वय, शिक्षण, पैसाअडका, जातपात वगैरे सगळ्या बाबतीत नवरामुलगा नवऱ्यामुलीपेक्षा अमुक इतकी अंगुळं वरच असला पाहिजेच हा आग्रह आतातरी सुटतोय म्हणता? नाव सोडा. मागचे लोक हे स्वत:च्या तोंडाने स्पष्ट बोलायचे. नवे लोक इतरांवर ढकलतात. एवढाच काय तो फरक!
त्या वधूवर सूचक मंडळाच्या संचालकांसमोर बसून वधूच्या माहितीचा फॉर्म भरून देत होते. वर्षांनुवर्षे पुण्यासारख्या ‘बालेकिल्ल्या’मध्ये एका जागी तळ ठोकून असल्याने अधूनमधून कोणा ट, ठ, ड, ढ, ण साठी ‘स्थळ’ सांगण्याची ‘गोड कामगिरी’ मला पार पाडावी लागते. अनेक स्नेही-सोबती महाराष्ट्राबाहेर, जगभर राहत असतात, त्यांना आपापल्या मुलामुलींचे दोहोचे चार हात करायचे असतात. अगदी इंटरनेटच्या जमान्यातही लग्नासारख्या महत्त्वाच्या विषयात कोणी व्यक्तिगत लक्ष घातलं तर ते त्यांना हवं असतं. तात्पुरतं तेवढं घालायला माझीही ‘ना’ नसते. उपवर कन्येच्या दिल्लीतल्या नोकरीचा पत्ता, तिच्या आईवडिलांचं विशाखापट्टणम्मधलं घर, वडिलांची बोटी बांधण्याच्या व्यवसायातली जगभरातली भ्रमंती असं काहीबाही मी फॉर्मवर उतरवत होते. तेवढय़ात ते संचालक म्हणाले, ‘‘जरा वेगळ्या वळणाचं पण गुणी मुलाचं स्थळ आहे बरं का आपल्याकडे सांगू ?’’
‘‘जरूर. त्या कुटुंबाला त्रिस्थळी यात्रेमध्ये महाराष्ट्रातली चांगली स्थळं समजत नाहीत हीच तर समस्या आहे. कोणाचं आहे हे स्थळ?’’
‘‘चांगल्या घरातला, धट्टाकट्टा, निव्र्यसनी मुलगा आहे बघा. स्वत:चं ऑटोमोबाइल गॅरेज चालवतो. छान बसवलीये उद्योगाची घडी. स्वत: मजबूत पैसे मिळवतो. दहापंधरा लोकांना नोकरीवर ठेवतो. फक्त त्याच्या स्वत:च्या नावाभोवती पदव्यांची महिरप नाही. कॉलेजच्या पहिल्याच वर्षांत शिक्षण सोडलंय वाटतं. चालणार आहे का?’’
‘‘मला चालण्या न चालण्याचा प्रश्न नाही. त्या लोकांना विचारून बघते. पुढच्या वेळी इथे येईन तोवर..’’
‘‘बघा. बहुधा विषय पुढे जाणार नाहीच म्हणा! मुलीपेक्षा ‘खालचं स्थळ’ कशाला कोण पत्करेल?’’
‘‘असंच काही नाही हं. आमचे हे लोक वेगळे आहेत. वडील जगभर कुठेकुठे राहिलेले आहेत. आई त्यांच्याबरोबर नसते तेव्हा विशाखापट्टणमध्ये बरंच सामाजिक काम करते. दोन्ही मुलं वेळोवेळी मोठमोठय़ा हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेताना नाना गटांमध्ये वावरलेली आहेत. जगण्याचा पट विस्तारला की विचारांचा पटही विस्तारतोच ना माणसांच्या?’’
‘बघू या’ ते थंडपणे म्हणाले. त्यांचा निरुत्साह मला खटकला. पण संस्थेतल्या येणाऱ्याजाणाऱ्या माणसांच्या गोंधळात जास्त बोलता आलं नाही.
त्याच रात्री त्या मैत्रिणीचा विशाखापट्टणहून फोन आला. ‘‘गेली होतीस संस्थेत? नोंदवलंस राणीचं नाव?’’ अधीर चौकशी झाली. मुली वयानं, शिक्षणानं, कर्तबगारीनं कितीही मोठय़ा झाल्या तरी एका टप्प्यावर त्यांच्या लग्नाच्या बाबतीत त्यांचे मायबाप किती घाईला येतात. हे मी अनेकदा पाहिलंच होतं. संस्थेची, तिथल्या कार्यपद्धतीची माहिती सांगत म्हणाले,
‘‘विशेष म्हणजे तिथले संस्थाचालक स्वत:ही खूप लक्ष घालताना दिसतात बरं का कामात. अगदी ‘मोले घातले रडाया..’ असा प्रकार नाही. बाय द वे, ते एका वेगळ्या स्थळाबद्दल आस्थेनं सांगत होते. बरं का..’’ मी तोच माहितीचा तुकडा पुढे सरकवला. मैत्रिणीने तोंड भरून दाद दिली.
‘‘अरे वा.. छानच आहे की हे प्रकरण. काय एकेक गोष्टी करतात ना हल्लीचे लोक..’’
‘‘मला पण इंटरेस्टिंग वाटलं. जास्त माहिती काढू या का?’’
‘‘हरकत नाही. पण राणीच्या पप्पांना विचारून पुढे गेलेलं बरं. तसे तर आम्ही सगळेच अगदी नव्या विचारांचे, खुल्या दिलाचे आहोत. पण पप्पा राणीबाबत जरा जास्तच हळवे आहेत. त्यांच्या पण जावयाबाबत काही ना काही अपेक्षा असणारच ना!’’
‘‘प्रश्नच नाही.’’
‘‘शिवाय आम्ही खूप दिवस खटपट करतोय, लेकीचं लग्न जमत नाहीये, आता काहीतरी करून कुठेतरी तिला उजवायचीय असं काही झालेलं नाही आहे आमच्याबाबतीत.’’
‘‘तसं कशाला होतंय? चुकटीसरशी जावई मिळवाल तुम्ही लोक. माझी खात्री आहे.’’
‘‘बघायचं आता काय होतं ते! रोज नव्यानव्या तऱ्हा समजताहेत खऱ्या. परवा एक खूप शिकलेला भिडू समजला होता. सगळं उत्तम होतं त्याचं. पण तो म्हणे आयुष्यभर आदिवासी भागात राहूनच काम करणार होता. तेही एखाद्या एन.जी.ओ.चा आधार न घेता. त्याचा तो! त्याच्या पद्धतीने! त्याला म्हणे शहरातल्या झिजलेल्या ‘रॅटरेस’मध्ये उतरायचंच नव्हतं!’’
‘‘चांगलंय की मग. हल्ली अशाही विचारांची माणसं निघताहेत. आहे कुठेकुठे आशेला जागा आहे ..’’
‘‘हे आपल्याला कळतंय गं. पण लोकांना कळत नाही. जावई काय करतो म्हटलं की काय सांगायचं आपण? आमची मुलं एवढी वर गेलीयेत ना, शिक्षणाच्या बाबतीत.. करिअरमध्ये.. की एकेकदा त्याचंच दडपण येतं. लोकांच्या अपेक्षाही वाढलेल्या असतात अशा मंडळींच्या जोडीदारांबाबत.’’
‘‘ठीक आहे मग, तुमच्या अटींमध्ये बसणारे नवरे मुलगे आढळले की मी कळवत राहीन.’’
‘‘अटी वगैरे काही खास नाहीयेत आमच्या, मुलीला साजेसा जावई असावा एवढी साधी कल्पना आहे. तिचं तिनं लग्न जमवलं असतं तर प्रश्नच नव्हता. तिची पसंती आम्ही १०० टक्के स्वीकारली असती. पण आपण बघतोय म्हटल्यावर चांगल्यात चांगली सांगडच घालायला हवी की नाही?’’
याबाबत दुमत होण्याचा सवालच नव्हता. बोलणं तिथंच थांबलं. दोनतीन दिवस थोडं मागे पडलं. ज्याला-त्याला रोजची धकाधक काय कमी असते? पुन्हा एका रात्री अवचित राणीच्या वडिलांचा फोन आला. माझ्या मदतीबद्दल रीतसर आभार वगैरे मानत म्हणाले,
‘‘ही म्हणत होती, तुम्ही त्या कुठल्या गॅरेजवाल्याबद्दल काहीतरी सांगत होता वगैरे.. तसा मी फार ब्रॉडमाइण्डेड आहे बरं का! माझ्या बाजूने काहीच कसलीच हरकत नाहीये, पण राणीला विचारलं पाहिजे.’’
‘‘अर्थातच!’’
‘‘आफ्टर ऑल, न्यू जनरेशन आहे. त्यांचे विचार नवे असतात. लग्न आपलं करायचं म्हणून केलं, असं आता थोडंच राहिलंय? लग्नानंतर जास्त चांगलं जीवन मिळायला हवं मुलीला. एरवी आज तिला कुठे काय कमी आहे?’’
‘‘अगदी बरोबर आहे.’’
‘‘नवऱ्याबरोबर बाहेर जाताना, इतरांशी त्याची ओळख करून देतात तिला अभिमान वाटला पाहिजे. याबाबतीत आपल्या लोकांच्या कल्पना फार जुनाट आहेत हो अजून. म्हणून वाटतं की..’’
‘‘काही हरकत नाही. मला काय फरक पडतो? या बाबतीत मी फक्त पोस्टमनचं काम करत्येय. फार तर पोस्टवुमन म्हणता येईल. मला त्या वधूवर सूचक मंडळाच्या संचालकांनी सुचवलं ते मी तुम्हा लोकांपर्यंत पुढे पोचवलं एवढंच.’’
‘‘नाही नाहीऽ अशा लोकांचा आदरच केला पाहिजे. सध्याच्या आपल्या एकूण परिस्थितीत सरकारने त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. कुठल्यातरी मल्टिनॅशनल कंपनीच्या अजस्र चक्राचा एकलक्षांश वगैरे कण बनण्यापेक्षा ह्य़ाचं काम मोठं असतं. आफ्टर ऑल, दे जनरेट एम्प्लॉयमेंट फॉर लोकल पीपल यू सी..’’
अशा अर्थाचं बरंच ते बोलले. एकूण अशा धडाडीच्या वगैरे तरुणांसाठी कोणीकोणी काय काय करायला हवं हे त्यांनी भरपूर सांगितलं. ते स्वत: काही करणार नव्हते हे न सांगताच मला समजलं. तरीही त्यांनी एक केलं. राणीला मला फोन करायला लावला. तिनं कुठेतरी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन द्यायला जायच्या घाईत असताना वेळात वेळ काढून माझा फोन नंबर फिरवला. मी तो उचलताच मलाच दाद दिल्यासारखी म्हणाली,
‘‘तुम्ही पण अगदी वेगळाच अँगल दिलात हं मावशी माझ्या लग्नाबाबतच्या खटपटीला!’’
‘‘मुद्दाम नव्हे गं. ओघाने आलं म्हणून. नाहीतर तुमच्यासारख्या एवढय़ा उच्चविद्याविभूषित कुटुंबात मी असलं काही का सांगेन?’’
‘‘ते उच्चविद्या विभूषित-बिभूषित वगैरे सगळं बोलायला ठीक आहे. पण ते तसं करणाऱ्याला ‘अंदर की बात’ चांगली माहीत असते. परीक्षा देण्याची पण सवय व्हायला लागते हळूहळू. ते एक ‘एक्झ्ॉमटेक्निक’ असतं ना, ते कळलं की पुढे काही नसतं विशेष. शिवाय परीक्षांमधल्या यशाचा आयुष्याच्या यशाशी थेट संबंध नसतो तो नसतोच. मला तुमच्या त्या ‘परसन’ला भेटायला आवडेल.’’
‘‘बघ बाई.. तुला वाटत असेल तर..’’
‘‘मिलने में क्या हर्ज है? एखाद्या चांगल्या शिकलेल्या मुलीनं त्याच्याशी लग्न करायलाही हरकत नाही. फक्त पुढेमागे त्याच्या मेल-इगोचा, पुरुषी अहंकाराचा प्रश्न यायला नको.’’
‘‘कोण जाणे!’’
‘‘कोण जाणे कशाला? मी सांगते. नवरा बायकोपेक्षा कमी शिकलेला असणार. अधूनमधून बाहेरचे लोक ते उगाळणार. तो दुखावणार. मग एकदम कधीतरी त्याची नवरेशाही उफाळून येणार. कमी शिकलेलाच कशाला हवा, कमी देखणा.. कमी कमावणारा, कोणीही घ्या. आपलं गौणपण जन्मभर स्वीकारणं त्याला जमणार नाही. लोक त्याला ते जमू देणार नाहीत. ‘आ बैल मुझे मार’ असं करायला सांगितलंय कोणी?’’
‘‘हे असंच असतं का सगळं? अगदी आजच्या काळातही?’’
‘‘माझ्या एका खूप सुंदर मैत्रिणीनं एका अगदीच पर्सनॅलिटी नसलेल्या माणसाशी लव्हमॅरेज केलंय. तिची फरपट बघत्येय ना मी.. आता खूप घाईत आहे म्हणून बंद करते फोन. बट, वन थिंग इज सर्टन. एक वेळ अशी जोडपी निभावून नेतील. आपलं काही नसतं हो, पण बाहेरचे लोक प्रॉब्लेम्स तयार करतात. अवर पीपल.. आय टेल यू..’’
किती खात्रीने ती म्हणत होती. आपलं काही नसतं! तिचं काही नव्हतं. तिच्या मम्मीचं काही नव्हतं, तिच्या पप्पाचं काही नव्हतं. म्हणजे एकूण त्यांच्या बाजूने नकारात्मक असं कोणाचं काही नव्हतंच. सगळा प्रश्न काय तो लोकांचा होता. एकूण लोकांना असले प्रश्न निर्माण करणारे लोक कुठे भेटतात, आपल्याला ते कुठे भेटतील, भेटलेच तर आपण त्यांना कसे खडसावू, असले भलभलते विचार माझ्या मनात येत राहिले.
ठरलेल्या मुदतीनंतर पुन्हा त्या संस्थेत त्याच संचालकांसमोर जाण्याची माझी वेळ आली. कोऱ्या चेहऱ्याने लग्नाळू मुलग्यांच्या नोंदीचं एक भलंमोठं रजिस्टर माझ्यापुढे टाकताना ते म्हणाले,
‘‘निदान पोस्टग्रॅज्युएशनच्या खालची स्थळं उतरवून घेऊ नका बरं का. उगाच कुठे कोळशाची दलाली करून हात काळे करताय?’’
‘‘असंच काही नाही अगदी.’’
‘‘मग कसं? पस्तीस र्वष हे वधूवर सूचक मंडळ चालवतोय मॅडम. एक-दोन वर्षे नाही. खूप पाहिलीय दुनिया. लग्न जुळवणाऱ्यांनी भलेही कॉम्प्युटरवर कुंडल्या जमवल्या किंवा स्काइपवर मुलं पाहिली म्हणजे झाले का सगळे चकाचक, आधुनिक? शेवटी वय, शिक्षण, पैसाअडका, जातपात वगैरे सगळ्या बाबतीत नवरामुलगा नवऱ्यामुलीपेक्षा अमुक इतकी अंगुळं वरच असलाच पाहिजेच हा आग्रह आतातरी सुटतोय म्हणता? नाव सोडा. मागचे लोक हे स्वत:च्या तोंडाने स्पष्ट बोलायचे. नवे लोक इतरांवर ढकलतात. एवढाच काय तो फरक!’’ ते तीक्ष्णपणे म्हणाले. त्यांच्याशी बोलण्यासाठी रजिस्टरमध्ये खुपसलेली मान वर करते तर त्यांच्यामागे असणाऱ्या मुख्य दरवाजातून ३-४ नवे लोक नव्याने चौकशीसाठी येताना दिसले. साहजिकच संचालकांनी त्यांच्या दिशेने आपला मोहरा वळवला. माझं बोलणं खुंटलं. माणसामाणसांच्या बोलण्यात ‘लोकां’ची अडचण कशी येत जाते. ह्य़ाचा जुना अनुभव मला नव्याने आला.
लग्न करावं लोकांसाठी!
वय, शिक्षण, पैसाअडका, जातपात वगैरे सगळ्या बाबतीत नवरामुलगा नवऱ्यामुलीपेक्षा अमुक इतकी अंगुळं वरच असला पाहिजेच हा आग्रह आतातरी सुटतोय म्हणता? नाव सोडा. मागचे लोक हे स्वत:च्या तोंडाने स्पष्ट बोलायचे. नवे लोक इतरांवर ढकलतात. एवढाच काय तो फरक!
आणखी वाचा
First published on: 02-03-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expectations about bride remains unchanged in modern days