बांगलादेशातील सईदा रिझवाना हसन या तरुणीने वकिलीचे उच्चशिक्षण पूर्ण करताच, ‘बेला’ या जनकल्याणासाठी आवाज उठवणाऱ्या संस्थेत प्रवेश केला. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या अनेक धनदांडग्यांना कायद्याचा बडगा दाखवून वठणीवर आणण्याचं काम तिने करून दाखवलं. पर्यावरणविरोधी अनेक खटले लढवत पहिल्यांदाच आरोपी पक्षाने दंड भरल्याची घटना देशाच्या इतिहासात घडली. पर्यावरणरक्षणासाठी झटणाऱ्या, जहाज बांधणी मजुरांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या, सईदाच्या या कार्याची दखल प्रतिष्ठित मॅगसेसे पुरस्कारासह अनेकांनी घेतली आहे.
नफ्याच्या हव्यासापायी अनेक देशांत निसर्गावर अत्याचार होतच असतात. जिथे सर्वसामान्यांचं हित जपण्यासाठी कायदे अस्तित्वात असतात आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करणारी व्यवस्था असते, तिथे अशा प्रवृत्तींना थोडा तरी आळा घातला जातो. परंतु जिथे असे कायदेच अस्तित्वात नसतात, तिथे पर्यावरणाला आणि सजीव सृष्टीला घातक ठरणाऱ्या कृती अर्निबधपणे सुरू राहातात. याचे ठळक उदाहरण म्हणजे बांगलादेशातील चित्तगाँव येथील शिप ब्रेकिंग व्यवसाय! हा व्यवसाय म्हणजे टाकाऊ जहाजांचे भाग अलग करून मोडीत विकण्याचा उद्योग.
इथे दरवर्षी श्रीमंत देशातली १५० टाकाऊ जहाजं आणली जातात. या जहाजांमधून तत्पूर्वी विषारी रसायनांची वाहतूक केली जात असली, तरी ही जहाजे स्वच्छ करून त्यांचं निर्विषीकरण न करताच ती चित्तगाँव बंदरात आणली जातात. या जहाजांचे भाग अलग करून ते मोड म्हणून विकता यावेत, या कामासाठी लहान वयाची मुलं कामाला जुंपली जातात. विषारी रसायनांचा या मुलांच्या प्रकृतीवर घातक परिणाम तर होतोच, परंतु समुद्र किनाऱ्यावरचं पाणीसुद्धा विषारी बनतं.
याप्रमाणेच बांगलादेशातील दलदलीचे भाग आणि तळी यात मातीचा भर टाकून या जागेचा वापर औद्योगिक उपयोगासाठी करण्याचे काम खाजगी कंत्राटदार बिनदिक्कतपणे करत आहेत. हे करताना तेथील स्थानिकांना दूर हटवलं जातंय, ओसाड जागेच्या प्रमाणात वाढ होते आहे, त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन ढळलंय आणि पुराचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे.
अशा प्रकारे कायदा हातात घेऊन पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या आणि लाखो निष्पाप बांधवांच्या स्वास्थ्याला दावणीला बांधणाऱ्या मूठभर धनदांडग्यांना कायद्याचा बडगा दाखवून सरळ करण्याचं काम एका तरुण वकील स्त्रीनं यशस्वीरीत्या करून दाखवलं. तिला धमक्या देऊन घाबरून टाकण्याचे अनेकांनी अनेकदा प्रयत्न केले. परंतु ती अजिबात विचलित झाली नाही. तिनं एकाग्रतेनं आपलं काम चालूच ठेवलं आणि पर्यावरण-कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांचा पाठपुरावा केला. ती म्हणते, ‘बांगलादेशच्या रहिवाशांच्या मनात देशाच्या न्यायव्यवस्थेबद्दल विश्वास उत्पन्न करणं आणि कायदा आणि वकील केवळ धनदांडग्यांच्या सेवेसाठीच नेहमी काम करत नसतात, असा संदेश जनसामान्यांपर्यंत पोचवणं, हे माझ्यापुढचं उद्दिष्ट आहे!’
या तेजस्विनीचं नाव आहे सईदा रिझवाना हसन. १५ जानेवारी १९६८ रोजी बांगलादेशातील हबीबगंज इथे तिचा जन्म झाला. महिबूल आणि सुरैय्या हसन हे तिचे माता-पिता आणि तिचे अन्य कुटुंबीय यांच्याकडून तिला लोकसेवेचं बाळकडू लाभलं होतं. तिनं १९९३ साली ढाका विद्यापीठातून कायद्याचं पदव्युत्तर शिक्षण घेऊन एलएलएम. ही पदवी मिळवली आणि ताबडतोब ‘बेला’ (BELA) (बांगलादेश एन्व्हायरनमेंटल लॉटर्स अॅसोसिएशन) या जनकल्याणासाठी कार्यरत असलेल्या वकिलांच्या संघटनेसाठी ती काम करू लागली. जनहितासाठी अत्यंत समर्पिततेनं काम करणारे आदरणीय वकील, मोहिउद्दीन फरूकी यांनी ही संघटना स्थापन केली होती. १९९७ साली त्यांचं निधन झाल्यानंतर सईदा हसन हिनं संघटनेची सूत्रं हाती घेतली. तिनं कार्यकारी संचालकपद स्वीकारल्यानंतर ‘बेला’चा सक्रिय सहभाग प्रचंड प्रमाणात वाढला. कारखान्यांमुळे होणारं प्रदूषण, नद्यांमधून बिनदिक्कतपणे केला जाणारा वाळूचा उपसा, नद्यांचं प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, नदीकिनाऱ्यांवरची घुसखोरी, टेकडय़ांचं सपाटीकरण, अर्निबधपणे कचऱ्याचा ढीग रचणे अशा जनहिताला बाधक असलेल्या गोष्टीबाबत या संस्थेने निदान शंभर तरी खटले लढवले.
तिनं यशस्वीरीत्या लढवलेल्या दोन खटल्यांचे निर्णय, तशाच पुढल्या खटल्यांसाठी दाखला स्वरूपात (Precedent Setting) वापरले जाऊ लागले, आणि ‘बेला’च्या कार्याकडे सर्व देशांचे लक्ष वेधले गेले. २००३ सालापासून सईदा हसन, या संस्थेच्या वतीनं सतत खटले लढवत होती आणि मूळ देशातच निर्विषीकरण केल्याखेरीज, कोणतंही जहाज बांगलादेशात आणू दिलं जाऊ नये यासाठी झगडत होती. त्याबरोबरच शिप ब्रेकिंग व्यवसायासाठी काम करणाऱ्या मजुरांना संरक्षण मिळावं म्हणून धडपडत होती. हा लढा अजून संपलेला नसला, तरी त्यात तिनं नेत्रदीपक यश मिळवलं. बांगलादेशच्या न्यायालयीन इतिहासात, पहिल्यांदाच कुणाला तरी पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्याला दंड भरावा लागलाय. त्यानंतर २००९ साली बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं, पर्यावरण खात्याकडून परवानगी न घेता चालवली जाणारी सर्वच्या सर्व ३६ शिप ब्रेकिंग यार्डस् बंद करायला लावली आणि त्याबरोबरच नवा र्निबध जारी केला की बांगलादेशात येणाऱ्या प्रत्येक टाकाऊ जहाजाची, मूळ देशात निर्विषीकरणाची स्वच्छता केली गेली असायलाच हवी.
दोन हजार सालापासून ‘बेला’ आणखी एका मुद्दय़ाबाबत सतत लढा देत होती. पाणथळ जमिनीत भर टाकण्यावर र्निबध आणले जावेत, यासाठी झगडताना तसा कायदा संमत करून घेता आला होता, परंतु या कायद्याची अंमलबजावणी मात्र होत नव्हती. एक प्रचंड मोठी आणि राजकीय लागेबांधे असणारी धनदांडगी अशी बांधकाम कंपनी, नदीच्या पुराच्या विस्तारक्षेत्रातच मातीची भर घालून, प्रचंड मोठा गृहप्रकल्प हाती घेत होती. सईदा हसन आणि तिच्या मूठभर सहकाऱ्यांनी या प्रकल्पाला हरकत घेणारी जनहित याचिका कोर्टात दाखल केली. हा खटला लढवताना त्यांना त्या बांधकाम कंपनीच्या सुप्रसिद्ध अशा २० ज्येष्ठ वकिलांचा सामना करावा लागला, कोर्टातील लाचखोरीला शह देत आणि सुनावणीसाठी लागणाऱ्या विलंबाला तोंड देत अत्यंत चिकाटीनं या खटल्याचा पाठपुरावा करावा लागला. अखेरीस निर्णय ‘बेला’च्या बाजूनं लागला आणि कोर्टानं हा गृहप्रकल्प बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला. परंतु या दरम्यान या बांधकाम कंपनीनं फ्लॅट्स विकले होते आणि अपील्स आणि फेरअपील्सचा ससेमिरा संस्थेच्या मागे लागला. तरीसुद्धा सईदा हसन खचून गेली नाही. ‘या सर्व अनिष्ट शक्तींशी ठामपणे दोन हात करू शकणं, हेच मोठं यश आहे!’ असं सईदा म्हणते. या खटल्याद्वारे सईदानं आणि ‘बेला’नं स्पष्ट संदेश दिला की, पूर्वीप्रमाणे कायद्यांना धाब्यावर बसवणं आता शक्य नाही आणि पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्यांना कायद्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.
सईदा हसननं आपलं कार्यक्षेत्र विस्तारलं आहे आणि तिनं तळागाळातल्या लोकांनासुद्धा त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली आहे की, पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा हक्क, घटनेनं दिलेल्या ‘जीविताच्या’ हक्काचाच एक भाग आहे.
सईदाच्या कार्यासाठी २००९ सालचा ‘गोल्डमन एनव्हायर्नमेंट’ पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला. २०१२ साली तिला रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारताना ती म्हणाली, ‘‘हाती विशेषाधिकार असलेल्या संस्था आणि व्यक्ती ज्या उद्दामपणे आमच्या निसर्गसंपत्तीची लूट करत होत्या, त्यांच्याशी लढा देण्यापासून आम्ही आमच्या कार्याला प्रारंभ केला. अशी लूट करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवणं, हा आमचा हेतू होता. त्यामुळे आमचं हे काम अत्यंत खळबळजनक, आव्हानात्मक, धाडसी आणि रोमांचक बनलं. कायदा सर्वासाठी असतो आणि तो सर्वाना समप्रमाणात लाभायला हवा, यासाठी आमचा लढा होता. आम्ही आमचे शेतकरी, कोळी, अरण्यवासी यांच्या हक्कांसाठी झगडत आहोत. वृक्षराजी, टेकडय़ा-पर्वत, तळी-नद्या आमचं हित जपत असतात, त्यांचं संरक्षण करणं हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो. चुकीच्या व शोषण करणाऱ्या आणि निसर्गसंपत्तीचा ऱ्हास करणाऱ्या विकास योजनांबाबत आम्ही सतत प्रश्न उपस्थित करत राहू. गैरकारभार आणि सत्तेचा गैरवापर यांच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहील. पर्यावरणविषयक न्याय, विशेषत: गरिबांना मिळवून देण्यासाठी मी पूर्णत: कटिबद्ध राहीन. समारोपादाखल मी मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या सुप्रसिद्ध वाक्याचा पुनरुच्चार करते.
आम्ही अद्याप संतुष्ट नाही, आणि जोवर न्याय पाण्यासारखा खळाळून वाहत नाही आणि जोवर सदाचरणाचा अफाट ओघ सुरू होत नाही, तोवर आमचं समाधान होणार नाही!’ ’
कायदा हे दुधारी शस्त्र असतं. जोवर ते शस्त्र सईदा हसनसारख्या सुज्ञ, परोपकारी व्यक्तीच्या हाती असतं, तोवर आशेला जागा असते!!