– राजेश मंडलिक

प्रत्येकाच्या आयुष्यात रोज २४ तास आणि वर्षांचे ३६५ दिवसच असतात. तरीही अनेक जण यशस्वी तर काही जण अपयशी वा आयुष्यभर चाचपडत राहाणारे दिसतात. का होतं असं? त्यासाठी आयुष्याचा सिद्धांत आणि उद्देश सापडावा लागतो. एकदा का तो सापडला, की तो त्याच्यासाठी ‘युरेका’ क्षण असतो..

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
four days week in japan
विश्लेषण : जन्मदर वाढविण्यासाठी जपानमध्ये चार दिवसांचा आठवडा..! काय आहेत कारणे? योजना कशी राबवणार?
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Pune builders , Pune air pollution, Pune,
बांधकाम व्यावसायिकांवर का होणार कारवाई?
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात

दिवसाचे चोवीस तास आणि वर्षांत ३६५ दिवस हे वैश्विक सत्य आहे; पण त्याच आणि तितक्याच काळाचा वापर करून प्रत्येक जण आयुष्य मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं जगतो. त्यामध्ये काही लोक आकाशाची उंची गाठतात, तर काही जण मात्र भरीव असं फारसं काही करू शकत नाहीत. किंबहुना तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य लोकांचाही विचार केला, तर अनेक जण ‘अर्हसमस्ती’आयुष्य जगतात. ‘अर्हसमस्ती’अर्थात worthy of existence
काय मानसिकता असावी अशा यशस्वी लोकांची? हा प्रश्न माझ्या मनात नेहमी येतो. मी जेव्हा या लोकांचा अभ्यास करतो, एकूण जीवनशैलीबद्दल विचार करतो, तेव्हा काही गोष्टी प्रकर्षांनं लक्षात येतात. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य जगण्याचे मूळ सिद्धांत आणि उद्देश याबद्दल या लोकांच्या डोक्यात खूपच स्पष्टता असते. कुठलंही काम करताना ही लौकिकार्थानं समाजात विशिष्ट योगदान देणारी मंडळी त्या कामाला सिद्धांताच्या आणि उद्देशाच्या कसोटीवर अगदी तावून सुलाखून बघतात. त्या सिद्धांताला आणि उद्देशाला जागणारं ते काम असेल, तर त्यात अक्षरश: झोकून देतात आणि त्यासाठी १०० टक्के प्रयत्न पणाला लावतात; पण जर काही कारणानं त्यांच्या मूळ सिद्धांताला धक्का बसणार असेल आणि मूळ उद्देश जर सफल होत नसेल, तर बहुतेकदा हे लोक त्या कामाच्या वाटेलाही जात नाहीत. या वैचारिक स्पष्टतेमुळे कुठलं काम हातात घ्यायचं आणि कुठलं नाही, याची निवड करताना त्यांचा वेळ फारसा जात नाही आणि मग जे काम हातात घेतलं, ते तडीस नेताना ते तन-मन-धन झोकून काम करतात.

हेही वाचा – नवीन वर्षांचे स्वागत करताना.. डिजिटल डिटॉक्स ऑनलाइन तुटलेपण

सिद्धांत आणि उद्देश यांपैकी एक वेळ जगण्याचे सिद्धांत शोधणं सोपं असेलही कदाचित, पण उद्देश शोधणं हे मात्र फार जिकिरीचं काम असतं. स्वत:च्या ‘असण्याबद्दल’ खूप खोलवर विचार करणं हे गरजेचं असतं. वयाच्या कुठल्या पायरीवर याची उपरती होते, हा एक मोठा प्रश्नच आहे. काही जण वयाच्या विशीत हे शोधू शकतात, तर काही जण तीस, चाळीस किंवा पन्नाशीत याचा धांडोळा घेतात. काहींना मात्र आयुष्य संपतं तरी त्याचा शोध घेता येत नाही आणि अनेक जणांना तर तो शोध घ्यावा अशी इच्छाही होत नाही. फक्त एक मात्र आहे, की ज्या क्षणी या सिद्धांताचा आणि उद्देशाचा साक्षात्कार होतो तो ‘युरेका’ क्षण असतो. आणि त्यानंतरच्या आयुष्याला एक वेगळा आयाम प्राप्त होतो!

इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे हा मूळ उद्देश हा भौतिक गोष्टींशी सांगड घालणारा नसतो. तर तो अभौतिक आणि अमूर्त गोष्टींभोवती रुंजी घालत असतो. एकदा आपलं ‘असणं’ हे भौतिकतेशी निगडित नाही आहे हे लक्षात आलं, की त्या उद्देशाला परिपूर्ण करण्यासाठीचा प्रवास हा कमालीचा आनंददायी असतो. त्यातून मिळणारं समाधान हे आपण शब्दांत व्यक्त करू शकत नाही. इंग्रजीत एक शब्द आहे ‘पॅशन’. एखादं काम स्वत:वर ओढून घेताना कुठल्याही भौतिक परताव्याची अपेक्षा न ठेवता काम करणं म्हणजे पॅशन. त्यातली गंमत अशी आहे, की जेव्हा या भावनेनं काम केलं जातं, तेव्हा त्या कामातली गुणवत्ता आणि त्यातून मिळणारे रिझल्ट्स (परिणाम) हे उच्च दर्जाचे असतात. त्यामुळेच नि:स्वार्थीभावनेनं समाजोपयोगी काम करणाऱ्या अनेक जणांकडून स्तिमित व्हावं असं अचाट काम झालेलं आपण पाहतो. या उत्कट भावनेला निखार येण्यासाठी मात्र मनातला उद्देश हा एक तर उदात्त हवा किंवा ‘एव्हरेस्ट’इतका भव्य हवा! उदात्त उद्देश आणि त्याची पूर्तता करणारी उत्कट भावना, याचा एकत्रित आविष्कार हा दिव्यत्वाची प्रचिती देणारा असतो, हे आपण आजूबाजूच्या अनेक उदाहरणांवरून बघतो.

बऱ्याचदा असं म्हटलं जातं की, ही जगणं ‘गाणं’ करण्याची भावना किंवा तिला सूर देणारा उद्देश हे अंगभूत असावं लागतं किंवा ते जन्मत:च येतं. मला नाही वाटत तसं! बहुतांशी लोक जन्माला येताना एकाच प्रकारची शारीरिक आणि मानसिक क्षमता घेऊन जन्माला येतात. (काही अपवाद असतात.) ते लक्षात न घेता बहुतेकदा असामान्य लोकांना आपण देवत्व देऊन मखरात बसवून टाकतो आणि आपणही काही भरीव करू शकतो, या भावनेला तिलांजली देतो. जन्मानंतरची जडणघडण- त्यातही मानसिक, ही कौटुंबिक आणि सामाजिक ‘इकोसिस्टीम’वर (परिसंस्थेवर) अवलंबून असते. किंबहुना असं म्हटलं जातं, की वयाच्या सातव्या वर्षापर्यंत माणसाचा मेंदू आपल्याला हवा त्या पद्धतीनं विकसित करता येतो; पण याचा अर्थ असा नाही, की त्यानंतर त्या विचारात बदल घडवून आणता येत नाही. तो बदल घडवता येतो. फक्त त्यासाठी ‘लर्निग- अनलर्निग- रीलर्निग’ ही पद्धती समजून घ्यावी लागते. थोडक्यात सांगायचं तर आतापर्यंत जी काही जीवनकौशल्यं आपण शिकलो, ती एक तर कुणाला तरी हस्तांतरित करण्यात शहाणपण असतं. हे झालं ‘अनलर्निग’. एकदा ते केलं, की आपण नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होतो. या नवीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याला पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागते. त्यासाठी वेगळी कौशल्यं नव्यानं शिकावी लागतात. ही झाली ‘रीलर्निग’ची पद्धत. यामुळे जगण्यात नावीन्य येते. कुठलंही काम करताना ‘हे बोअर झालं आहे’ ही भावना मनाला शिवत नाही. नवनवीन आव्हानं वयाच्या कुठल्याही टप्प्यात स्वीकारण्यासाठी मन घाबरत नाही.

ही वरची श्रंखला लक्षात आली, की त्याला पूरक गुण असतो तो म्हणजे योजनाबद्ध नियोजन. नियोजनाशिवाय जर काही काम हातात घेतलं, तर अपयशी इतिश्री होण्याची मुहूर्तमेढ आपण रोवत असतो. नियोजन या प्रकारावर थोडा जास्त वेळ काम केलं, तर ते काम नंतरच्या काळात पूर्णत्वाला जाण्याची शक्यता जास्त असते. एकदा का नियोजन झालं, की पुढची महत्त्वाची पायरी आहे, ती म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. बऱ्याचदा आपण योग्य निर्णय कसे घेता येतील याची वाट बघतो. इथे गंमत अशी आहे, की जे लोक लौकिकार्थानं सातत्यानं योग्य निर्णय घेत असतात, त्यांनी आयुष्यात कधीकाळी खूप चुकीचे निर्णय घेतलेले असतात. त्यातून जे अनुभव पदरात पडतात त्यातून मग योग्य निर्णय घेण्याची सवय लागते. वेगवेगळ्या अनुभवांतून निर्णयक्षमता विकसित करावी लागते.

हेही वाचा – शाळेची वेळ सकाळची की दुपारची?

निर्णयक्षमता अंगात बाणली गेली की त्याला जोड लागते ते कृतिशीलतेची. कृतीविना निर्णय हे फक्त स्वप्नच राहतं. कामात चालढकल करणं हे खरं तर कृती टाळणं असंच असतं. त्यामुळे एखादं काम हातात घेतलं तर ते लवकरात लवकर तडीला नेण्यात आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती खर्च करण्याची तयारी हवी. हातात घेतलेल्या कामाला तडफेच्या कृतीची जोड देत ते जर पूर्णत्वाला नेलं, तर त्यातून मिळणारा आनंद हा स्वर्गातीत असतोच, शिवाय आपल्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास आपसूक येतो.

या तीन गुणांबरोबर गरज असते ती चिकाटीची आणि पाठपुराव्याची. ‘मॅकडोनाल्ड’चे संस्थापक रे क्रॉक यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट आहे- ‘फाऊंडर’. त्यात क्रॉक यांच्या तोंडी एक सुंदर वाक्य आहे, ‘Perseverance beats genius. एखाद्याच्या अंगात भले हुशारी कमी असेल, पण त्याची पाठपुरावा करण्याची क्षमता असेल, तर तो आयुष्यात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. मला असे अनेक यशस्वी लोक माहिती आहेत, की ज्यांनी आपली काही स्वप्नं वर्षांनुवर्ष मनाशी जपून ठेवली आहेत आणि योग्य वेळी निर्णय घेत, कृतिशीलतेची जोड देत आश्चर्यकारक प्रगती केली आहे. तर आहे हे असं आहे! जे लोक आयुष्य ‘अर्हसमस्ती’ पद्धतीनं जगतात आणि जे लोक फारसं काही दखलयोग्य जगू शकत नाहीत, त्यांच्या विचारधारेत हा पंचसूत्राचा मूलभूत फरक आहे असं माझं मत! लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला दिवसाचे २४ तास मिळाले आहेत. त्या वेळेचा वापर आपण किती ‘इफेक्टिव्ह आणि प्रॉडक्टिव्ह (परिणामकारक आणि उत्पादक रीतीनं) करतो, हे आपल्या हातात आहे. येणाऱ्या नवीन वर्षांत तो तसा करता यावा यासाठी हार्दिक शुभेच्छा!

rmandlik87@gmail.com

Story img Loader