‘‘वयाच्या सहाव्या वर्षांपासून मी बासरीवादनाचे धडे गिरवतो आहे. बासरी शिकताना व वाजवताना ती कधी माझं आयुष्य बनून गेली मला कळलंच नाही. आज जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा मला वाटतं की मी बासरीला नाही, बासरीनेच मला निवडलं. विद्या या शब्दाचा नेमका उलट शब्द ‘द्यावी’ असा होतो आणि मला ती देण्यातच आनंद मिळत आलेला आहे.’’ सांगताहेत शास्त्रीय, सिने, प्रायोगिक, फ्युजन संगीतात आपलं विशिष्ट स्थान निर्माण केलेले प्रसिद्ध बासरीवादक पं. रोणू मजुमदार
‘माचिस’ चित्रपटाच्या शेवटी दहशतवादी चंद्रचूडला तब्बू सायनाइडची गोळी देते, असा मोठा भावुक पण दर्दभरा प्रसंग होता. हा प्रसंग अधिक ठळक करण्याची जबाबदारी पाश्र्वसंगीताची होती. आणि गुलजारसाहेबांनी मला यासाठी बासरीची धून वाजवायला सांगितली. तो संपूर्ण सीन समजावून देण्यासाठी आमची सीटिंगही झालेली होती. त्यामुळे गुलजारजींना काय अपेक्षित आहे, याचा अंदाज आला होता. तरीही तो काही मिनिटांचा सीन केवळ बासरीच्या सुरावटीवर तोलून धरायचा, या विचाराने मनात धाकधूक सुरू होती. गुलजारसाहेबांनी हे ओळखलं असावं. ते माझ्याकडे येऊन म्हणाले, ‘आप बजाईए तो सही! ये सीन आप के बांसुरी के सामने पनाह मांगेगा!’, माझ्यावरील त्यांचा विश्वास पाहून मला वेगळाच हुरूप आला आणि मी छेडलेल्या मारवा रागाची ती सुरावट कायमची यादगार ठरली.
 या देवतुल्य माणसाने मला नेहमीच प्रोत्साहित केलं, शाबासकी दिली. बासरीवादनाबरोबरच मला गाताही येतं हे जेव्हा त्यांना कुणीतरी सांगितलं, तेव्हा ते अतिशय उत्स्फूर्तपणे म्हणाले होते, की ‘ये तो बासुरी से भी गातें हैं!’  कलेच्या या प्रवासामध्ये असे बरेचसे क्षण आले, ज्यांच्यामुळे मी अक्षरश: भरून पावलो. मी स्वत: एक कवी, कंपोझर आहे परंतु अल्पाक्षरामध्ये जगण्याचं सार कसं मांडावं, हे फक्त गुलजारजीच करू जाणे.
माझ्या बासरीने अशा अनेक दिग्गजांशी माझा स्नेह जुळवून आणला, एवढंच नाही तर तो स्नेह त्या माणसांमधील उत्तम सद्गुणांच्या प्रभावाने माझ्यातील कलाकाराला, माझ्या कलेला समृद्ध करून गेला.
 विद्या या शब्दाचा नेमका उलट शब्द ‘द्यावी’ असा होतो आणि मला ती देण्यातच आनंद मिळत आलेला आहे. आपल्याकडे ‘ स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूजयेत!’ असं संस्कृत वचन आहे, ते अगदी सार्थ वाटतं मला. कोणत्याही राजापेक्षा अधिक सन्मान आणि आदर मला रसिकांनी नेहमीच दिला आहे. आजही मी शिष्याच्याच भूमिकेत राहणं अधिक पसंत करतो. शिकण्याला आणि शिक्षणाला कोणत्याही वयाचं बंधन, मर्यादा नसते. तीच गोष्ट कलेबाबतही आहे. कोणतीही कला असो ती तुम्हांला कसल्याही बंधनात, चौकटीत जखडून ठेवत नाही. ती जितकी मुक्त असेल, प्रवाही असेल तितकी तिची व्याप्ती वाढत जाते. परिणामी, तुमचाही दृष्टिकोन आणि समज विकसित होत त्याचं प्रतििबब तुमच्या कलेतून रसिकांसमोर साकारतं. स्वरांचं असं महादान बासरीतून स्रवताना त्याने आधी मला रिझवलेलं तर असतंच शिवाय माझ्यातील आनंदाला सोबत घेऊन ते अधिक उत्कटपणे रसिकांच्या हृदयाला जाऊन भिडतं, तो क्षण मला नेहमीच भावला आहे. मला मिळालेल्या या दैवी देणगीचा वर्षांव रसिकांवर आजन्म करावा, असं राहून राहून मला वाटतं. कारण, ही कला कुणा एकाची नाही. प्रत्यक्ष श्रीकृष्णाने ज्या वेळूमधून सुरावट छेडली ती बासरी हा माझाही प्राणवायू आहे. तिच्याशी संवाद साधताना ते एक साधन कधीही राहत नाही. तिच्यातले सूर हे माझ्या रंध्रारंध्रातून, नसांतून झरताहेत, असाच प्रत्यय मला येत राहतो. त्यामुळे ईश्वर सान्निध्याची एक शब्दातीत अनुभूती देणारं हे असं जादूई वाद्य आहे, असंच मी म्हणेन.
   वयाच्या सहाव्या वर्षांपासून मी बासरीवादनाचे धडे गिरवतो आहे आणि वयाच्या ११-१२ वर्षांपासून सहवादनही करतो आहे. बासरी शिकताना वाजवताना ती कधी माझं आयुष्य बनून गेली मला कळलंच नाही. आज जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा मला वाटतं की मी बासरीला नाही, बासरीनेच मला निवडलं. कारण ती प्रत्यक्ष कृष्णाची सखी होती. बासरीने मला आजतागायत भरभरून आनंदच दिला. बासरीला जेव्हा जेव्हा मी स्पर्श करतो, त्यात प्राण फुंकतो त्या वेळी त्या त्या वेळी मी माझा उरत नाही. प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं रूप मिटल्या डोळ्यांसमोर उभं असतं आणि त्या श्रीहरीची आराधना मी त्या बासरीच्या माध्यमातून करत असतो. बासरी हे माझ्या पूजेचं दुसरं नाव आहे. तिच्या संगतीत तर मला विलक्षण आनंद असतोच परंतु नेहमीच ती काही माझ्या हाताशी नसते, अशा वेळी माझा रियाज हा मनाशीच सुरू असतो. काही कारणाने हातामध्ये बासरी नसेलही तरीही मनाचा हा रियाज कधीच चुकला नाही. तिथे माझ्या वादनाचं, होणाