आरती कदम

आपल्याच कुटुंबीयांमुळे सतत अपमानित होणारी, आत्मविश्वास गमावलेली एक मध्यमवर्गीय गृहिणी, शशी एका क्षणी परिस्थितीला शरण जाणं नाकारते आणि स्वत:साठी उभं राहायचं ठरवते. अनेक अडथळे पार पाडत अंतिम ध्येयापर्यंत पोहोचायला तिला मदत होते तिच्या विजिगीषू वृत्तीनं इंग्रजी शिकण्याची. एका साध्या सरळ मध्यमवर्गीय स्त्रीचा स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या नजरेत मोठं होण्याचा ‘इंग्लिश विंग्लिश’ या हिंदूी चित्रपटातील प्रवास सार्वत्रिक सत्य सांगणारा असल्यानं तो पाहायला हवा. 

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

‘‘मला प्रेमाची नाही, थोडी इज्जत- आदराची गरज आहे,’’ ‘इंग्लिश विंग्लिश’ या हिंदूी चित्रपटातील शशीची ही स्वत:साठीची अपेक्षा हाच या चित्रपटाला व्यापून टाकणारा संघर्षिबदू. आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठीचा महत्त्वाचा दुवा आहे, तो तिचं इंग्रजी शिकणं, तिला ती बोलता येणं आणि तिचं स्वत:ला सापडत जाणं. आपल्याच कुटुंबीयांच्या नजरेत आपल्याविषयी हा आदर मिळवण्यासाठी रोजच्या रोज हजारो मरणं मरणाऱ्या असंख्य स्त्रियांशी सहजपणे नाळ जुळवणारा हा दिग्दर्शक गौरी शिंदे यांचा चित्रपट म्हणूनच पाहायला हवा.

ही कथा एका टिपिकल मध्यमवर्गीय, मध्यमवयीन, सुती साडय़ा नेसणाऱ्या, एक वेणी घालणाऱ्या, अपमान गिळत जगणाऱ्या साध्या सरळ शशीच्या आत्मविश्वासाच्या प्रवासाची तर आहेच, पण त्याबरोबरीने तिच्या कुटुंबीयांतील नात्याला परिपक्व करत जाणारी अधिक आहे. कारण तिचा आत्मविश्वास सातत्याने खच्ची करण्याचं काम हे कुटुंबीयच करत असतात, विशेषत: तिचा नवरा सतीश आणि वयात येणारी मुलगी स्वप्ना. जे आपणही अनेक कुटुंबांत पाहत असतोच. ‘आपल्या बायकोला काय येतंय’ किंवा ‘आपल्या आईला कुठं काय कळतं?,’ असं म्हणत एखादीच्या कमजोरीला लक्ष्य करत सातत्याने तिला अपमानित करणारे अनेक जण आपल्यालाही आजूबाजूला दिसत असतात. अर्थात, अनेक जणी लोक जे म्हणतील तेच खरं मानून रडत, झिजत जगत राहतात, पण इथली शशी मात्र तसं मरत जगणं नाकारते. घरी काय, मुलीच्या शाळेत काय किंवा अमेरिकेत पोचल्यावर कॅफेमध्ये कॉफीची ऑर्डर देताना केवळ इंग्रजी बोलता न आल्याने तिला ज्या पद्धतीने अपमानित व्हावं लागतं त्यातून तिचा अंतर्गत संघर्ष अधिकाधिक तीव्र होत जातो आणि त्यावर तिला उतारा मिळतो तो ‘चार आठवडय़ांत इंग्रजी शिका’ या क्लासचा. हे चार आठवडे म्हणजे शशी नावाच्या सुरवंटाचं फुलपाखरू होणं!

खरं तर प्रत्येकीमध्ये एक ऊर्जा असतेच, पण अनेकदा ती सुप्तावस्थेत असते. तिला हवा द्यावी लागते, मग विजय आपलाच. तशीच शशी आहे. ती गृहिणी आहे. स्वयंपाकात, विशेषत: मोतीचुराचे लाडू करण्यात एक्सपर्ट आहे. इतकी, की तिचा छोटा व्यवसाय आहे. पण त्यावरूनच आणि तिला इंग्रजी बोलता न येणं किंवा चुकीचे उच्चार करणं यावरून सतीश आणि स्वप्ना तिची थट्टा, अपमान करत असतात. मुलीच्या अशा चिडवण्याला सतीशचं प्रोत्साहनच मिळत असतं त्यामुळे तिला तसं करण्यापासून कुणी थांबवणारंही नसतं. त्याचा परिणाम असा होतो, की शशी आत्मविश्वास गमावून बसते. ‘कितनाभी करो किसीको खुष नही रख सकती।’- हे असंख्य स्त्रियांचं दु:खं तिच्याही तोंडून निघतंच. दरम्यान, अमेरिकेत असणारी तिची बहीण, मनू लेकीच्या, मीराच्या लग्नासाठी म्हणून तिला अमेरिकेत बोलावून घेते आणि एकटीने अमेरिकेत जाणं या विचारानेच तिची झोप उडते. पण तरीही मोडकं तोडकं, कामचलाऊ इंग्रजी बोलत ती तिथे पोहोचतेच. इतकंच नाही, तर इंग्रजी क्लासची माहिती मिळाल्यावर एकटय़ाने मेट्रो ट्रेन पकडून सारे क्रमांकच असणारे रस्ते शोधत शोधत न्यूयॉर्कला क्लासमध्ये पोहोचतेही. तो तिचा पहिला विजय असतो. इथूनच शशीचा गर्तेत वाहून जाण्यापेक्षा प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रवास सुरु होतो. ‘क्या करू टाइम कम हैं ना,’ याची जाणीव झालेली ती झपाटल्यागत प्रत्येक इंग्रजी शब्द, वाक्य समजून घेते. सिनेमाला गेलेली असताना असो, टीव्हीवरच्या बातम्या बघताना असो, फ्रीजवरचे मॅग्नेट्स असोत, वर्गात इतर सहाध्यायी मस्त धमाल करत असताना, टाइमपास करत असताना, हिचं आपलं एकच लक्ष्य – इंग्रजी शिकणं. त्यासाठी बहिणीशी खोटं बोलावं लागतं, नवऱ्याला थाप मारावी लागते. पण भाची राधाच्या मदतीनं ती सारं पार पाडत असते, पण संघर्ष हा सहजसोपा कधीच नसतो त्याप्रमाणे तिलाही अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. शेवटच्या परीक्षेसाठी तिला क्लासला जाता येत नाही, पण तरीही ती त्यात डिस्टिंक्शन मिळवून उत्तीर्ण होते, पण त्याचवेळी आयुष्याच्या परीक्षेत शंभरच्या शंभर गुण मिळवत कुटुंबांतलं स्वत:चं स्थान भक्कम करते, ते तिला जाणवलेलं सार्वत्रिक आणि कालातील सत्य सांगून. चित्रपटाच्या शेवटी असणारा तिचा हा मोनोलॉग म्हणजे प्रत्येक कुटुंबासाठीचा ‘आय ओपनर’ ठरावा. मीराच्या लग्नात ‘टोस्ट’ करताना, कुटुंबातील प्रत्येकाला खूष करण्याची जबाबदारी बाईची एकटीची नाही, तर ती प्रत्येकाची आहे, हे सांगताना मीरा आणि जावई केविनला उद्देशून ती म्हणते, ‘लग्न म्हणजे मैत्री. तिथे दोघंही एकसमान असतात. आयुष्य म्हणजे खूप मोठा प्रवास असतो, त्यात कधी एखाद्याला आपण छोटे आहोत असं वाटू शकतं, कधी दुसऱ्याला. अशा वेळी एकमेकांसाठी असा. या भल्यामोठय़ा जगात तुमचं असं छोटंसं जग, तुमचं कुटुंब असू द्या, कारण कुटुंब ही अशी एकच जागा आहे जिथे तुम्हाला कुणी छोटं समजत नाही, कुटुंब कधी जजमेंटल नसतं. ते तुमचा अपमान करत नाही. तुमच्यावर प्रेम करतं, तुमचा आदर करतं. तुम्ही तसं कुटुंब निर्माण करा. प्रेमाने राहा.’ हे सगळं शशी सांगत असताना तिच्या आयुष्यात हे काहीच नाही, याची जाणीव आपल्याला होत राहते, तशी सतीश आणि स्वप्नालाही होत जाते. कोणताही त्रागा, आदळआपट, राग, चिडचिड न करता शशी आपलं म्हणणं नेमकेपणाने पोहोचवते. आणि अंतिम विजयाकडे पोहोचते. शेवटी विमानाने मायदेशी परत निघालेल्या या कुटुंबाला, शशीला, एअर हॉस्टेस वाचायला काय हवं,असं इंग्रजीत विचारते, तेव्हा शशी तिला विचारते, ‘डू यू हॅव हिंदूी न्यूज पेपर? नो? इट्स ओके.’ तेव्हा सतीश कौतुकानं तिच्याकडे पाहत राहतो आणि ती खुषीत पुन्हा एकदा खांद्यावरचा पदर घट्ट लपेटत समाधानाने हसते. आयुष्याकडून फार अपेक्षा नसलेली ही साधी सरळ शशी, पण प्रश्न जेव्हा आत्मसन्मानाचा होतो, तेव्हा मात्र त्याला शरण जाणं नाकारते आणि स्वकष्टाने खणखणीतपणे उभी राहाते तेव्हा तिची हीच साधीसोपी गोष्ट सर्वाची होते.

