प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com
स्त्रियांचा भर हा बोलून प्रश्न सोडवण्याकडे असतो. यासाठी गरजेची असलेली सहवेदना, करुणा स्त्रीच्या ठायी निर्माण होण्याचं कारण हे स्त्रिया पूर्वीपासून ज्या वेगवेगळ्या भूमिका बजावत असतात त्यामध्ये आहे. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता स्त्री दुसऱ्यांसाठी अनेक कामं एकाच वेळेला करत असते. त्यातून तिची सहवेदना अधिक प्रभावी होते. मानसशास्त्रीय समुपदेशनामध्ये स्त्रीचा हाच गुण सर्वात महत्त्वाचा ठरलेला आहे.
योगेश एवढा उत्साही मुलगा मी कधी पाहिलाच नव्हता. कॉलेजमध्ये कला मंडळात काम करत असतानाच दोन भाषा शिकला तो. नंतर स्वत: काही नाटकं दिग्दर्शित केली. मानसशास्त्रात पदवी असूनही स्थिर नोकरी हवी, म्हणून ‘एमबीए—एचआर’ केलं आणि उत्तम कंपनीत कामाला लागला. परवा, या लेखासाठीच खरं तर जवळजवळ
१० वर्षांंनी भेटले त्याला. कोमेजलेला चेहरा, वाढलेलं वजन डोळ्यांतली जान गेलेली.. पहिल्यांदा ओळखलंच नाही मी त्याला. कामाचा वेग, घरच्यांच्या अपेक्षा, बायकोशी संवाद नाही, या सगळ्याचा ताण येतोय म्हणाला. काही दिवसांपासून तोदेखील एका चांगल्या मानसशास्त्रीय समुपदेशकाच्या शोधात आहे. शक्यतो पुरुषच, पण त्याला अजून कोणी तसं भेटलेलं नाही.
मानसशास्त्र म्हणजे मनाचा आणि मानवी वर्तणुकीचा अभ्यास. हा अभ्यास आज कोणत्या क्षेत्रात लागू होत नाही, असंच विचारावं लागेल. त्यामुळे क्रीडा क्षेत्रापासून ते राजकारणापर्यंत आणि वैद्यकीय सेवेपासून ते जाहिरात क्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये याविषयी अभ्यास लागतो. म्हटलं तर या विषयामधली आपल्याला पटकन आठवणारी नावं म्हणजे सिग्मंड फ्रॉईड, कार्ल युंग, अल्फ्रेड अॅडलर वगैरे. पण जवळच्या समुपदेशकाचा सल्ला घ्यावा म्हटलं तर पुरुष अभावानेच दिसतो. योगेशशी बोलत असताना आणखी एक लक्षात आलं की सिद्धांत मांडणारे किंवा मानसशास्त्रात मोठी कामगिरी बजावणारे पुरुष आहेत. मानसशास्त्रात मोठा प्रभाव टाकलेल्या १०० व्यक्तींच्या यादीमध्ये केवळ
३ स्त्रिया आहेत. ही यादी झाली २००२ ची आणि आजपर्यंतच्या सर्व मानसशास्त्रज्ञांची. पण जगावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या हयात मानसशास्त्रज्ञांच्या अर्थात ‘सायकॉलॉजिस्ट्स’ च्या यादीमध्ये ५० पैकी केवळ १० स्त्रिया आहेत. ‘एमिनंट इंडियन सायकॉलॉजिस्ट’ या नुकत्यात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातही एकही स्त्री मानसशास्त्रज्ञाचं नाव नाही. हे केव्हा, तर जेव्हा जगभरात मानसशास्त्राचं शिक्षण घेणाऱ्या वर्गांमध्ये ८० टक्के स्त्रियाच असतात तेव्हा! याउलट मानसोपचारतज्ज्ञ (सायकॅट्रिस्ट) हे पुरुष अधिक दिसतात.
या क्षेत्रात स्त्रिया कमी आहेत. याची कारणं पाहायचा प्रयत्न केला. याविषयी मानसोपचारतज्ज्ञ गिरीजा महाले यांच्याशी चर्चा झाली. त्या म्हणाल्या की, अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या आकडेवारीनुसार दोनतृतीयांश मानसशास्त्रज्ञ या स्त्रिया आहेत. पण असं म्हणताना प्रत्यक्ष कामामध्ये हा आकडा कमी होत जातो. त्याबरोबरच स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत मिळणारा पगारही कमी असतो, असं त्या सांगतात. पुरुष आणि स्त्रियांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये मुळातच फरक आहे. स्त्रीही पटकन समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेत जाऊन विचार करू शकते. मात्र पुरुषाला हे कौशल्य आत्मसात करायला बराच प्रयत्न करावा लागतो. पारंपरिक समजही असा आहे, की पुरुष हे खूप व्यवहार्य विचार करणारे असतात. मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये अशा व्यवहारीपणापेक्षा सहवेदना (एंपथी) आणि करुणा ( कंपॅशन) अधिक महत्त्वाची ठरते. मानसशास्त्रज्ञ गौरी ताटके म्हणतात की, पुरुषांमध्ये ही सहवेदना असते. पण ते ती व्यक्त करण्यात कमी पडतात. म्हणून समोर बसलेली व्यक्ती ही मोकळी होऊ शकत नाही. अशा कारणांमुळे पहिल्यापासूनच पुरुषांनी मानसशास्त्राच्या शिक्षणाकडे भर दिलेला नाही, असं आपल्याला दिसतं.
मानसोपचार हे वैद्यकीय क्षेत्र आहे. तिथे आपल्याला स्त्रियांच्या तुलनेत पुरुष अधिक दिसतात, असं डॉ. गिरीजा महाले सांगतात. याबरोबरच पुरुषांना अनेक वेळा आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत किंवा अनेकदा त्या नीटशा कळतही नाहीत, त्यामुळे त्यांचा भर हा पटकन गोळ्या घेऊन बरं करा, असा असतो. म्हणून ते मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणं अधिक पसंत करतात. त्याउलट स्त्रियांचा भर हा बोलून आपले प्रश्न सोडवण्याकडे असतो. स्त्रियांमध्ये ही सहवेदना, करुणा निर्माण होण्याचं कारण म्हणजे स्त्रिया पूर्वीपासून ज्या वेगवेगळ्या भूमिका बजावत असतात त्यामध्ये आहे. याचं कारण गौरी ताटके सांगतात. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता स्त्री दुसऱ्यासाठी अनेक कामं एकाच वेळेला करत असते. त्यातून तिची सहवेदना अधिक प्रभावी होते आणि मानसशास्त्रीय समुपदेशनामध्ये स्त्रीचा हाच गुण सर्वात महत्त्वाचा ठरलेला आहे. आजही कामाचं क्षेत्र निवडताना आपल्याकडे काही पूर्वग्रह असतात, असं मनोचिकित्सक (सायकोथेरपिस्ट) मेघा देऊसकर म्हणतात. अनेक मुलग्यांमध्ये चांगला समुपदेशक होण्याची क्षमता असूनही त्यांना परंपरागत व्यवसाय करायला भाग पाडलं जातं. अर्थात युरोप—अमेरिकेत आता खूप पुरुष या व्यवसायात यायला लागले आहेत. याचं अजून एक कारण असंही असू शकेल, की या व्यवसायात जम बसवण्यासाठी खूप वेळ आणि कष्ट लागतात. पुरुषांना अजूनही घरातली मुख्य मिळवती व्यक्ती असं समजलं जातं. त्यामुळे इच्छा असूनही पुरुष या व्यवसायाकडे कमी प्रमाणात वळतात. याबरोबरच स्त्रियांना निसर्गाने दिलेली कौशल्यं स्त्रियांना आणि पुरुषांना अभ्यास आणि प्रशिक्षणाने वाढवता येतात. अनेक वेळा काही रॅगिंगच्या प्रकरणांमध्ये किंवा एखाद्याला त्याच्या लैंगिकतेविषयी बोलायचं असेल तर पुरुषांना एका पुरुष समुपदेशकाशी बोलणं बरं वाटतं. पण त्या स्वत: एका महाविद्यालयात प्राध्यापक असल्या तरी पुरुष समुपदेशक नसल्याने त्यांना अशा केसेसना नाही म्हणावं लागतं. समुपदेशनात, मनोचिकित्सक (सायकोथेरपिस्ट) म्हणून काम करताना भारतात तरी आपल्याला पुरुष अभावाने दिसले तरी एखाद्या गोष्टीची मांडणी सिद्धांतात करणं यामध्ये आपल्याला पुरुष अधिक दिसतात. हे थोडं ‘मॅसलो’ने सांगितलेल्या ‘जोन्हा कॉंम्प्लेक्स’ मुळे— म्हणजे स्त्रियांमधल्या खूप यश मिळवण्याच्या भीतीमुळे काही ठिकाणी त्यांच्यात योग्य क्षमता असूनही त्या मागे राहणं पसंत करतात, यामुळे होत असेल असंही त्या म्हणाल्या.
शीतल रुईकर यांनी एक अभ्यास केला होता. त्यात त्यांच्या असं लक्षात आलं, की मुख्यत: भारतीय स्त्रिया बाहेर जाऊन काम करायला लागल्या की त्यांना अर्थातच घरच्या काही कामांसाठी कुटुंबातल्या इतर सदस्यांची मदत घ्यावी लागते. पण स्त्रियांना हे कामाचं वाटप आहे, असं न वाटता लोकांनी केलेल्या मदतीचं ओझं वाटतं. मग तिने केलेल्या प्रत्येकच कामाबद्दल तिला अपराधी वाटायला लागतं. या सगळ्याचा स्त्रीला अतिशय ताण येतो. या ताणातून स्त्रिया एक तर नोकरी सोडतात किंवा कामाला महत्त्व देणं कमी करतात. हेही कारण असेल, की समुपदेशनामध्ये आपल्याला स्त्रिया दिसतात, पण त्या क्षेत्रावर मोठा बदल घडवणारं काम काहीच जणी उभं करू शकतात.
स्त्रियांची नावं अभावनेच समोर येत असली तरी इथे बार्बरा फ्रेडरिकसन यांच्या कामाविषयी समजून न घेता आपण मानसशास्त्राबद्दल समजून घेऊच शकणार नाही, असं प्राध्यापक डॉ. शीतल रुईकर सांगतात. फ्रेडरिकसन यांचं काम आहे ‘पॉझिटिव्ह सायकॉलॉजी’मध्ये. त्यांचं म्हणणं हे, की मानसशास्त्राने आजपर्यंत केवळ ज्याला ‘अॅबनॉर्मल सायकॉलॉजी’ म्हणतात— म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये कोणत्या कमतरता आहेत, त्याकडे लक्ष दिलं. पण २००० मध्ये अशी चर्चा सुरू झाली, की माणसामधले हे दुर्गुण न बघता, त्याच्यातील चांगल्या गुणांचा तो प्रभावी वापर कसा करू शकेल. यावर आधारलेल्या फ्रेडरिकसन यांच्या सिद्धांताने अनेक क्षेत्रांमध्ये मोठा प्रभाव टाकला आहे. दुसरं महत्त्वाचं नाव एलिझाबेथ लॉफ्टस. लॉफ्टस यांनी ‘आयविटनेस टेस्टीमेंट्स’च्या या संदर्भात खूप काम केलं आहे. त्यांचं म्हणणं असं, की आपल्याला असलेल्या आठवणी या चित्र स्वरूपात नसतात. आपण त्याला नंतर ते स्वरूप देतो. काही विशिष्ट प्रकारचे शब्द वापरून या आठवणी पेरल्या किंवा त्यामध्ये बदलही केला जाऊ शकतो. साक्षीदाराने जरी एखादी घटना प्रत्यक्ष पाहिली असेल, तरी त्यावर नेमका किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामुळे लॉफ्टस यांच्यावर अनेकांकडून आरोपींना वाचविण्याचे आरोप झाले. पण त्यांच्या या कामामुळे, आठवणी कशा निर्माण होतात, मेंदूचं कार्य कसं चालतं, याच्या आकलनामध्ये मोठा फरक पडला.
मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी काम करणाऱ्या अनेक स्त्रियांनी वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा उपयोग करून मानसशास्त्रामध्ये मोठं योगदान दिलं आहे. आज भारतात आपल्याला ‘आर्ट थेरपी’, ‘म्युझिक थेरपी’, ‘पेट थेरपी’ (पाळीव प्राण्यांची मदत घेऊन केले जाणारे उपचार), ‘ड्रामा थेरपी’ अशा विविध शाखांना या शास्त्राशी जोडून घेतलं आहे. स्वरालीने मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर काही काळ विविध शाळांमध्ये समुपदेशनाचं काम केलं. ‘सायकोड्रामा’ नावाच्या संस्थेची स्थापना केली. यामध्ये स्वराली अशा लोकांबरोबर काम करते ज्यांना एकतर याविषयाबद्दल जागरूकता नाही आणि असली तरी स्वत:च्या मानसिक आरोग्यासाठी मदत घेण्याची साधनं उपलब्ध नाहीत. ती मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमधल्या मुलांचं मानसिक आरोग्य राखण्यासाठी कला, नाटक आणि याबरोबरच मानसशास्त्रातल्या पारंपरिक उपचारांचाही वापर करते. या कामामुळे गेल्या ३—४ वर्षांंतच या मुलांमध्ये चांगला फरक बघायला मिळाला आहे. अशा प्रकारे स्वमग्न (ऑटिस्टिक) आणि शिक्षण समस्या असलेल्या (डिस्लेक्सिक) मुलांसाठी काम करणारी केंद्रं चालवणाऱ्याही बहुतांशी स्त्रियाच आहेत. याचप्रकारे बदलत्या काळाचा वेध घेऊन श्यामला वनारसे यांनी बालसंगोपन आणि पालक शिक्षण या विषयाचा भारतीय समाजाच्या गरजांनुसार अभ्यास केला.
मुलाला त्याच्या आयुष्यासाठी तयार करणं हा पालकत्वाचा गाभा आहे. भारतात १९६० च्या दशकात कुटुंब व्यवस्थेमध्ये मोठा बदल झाला. स्त्रिया नोकरी करायला मोठय़ा प्रमाणात बाहेर पडू लागल्या. खेडय़ांकडून शहरांकडे स्थलांतर झाले. आधी गृहीत धरल्या गेलेल्या गोष्टी नव्याने शिकवण्याची गरज निर्माण झाली. काम करणाऱ्याआईला घरातल्या कामाच्या फेरवाटणीची गरज असते, ते आईने ठामपणे सांगणं आणि घरच्यांनीही तिला साथ देणं, यांसारखे मुद्देही समोर यायला लागले. याबरोबरच, मुलं ज्या समाजात वाढतात तो आपला समाज एकसंध नाहीए, तरीही त्या मुलाला सगळ्यांशी सामाजिक व्यवहार सुरळितपणे करता यायला हवेत, यासाठी पालकांनीही एकत्र यायला हवं, असं लक्षात आलं. कारण अशा कामामध्ये फक्त स्वत:पुरतं बघून पुरत नाही. यामधून पालक—शिक्षक संघाचं आणि ‘बालभवन’चं काम सुरू झालं. या १९६०मध्ये सुरू झालेल्या कामामुळे, त्याविषयीच्या चर्चेमुळे, आपण मुलं वाढवतो तेव्हा पिढी घडवत असतो याची जाणीव ठेऊन पालकत्व निभावणारे लोक निर्माण झाले, असं नक्कीच म्हणता येईल.
मानसशास्त्राची गरज जसजशी प्रत्येक क्षेत्रात भासायला लागली, तसतसे त्याविषयीचे लहान-मोठे अभ्यासक्रमही सध्या उगवू लागले आहेत. मी ज्या—ज्या मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशकांशी याविषयी बोलले, त्या सर्वांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. या क्षेत्रात काम करायला सुरुवात करण्याआधी विद्यार्थ्यांंनी प्रचंड मेहनत घेणं आवश्यक असतं. अपरिपक्व समुपदेशकाच्या चुकीच्या सल्ल्याचे परिणाम खूप दूरगामी असतात. सध्या सुरू झालेल्या २—३ महिन्यांच्या किंवा याविषयीच्या दुरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांमुळे मानसशास्त्रीय समुपदेशनामधली नैतिकता संपत चालली आहे, अशी धोक्याची सूचनाही त्यांनी दिली. सध्या या बाबतीत असलेल्या ढाच्यामध्ये अनेक कमतरता असल्यामुळे आता राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्याची काही पद्धत लवकरात लवकर विकसित व्हायला हवी, अशी या सर्वाचीच मागणी आहे.
काळ जसा बदलतो तसे मानसशास्त्रासमोरचे प्रश्नही बदलतात. माणसाच्या मानसिक आरोग्यावर त्याच्या परिसराचा, समाजाचा, परंपरेचा, अर्थकारणाचा अर्थातच खूप परिणाम पाहायला मिळतो. त्यामुळे इतर क्षेत्रांत होणारे बदल मानसशास्त्राने समजून घ्यायला हवेत. आता कुटुंब या संकल्पनेतच खूप बदल पाहायला मिळत आहेत. एकटे पालक, घटस्फोटित, लग्न न करता एकत्र राहणारे, अशी अनेक प्रकारची कुटुंबे आहेत. माणसाच्या आयुष्यातल्या या सर्वांत पारंपरिक रचनेमध्ये होणारा बदल माणसाच्या विचारपद्धतीवर कसा प्रभाव करतो, हे अभ्यासायला हवं आहे. सध्या एकटेपणा खूप वाढला आहे आणि त्यामुळे होणारे मानसिक आजारही वाढले आहेत. सुबत्ता आहे, सोईसुविधा आहेत, पण या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी मनाला ठेहरावच नाही. याला उत्तर म्हणून माणूस कोणत्या ना कोणत्या व्यसनाचा आणि त्याबरोबर आभासी जगाचा आधार घ्यायला लागला आहे. यामध्ये स्वत:च्या मनातून आनंद निर्माण होणं बंद होतं आणि कोणी काही प्रतिसाद दिला तर, लाईक केलं तर किंवा बाहेर जाऊनच आनंद मिळतो, अशी पक्की समजूत होते. यामधून समोरच्याच्या आयुष्याशी तुलना, त्यातून स्वत:च्या आयुष्याबद्दल आणखीनच निराश व्हायला होतं. हे आपल्याला सर्वच वयोगटांमध्ये दिसतं. आताच्या पिढीला तर जणू काही हे तंत्रज्ञानच वाढवतं आहे. याचा परिणाम त्यांच्या पुढच्या आयुष्यावर होणार आहे. ही मुलं मोठी होतील तेव्हा व्यवसाय वेगळे असणार आहेत. त्यांना पर्यावरणामधल्या बदलांचा सामना करावा लागणार आहे. करोनासारख्या साथी कदाचित अधिक पसरणार आहेत. या सगळ्या बदलांना आणि बदलांच्या वेगाला तोंड देण्यासाठी मानसशास्त्राने सज्ज राहायला हवं. या सगळ्या बदलांचा परिणाम प्रत्येक देशात समान नसेल. भारतात नेमकं काय घडेल याचा अभ्यास कदाचित इतर विद्याशाखांबरोबर जोडून घेऊन व्हायला हवा. पुढच्या काळात, झपाटय़ाने बदलत जाणाऱ्या या जगाच्या प्रश्नाला उत्तर देणारे, मनाचे मनोगत समजून घेणारे असे सक्षम मानसशास्त्रज्ञ तयार करण्याची गरज आहे.
आयुष्यातला पॉझ…
समृद्ध आयुष्य जगायचं असेल तर भरधाव सुरू असलेल्या आयुष्याला थोडा ब्रेक लावून आपल्याच जगण्याकडे थोडं तटस्थपणे बघायला हवं.. जगण्यातला हा निवांतपणा तुम्हाला स्वत:च्याच आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघायला शिकवतो म्हणतात.. सध्या हा निवांतपणा अनेकांच्या वाटय़ाला आला आहे. काय शिकवलं तुमच्या आयुष्यात अचानक आलेल्या या पॉझने.. आयुष्याबद्दल, जगण्यातल्या व्यर्थतेविषयी किंवा त्यातल्या सामर्थ्यांबद्दल.. काही वेगळे साक्षात्कारही झाले असतील.. तुमच्याच वागण्याचे वेगळे अर्थही तुमच्या स्वत:बद्दल..
कोण आहात तुम्ही, कसे आहात तुम्ही.. लागले असतील.. काय आहेत ते.. आम्हाला लिहून कळवा ५०० शब्दांत.. मजकूर ईमेलवर आणि युनिकोड फॉन्टमध्येच पाठवा – chaturangnew@gmail.com