भावंडांनी जमल्यावर सगळय़ांनी रात्री एकाच खोलीत गाद्या घालून लोळत मध्यरात्रीपर्यंत गप्पा माराव्यात, सकाळी उठून जवळच्या एखाद्या टेकडीवर फिरायला जावं किंवा आईला एखाद्या खास पदार्थाची फर्माईश करावी अशी चित्रं या घरच्या आईच्या डोळय़ांपुढे होती. पण तसं काहीच होईना. आल्या आल्या पहिला अर्धा-पाऊण तास गप्पाटप्पा झाल्यावर, पांगापांग सुरू झाली. जो तो स्वत:साठी त्यातल्या त्यात स्वतंत्र-खासगी जागा शोधायला लागला..
आईबाबा बेहद्द खूष होते. मुलं घरी सुट्टीला येणार म्हणून. तसा मुलांचा अधूनमधून संपर्क असायचा. कारण प्रसंगाने ती घरीही यायची पण सगळी एकेकटी किंवा आपापल्या कुटुंबाबरोबर, आपापल्या सोयीने. तिघांचं एकाच वेळी एकत्र घरी राहणं जमतंच नव्हतं. गेल्या ५-७ वर्षांमध्ये आईबाबांना फार वाटायचं. कधी तरी घरामध्ये पूर्वीसारखे आपण सगळे एकत्र असावे. आईबाबा, त्यांची तीन मुलं, पुढचा त्यांचा कुटुंबविस्तार वगैरे वगैरे. घर एवढं मोठं नव्हतं की, सगळे ऐसपैस सामावावेत. जराशी अडचण, गैरसोय होणंही शक्य होतं. पण मुलं काय पाहुणी का होती त्यांच्या सोयी गैरसोयीचा विचार करायला?
ताईचं लग्न झालं आणि वर्षभरातच भाऊ इंजिनीअरिंगच्या शिक्षणासाठी हॉस्टेलला रवाना झाला. ती दोघं लागोपाठची. नंतर चांगल्या ७ वर्षांच्या अंतराने छोटी जन्मली होती. तिचा सहवास तुलनेने उशिरापर्यंत आईबाबांना मिळाला. बघता बघता छोटीच्या लग्नालाही दहा र्वष होत आली. दिवस किती भराभरा जातात! मुलांना घडवताना-वाढवताना आपण कधी म्हातारे झालो हे आई-बाबांना समजलंही नाही. लांब कुठे का असेनात, आपली मुलं सुखात आहेत, हे समजणं पुरेसं होतं. रोजच्यासाठी ती कुठेही असली तरी वर्षांकाठी चार दिवस तरी त्यांनी सगळय़ांनी मिळून घरी यावं, घराला जुनं रूप द्यावं, आठवणी सोडून जावं, ही इच्छा मात्र फारशी पुरी झाली नाही. अधेमधे कधी तरी गहिवरून आई म्हणायची, ‘‘कसली हो धकाधकीची जीवनसरणी ही! भावंडांना एकत्र राहताच येत नाही कधी. त्यांना नसेल का वाटत, पुन्हा एकदा लहान होऊन जुन्या वस्तूच्या, वातावरणाच्या कुशीत शिरावं?’’
 ‘‘वाटत असेलच. रक्त पाण्यापेक्षा दाट असतं, असं पूर्वीपासूनच म्हटलं जातं, नाही का? पण जबाबदाऱ्या असतात. बंधनं असतात’’
‘‘ते ओझे घटकाभर दूर करायलाच तर इथे यायचं ना? आम्ही सगळी भावंडं किती धडपडायचो सणावारी एकत्र जमायला? कुठून-कुठून घरी पोचायचो, जिवापाड वेळ आणि पैसा खर्च करून. पण एकदा घरी, सगळय़ा गोतावळय़ात पडलो की कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटायचं. तो मोजक्या दिवसांचा सहवास पुढे वर्षभर ऊर्जा द्यायचा आम्हाला.’’
‘‘आपल्या मुलांचाही अनुभव असाच असेल. त्यांना पुढाकार घेऊन सारं ठरवता येत असेल, तर आपण थोडी खटपट करायची. फोनवर फोन करायचे, पर्याय सांगायचे, थोडा दबाव टाकायचा..’’