या संपूर्ण चित्रपटात दिग्दर्शक गौरी शिंदे यांनी शशीसाठी अभिमानाची गोष्ट असलेल्या मोतीचुरांच्या लाडवांचा फारच निगुतीने वापर केला आहे. थोडक्यात, हे लाडू संपूर्ण चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावतात. चित्रपटाची सुरुवातच शशीने तयार केलेल्या लाडवांच्या दृश्य रुपाने होते. बॉक्समध्ये ठेवलेले ते तजेलदार लाडू तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू आणतात. तिचं लाडवांवर अलगद हाताने बेदाणा दाबणं, बॉक्स नीट लावून ठेवणं, घरातल्या सर्वाना प्रेमाने लाडू खायला घालणं या साऱ्यातून तिचं आपल्या कामावर प्रेम व्यक्त होत राहातं. तिचे हे लाडू इतके लोकप्रिय असतात, की तिला रोजच्या रोज, अगदी लग्नासाठीही ऑर्डर्स मिळत असतात. एका मुलाला हाताशी धरत ती ते लाडवांचे बॉक्स घरपोच देत असते. इथेही नवऱ्याचं, सतीशचं तिला अजिबात प्रोत्साहन नाही हे तिला कार न देण्याच्या त्याच्या छोटय़ाशा कृतीतून दिसतंच. ती रिक्षा करून लाडवांची डीलिव्हरी देत असते. त्यातून मिळणारे पैसे एका डब्यात जमा करत असते. पुढे हेच पैसे तिला इंग्रजीचा क्लास लावण्यासाठी उपयोगी पडतात. लाडवांच्या जिवावर तिने कमावलेले ते पैसे, त्यांच्या जोरावरच ती पुढचा प्रवास करते. क्लासमध्येही जेव्हा ती सरांना सांगते, की माझा लाडवांचा ‘स्मॉल बिझनेस’ आहे. तेव्हा ते तिला म्हणतात, म्हणजे तू ‘आंत्रप्रेन्युअर’ आहेस. तिचे डोळे लकाकतात. पहिल्यांदा कुणी तरी तिच्या या कामाला इतकी प्रतिष्ठा दिल्याचं जाणवून ती सुखावते. पण हेच जेव्हा ती नवऱ्याला सांगते तेव्हा तो नेहमीच्या थट्टेने, ‘म्हणजे तू तिथेसुद्धा सगळय़ांना लाडू खायला घातलेस वाटतं,’ असं म्हणतो तेव्हा तिच्या आत्मविश्वासाला ठेच लागतेच. तसंही सतीश कायमच तिच्या लाडू बनवण्यावरून थट्टा करत असतोच, म्हणजे मुलाला सांगतानाही, ‘अभ्यास कर नाही तर लाडू बनवावे लागतील,’ किंवा तिला म्हणतो, ‘तू लाडू बनवायलाच तर जन्माला आली आहेस,’ पण असं म्हणताना त्यात अध्याहृत असलेली, ‘तिला दुसरं काय येतं?’ ही थट्टा तिला किती दु:ख देते याची त्याला जाणीवही नाही. भाचीच्या, मीराच्या लग्नातही हे मोतीचुराचे लाडूच ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून द्यायचे हे तीच ठरवते आणि त्याप्रमाणे करतेही. चार आठवडय़ांनंतर इंग्रजीची परीक्षा देणं इतकंच राहिलेलं असतं. त्यासाठी एकदाच तिला क्लासला जायचं असतं, पण तिने तयार केलेले लग्नासाठीचे लाडू मुलाचा धक्का लागून जमिनीवर पडतात आणि तिला परीक्षेला जाण्याचा विचार मागे ठेवायला लागतो. पुन्हा नव्याने सगळे लाडू ती तयार करते. कारण ते तिचं पहिलं प्रेम आहे. लग्न लागतं. तिच्या क्लासमधले सगळे येतात. सगळय़ांना ती लाडू खायला घालते. तिच्यावर अबोल प्रेम करणारा फ्रेन्च मित्र लॉरेनला लाडू देताना, त्याला तिच्याबद्दल वाटणाऱ्या प्रेमभावनेचा शेवट करताना ती सांगते, ‘थँक्स, मुझे अपने आपसे प्यार करना सिखाने के लिए।’ हे सगळं लांबून बघत असलेला तिचा नवरा फारच अस्वस्थ होतोच. पहिल्यांदाच त्याला तिचं स्वतंत्र आणि वेगळं अस्तित्व जाणवतं. त्याच्या ताटात दोन लाडू वाढत असताना तो तिला विचारतो, ‘‘तुझं माझ्यावर अद्याप प्रेम आहे ना?’’ तेव्हा ती छान हसत म्हणते, ‘‘नाही तर तुला दोन लाडू कशाला दिले असते!’’ लाडवांची कहाणी इथे अशी तिला स्वत:च्या पायावर ठामपणे उभं करत, मुख्य म्हणजे कुटुंबाला जवळ आणत सुफळ संपूर्ण होते.

उत्कृष्ट दिग्दर्शन आणि गोळीबंद पटकथा याच्या जोडीने श्रीदेवी यांचा अभिनय या चित्रपटाला खूप वरच्या स्तरावर घेऊन गेला आहे. नवऱ्याने, मुलीने केलेला प्रत्येक अपमान गिळताना होणारी तगमग आणि त्याचवेळी यशाचा नितळ आनंद त्यांनी खूप छान व्यक्त केला आहे. यशाची एकेक पायरी चढत असताना शशीचं पदर डाव्या खांद्यावरून घट्ट लपेटून घेणं, वेणी मागे उडवणं किंवा उजवा हात उंचावत ‘यो’ म्हणत स्वत:भोवती गिरकी घेणं या लकबी प्रत्येक प्रसंगी अगदी चपखल बसल्या आहेत. लॉरेनचं प्रेम समजून घेताना, ‘मला प्रेम नको आहे, हवी आहे थोडी इज्जत,’ हे सांगतानाचा ठामपणा, माझ्या बायकोला इंग्रजी येत नाही, असं सांगणाऱ्या सतीशला हाताने धरून खाली बसवताना, ‘मे आय?’ म्हणतानाचा तिचा आत्मविश्वास, ‘पीटीए म्हणजे काय हे माहीत नसेल, पण पेरेन्ट म्हणजे काय हे चांगलं माहीत आहे’, असं लेकीला सांगत गप्प करणं किंवा लेकीच्याच ‘तू काय वाचणार? तुला इंग्रजी वाचता येत असेल तर ना?’ या वाक्यावर अपमान, संताप, दु:ख, हतबलता यांच्या एकत्रित उद्रेकातून, ‘या मुलांना आपल्या आईवडिलांशी असं बोलण्याचा हक्क कुणी दिला. आदराचा अर्थ तर यांना माहीतच नाही. ये कैसी मासुमियत हैं बच्चोंकी? जो कमजोरीका फायदा उठाते हैं।’ हे ज्या तगमगीने शशी बोलते तेव्हाचा संपूर्ण प्रसंगच पालक-मुलांचा नात्याचा विचार करायला भाग पाडतो.

सुरुवातीला म्हटलं तसं, हा चित्रपट म्हणजे शशीच्या माध्यमातून एका स्त्रीच्या आत्मविश्वासाचा प्रवास आहेच, परंतु कुटुंबांतल्या प्रत्येकाचं प्रत्येकाशी असलेलं आदराचं, जवळिकीचं नातं हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे.२०१६च्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटातून आयुष्यावर प्रेम करायला शिकवणाऱ्या गौरी शिंदे यांनी त्यापूर्वीच, २०१२ मध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट देऊन स्वत:वर प्रेम करायला शिकवलं आहे, एवढं मात्र निश्चित.

 arati.kadam@expressindia.com