-किरण येले

प्रत्येक पुरुषाला एक घनिष्ठ मित्र आणि प्रत्येक स्त्रीला एक जवळची मैत्रीणच हवी असेल, तर पुरुषाबरोबरची एखाद्या स्त्रीची मैत्री ही त्याच्यातल्या मैत्रिणीशी असते का? मैत्रिणीचा खरा मित्र होण्यासाठी तुमच्या डोळ्यातला ‘पुरुष’ संपणं ही पहिली अट असते. सोबत स्त्री असतानाही ज्याचे डोळे स्वच्छ राहतील तोच पुरुष मैत्रिणीची मैत्रीण होऊ शकतो. प्रत्येक पुरुषाला जमू शकतं का असं स्वत:च्या आतच एक मैत्रीण तयार करणं? उद्याच्या (४ ऑगस्ट)आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त कवी, कथाकार किरण येले यांचा खास लेख.

International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
mazhi maitrin
माझी मैत्रीण : …आणि मैत्रीचे बंध दृढ झाले
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
pravin tarde shares special post on the occasion of wife snehal tarde
“स्वतःचं घरदार आणि संसार सांभाळून…”, प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहलसाठी खास पोस्ट! मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या भावना
Boyfriend surprises his blind girlfriend with a braille proposal video
याला म्हणतात खरं प्रेम! अंध गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं केलं अनोखं प्रपोज; VIDEO पाहून तरुणाचं कराल कौतुक
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत

मैत्रीची वीण ज्या स्त्रीसोबत जुळते ती मैत्रीण. दोन वेगळ्या गोष्टी एकत्र बांधणारा धागा म्हणजे वीण. किंवा रेशमी धागे एकमेकांत विणून केलेलं नक्षीदार तोरण. अशा कामात वीण न जाणवता नक्षी दिसणं, दोन बंध एकसंध दिसणं ही पहिली अट असते. स्त्री-पुरुष मैत्री म्हणजे तलम कपड्यावरली वीण. त्यावर चुण्या पडण्याचा धोका अधिक. अशा झुळझुळीत कपड्यावर शिलाई मारताना काळजीपूर्वक विणीकडे लक्ष ठेवत अलवारपणे कधी ते कापड ताणून धरत, कधी मोकळं सोडत, असं हाताळावं लागतं की, शिवणीच्या जागी एकही चुणी पडणार नाही. स्त्री-पुरुष मैत्री ही अशा तलम कपड्यावरली वीण असते, त्यात एक जरी चुणी असेल तर ती मैत्री गढूळ दिसू लागते.

हेही वाचा…‘आईची जात, ती मुलांची का नाही?’

स्त्री-पुरुष मैत्री हे नातं आपल्याकडे अलीकडे वाढू लागलं आहे. मला आठवतंय, मी शाळेत असताना आम्हा मुलग्यांपैकी कुणी दंगा केला, तर त्याला शिक्षा म्हणून मुलीच्या शेजारी बसवलं जायचं. अगदी महाविद्यालयात शिकत असतानाही मी मुलींशी बोलायला घाबरायचो. एक प्रसंग आठवतोय, त्या काळात मी बऱ्यापैकी नृत्य करायचो. त्या वेळी एक मोठी आंतरमहाविद्यालयीन नृत्यस्पर्धा षण्मुखानंद हॉलमध्ये व्हायची. आमचं महाविद्यालयही त्यात भाग घ्यायचं. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक अरुण चांदीवाले आम्हाला शिकवायला यायचे. एका वर्षी त्यांनी एक आदिवासी लोकनृत्य निवडलं. त्या नृत्यात तरुण-तरुणींच्या सहा जोड्या होत्या. सराव सुरू झाल्यावर चांदीवाले सरांनी एक असा नृत्यक्षण सांगितला ज्यात दोघांनीही एकमेकांच्या कमरेवर हात ठेवत ठेक्यावर पावले टाकायची होती. त्यापूर्वी मी कधी कुणा तरुणींशी फार बोललोही नव्हतो आणि इथे एकदम कमरेवर हात ठेवायची वेळ आल्यावर मला घाम फुटला. मी वरच्यावर हात ठेवत नृत्य करू लागलो. त्यामुळे आम्हा दोघांची पावले वेगवेगळी पडू लागली. सरांनी दोन वेळा सांगून पाहिलं, पण माझं अवघडलेपण जाईना. तेव्हा चांदीवाले सर म्हणाले, तू थोडा वेळ बसून विचार कर असं का होतंय? मी अर्धा तास बाजूला बसून होतो. समोर सराव सुरूच होता. इतक्यात माझा एक मित्र आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवत सराव पाहू लागला….आणि मला कळलं. मी सरांना सांगितलं, ‘मी तयार आहे.’ त्यानंतर मात्र आम्हा दोघांची पावले तालावर पडू लागली. मी त्या मुलीला मित्र समजून नृत्य करू लागलो होतो. तेव्हापासून मैत्रीण माझ्यासाठी मित्र झाली. अर्थातच ती सुरुवात होती मैत्रीची…

मग आई, बहीण, पत्नी आणि काही मैत्रिणींनी मला ‘बाईच्या कविता’ दिल्या. हा कवितासंग्रह वाचून काही फोन आले. ते ऐकता ऐकता कदाचित हळूहळू माझ्या आतच एक मैत्रीण तयार झाली असावी. प्रत्येक पुरुषाला एक मित्र हवा असतो आणि प्रत्येक स्त्रीला एक जवळची मैत्रीण हवी असते. दोघांच्याही मैत्रीच्या गरजा वेगळ्या असतात. पुरुषाला आनंद वाटून घेण्यासाठी मित्र हवा असतो आणि स्त्रीला आतल्या गुजगोष्टी सांगण्यासाठी मैत्रीण हवी असते. पुरुष आनंदी असतात तेव्हा मित्रासोबत राहणं जास्त पसंत करतात. तणावात असतात तेव्हा एकटे राहतात. पुरुष त्यांचा तणाव कुणाला सांगत नाहीत. त्यामागे अनेक कारणे आहेत. स्त्रिया आनंदाचे क्षण सांगतात, पण जवळच्या मैत्रिणीला त्यांना प्रकर्षाने सांगायचा असतो तो मनातला तणाव. कारण त्यांच्या मनात अनेक तणाव असतात. पुरुषांना फक्त करियर, कार्यालय वा नातं असा एक वा दुपदरी तणाव असतो. स्त्रियांसाठी करियर, नवरा, नाती, सासर, माहेर, कार्यालय, घर, यातील काही किंवा सगळीच तणावस्थळे असू शकतात. कुणाशीही बोलता येत नाही, कारण बदनामी आणि सल्ले देत सुटण्याची भीती यामुळे ती त्याच मैत्रिणीकडे जाते जी कुणालाही चूक वा बरोबर ठरवणार नाही. फक्त ऐकेल. माझ्या अनुभवानुसार, स्त्रीला अनेकदा कधी तिचा तणाव ऐकणारी तर कधी तिचं अघळपघळ बोलणं शांतपणे ऐकणारी, कधी खिलाडूवृत्तीने तिचे टोमणे ऐकणारी, कधी तिच्याशी खोटं खोटं भांडणारी, कधी तिला बापासारखी आज्ञा देणारी, पण तरीही तिच्या आज्ञेत राहणारी व्यक्ती हवी असते. ती व्यक्ती पुरुष असेल तर तो सरंक्षक म्हणून सोबत राहणारा, पण त्या बदल्यात काहीही अपेक्षा न करणारा आणि आपलं कोडकौतुक करणारा हवा असतो.

हेही वाचा…कर्करोग प्रतिबंधात्मक उपचार हाच उपाय

महाविद्यालयात शिकत असताना असाच एक एकदम साधा आणि देवभोळा तरुण आमच्या बरोबर शिकत होता. त्याच्या कपाळावर नेहमी चंदनाचा आडवा टिळा लावलेला असायचा. मुली नेहमी कॅन्टीनमध्ये, पिकनिकला, रेस्टॉरन्टमध्ये जायला त्याला सोबत घ्यायच्या. एकदा चित्रपट पाहायला जाताना त्या सगळ्यांनी मिळून त्याचं तिकीट काढलं आणि ही बातमी कळल्यावर आम्ही सारे अवाक् झालो होतो की, त्याच्यामध्ये त्यांना काय दिसलं बुवा? आता कळतंय की, त्यांना त्याच्यामध्ये मैत्रीण दिसली होती.

काही वर्षांपूर्वी मी एका कंपनीतली नोकरी सोडताना तिथली एक लग्न झालेली तरुणी रडू लागली. मी म्हटलं, ‘‘तू का रडते आहेस? आपण फोनवर बोलू शकतो की.’’ तर म्हणाली, ‘‘हो बोलू शकतो, पण मी माझ्या आजारी आईविषयी सांगताना तुझे डोळे हळुवार व्हायचे ते फोनवर नाही दिसणार. तुला माहीत आहे तुलाच मी का सांगायचे? कारण धीर देणारं तू बोलायचा नाहीस, पण तुझे डोळे बोलायचे.’’

हेही वाचा…सांदीत सापडलेले: भांडण

अशीच एक मैत्रीण मला म्हणाली, ‘‘तू मला जवळचा का वाटतोस माहीत आहे? तुझ्या डोळ्यांत मला कधीच माझं बाईपण दिसलं नाही. मैत्रिणीला सांगाव्या तशा सगळ्या गोष्टी तुला सांगाव्याशा वाटतात, कारण तू मला मित्र वाटत नाहीस, मैत्रीण वाटतोस.’’ मला वाटतं, माझं हे मैत्रीण होणं मला माझ्या ‘बाईच्या कविता’ आणि ‘मोराची बायको’ या कथासंग्रहाने शिकवलं. बाईच्या कवितांनी मला मैत्रिणी दिल्या. त्यात माझी आई आहे, बहीण आहे, बायको आहे आणि अशा काही स्त्रिया आहेत ज्यांना मी कधी भेटलोही नाही. या सगळ्यांनी मला बाई समजावून सांगण्याचा जो प्रयत्न केला त्यातून ‘बाईच्या कविता’ लिहिल्या. अनेक जणी मला विचारतात की, ‘आम्ही बाया असून आम्हाला जे समजलं नाही ते तुम्ही कसं लिहिलंत? मलाही त्या वेळी लक्षात यायचं नाही की, मी हे कसं लिहिलं असेन, पण नंतर हळूहळू स्वत:चं निरीक्षण करताना माझ्या लक्षात आलं की, माझ्या आतच एक बाई असावी आणि ती माझ्यातली सगळ्यांत जवळची मैत्रीण आहे. ती माझ्याशी बोलत असते. काही सांगत असते. टीका करत असते. टोमणे मारत असते. प्रेम करत असते. लाड करत जवळ घेते. कधी रूप पालटून कथा बनते. कधी मला उणिवा दाखवून टीका करते. माझी स्तुती ती कधीच करत नाही. बाईला आपल्या पुरुषात काही ना काही उणीव दिसतेच तसं तिला माझ्यात काही ना काही उणीव दिसतेच दिसते आणि मग बाहेरची माणसं मला वा माझ्या कवितांना वा कथांना कितीही चांगलं म्हणोत माझ्या आतली ती मैत्रीण मला नेमक्या उणिवा दाखवत राहते. ही मैत्रीण सतत सजग असते.

एकदा एक हिंदी कवयित्री मैत्रीण म्हणाली, ‘‘मेरे सपने में आज भी मोर आता है।’ आणि मी पटकन बोलून गेलो, ‘‘यह तो स्टोरी है, आप लिखो।’’ तर ती म्हणाली, ‘‘इस में क्या स्टोरी है? ऐसे तो बहोत लोगों को बहोत सपने आते रहते है।’’ तिचं लग्न झालं होतं आणि तिला एक मुलगा होता. मी पुन्हा म्हटलं, ‘‘मुझे पता नही पर मुझे लगता है इस में स्टोरी है। आप लिखो।’’ तर म्हणाली, ‘‘आपही लिखो।’’ मी म्हटलं, ‘‘अजी मोर आपके सपने में आ रहा है मै कैसे लिखू?’ ती म्हणाली, ‘‘मुझे कथा लिखना नाही आता.’’ तो संवाद तिथेच थांबला. पण मनात विचार आला की, स्वप्नात मोर येणं हे एक सुप्त इच्छेचं लक्षण असेल. लहानपणापासून आजही मोर स्वप्नात येत असेल, तर ती सुप्त इच्छा अजून पूर्ण झाली नाहीए असा त्याचा अर्थ असावा का? एका लग्न झालेल्या स्त्रीच्या मनात अजूनही मोर का येत असावा? कशासाठी? ती मैत्रीण त्या वेळी जवळपास ३५ वर्षांची होती म्हणजे किमान २५ वर्षं तिच्या स्वप्नात मोर येत असेल, तर त्यामागे काय संदर्भ असतील? त्यावरचं तर्कशास्त्र काय असेल? आणि मग काही दिवसांनी माझ्या स्वप्नात एक मोर आला. त्यानंतर काही दिवसांनी मला मोरासोबत खेळणारी एक अल्लड मुलगी दिसली आणि ‘मोराची बायको’ कथेची सुरुवात झाली. ती कथा त्या मैत्रिणीची नाही, पण त्या कथेला कारणीभूत माझ्या आतली स्त्री ठरली असावी.

हेही वाचा…मनातलं कागदावर: कोरडी साय!

आजही कोणताही चित्रपट पाहताना मी हळवा होतो. कथा लिहिताना, संवाद लिहिताना डोळे पाणावतात. कदाचित मैत्रिणींनाही माझ्या आत बाई जाणवत असावी आणि म्हणून त्या त्यांचे गुज मला नाही, तर माझ्या आतल्या बाईला सांगत असाव्यात ही शक्यता नाकारता येत नाही.

नातं कोणतंही असो त्याला अनेक आयाम असतील तरच ते कायम टिकतं. पुरुष-पुरुष वा स्त्री-स्त्री मैत्री सहज आणि सोपी आहे. मात्र स्त्री-पुरुष मैत्री सोपी नाही. त्यात सहजता नसेल, तर ती इतरांना दिसते. या नात्यातला गढूळपणा इतरांना लगेच लक्षात येतो.

कोणत्याही माणसाचे वर्तन अभ्यासायचे असेल, तर बोलताना त्या माणसाच्या डोळ्यांत पाहात राहिलात की, लक्षात येतं तो माणूस खोटं बोलतोय की खरं. माणूस लाख खोटं बोलू शकतो, पण त्याचे डोळे खोटं कधी बोलत नाहीत आणि समोरची व्यक्ती जर स्त्री असेल तर तिला डोळे वाचण्याची शक्ती उपजत असते.

मैत्रिणीचा खरा मित्र होण्यासाठी तुमच्या डोळ्यातला पुरुष संपणं ही पहिली अट आहे. सोबत स्त्री असतानाही ज्याचे डोळे स्वच्छ राहतील तोच पुरुष मैत्रिणीची मैत्रीण होऊ शकतो, असं मला वाटतं. पण यात दुसरी अट अशीही आहे की, मैत्रिणीनेही पुरुषाला मैत्रीणच मानायला हवं किंवा तिने पुरुषाचा मित्र व्हायला हवं. हे दोन्ही बाजूंनी असेल, तरच त्यात निर्मळता असेल. एखाद्या आरशावर पडून प्रकाश परत येतो तसे असतात मनातले विचार. समोरच्याला ते लगेच जाणवतात. कोणत्याही विचारलहरी एकदुसऱ्याला जाणवतात म्हणूनच मी म्हणतो की, ते काचेचं भांडं आहे ते सांभाळणं इतकं सोपं नाही. स्त्री-स्त्री मैत्री सहज आणि सोपी आहे, पण पुरुष-स्त्री मैत्री सहज आणि सोपी नाही.

हेही वाचा…माझी मैत्रीण: मैत्रीचं देणं!

माझ्या कवितेत एक ओळ आहे,

एकांतातलं निरव बोलणं तुझं

ज्याला समजेल तो पुरुष.

मनातल्या मनात लाजणं तुझं

ज्याला उमजेल, तो पुरुष

कधी भेटेल कुठे भेटेल माहीत नाही काही

सात जन्म सरले तरी सापडत नाही बाई ’

हेही वाचा…जिंकावे नि जागावेही: कृतज्ञता

स्त्री-पुरुष मैत्रीमध्ये दोघांनाही आपले लिंगभान सोडून समान पातळीवर यावं लागतं ते कठीणपण जमलं, तर मोती सापडतो नाहीतर ते अळवावरचं पाणी…

Kiran.yele@gmail.com