सुजाणपालकत्व
परीक्षा हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातला अपरिहार्य भाग. प्रत्येकाच्या जीवनात ती वेगवेगळ्या पद्धतीने येते. काहींच्या जगण्यात शांत, सहजपणे तर काहींच्या घरात भांडणाचा विषय, आई-वडिलांशी नाते खराब करणारी असते. मुलांची निरीक्षणशक्ती चांगली असते, ती पालकांना नीट जोखत असतात. म्हणूनच पालक म्हणून आपली जबाबदारी असते, त्यांना समजून घेण्याची.
रीक्षा म्हटली की ताण येणारच, असं आपण गृहीत धरतो. म्हणूनच मुलांना खरोखरच परीक्षेचा ताण, दडपण येतं का हे जाणून घेण्यासाठी मी काही मुलांशी खास गप्पा मारल्या. त्या काळातली त्यांच्या घरातली परिस्थिती जाणून घेतली. त्यांना विचारलं, ‘‘तुम्हाला वार्षिक परीक्षेचं टेन्शन येतं का,’’ त्यावर सर्वाचं उत्तर होतं, ‘‘आम्ही फारसं टेन्शन घेत नाही,’’ पण तमाम मोठी मंडळी परीक्षेचं टेन्शन घेतात आणि आम्हाला देतात. निहारिका, मधुरा, वरदा, पृथिका, गौरी, आयुष, रोहन अशी ही वेगवेगळ्या बोर्डाच्या शाळांतून शिकणारी. यांची माध्यमं वेगळी. पुणे, घाटकोपर, सायन, विलेपार्ले, अंधेरी मुंबईतल्या शहरातली. त्याच्यातला हिरेन यूपीचा. या मुलांपैकी ५० टक्के मुलांच्या आया होममेकर होत्या. ४५ टक्के मुलांच्या आई नोकरी करीत होत्या. तर ५ टक्के प्रोफेशनल होत्या.
या मुलांना माझा पुढचा प्रश्न होता, ‘‘मोठी माणसं जास्त टेन्शन घेतात, हे तुम्ही कशावरून म्हणता?’’ त्यावर त्यांनी कारणांची भली मोठी यादी दिली. ‘‘आता स्पोर्ट्स, गॅदिरग, पिकनिक सारं संपलं. आता अभ्यासाला लागा अशा माईकवरून शाळेत सूचना दिल्या जातात. ‘एचएम’च्या राऊंड वाढतात. शिक्षक मागे लागतात, वहय़ा पूर्ण करा. प्रोजेक्ट सबमिट करा. पीटीच्या तासांना बुट्टी मिळते. जास्तीचे तास घेतले जातात. घरी बाबा थोडे कुल असतात पण आई, आजी, आजोबा याचं वागणं बदलतं. आजी-आजोबा सांगतात, ‘‘पोरांनो यश मिळवा. आमच्या भरवशावर तुमचे आई-बाबा तुम्हाला सोपवून कामाला जातात. त्यांनी ठपका ठेवता कामा नये. आई-बाबा बजावतात. वर्षभर आम्ही तुम्हाला तुमच्या मनासारखं करू दिलं. कधी अडवलं नाही. आता आमचं ऐका. टीव्ही, खेळ, मोबाइलवर गप्पा मारणं, गाणी ऐकणं सारं बंद. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींवर चर्चा, वादविवाद भांडणं होतात. अबोला धरला जातो. आमच्यासाठी केलेल्या खर्चाचा, कष्टांचा हिशेब मांडला जातो. या बदल्यात आमच्याकडून भरपूर मार्काची अपेक्षा असते. जरा त्यांच्या मनाविरुद्ध झालं की सुनावलं जातं. २-४ रुपये कमवावे लागले, फाके पडले, एखादा दिवस घराबाहेर राहावं लागलं की मग डोकं ठिकाणावर येईल. होस्टेलवर ठेवण्याची धमकी दिली जाते. वर्षभराच्या परीक्षेत कमी गुण मिळवणाऱ्यांच्या घरी मारझोडही होते. कधी अभ्यास घ्यायला आजी-आजोबांना बोलावलं जातं. आईच बहुधा रजा घेऊन घरी राहते.’’ मुलं एकामागोमाग एकेक सांगतच जातात.
‘‘तुमच्या पालकांना असं टेन्शन का येत असेल असं वाटतं तुम्हाला? आणि तुम्ही बिलकूल टेन्शन फ्री असता?’’ असं विचारताच त्यांनी प्रामाणिकपणे उत्तर दिलं, ‘‘आम्ही पास होऊ का? किती मार्क मिळतील याचं आम्हाला टेन्शन नसतं. कारण आम्ही वर्षभर अभ्यास करतो.’’
निहारिका, वरदा, गौरी यांनी आत्मविश्वासानं सांगितलं, ‘‘आमची आई आमच्यासाठी खूप काही करते. तिनं आम्हाला असं घडवलं आहे की, आम्हाला कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. तिनंच आम्हाला अभ्यासातल्या ट्रिक्स सांगितल्या. कामावर जाताना ती सांगून जायची. हे धडे वाचून ठेव. हे प्रश्न सोडव आदी आणि कितीही उशिरा आली तरी चौकशी करायची. कधी उत्तरात सुधारणा सांगायची. तिला स्वत:ला वाचनाची आवड. ती आम्हाला पुस्तक आणून द्यायची. आता आम्ही वाचनालयात जातो. आवडतील ती पुस्तकं आणतो. तिनं आमच्याकडून वेगळ्या वहय़ा बनवून घेतल्या आहेत. त्यात चांगली वाक्ये, कोट्स, कविता असं बरंच काही आहे. शिवाय निबंधाची वही आहे. अनेक विषयांवर तयारी करून त्यात निबंध लिहून ठेवलेले असतात. प्रवासात, पाहुण्यांवर झालेल्या गप्पा, महत्त्वाच्या घडामोडी, त्यावर जे जसं जमेल तसं पण स्वत:च्या शब्दात लिहून ठेवलं जाते. रोज वृत्तपत्र वाचण्याचा तिचा आग्रह असतो. आतातर आम्ही इंटरनेटही वापरतो.’’
‘‘आम्हीच कितीतरी विषयांवर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवतो. एखादा विषय कळला नाही तर आई-बाबा तोच भाग परत परत वाचायला सांगतात. ते माझे विद्यार्थी बनतात. मी त्यांची टीचर. मग हळूहळू सारं सोपं वाटत जातं. मोठय़ा सुट्टीतही ती काहीतरी अॅक्टिव्हिटी करायला सांगते. आईच सांगते, प्रत्येक गोष्ट एन्जॉय करायला शिका. अगदी अभ्यास, जबाबदारीसुद्धा. तसंच आम्ही सर्व वर्षभर कसल्या ना कसल्या परीक्षा देतच असतो. स्कॉलरशिप, गणिताच्या प्रज्ञा, प्रावीण्य, टिळक महाराष्ट्र हिंदी राष्ट्रभाषा यांच्या भाषांसाठीच्या परीक्षा. आई-बाबा तर छोटय़ा छोटय़ा प्रश्नपत्रिका नेहमीच बनवतात. आमच्याकडून सोडवून घेतात. थोडक्यात परीक्षांना आम्ही यूज टू झालेलो असतो. पण तरीही आई-बाबांना आम्हाला जास्त मार्क मिळावेत, असं दोन कारणांसाठी वाटतं. ‘‘एक त्यांना आमच्या १० वी १२ वी नंतर काय याची चिंता असते आणि त्याहीपेक्षा मोठी भीती असते, आम्ही मार्कात घसरलो तर आमचे मित्र-मैत्रिणी बदलतील याची.’’
मी विचारलं, ‘‘मार्क कमी पडले म्हणून मित्र कसे बदलतील’’? त्यावर निहारिकानं स्पष्टीकरण दिलं. तिची आई डॉक्टर आहे. बोर्डाच्या परीक्षेत मेरिटमध्ये आलेली. निहारिकाही खूप स्मार्ट. अनेक क्विझ, कॅम्पिटिशन्स, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला. अगदी स्वत:हून. तिच्या आई-बाबांचं म्हणणं ‘‘भरपूर तयारी कर. भाग घे, पण यश नाही मिळालं तर मूड खराब करून घेऊ नकोस.’’ ती सांगते, ‘‘अशा स्पर्धात मिळवलेली बक्षिसे, परीक्षेत मिळालेले मार्क हे असतात आमचे स्टेट्स सिम्बॉल्स, आमच्या हुशारीची मोजपट्टी. आपण वर्गात मग उठून दिसतो. टीचर वेगळ्या वागतात आणि आपल्याचसारखे. आपल्या विचारांचे मित्रही आपल्याला मिळतात. नाहीतर हल्ली मुलंच काय अगदी मुलीसुद्धा खूपच आगाऊ झाल्या आहेत.’’ तिची री ओढत बाकीच्यांनी पुस्ती जोडली. वर्गातली खूप मुलं टय़ूशनला जातात. शाळा आणि क्लासमध्ये भर असतो केवळ पाठय़पुस्तकांवर. तोच अभ्यास. भरपूर गृहपाठ. मग ती कंटाळतात. त्यांचा वेगळा कंपू बनतो. वर्ग सुरू असताना यांचे भलतेच उद्योग चालतात. शिक्षकांना आणि पालकांना ही मुलं थापा मारतात. फसवतात. कधी शाळा तर कधी क्लास बंक करतात. मग ती फिरायला जातात. कोणाच्या तरी घरी जमतात. भंकस करतात. मुलींच्या गप्पा खूपच गर्लिश असतात. मुलांना पी. जे. आवडतात. मुलींवर कॉमेंट्स करणं, नव्या शिव्या, कोडवर्ड्स कॉइन करणं ते एन्जॉय करतात. फेसबुक, त्यांचं फेव्हरिट. अशी मुलं कित्येक वेळा वर्गात डोकेदुखी असतात. वर प्राऊडली सांगतात. कोणाची कशी फिरकी घेतली, कोणाला मामा बनवलं. कोणाला उल्लू बनवलं. यांच्या वहय़ा कधीच पूर्ण नसतात. अभ्यास झालेला नसतो. विषय कळलेला नसतो. मग ती हुशार मुलांना त्यांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. पार्टीला बोलावतात. पिकनिकला येण्याचा आग्रह करतात. प्रेझेंट देतात. खूप स्तुती करतात म्हणूनच यांच्यापासून सावध असावं लागतं. या मुलांना मग वार्षिक परीक्षेचं टेन्शन येतं. भीती वाटते. आजारपण येतं. रात्रीची झोप येत नाही. ही मुलं एकदम गप्प होतात. डबा खात नाहीत. ग्राऊंडवर खेळायला येत नाहीत. हुशार मुलांच्या वहय़ा मागून घेतात. झेरॉक्स करतात. यांचा सारा भर असतो पाठांतरावर. ही मुलं कॉपी करायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. त्यांना रडूदेखील येतं.’’ मुलं न थकता बोलत होती..
हे सर्व पीयूष आणि हरेन आत्तापर्यंत शांतपणे ऐकत असतात. आता मात्र त्यांना राहवत नाही. ते सांगतात. ‘‘अजब बच्चे है ये। और उनके घरवाले भी। खाली मार्क की बाते करते है क्या? उनको सिखाते नही है क्या की अच्छे आदमी बनो। कुछ अच्छा काम करो। तुम्हें आगे बढना है। पपा के हाथ बटाना है। अपना कारोबार बनाना है।’’
पीयूषच्या बाबांचा छोटा व्यवसाय आहे. हिरेनचे बाबा शेतकरी आहेत. त्यांच्या आया खूप शिकलेल्या नाहीत. त्यांना मुलांच्या मार्काचंही खूप अप्रूप नाही. त्या रोज त्यांना देवासमोर उभं करतात. देवाला दिवा लावून नमस्कार करायला सांगतात. आणि वदवून घेतात, ‘‘अच्छे आदमी बनेंगे। भगवान उसे मदत करते है, जो खुद की मदत करता है।’’ म्हणून ते, त्यांचे पालक वार्षिक परीक्षेचं टेन्शन घेत नाहीत. प्रथम तेच अभ्यास करीत. पण खूप टीव्ही बघू लागले तर मात्र परीक्षेच्या आधी बंदी येते. बाकी सर्व ठीक असतं. ही मुलं काही खास मुलांबद्दल सांगतात, ‘‘काही मुलं खूपच बिनधास्त असतात. म्हणजे ती नेमकी कशी असतात, तेच समजत नाही. त्यांना अभ्यास येत नसतो आणि त्याचं त्यांना काही वाटतही नसतं. कदाचित त्यांना कोणी अभ्यास म्हणजे काय, तो कसा करायचा हे सांगितलेलं नसतं. त्यांना लिहायला, वाचायलाही धड येत नसतं. मग ती सतत नापास होतात. शाळा त्यांना मदत करायचा प्रयत्न करते. स्पेशल टीचर नेमते. जास्तीचे तास घेते. री एक्झाम घेते. पण त्याचं त्यांना काहीच वाटत नसतं. त्यांचे पालक गरीब की श्रीमंत आहेत, सुशिक्षित वा अशिक्षित काही फरक नसतो. त्यांचे पालक कधी येतच नाहीत शाळेत. मुलं त्यांचं ऐकत नाहीत. मग हळूहळू ती निर्ढावतात-बिनधास्त बनतात. त्यात आता कोणालाच नापास करायचं नाही. मग काय.. ती शाळेत केवळ टाइमपास करायला येतात. काहींचे पालक मात्र मुलं थोडी मोठी झाली की बदलतात. जागे होतात. मग घरात भांडणं होतात. शिक्षक त्यांना रागावत असतात. त्यांच्याही सहनशीलतेला मर्यादा असते ना? मग मात्र हय़ा मुलांना घाम फुटतो. ती आपापसात बोलतात, ‘‘अरे यार घर छोड के भागना चाहिये।’’ कोणी तर म्हणतात, ‘मर जाना चाहिये।’ यांना आपण मदत करणंही व्यर्थ असतं. काही वेळा रिस्कीही. ती आपला हात पकडून स्वत: तर वर येतील आणि आपल्याला खाली खेचतील. ‘‘त्यांना टेन्शन केवळ परीक्षा नाहीतर लाइफचं असतं.’’ या बोलण्यावर आपणही संचित होऊन जातो..
‘‘मुलांशी या विषयावरच्या गप्पा संपणाऱ्या नसतात. कारण परीक्षा या प्रत्येक मुलाच्या आयुष्यातला अपरिहार्य भाग. प्रत्येकाच्या जीवनात ती वेगवेगळ्या पद्धतीने येते. काहींच्या जगण्यात शांत, सहजपणे तर काहींच्या घरात भांडणाचा विषय, काहींसाठी ती आई-वडिलांशी नाते खराब करणारी असते तर काहींसाठी घरातून बाहेर पाडणारी असते. मुलांची निरीक्षणशक्ती चांगली असते, ती पालकांना नीट जोखत असतात. त्यावरून काही ठरवतही असतात म्हणूनच पालक म्हणून आपली जबाबदारी असते त्यांना समजून घेण्याची.