संत तुकाराम, संत नामदेव, संत मीराबाई, संत गोरा कुंभार, संत एकनाथ आदी संतांच्या हातात आपण कायमच तंबोरा, एकतारी, टाळ, वीणा, चिपळ्या आदी वाद्यां पाहतो. त्यातून निघणारं नादब्रह्म हा परमेश्वरतत्त्वाशी जोडून ठेवणारा एक महत्त्वाचा दुवा, जो सामान्य साधकाचं मनही एकतान करतं. नादमाधुर्याची ही विलक्षण अनुभूती म्हणजेच ध्वनिसौंदर्य!
तन तम्बूरा, तार मन
अद्भुत है ये साज
हरी के कर से बज रहा
हरी की है आवाज
तानपुऱ्यातून निघणाऱ्या नादसौंदर्यानं भावविभोर झालेल्या एका भक्ताच्या अवस्थेचं वर्णन करणारी ही रचना… तंबोऱ्यासारख्या वाद्याची एक साधीशी तार, परंतु तिच्या छेडण्यातून निघणारा, शरीर आणि मनाच्या पलीकडे नेणारा नाद किती सुंदर आणि अद्भुत असतो! ती तार वाजविणारा हरी, गाणारा हरी आणि ऐकणाराही हरीच, अशा एकत्वाच्या भावावर घेऊन जाणारी अशी ही उत्कट कवीकल्पना.
भारतीय अध्यात्म परंपरेत अनेक संत हातात वाद्या घेऊन भजन गाता गाता भक्तिभावात तल्लीन झालेले दिसतात. संत तुकाराम, संत नामदेव, संत मीराबाई, संत गोरा कुंभार, संत एकनाथ, अशा अनेक संतांच्या हातात तंबोरा, एकतारी, टाळ, वीणा, चिपळ्या आदी वाद्यां बघायला मिळतात. भगवंताशी आपल्या भक्तीचं अनुसंधान जोडून ठेवण्यासाठी वाद्याची तार हा त्यांच्यासाठी केवळ एक ध्वनी नसतो तर एक सोपा साधनामार्गही असतो; म्हणून तर वारकऱ्यांच्या गळ्यातील टाळ- मृदंग, कीर्तनकाराच्या गळ्यातील एकतारी, वीणा या वाद्यांना पूजेचा मान आहे आणि त्यातून निघणारं नादब्रह्म हा साधकांसाठी परमेश्वरतत्त्वाशी जोडून ठेवणारा एक महत्त्वाचा दुवा मानला जातो. परमेश्वराच्या रूपाचं, त्याच्या लीलांचं आणि त्यातील तत्त्वज्ञानाचं शब्दांनी कितीही वर्णन केलं तरी खऱ्या भक्ताचं समाधान हे भजन कीर्तन केल्याशिवाय पूर्णच होत नाही. भजन कीर्तनाची ब्रह्मानंदी टाळी ही वाद्याशिवाय लागू शकत नाही. पंढरपूरची शेकडो मैलांची वारी, एकाच वेळी लाखो वारकऱ्यांकडून नाचत नाचत साजरी होते ती टाळ मृदुंगांच्या गजरात आणि वीणेच्या झंकारात. अखंड हरिनाम सप्ताहात सातही दिवस चोवीस तास वीणा छेडून, तारेच्या गुंजारवात हरिनामाचं नामस्मरण सुरू असतं. चार तारांतून झंकारणारं नादाचं ते सौंदर्य वारकऱ्यांच्या तनामनात आणि रोमारोमात जणू चैतन्याची साक्ष भरत असतं.
तासंतास शब्दांनी चालणारं निरूपण वीणेच्या एका झंकारातून सूर घेऊन बाहेर पडतं आणि अचानक वातावरणच बदलून जातं … हीच तर नादसौंदर्याची गंमत आहे, शब्दांनी भारावून गेलेलं काहीसं गंभीर वातावरणदेखील साध्याशा वाद्याच्या साथीनं सहज भक्तिरसाचा आनंद देत हलकंफुलकं आणि भावविभोर होऊन जातं. वाद्यासंगीतातून उमटणारं ध्वनिसौंदर्य हे कोणत्याही शब्दांच्या आणि अर्थाच्या आधाराशिवाय निर्माण होत असतं म्हणून कदाचित ते अधिक शुद्ध दर्जाचं संगीत मानलं जातं. भारतीय वाद्यासंगीतात वाद्यांचं वर्गीकरण हे सर्वसाधारणपणे तंतुवाद्या (सतार, तंबोरा, वीणा, सारंगी, गिटार, व्हायोलिन), सुषिर वाद्या (ओठांनी फुंकून वाजवायचं वाद्या -शंख, तुतारी, बासरी), घनवाद्या (झांज, घंटी, चिमटा,) आणि चर्मवाद्या(ढोलकी, मृदुंग, संबळ, नगारा, हलगी) अशा चार प्रकारांमधून केलं जातं. खरंतर या प्रकारातील प्रत्येक वाद्याचं आपापलं असं एक वेगळं महत्त्व आणि स्थान आहे परंतु तंतुवाद्यांची नजाकतच काही वेगळी असते. धातूच्या तारेतून उमटणारी एकसुरी धून ही थेट मनाच्या तारेशी कशी जोडली जाते हे खरं तर एक आश्चर्यच आहे परंतु तंतुवाद्या वाजविणाऱ्या वादकाची त्या वाद्याशी समरसून गेलेली एकाग्र भावमुद्रा आठवली तर हे अक्षरश: पटतं. विशेषत: तंबोऱ्यासारख्या मूळ वाद्यातून निर्माण होणाऱ्या गुंजनयुक्त नादाने त्यातील ध्वनिसौंदर्याचा आस्वाद अधिक गहिरेपणाने घेता येतो.
संगीतातील ‘आधार’ सूर भक्कमपणे मनात रुजविणाऱ्या तानपुऱ्यांच्या जोडगोळीत गाणारे गायक किंवा वादक कलाकार हे त्यातील सौंदर्याचे पहिले आस्वादक असतात. तानपुऱ्याच्या तारा ‘सुरात जुळविण्याच्या’ प्रक्रियेपासूनच त्यातील व्यक्त आणि अव्यक्त संगीताशी हे कलाकार समाधी लागल्यागत समरस होऊ लागतात. त्यांना आणि श्रोत्यांना हे सौंदर्य मूळ स्वरूपात कानात साठवता येतं कारण या वाद्यावर संपूर्ण संगीत वाजत नसलं तरी एकदोनच, पण मुख्य सुरांचा भरणा सतत आणि अविरत मिळत असतो, जो मनाला एक विशिष्ट धून किंवा नाद लावीत असतो. त्यापैकी पहिला मुख्य सूर म्हणजे आधाराचा षड्ज अर्थात ‘सा’ आणि त्याचा सहयोगी सूर म्हणून पंचम, मध्यम किंवा निषाद. ज्या दोन सुरांच्या आधारावर कलाकार त्या रागाच्या संपूर्ण स्वराकृतीची कल्पना मनात रंगवीत असतो, ते दोन मुख्य आधार सूर संपूर्ण मैफीलभर असे गुंजत असतात, की जणू त्यांच्याचमुळे मैफिलीला आणि त्या रागाला अस्तित्व प्राप्त झालं आहे. सूर्योदयापूर्वी वातावरणात ज्याप्रमाणे एक किरमीजी केशरी रंगाची आभा पसरत असते त्याचप्रमाणे मैफील सुरू होण्यापूर्वी तानपुऱ्याच्या नादसौंदर्याची एक आभा रसिकांच्या मनावर रेंगाळत असते. आपल्याकडे असे अनेक महान कलाकार होऊन गेले जे उत्तम आणि सुरेल तंबोरे जुळवीत. त्यांनी जुळविलेल्या तंबोऱ्याचा गुंजनयुक्त नाद ऐकून रसिकांच्या डोळ्यात दाद म्हणून मैफील सुरू होण्याआधीच आनंदाश्रू तरळल्याची अनेक उदाहरणंही आपण ऐकतो, वाचतो; यावरून या वाद्यात केवळ ध्वनिसौंदर्यच नाही तर एक प्रासादिक नाद आहे हे जाणवतं.
कमीत कमी तारा असूनही जास्तीत जास्त परिणामकारक असलेलं हे मूळ वाद्या. मिरज, पंढरपूर आणि कोलकाता येथील कारागीर कडू भोपळ्यापासून हे वाद्या बनवतात. एकट्या तानपुऱ्यापेक्षा तानपुऱ्याची जोडी ही अधिक सुसंवादी आणि परिणामकारक असते. पुरुष स्वरांचे तानपुरे हे स्त्री स्वराच्या तानपुऱ्यापेक्षा आकाराने मोठे असतात, त्यामुळे हे दोन्ही प्रकारचे तानपुरे छेडण्याची पद्धत आणि वेळेचा अवकाश वेगवेगळं असतं. बहुतांश तंबोरे हे चार तारांचे असतात. मधल्या जोडीच्या दोन तारा या मूळ षड्जात लावतात, पहिली तार मध्यम, पंचम किंवा निषादाला तर शेवटची तार खर्जाला म्हणजे मूळ स्वराच्याच उंचीला सगळ्यात खाली ऐकू येणाऱ्या सुराला लावली जाते. पुरुष स्वराचा तंबोरा हा लांबीनेही मोठा असल्यामुळे त्याचा झंकार भरून वाजतो व अधिक काळ टिकतो त्यामुळे तो कमी वेगाने वाजवतात तर स्त्री स्वराचा तंबोऱ्याचा झंकार कमी काळ टिकत असल्यामुळे, नाद टिकून राहण्याच्या दृष्टीने तो जरा जलद वाजवावा लागतो. वादकाला पहिल्या आणि शेवटच्या तारेवरचा ठहराव समजला आणि या चारही तारा विशिष्ट वेगाने पाठोपाठ छेडता आल्या की स्वरमाधुर्याचा विलक्षण अनुभव येतो. उत्तम जुळविलेले दोन एकसारखे तानपुरे एकाशेजारी एक ठेवून वाजविल्यास, दांडीला कान लावून ऐकल्यास पहिल्या तानपुऱ्याचा नाद हा दुसऱ्या तानपुऱ्यातून ऐकू येतो, तसेच तानपुऱ्याची एक तार छेडल्यास दुसरी तार आपोआप हलू लागते. हा अनुभव मी सर्वप्रथम घेतला तेव्हा मला या वाद्यातील ध्वनिसौंदर्याचं साक्षात दर्शन घेतल्याचा प्रत्यय आला. ज्यांना खरोखर संगीताची सखोल साधना करायची आहे त्यांच्यासाठी चित्त एकाग्र करण्यासाठी तानपुऱ्यासारखं उत्तम वाद्या नाही.
