातून सावरून अशा समपथिकांना सावरण्यासाठी स्वतचा हात पुढे करतात. िबदूला कॉलेजमध्ये मोपेडवरून जाताना ट्रकवाल्यानं उडवलं. एकुलती एक मुलगी अशी दुर्दैवी बळी ठरल्यानं  तिचे आई-वडील सुरुवातीला कोसळले. पण मग कालांतरानं तिचं नसणं त्यांनी स्वीकारलं. इतकंच नाही तर तिच्या स्मृतींच्या उजाळ्याला त्यांनी समारंभाचं स्वरूप दिलं. त्या दिवशी अशा लोकांचा सत्कार करायचं व्रत घेतलं की जे अपघाताच्या वेळी बघ्याची भूमिका न घेता आपली प्राधान्यं बाजूला ठेवून धावून जातात. त्यातून ‘िबदू’सारख्या अनेकांना वेळीच यमरेषेवरून मागे खेचलं जातात.  िबदूच्या आई-बाबांना हे कसं जमलं? लेक गमावल्याचं त्यांचं दुख त्यामुळे कमी झालं का? तर बोच कमी झाली नसेल, पण त्या घटनेकडे ते काही प्रमाणात तटस्थपणे पाहू लागले तेव्हा त्यांना जाणवलं की आपण स्वतसाठी नाही तरी इतरांसाठी तरी यात काही फरक पाडू शकतो. ‘मीच का’ असं विचारण्याऐवजी,‘आता ‘मी आहे त्या परिस्थितीत पण मग पुढे काय’ असा प्रश्न ते स्वतला विचारू शकले म्हणून त्यांचं दुख त्यांना वेदनापलीकडचं काही मौल्यवान असं देऊन गेलं.  पूर्वी लोक मानायचे की अशा तीव्र दुखदायक घटनांनंतर वरवर माणसं बदलतात, पण आतली जखम भळभळतच राहाते. दाबून टाकली जाते. पण आजचं संशोधन असं सांगतं की होणारे बदल, दुखातून होणारी विचारांची, जाणिवांची प्रगल्भता ही खूप आतून, खरीखुरी आलेली असू शकते. आयुष्यातल्या सर्व घटनांचा काहीतरी ‘अर्थ’ लागला पाहिजे ही माणसाची एक स्वाभाविक गरज असते. उद्ध्वस्ततेच्या काळात तो ‘अर्थ’ हरवतो.  आपण गोंधळलेले असतो, पण मग जेव्हा तटस्थपणे त्याच गोष्टींकडे आपण पाहातो तेव्हा पुन्हा नवा काही अर्थ, रचना शोधायला लागतो. नवीन उद्दिष्ट डोळ्यांसमोर आणतो. आयुष्य पुन्हा एकदा अर्थपूर्ण बनवतो. जशी शरीराची जखम भरून काढणारी एक रचना असते, जी नव्या पेशींना जन्म देते, तिथला रक्तप्रवाह, चेतापेशी, त्वचापेशी या सर्वाची नवी आघाडी उघडते, तशीच मनाची जखम विचारांच्या, जाणिवेच्या पुनर्रचनेनंतर भरून येते. मग कुणी आयुष्यावर कादंबरी लिहितं, कुणी एखाद्या सामाजिक संस्थेची निर्मिती करतं तर कुणी अत्युत्कृष्ट संगीताची रचना करतं!
हरपलेल्या गोष्टींचा अर्थ लावताना माणसं विविध प्रकारे विचार करतात.
-हे असं घडणारचं होतं. किती भरमसाट सिगरेट्स प्यायचा तो (भविष्य अंदाज)
-जन्माला आला तो एक दिवस जाणारच. आपण दुख तरी किती आणि का करणार? (निसर्ग नियमांचा स्वीकार)
-ते इतके आजारी होते की देवानंच त्यांचे हाल न बघवून त्यांना नेलं! तसं ते भरपूर आनंदात इतकी वर्ष जगलेच की. (परमेश्वरी इच्छा)
-त्यांनी स्वतचं जाणं मनानंच स्वीकारलं होतं. त्यामुळे मलाही ते पचवायला जड गेलं नाही. ते नेहमी बोलायचे मृत्यूविषयी .(प्रियजनांचा मृत्यूचा स्वीकार)
-ते जाणार याची मी मनाशी आधीच तयारी करून ठेवली होती. (अपेक्षित घटना)
-हा सगळा काळच आम्हाला फार शिकवणारा होता. अशा प्रसंगातून जे जातात त्यांना जगणं म्हणजे काय हे कळतं. कारण आपणही त्यातून कधी तरी जाणारच ना? (आयुष्याचे धडे !)
दुखाचे अनुभव म्हणजे दरवेळी मृत्यू असं नाही. पण तशीच तेवढीच वेदना देणारेही अनेक प्रसंग असतात. जिवलगानं केलेला विश्वासघात, सामाजिक अवहेलना, डोळ्यासमोर झालेला विध्वंस, दुर्धर आजाराचा आघात आणि अशा कितीतरी!
अनेकदा असा अनुभव येतो की यातून व्यक्तीला तिचा ‘स्व’ तर सापडत जातोच, पण जगण्याकडे तुकडय़ा तुकडय़ानं न बघता एकसंधपणे बघण्याचा प्रयत्न होतो. नकळतपणे अनेक कुटुंबीय अशावेळी पुनश्च एकदा घट्ट जोडले जातात. इतरांची मदत घेण्यातला फुका संकोच कमी होतो, आणि आपल्या या ‘शिकण्याचा’ फायदा आपण अगदी मोफत (निरपेक्षपणे) इतरांनाही करून देऊ लागतो.
डॉ. अभय बंग याचं ‘माझं साक्षात्कारी हृदयरोग’, डॉ. अरिवद बावडेकर यांचं ‘कॅन्सर माझा सांगाती’ ही पुस्तकं अशीच कहाणी सांगतात, नाही का? दुखाची देणगी म्हणजे ही साक्षात्काराची प्रचीती! ती मिळवायची का नाही हे मात्र ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. मी तर माझ्यापुरतं! ‘हो’ असं ठरवलंय, तुम्ही?
डॉ. अनघा लवळेकर -anagha.lavalekar@jnanaprabodhini.org

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
Marathwada Socio economic backwardness,
मराठवाड्याच्या अस्वस्थतेची पाळंमुळं
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
Story img Loader