बाबांचे अनुभवाचे बोल असणार हे. कारण त्यांनी खरोखरच गेले काही महिने पोरांवर या सगळय़ाचा मारा केलेला होता. अगणित फोन करून तिघांच्या सोयीचे मोजके दिवस काढले होते, ठरवले होते. मुलांच्या इथल्या वास्तव्याबाबत नाना बेत ठरवले होते. त्यांचा इथला क्षण न् क्षण आनंदाचा कसा जाईल याचे आडाखे बांधले होते. आई आठवून आठवून एकेकाच्या आवडीचं काही-काही खाणंपिणं उभं करण्याच्या मागे होती. आता परत मुलं यायचाच अवकाश होता. आईबाबा ‘रेडी..स्टेडी..गो..’ च्या पवित्र्यात होते.
मूळचा बेत भरभक्कम आठवडय़ाभराचा होता, तो जेमतेम चार दिवसांवर आला. त्यातही ताई लवकर येऊन उशिरा परत जाणार वगैरे फिरवा फिरवी झाली. आईबाबांनी ती समजून घेतली. नाही तरी विशिष्ट दिवस, मोठासा काही इव्हेण्ट, सणवार वगैरे नव्हताच. भावंडांनी एकत्र येणं हाच जंगी सण नव्हे का? त्यातही आई-बाबा ठाकठीक असताना, त्यांच्या डोळय़ासमोर, त्यांच्या घरामध्ये वगैरे वगैरे? आयुष्याची सुरुवातीची, पायाभरणीची १५-२० वर्ष क्षण न् क्षण बरोबर घालवलेला असतो त्यांनी. आयुष्याची स्वप्नं पाहिलेली असतात. ती वास्तवामध्ये उतरवताना साक्ष नको राहायला एकमेकांना? तसे त्यांचे आपापसात फोनबीन चालायचे. पुढे ई-मेल सुरू झाली. नंतर व्हॉट्सॅप वगैरे. पण थेट भेट ती थेट भेटच.
प्रत्यक्षात थेट भेट झाली तेव्हा आई-बाबांच्या डोळय़ांत थेट पाणीच आलं! त्यामुळे, आता मुलं न राहिलेली मुलंही, थोडा वेळ चक्क कावरीबावरी झाली. आईला त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको असं झालं. तरी नातवंडं होती, त्याच्या निम्मीच आली होती. एकाला सातवीच्या स्कॉलरशिपला क्रॅश क्लास लावला होता. तर एकीच्या आंतर शालेय नाटय़स्पर्धेत सादर करण्याच्या नाटकाची तालीम सुरू होती. ती सोडून तिला पाठवायला शाळेतल्या मॅम तयार नव्हत्या. ताईचा एकुलता एक स्वत:चा पी.सी. बरोबर घेऊन आला होता. त्याच्यावर त्याला एक प्रोजेक्ट पूर्ण करणं भाग होतं. इथे पोचल्यापासून तो आपल्या पी.सी.ला खिळून होता. त्यामुळे साहजिकपणे तो सगळय़ांमध्ये असून नसल्यासारखा होता. भावंडांनी जमल्यावर सगळय़ांनी रात्री एकाच खोलीत गाद्या घालून लोळत मध्यरात्रीपर्यंत गप्पा माराव्यात, सकाळी उठून जवळच्या एखाद्या टेकडीवर फिरायला जावं किंवा आईला एखाद्या खास पदार्थाची फर्माईश करावी अशी चित्रं या घरच्या आईच्या डोळय़ांपुढे होती. पण तसं काहीच होईना. आल्या आल्या पहिला अर्धा-पाऊण तास गप्पाटप्पा झाल्यावर आणि सर्वानी सर्वाना भेटवस्तू दिल्यावर पांगापांग सुरू झाली. जो तो स्वत:साठी त्यातल्या त्यात स्वतंत्र-खासगी जागा शोधायला लागला. लहान नातवंडांनासुद्धा कपडे बदलायला खोली बंद करून घ्यावी लागत होती. तिथे मोठय़ा माणसांचं काय जुळणार गर्दी अडचणीत? शिवाय जो तो स्वत:च्या आवडी-निवडी-सवयींना घट्ट धरून बसणार आणि कोणीच कोणत्या बाबतीत तडजोड करायला उत्सुक नसणार. साध्या खाण्या-पिण्याच्या आवडींपासून थेट भाषा-विचार इथवर प्रत्येकाचा स्वतंत्र पंथ. सामाईक बाबी कमीच. त्यामुळे एकत्र राहण्याचा अट्टहास आणि कदाचित त्यातला आनंदही कमी.. इथे आल्यावर काही तासांतच प्रत्येकाचे छोटे-मोठे अपापले उद्योग सुरू झाले.
ताई तिच्या मैत्रिणीच्या आईला भेटायला गेली. भाऊच्या मित्राने गावात पहिला हेल्थस्पा सुरू केला होता. तो बघून मित्राला त्याच्याविषयी सल्ला-सूचना द्यायला भाऊ निघून गेला तो जवळजवळ चार तास घरी आलाच नाही. जिम-स्पा-फिटनेस वगैरेबाबत त्याला बरंच ज्ञान होतं म्हणे.
मुंबईपेक्षा इथल्या ब्यूटीपार्लरमध्ये स्वस्तात सौंदर्यसेवा मिळेल या कल्पनेने छोटीने त्या दिशेने कूच केलं. केबलवाला कार्टून चॅनेल दाखवत नव्हता त्याच्याशी त्याबाबत बोलायला नातीला जायचंच होतं म्हणे, तिला बाबा घेऊन गेले. मध्येच कोणाला तरी ग्रामदेवतेच्या देवळाच्या जीर्णोद्धारासाठी देणगी देण्याची स्फूर्ती आली मग त्याचा मोहरा तिकडे वळला. अशा असंख्य आणि एकमेकांच्या दृष्टीने असंबद्ध गोष्टी-उद्योग उफाळून आले. कोणाचा पायपोस कोणात नाही अशी स्थिती झाली. सगळी एकत्र चवीढवीने जेवायला बसली आहेत. शिळोप्याच्या गप्पा मारत बसली आहेत. असं फारसं कधी घडलं नाही. ‘‘आता झोपा रे पोरांनो,.. मध्यरात्र उलटून गेली तरी तुमची बडबड थांबत नाही,’’ असा धोसरा एकेकाळी बाबांच्या बाबांना पोरं जमली की करावा लागायचा. तसा प्रसंग या बाबांवर आला नाही.
अचानक भाऊला त्याच्या कंपनीने बोलावून घेतलं म्हणून तो ठरलेल्या दिवसाच्या अगोदरच एक दिवस पसार झाला. निघताना त्याने बहिणींना ‘कीप कनेक्टेड’असं सांगितलं. पण जाताना त्याचं पाऊल अडखळल्यासारखं दिसलं नाही. त्याला प्रदर्शन आवडत नव्हतं का आतून तेवढंसं काही उत्कटपणे वाटतंच नव्हतं? आईबाबा विचारात पडले. मुलं परत गेल्यावर घर आवरता आवरता त्यांची दमछाक झाली. ‘‘आता देहाला-मनाला एवढी धकाधक झेपत नाही, नाही का?’’ आई उसासली. बाबा म्हणाले,
‘‘झेपत तर नाहीच पण करण्याचं प्रयोजनही समजत नाही.’’
‘‘म्हणजे काय?’’
‘‘आपलंच बघ ना. एवढी सहा सहा महिने फिल्डिंग लावून सगळा घाट घातला आपण. मुलांच्या दृष्टीने त्यात फार काही होतं असं मला तरी वाटलं नाही. तुला वाटलं?’’
‘‘शक्य आहे.. आता वयं वाढलीयेत त्यांची. त्यांची इथली आठवण पुसट पुसट होणार.. बाहेरचं विश्व मोठं मोठं होणार.. रंगीतसंगीत होणार.. झोका उंच गेला की खालच्या गोष्टी लहानच दिसणार..’’
‘‘तसं असेल. पण एक नक्की. आपल्या मुलांनी यावं, एकत्र राहावं याची आपल्याला ओढ लागते तेवढी त्यांना परस्पर सहवासाची नसावी असं दिसतंय.’’
‘‘पण मग ते रक्ताचं काय? ते पाण्यापेक्षा घट्ट असतं वगैरे आपण म्हणत आलोय ते..’’
‘‘काळाच्या ओघात इतक्या गोष्टी बदलल्या तशा रक्ताच्या प्रॉपर्टीज पण बदलल्या असतील नाही का? या दृष्टीने विचार करून बघ.’’ आई शून्यात बघू लागली! दुखऱ्या देहामनाने तेवढंच करणं तिला शक्य होतं!     
mangalagodbole@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा