घरात आईचा ऋतुसमाप्तीचा कालावधी सुरू असतानाच बऱ्याच घरांमधील मुलीचा ऋतुप्राप्तीचा टप्पा सुरू होतो. त्या वेळेला होणाऱ्या भावनिक पातळीवर संघर्षामुळे घरात कलह निर्माण होऊ शकतात. अर्थात प्रत्येक कुटुंबातील प्रश्न वेगवेगळे असले तरी या कालावधीत नात्यातील समीकरणेही बदलत असतात. त्यामुळे अतिशय नाजूक आणि कोवळ्या अवस्थेतून सुरक्षितरीत्या बाहेर कसे पडायचे हे काळजीपूर्वक, संवेदनशीलतेने समजून घ्यायला हवे.
‘‘दादा हे बघ, आई बाबा पुस्तक वाचून मोबाइल फोन सुरू करायचा प्रयत्न करत आहेत.’’ असा घरातल्या लहान मुलांनी मोठ्यांचा केलेला उपहास किंवा उडवलेली खिल्ली आपल्याला नवीन नाही. प्रत्येक घरात नवीन मोबाइल फोन आणला की, या संवादातून जावं लागणार हे अनेकांनी अनुभवलेलं असतं. आपल्या मुलांचं आपल्यापेक्षा हुशार असणं कधी सहजपणे स्वीकारलं जातं, तर कधी त्याचा पालकांना धक्का बसतो. लहान असताना अगदी आज्ञाधारक असलेली मुलं अचानक कधीतरी उलट उत्तर देताना किंवा प्रतिप्रश्न विचारताना आपल्याला दिसू लागतात.
घरात आईची ‘पेरी मेनोपॉझल’ (ऋतुसमाप्तीचा कालावधी) अवस्था चालू असतानाच बऱ्याच घरांमधील मुलंदेखील त्यांच्या वयात येण्याच्या टप्प्याला पोहोचलेली असू शकतात. मुलांचं शरीरातील संप्रेरकांचं प्रमाण हे वाढीला लागलेलं आणि त्याच वेळेला आईच्या शरीरातील संप्रेरकांचं प्रमाण उताराला लागलेलं. त्यामुळे शरीरात होणारी आंदोलने ही एकाच वेळी धडाका देऊ लागतात. शरीरात निर्माण होणारे हे संप्रेरकांचे कमी-जास्त होणे याचे परिणाम शारीरिक तर असतातच तसेच ते भावनिक, मानसिकदेखील असतात. हे आपण मागे बघितलेलेच आहे. हे सर्व कुटुंबात कलह किंवा एक प्रकारचे घर्षण निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात.

ऋतुप्राप्तीचा काळ आणि ऋतुसमाप्तीचा काळ हा आई आणि मुलगी या दोघींच्याही आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. अतिशय नाजूक आणि कोवळी अवस्था. त्यातून सुरक्षितपणे बाहेर पडणे ही एक तारेवरची कसरत असते. ती अतिशय काळजीपूर्वक, संवेदनशीलतेने हाताळावी लागते.

मला आठवतंय, नीता जेव्हा दवाखान्यामध्ये तिच्या मुलीला घेऊन आली तेव्हा नीताच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता अजूनही माझ्या लक्षात आहे. तिच्याबरोबर असलेली तिची मुलगी, तिच्या चेहऱ्यावरचे बेदरकार आणि निष्काळजीपणाचे हावभाव यांनी त्यांच्या घरात काय द्वंद्व चालू असेल याची कल्पना काही न बोलताच मला आली. मुलांची वागणूक आणि त्यातला संघर्ष याच्या इतकी वेदनादायी अवस्था पालकांसाठी दुसरी कुठलीच असू शकणार नाही. ‘‘मला काहीच झालेलं नाहीये. मला खरं म्हणजे यायचं नव्हतं, आई जबरदस्तीने तुमच्याकडे घेऊन आलेली आहे.’’ हे मुलींचं म्हणणं ती स्पष्टपणे मांडत होती. अशा वेळेस मी तिची आई आहे, वयानं आणि अनुभवानंही मोठी आहे, तेव्हा मलाच समजूतदारपणा दाखवायला हवा, हे आईला स्वत:ला समजावून सांगावं लागेल. मुलांच्या मानसिकतेकडे त्यांच्या दृष्टिकोनातून बघण्याची सवय आणि जेव्हा गोष्टी अगदी हाताबाहेर जात आहेत किंवा आपल्या समजण्याच्या पलीकडे आहेत, असं वाटतं तेव्हा अगदी समुपदेशकाची मदत घ्यायलादेखील काहीच हरकत नसते. कारण प्रश्न शेवटी आपल्या मुलांच्या भवितव्याचा असतो.

राधिका जेव्हा तिच्या वयात येणाऱ्या मुलीला कोणी चिडून, टोमणे मारून बोलायचं नाही याबद्दल आग्रही होती, तेव्हा मुलीच्याच वडिलांचे शब्द माझ्या कानात अजून घुमतात. ते म्हणाले होते, ‘‘आमच्या वेळी ही ‘चाइल्ड सायकॉलॉजी’ वगैरे नव्हती. दोन रट्टे दिले की मुलं शांत बसत. हे म्हणजे एक नवीन निर्माण झालेल्या आधुनिक चाळ्यांपैकी एक!’’ हे किंवा अशा प्रकारचे विचार पालकांनी करणे यापुढे चालणार नाहीत, हे शहाण्या माणसाला सांगायला नकोच.

एका कार्यक्रमात, प्रश्नोत्तराच्या दरम्यान एक आई अगदी दु:खी चेहऱ्यानं उठून उभी राहून विचारत होती, ‘‘मुलगी तिच्या वडिलांबरोबर आणि काकांबरोबर खूप मोकळेपणाने वागते. काकूबरोबरसुद्धा तिचे मैत्रीचे संबंध आहेत. पण माझ्याबरोबर ती मोकळेपणानं वागत नाही. असं का?’’ एकत्र कुटुंबात असण्याचा मुलीला फायदा होतो आहे. त्यामुळे ती मोकळी होते आहे, याबद्दल त्या आईला समाधान वाटायला हरकत नाही. आपलं काही कुठे सांधण्यासारखं आहे का याचा विचारही त्या आईने जरूर करायला हवा. पण नाही शक्य झालं तर फावल्या वेळात स्वत:ला जे हवंय ते करून, आवडीचे छंद जोपासून आनंद लुटायला काय हरकत आहे, या उत्तरावर ती खळखळून हसल्याचं आठवतंय. मला वाटतं, माझ्या उत्तरामुळे ती एका अपराधीपणाच्या भावनेतून मुक्त झाली होती आणि तेच तिच्या प्रतिक्रियेतून परिवर्तित झालं होतं, पण विभक्त कुटुंबात ही सोय आता उपलब्ध नाही. त्यामुळे अशा आई-वडिलांना स्वत:चे उपाय स्वत:च शोधावे लागणार आहेत. त्यासाठी वेळीच सावध करून त्याबद्दल जाणून घेण्यासाठी स्वत:ला सिद्ध करावं लागेल.

अशाच परिस्थितीचे वर्णन हिलरी क्लिंटन यांनी ‘इट टेक्स अ व्हिलेज अँड अदर लेसन चिल्ड्रन टीच अस’ या त्यांच्या पुस्तकात केलेले आहे. त्याच परिस्थितीला आपण आपल्या देशात जागतिकीकरणानंतर आणि मुक्त अर्थव्यवस्थेनंतर तोंड देत आहोत. शहरीकरणाकडे वळणारे ग्रामीण भागातील लोकांचे लोंढे, वस्त्यांऐवजी मोठमोठ्या बंद इमारती, एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्त कुटुंब पद्धतीकडे असलेला ओढा, बदललेली आर्थिक समीकरणे, गरजा आणि अपेक्षा यामुळे पालकांना आणि मुलांनादेखील नवीन नवीन आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे. हे इथे सांगण्याचं कारण म्हणजे अमेरिकेतील शालेय वयातील मुलांच्या एकटेपणाच्या भावनेमुळे निर्माण होणारी मानसिक आणि भावनिक अस्वस्थता, ड्रग्ज आणि तत्सम पदार्थांच्या आहारी जाणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या हिंसाचाराची संख्या बघितली तर आपण वेळीच सावध व्हायला हवं.

आई व वडील दोघांनाही सद्या परिस्थितीवरील निरनिराळ्या विषयांचे वाचन, विशेषत: मुलांना ज्यामध्ये आवड आहे अशा गोष्टींबद्दल माहिती करून घेणं आवश्यक आहे. त्यांच्या काळातल्या ‘अकबर-बिरबल’, ‘विक्रम-वेताळ’, ‘पंचतंत्र’ यांच्या पलीकडे जाऊन ‘हॅरी पॉटर’च्या जादूई दुनियेबद्दलसुद्धा त्यांना जाणून घ्यावं लागेल. मुलांच्या आवडीच्या विषयांबद्दल जाणून घेतल्यानं त्यांच्या बरोबरच्या संवादाची दारं उघडी होतात. विचारांची देवाणघेवाण जरा सोपी होते. त्याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील आई-वडिलांचे एकमेकांबरोबर नातेसंबंध, आई-वडिलांमधील सुसंवाद! कारण आई-वडिलांमधील विसंवाद हा मुलांच्या पोषणास घातक तर असतोच, पण या सत्याचा उपयोग मुले स्वत:च्या फायद्यासाठी करून घेण्याचा धोकाही मोठा असतो आणि जास्त घातकदेखील.

