चिमणीची पिलं चाळीस दिवसांत आकाशात भराऱ्या घेतात आणि माणसे चाळीस वर्षांची झाली तरी उत्कर्ष करू शकत नाहीत, कारण चिमणीच्या पिलांना पंख आतून फुटलेले असतात आणि माणसांना पदव्या बाहेरून लावलेल्या असतात. म्हणून आतून ज्ञानाचे पंख निर्माण करणारे आणि पंखात बळ देणारे अनुभवजन्य शिक्षण विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे.
घरात एखादे निसर्गचित्र लावून निसर्गाच्या सान्निध्यात जाणवणाऱ्या प्रसन्नतेचा अनुभव घेता येतो का? चित्रांमधील फुले पाहून त्यांच्या सुगंधाचा आस्वाद घेता येईल का? दिव्याचे चित्र लावून घरातला अंधार नाहीसा करता येईल का? खिडक्या-दारे बंद करून पावसावरची गाणी ऐकत पावसात भिजण्याचा अनुभव घेता येणे शक्य आहे का? पदार्थाची छायाचित्रे पाहून जिभेची तृष्णा आणि चोचले पुरविता येतील का?  
.. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी येतील, कारण इथे कुठेही रसरशीत जिवंत अनुभव नाही. जाणिवा समृद्ध करणारी अनुभूती नाही. नाना धर्माचे गूढ तत्त्वज्ञान आपल्या भारतीय संस्कृतीत सामावले आहे. या संस्कृतीत अनुभवजन्य ज्ञानाला आत्यंतिक महत्त्व दिले आहे. केवळ शब्दज्ञान किंवा पुस्तकी ज्ञान जीवनाचा सर्वागाने परिचय करून घेण्यासाठी उपयुक्त ठरत नाही. त्यासाठी अनुभव्य ज्ञानाची आवश्यकता असते. कपोलकल्पित कथा, ऐकीव दंतकथा, अनुभवरहित बोल आणि अनुभवशून्य कथनाचा जगातल्या बहुतेक सर्व विचारवंतांनी आणि संतांनी धिक्कार केला आहे. संतांच्या मुखातून बाहेर पडलेल्या सहज उद्गारांना अभंगांचे महत्त्व प्राप्त झाले, कारण त्या तत्त्वज्ञानाला अनुभूतीचा स्पर्श होता. तुकाराम महाराज सांगतात,
‘‘नका दंतकथा येथे सांगो कोणी। कोरडे ते मानी बोल कोण।
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार। न चलती चार आम्हापुढे॥’’
 अनुभव हाच शिष्टाचाराचा दंडक व्हावा, असा आग्रह ते धरतात. समर्थ रामदास आपल्या परखड शैलीत बजावतात.
‘प्रत्ययाचे ज्ञान। तेचि ते प्रमाण।
येर अप्रमाण। सर्व काही॥’
ही संतांची भूमिका एखाद्या वैज्ञानिकाइतकी स्वच्छ आणि स्पष्ट आहे. कारण विज्ञानाच्या आणि संशोधनाच्या क्षेत्रात प्रयोगाला आणि प्रयोगातून हाती येणाऱ्या अनुभवाला, अनुमानाला विशेष महत्त्व आहे. जीवनातल्या प्रत्येक अनुभवाची हा चांगला, हा वाईट अशी मीमांसा माणूस करीत असतो. पण जीवनातल्या सर्व अनुभवांसाठी स्वागतशील असणाऱ्या माणसांचेच जीवन अधिक समृद्ध आणि सुखी होत असते. जीवनात येणारे अनुभव माणसाला गुरूप्रमाणे मार्गदर्शन करीत असतात. भूतकाळातील अनुभवांची शिदोरी पाठीशी असेल तर वर्तमानात वागताना आणि भविष्याचे वेध घेताना ही शिदोरी उपयुक्त ठरते. अनुभवाच्या तडाख्यातून तावूनसुलाखून निघालेली माणसे आत्मविश्वासाने पावले टाकीत राहतात. त्यांचे आडाखे सहसा चुकत नाहीत, अशा अनुभवसंपन्न माणसांची यश पाठराखण करीत असते. जीवनातले काही अनुभव मात्र ‘अक्कलखाती’ जमा करावे लागतात. शहाणपण विकत घेण्यासाठी काही किंमत मोजून अशा अनुभवांची जीवनाच्या पासबुकात नोंद करणे ही त्या वेळेची गरज असते. अनुभूतीरहित जीवन ही कल्पनाही कुणाला सहन होणार नाही. येणारा प्रत्येक क्षण नवा अनुभव घेऊन येत असतो म्हणूनच जगण्यात नावीन्य आहे. त्यामुळेच जीवनाचे प्रवाहीपण टिकून आहे.
हजारो पुस्तके वाचून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा एक जिवंत अनुभव खूप काही शिकवून जातो. शाळेत पुस्तकं शिकवली जातात, पण जीवन नावाचे पुस्तक शिकवले जात नाही. त्यामुळे शिकूनही मुले अपूर्णच राहतात. बेकार नावाचे बिरुद पदवीबरोबरच त्यांना बहाल केले जाते. कारण अनुभवावर आधारित शिक्षण त्यांना मिळालेलेच नसते. तत्त्वचिंतक प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणत, ‘चिमणीची पिलं चाळीस दिवसांत आकाशात भराऱ्या घेतात आणि माणसे चाळीस वर्षांची झाली तरी उत्कर्ष करू शकत नाहीत, कारण चिमणीच्या पिलांना पंख आतून फुटलेले असतात आणि माणसांना पदव्या बाहेरून लावलेल्या असतात. म्हणून आतून ज्ञानाचे पंख निर्माण करणारे आणि पंखात बळ देणारे अनुभवजन्य शिक्षण विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे.’ विद्यापीठातर्फे मुलांना नुसत्या पदव्या दिल्या जातात. पण जीवनात धडका घेण्याचे आणि खडकावरती बीजारोपण करण्याचे सामथ्र्य मात्र शिकविले जात नाही. हे सारे चित्र बदलण्यासाठी शिक्षणाला अनुभवाची जोड देण्याचे महत्त्व संतांसहित जगातल्या सर्व विचारवंतांनी विशद केले आहे, पण त्याकडे गांभीर्याने पहायला हवे.
व्यक्तीच्या लौकिक, बाह्यजीवनात येणारे अनुभव त्याला समृद्ध करीत असले तरी त्याच्या आंतरिक जीवनातले अलौकिक अनुभव त्याला परिपक्व आणि परिपूर्ण बनवीत असतात. जीवनाचा खरा अर्थ त्याला समजावून सांगत असतात. हे अनुभव ज्याचे त्याने घ्यायचे असतात. कोणतीही साधना करीत असताना. प्रत्येकाला येणारा अनुभव वेगळा असतो. मोक्षप्राप्तीसाठी साधना करणाऱ्या योग्याचा अनुभव नृत्याची साधना करणाऱ्या नर्तकीचा अनुभव, अमूर्ताला मूर्त रूप देणाऱ्या शिल्पकाराचा अनुभव, स्वरांची आणि सुरांची साधना करणाऱ्या गायकांचा अनुभव, लेखनसमाधी अनुभवणाऱ्या लेखकाचा अनुभव, साहित्यकृतीशी एकरूप झालेल्या वाचकाचा अनुभव, एकाग्रतेने खेळणाऱ्या खेळाडूचा अनुभव, सर्व अंगभूत कौशल्यांसह रुग्णांवर जटिल शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा अनुभव वेगवेगळा असतो. हे सारे करीत असताना मिळालेल्या आनंदाची, समाधानाची अनुभूती वेगळी असते. तिची गुणवत्ता, पातळी आणि स्तरही वेगळा असतो.
केरूनाना छत्रे हे गणिताचे अभ्यासक आणि ज्ञानाचे उपासक होते. एक अवघड शस्त्रक्रिया करून घेताना ते डॉक्टरांना म्हणाले, ‘मला भूल देऊ नका. एखादे अवघड गणित सांगा. ते सुटेपर्यंत मी या देहात नसेन तोपर्यंत शस्त्रक्रिया उरकून घ्या. गणित सोडविताना मी माझा नसतो. एखाद्या साधकाला जसे अनुभव येत असतील तसेच मलाही येतात. अवघड गणित सुटल्यानंतर मला मिळणारे समाधान हे एक परमोच्च आनंदाचे आणि शांततेचे शिखर असते.’ गणिते सोडवितानादेखील अनुभव घेता येतो हे प्रा. छत्रेंचे उदाहरण बोलके आहे.
‘आहे त्या स्तरावरून जीवात्म्यास उच्च स्तरावर नेणे म्हणजे साधना.’ असं मानणाऱ्या योगी अरिवदांनी मानवी मन हे संपूर्ण ज्ञानप्राप्तीचे साधन नाही हे बजावले. मनामुळे केवळ अंशात्मक ज्ञान होऊ शकते. परमोच्च समाधानाची, शांततेची आणि आनंदाची अनुभूती घेण्यासाठी माणसांनी बíहमुखता टाळून अंतर्मुख झाले पाहिजे आणि मानसाच्या पुढे जाऊन अतिमानसापर्यंत पोचले पाहिजे. असा त्यांचा आग्रह होता. ते म्हणत ‘It is impossible for a man to understand ultimate secret of creation unless one enters supermind’. आत्मतत्त्वाचे पंचकोश त्यांनी सांगितले १. . Material body (जड शरीर) २. Life (जीवन-चतन्य) ३. Mind-intellect (मन-बुद्धी) ४. Super mind (अतिमानस) ५. Anand (आनंद) सामान्य माणसांची दुसऱ्या, तिसऱ्याच पायरीपर्यंत वाटचाल होते. चौथ्या व पाचव्या पायऱ्या ओलांडून मिळणारा आनंद त्यामुळे त्यांच्या वाटय़ाला येत नाही. लौकिक जीवनातल्या साध्या साध्या गोष्टीतून, वस्तूंमधून मिळणाऱ्या आनंदात रममाण होणाऱ्यांना या चिदानंदाची ओढ वाटली पाहिजे, असं त्यांचे सांगणे होते.
शब्दांपेक्षाही नि:शब्द जाणिवेचे महत्त्व अधिक आहे. शब्द कानातून मनापर्यंत पोचतात. आंतरिक संवेदना अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोचतात. त्यातून आनंदाचा, समाधानाचा जो अनुभव मिळतो तो सर्वश्रेष्ठ असतो. प्रत्येकाने आपल्या वाटय़ाला येणारे अनुभव आणि त्यातून मिळणाऱ्या समाधानाची प्रत तपासून पाहिली पाहिजे. अनेकदा जे दुय्यम दर्जाचे असते तेच सर्वश्रेष्ठ वाटू लागते. सर्वोत्तम अनुभवाविषयीचे अज्ञान हेच त्याचे कारण असते. जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनुभवाच्या इयत्ताही चढत्या क्रमाने पार करणे गरजेचे असते. हे ज्यांना जमते त्यांना शांततेच्या, आनंदाच्या आणि समाधानाच्या शोधार्थ वणवण करीत भटकावे लागत नाही.
ल्ल  प्रा. मिलिंद जोशी
 joshi.milind23@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा