‘स्त्री’ने हातात छापील पुस्तक धरले तर नवऱ्याचे आयुष्य कमी होते. असा वेडगळ धाक ज्या काळात स्त्रियांना सतत घातला जात असे, त्या काळात ‘स्त्रीशिक्षण’ कृतीत उतरणे सहज शक्य नव्हते. ही परिस्थिती ओळखून संपादकांनी स्त्रीशिक्षण अनेक प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवलं आणि ज्ञानाचा विस्तार होत गेला.
एकोणिसाव्या शतकात नवशिक्षणाचा प्रारंभ आणि त्या दृष्टीने होणाऱ्या कार्यातून त्या काळातील विचारवंतांना शिक्षणाविषयी, ज्ञानाविषयी ‘नवदृष्टी’ प्राप्त झाली. शिक्षण, ज्ञान, विद्या इत्यादी विषयीच्या पारंपरिक कल्पना बदलून त्याविषयी व्यापक दृष्टी आली. व्यक्ती, त्यांचे जीवन व समाज या दृष्टीने शिक्षणाचे महत्त्व केवळ औपचारिक शिक्षणापुरते नसून विविध कला, विद्या, व्यावसायिक कौशल्ये इत्यादी विषयही ज्ञानाच्या कक्षेत येतात. याविषयी महत्त्वाचे भान आले. त्याच वेळेला मराठी गद्य लेखनाचा विकास होत होता. विविध विषयांच्या मांडणीला गद्य लेखनाची मदत होत होती.
याच दृष्टीने स्त्री-जीवनाचाही विचार करण्याची प्रेरणा मिळाली. ज्ञानाच्या नवदृष्टीने स्त्रीशिक्षणाच्या कक्षेतसुद्धा अनेक विषयांचा सहभाग होऊ लागला. शिवण, वीणकाम, रांगोळी, स्वयंपाकातील विविध पदार्थ, घरगुती औषधोपचार, बाळाचे संगोपन इत्यादी विद्या/कला स्त्रिया घरात अनौपचारिक पद्धतीने शिकत होत्या. घरातील मोठय़ा स्त्रियांच्या हाताखाली काम करता करता स्त्रिया तयार होत. एका पिढीकडून ज्ञान दुसऱ्या पिढीपर्यंत पोचवले जाई. परंतु हे सर्व विषय केवळ अनुकरणातून जाणून घ्यायचे नसून शिकण्याचे आणि शिकवण्याचे आहेत. अंदाजे-अदमासे हे प्रमाण नसून ‘प्रमाणशीर’ शिकण्याचे आहेत. ही जाणीव बदलत्या काळाने ‘शिक्षणाच्या दिव्य दृष्टीने’ करून दिली होती. त्यामुळेच स्त्रियांच्या मासिकांतून अन्य विषयांचा समावेश ज्ञानविषय म्हणून झाला होता. ‘मनोरंजना’ची दृष्टी त्यामागे नव्हती हे विशेष.
‘सुमित्र’ने ‘शिवणकाम’ हे स्वतंत्र सदरच सुरू केले होते. कानटोपी, परकर, तुमान, झबले, अंगरखा इत्यादी कपडे कसे बेतावेत, कसे शिवावेत याविषयी पद्धतशीर मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे चोळी बेतायची असेल तर मागचे-पुढचे भाग कसे मोजावेत, मापे कशी घ्यावीत, कापडाची घडी कशी घालावी याचे आकृतीसह स्पष्टीकरण केले आहे. आकृत्यांमध्ये भूमितीत कोनांना अक्षरे देतात तशी अक्षरे देऊन कपडा कसा कापावा हे स्पष्ट केले आहे. शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन करण्याची दृष्टीच त्यामागे होती.
आज वृत्तपत्रांपासून दूरचित्रवाणीच्या सर्व वाहिन्यांपर्यंत पोचलेला ‘खाना खजाना’ स्त्रियांच्या मासिकातही होताच. परंतु त्यामागील दृष्टी वेगळी होती. पाककलेसंबंधी सदर, सुरू करण्यापूर्वी ‘अबला मित्र’च्या संपादकांनी ‘पाकशास्त्र’ शब्दाची फोड करून विषयाचे महत्त्व सांगितले आहे. ‘पाक’ शब्द पच् धातूनिर्मित असून- याचा अर्थ पक्य करणे किंवा शिजविणे. शिजविलेला पदार्थ तो पाक. पदार्थ पक्त करण्याची कृती ज्यात सांगितली आहे ते पाकशास्त्र किंवा स्वयंपाकशास्त्र होय.