‘आमच्या वेळेला’ हे पालुपद वापरून आता चालणार नाही, कारण आता जग लहान आणि माहितीची द्वारे मोठ्या प्रमाणात मोकळी झाली आहेत. त्यामुळे मुलांचं जगाचं आकलन आणि पालकांचं जगाचं आकलन यामध्ये जमीन-आसमानाचा फरक दिसून येतो. माझी मैत्रीण ऑस्ट्रेलियाला सुट्टीसाठी गेली होती तेव्हा तिची दोन्ही मुलं कुमारवयीन होती. ऑस्ट्रेलियातील लोक सामाजिक जीवनात मोकळेपणानं वावरणारे आहेत. कुटुंब व्यवस्था फार लवचिक असल्यामुळे तेथील मुला-मुलींच्या वागण्यातील मोकळेपणा मैत्रिणीच्या ‘संस्कारी’ डोळ्यांना जास्तच खुपू लागला व तिच्यातली ‘आई’ जागृत झाली. मुलगी मोठी असल्यामुळे तिच्या काळजीपोटी तिने तिला सांगायचा प्रयत्न केला की, आपली संस्कृती आणि ही पाश्चिमात्य संस्कृती कशी वेगळी आहे, वगैरे वगैरे. असे उपदेशपर भाष्य शांतपणे ऐकून घेतल्यानंतर तिच्या मुलीचं प्रतिउत्तर ऐकून आम्ही सगळ्याच जणी एकदम स्तब्ध झाल्याचं आठवतंय. ती आईला म्हणाली, ‘‘मदर, ग्रो अप. मी आता काही लहान राहिलेली नाही. आजूबाजूला काय चालतं हे सगळं आम्हाला माहिती आहे. मी आता मोठी झाले आहे.’’

मुलांच्या वाढत्या वयात इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांचा शरीरात धुमाकूळ चालू असतो. त्यामुळे शारीरिक बदल होत असतात, या बदलणाऱ्या अवस्थेकडे पालकांना जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागते. परंतु अनेकदा आपल्यासमोर वाढणारी आपली मुलं मोठी होत आहेत हे पालकांच्या लक्षातदेखील येत नाही. त्यांना लहान म्हणून वाढवण्याकडेच त्यांचा कल राहतो.

प्रत्येकाच्या कुटुंबाचा व्यवहार, त्यांच्या कथा, त्यांचे प्रश्नही निरनिराळे असतात. आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला स्वत:ची उत्तरं शोधावी लागतात. मुलं आता परावलंबित्व अवस्थेपासून स्वतंत्र, आणि परस्पर अवलंबित्व या अवस्थेतून जात असतात. या समाजामध्ये, जगामध्ये स्वत:चं स्थान शोधण्याची त्यांचीदेखील धडपड चालू असते. अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्ये त्यांची शक्ती कामी पडते. नवीन मित्र मैत्रिणी, नवीन रोल मॉडेल्स शोधणं, नवीन नवीन गोष्टींची जाणीव करून घेणं आणि समाजामध्ये आपलं स्थान प्रस्थापित करण्यासाठीची धडपडदेखील याच कालावधी मधीलच. गोंधळलेल्या मन:स्थितीला सांभाळण्याचा मुलं आपल्या परीनं प्रयत्न करत असतात.

म्हणूनच प्रत्येक नवीन दाम्पत्याला माझं आवर्जून सांगणं असतं की, ‘‘बाळ जन्माला घालणं हे त्यामानानं सोपं आहे. पण त्याचं संगोपन कसं करायचं हे फार महत्त्वाचं ठरतंय. कुमारवयातील मुलं त्यांच्या जगात त्यांचे प्रश्न त्यांच्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करतच असतात. त्यानंतर घर हे त्यांच्यासाठी एक आश्वासक स्थान असलंच पाहिजे.’’

एकदा रेवती अगदी धुसफुसत घरी आली. कशाबद्दल त्रागा चालू आहे याची विचारणा तिच्या आईने केली असता, कॉलेजमध्ये चालू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान केवळ त्या मुली आहेत म्हणून तिला आणि तिच्या मैत्रिणीला सापत्न भावाची वागणूक मिळाल्याचे गोष्टीतून स्पष्ट झाले. असे प्रसंग नंतर वारंवार घडतच राहिले. वयात आलेल्या मुलींना अशा आपपरभावाची जाणीव हळूहळू होऊ लागते. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर, विचारांमध्ये आणि वागणुकीतदेखील जाणवू लागतो. ‘दादाला वेळेचं बंधन नाही मलाच का?’ याबद्दल घरात वाद घडू लागतात. सामाजिक, कौटुंबिक पातळीवर असलेल्या स्वत:वरील बंधनांची जाणीव त्यांना होऊन त्या अनुषंगाने चर्चा घडू लागतात. ‘फेमिनिझम’ (स्त्रीवाद) म्हणजे काय? ‘पितृसत्ताक पद्धती’ची सुरुवात यावर विचारमंथन सुरू होतं. अचानक आईशी भांडणारी मुलगी हळूहळू आईच्या बाबतीत सहानुभूती दाखवताना दिसते. आणि त्यानंतर ती खऱ्या अर्थाने आईला समजून घेऊ लागते ती स्वत: आई झाल्यानंतर!

savitamohiterbk@gmail.com

Story img Loader