तंतुवाद्यांच्या प्रकारांमध्ये ‘सारंगी’सारखं अनेक तारांचं वाद्याही एक वेगळंच ध्वनिसौंदर्य निर्माण करतं. भावभावनांशी संवाद साधणारं ते एक छान साधन आहे, परंतु मन आणि विचार शांत करण्यासाठी, तंबोरा, वीणा, एकतारी, दोतारा यांसारख्या कमीत कमी तारांच्या वाद्यांची परिणामकारकता अधिक दिसून येते.
आज अगदी मोजक्या ठिकाणी जिथे गुरुकुल पद्धतीने संगीताची साधना केली जाते, तिथे साधना सुरू करण्याआधी तंबोरा सुरात लावणे आणि सुरात लागलेला तंबोरा कान देऊन ऐकणे ही प्राथमिक साधना केली जाते व त्यानंतरच पुढची कलासाधना सुरू होते. कारण त्या मूळ नादातून निघणाऱ्या सौंदर्याचा आस्वाद स्वत: साधकालाच घेता आला नाही तर त्या पुढील संगीताचे ‘दर्शन’ त्याला घेता येणार नाही अशी परंपरेतील गुरुजनांची धारणा असते. तंबोऱ्याची एकेक तार सुरात लावणं हे साधकाचं इतरत्र विखुरलेलं मन साधनेत लावण्यासारखं असतं. एरवी मनाला काहीच कळत नसतं; ते कुठेही धावत असतं, त्याला पकडून एका नादात रममाण करणं यासाठी तंबोरा सुरात लावणं आणि तो तासंतास कान देऊन ऐकणं ही प्रक्रिया ध्यानासारखी असते. सकाळी झोपेतून उठताना व रात्री झोपताना इतर मनोरंजनात्मक संगीत ऐकण्यापेक्षा नुसत्या तानपुऱ्याचा आवाज ऐकल्यास मनाला शांत वाटू शकतं.
आजकाल अनेक ध्यानसाधक, मनाला शांत वाटावं म्हणून साधना, व्यायाम, योगासनं किंवा प्राणायाम करीत असताना रेकॉर्डेड तानपुऱ्याचा ट्रॅक वापरतात. हल्ली तानपुरा साथीचे अनेक मोबाइल अॅप व ट्रॅक्सही उपलब्ध आहेत. ज्यांच्याकडे मूळ वाद्या नाही, किंवा ज्यांना ते सुरात लावता येत नाही त्यांच्यासाठी सोय म्हणून हे ठीक आहे, परंतु मूळ वाद्याचा स्पर्श, नाद व त्याचे गुणधर्म याची यावरून कल्पना येऊ शकत नाही. ज्यांना तंतुवाद्यातील खऱ्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा आहे अशा संगीत साधकांसाठी उपलब्ध असलेल्या मूळ तंबोऱ्याच्या नादाला पर्याय नाही. म्हणूनच आजही वारकरी संप्रदायात मूळ वीणेच्याच आधारावर भजन कीर्तन केलं जातं कारण विज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी कानांना मूळ वाद्यातील सौंदर्यच अधिक भावतं. या सौंदर्याने मनात एक विशिष्ट धून जागी होते, कुठेतरी ‘लगन’ लागते म्हणूनच जगाला सोप्या भाषेत तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कबीराचं वर्णनदेखील मधुकर जोशी या कवीला एकतारीच्या नादात रमून असं करावं लागलं,
‘‘आकाश पांघरोनी
जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी
गातो कबीर दोहे.’’
trupti.chaware@gmail.com