मुलींना स्वयंपाक हा विषय हलका वाटू नये. म्हणून पाककृतीची माहिती दिली पाहिजे. असे ‘स्त्री-सौंदर्य लतिका’च्या संपादकांना वाटत होते- आपल्या देशातील बहुतेक सर्व स्त्रियांस पाककला अवगत आहे. परंतु अलीकडील आमच्या विद्याभिलाषी भगिनींस विद्येची रुची लागल्यापासून हे कृत्य त्यास हलके वाटते. त्यामुळे त्यांचे ठायी या संबंधीची मोठी उणीव दिसते. हे आश्चर्य नव्हे काय? त्यासाठी स्वयंपाकाचे मार्गदर्शन हवे असे जाणवल्यानेच मोरांबा, साखरांबा,  करंज्या, चिरोटे, साखरभात, मांसभात (बिर्याणी) इत्यादी पदार्थाची कृती, साहित्य प्रमाण देताना पदार्थ उत्तम व्हावा म्हणून काही सूचनाही दिल्या आहेत. अगदी ‘कणीक कशी भिजवावी’ याविषयीसुद्धा मार्गदर्शन आहेच.
‘स्त्रियांचे आरोग्य’ हा अत्यंत दुर्लक्षित विषय होता. वारंवार येणारी बाळंतपणे, सुईणीचे अज्ञान, योग्य काळजीचा अभाव इत्यादी कारणांनी स्त्रियांना-मुलांना त्रास सहन करावा लागे. बालमृत्यू, बाळंतपणात स्त्रियांच्या मृत्यूचे प्रसंगही उद्भवत. म्हणूनच स्त्रियांच्या मासिकांनी ‘आरोग्य’ हा विषय अतिशय गंभीरतेने मांडलेला दिसतो. ‘अबला मित्र’मध्ये ‘मातृशिक्षा’ नावाने लेखमालाच प्रसिद्ध झाली. बाळंतिणीचा आहार, बाळंतिणीची खोली कशी असावी, तसेच स्त्रियांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर मार्गदर्शन असे. ‘गृहिणी’ मासिकाने ‘शिशुजनन’ या विषयावर लेखमाला प्रसिद्ध केली. गर्भाची होणारी प्रगती, गर्भिणीचा (गर्भवती स्त्रीचा) आहार, गर्भारपणातील धोके, प्रसूतीचे टप्पे, सुईणीची जबाबदारी इत्यादी विषयांवर अतिशय सोप्या भाषेत माहिती दिली.
स्त्रियांच्या आरोग्याप्रमाणे मुलांचे आरोग्य, संगोपनही तितकेच महत्त्वाचे होते. म्हणूनच ‘सुमित्र’मध्ये ‘बालकांचा सांभाळ’ नावाचे सदरच होते. शास्त्रीय माहितीसह, मुलाला अंगावर पाजताना काळजी कशी घ्यावी, भरपूर दूध येण्यासाठी काय करावे इत्यादींच्या सूचना असत. पूर्वी एखाद्या स्त्रीला अजिबात दूध येत नसेल तर ‘दाई’ ठेवत. ‘दाई’ कशी निवडावी याविषयीच्या सूचना बघण्यासारख्या आहेत-कित्येक स्त्रियांस अगदी दूध येत नसेल तर त्यांनी आपली मुले पाजण्याकरिता दाया ठेवाव्या. पण दाई ठेवताना तिची बारकाईने चौकशी केली पाहिजे. ती अशी की, या बाळंत झालेल्या स्त्रीच्या वयाचीच ‘दाई’ असावी. आई ज्या सुमारास बाळंत झाली असेल त्याच सुमारास दाई बाळंत झालेली असावी. आणि याखेरीज ती दाई निरोगी असून स्वभावाने अम्मलादी गुणांची नसून चांगल्या स्वभावाची असावी.
‘अबला मित्र’मधून ‘मुलींस सदुपदेश’ सदरातून बालसंगोपनाविषयीचे मार्गदर्शन असे. ‘स्त्री -शिक्षणचंद्रिका’ मधून ‘इंद्रिय विज्ञानशास्त्र’ सदरातून आरोग्य, शरीरशास्त्राची माहिती, व्यायामाचे महत्त्व स्पष्ट केले. ‘स्त्री सद्बोध चिंतामणी’तून ‘आरोग्य पालन’ विषयावर लेख येत.
शिक्षणासाठी स्त्रियांची मानसिक तयारी करणे हासुद्धा शिक्षणाचाच एक भाग होता. ‘अबला मित्र’ चे संपादक रावजी हरी आठवले यांनी तर स्पष्टपणे लिहिले, ‘स्त्री-शिक्षणाकरिता कितीही पुस्तके निघाली व कितीही चर्चा झाली, तथापि प्रत्येक अबलेने हे काम आपल्यावरच अवलंबून आहे, असे मनात आणले तरच या सर्व प्रयत्नांचे सार्थक होईल. या यज्ञाचा जर अबलाजनांस काही उपयोग होईल तरच अंशत: तरी सार्थक झाले, असे तो समजेल.’’
‘स्त्री-शिक्षण’ ही बाबच समाजाला सहजतेने पटणारी नव्हती. मनाने पटले तरी कृतीत उतरणे सहज शक्य नव्हते. स्त्रिया तर पूर्णपणे परावलंबी होत्या. स्त्रियांना मनातून शिकावेसे वाटले तरी अनेक अडचणी समोर असत. अनेक कारणांनी शिक्षणात खंड पडत असे. मुलं मोठी होऊन प्रश्न विचारू लागली की, आईला उत्तर देता येत नसे. ही स्त्रियांची परिस्थिती संपादक स्त्रियांपुढे अनेक प्रकारांनी मांडत. लोकशिक्षण व मानसिक जागृती करण्याचाच प्रयत्न असे. कुटुंबात स्त्रियांच्या शिक्षणात येणाऱ्या अडथळ्यांचे वर्णन ‘सुमित्र’मध्ये कवितेतून मार्मिकपणे केले आहे.
आज बहीण घरां आली। उद्या सासरी गेली॥
परवा नहाण माखणें। पर्वा ओटी भरण्या जाणे॥
दहा दिवस महिन्यात। पाहतो हजीर दिसत॥
जाय आलेले विसवून। नव येईल कुठून॥
असता सर्व ऐसी स्थिती। दोष शिक्षका लावती॥
मुलगा मोठा होऊन अनेक प्रश्न विचारू लागल्यावर आईची होणारी स्थिती ‘स्त्री-शिक्षणचंद्रिका’ मासिकातील कवितेत अतिशय वास्तववादी स्वरूपात स्पष्ट केली आहे.

‘‘मोठा होता पाहुनी जाग जागी।
नाना वस्तू पुसतसे आई लागी।
सांग माते सांग हे काय आई।
कैसे झाले कोणी केले अगाई।
नाही माते स्वप्नही ज्ञान गंध।
कैसा बाई पुरवू बाळछंद।
अज्ञानाने होतसे फार खिन्न।
आडी नाही पात्री येई कुठून।
वेळोवेळी बाळ काही विचारी।
होई तेव्हा कष्टी भारी बिचारी।
ठायी झाली योग्यता तीस साची।
 झाली इच्छा मनाशी शिक्षणाची।
गेला काळ तो शिक्षणाचा।
ज्ञानाचा तो लाभ होईल कैचा!
चिंतेने या जाहली फार चूर।
केंव्हाही ना शिक्षणाने उशीर।

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
woman police officer stealing bananas from elderly women video viral on social media
स्कूटरवरून आली अन् वृद्ध महिलेला…, महिला पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात दादागिरी? VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!

अज्ञानाच्या जाणिवेने खिन्न होणाऱ्या आईला कवी शेवटी – ‘केव्हाही ना शिक्षणाने उशीर’ म्हणून जो दिलासा देत होता तो दिलासा, प्रोत्साहनच त्या काळात अतिशय महत्त्वाचे होते. विविध स्वरूपात स्त्रीमनाशी होणारा संवादच स्त्रियांना वास्तवाची, बदलत्या काळाची, स्वत:च्या जीवनाची आणि शिक्षणाच्या आवश्यकतेची जाणीव परत परत करून देत होता.
‘स्त्री’ने हातात छापील पुस्तक धरणे तर नवऱ्याचे आयुष्य कमी होते, असा वेडगळ धाक ज्या काळात स्त्रियांना सतत घातला जात असे त्या काळातील स्त्रीचे मानसिक संवर्धन स्त्रीमनाशी होणाऱ्या संवादातूनच घडत होते.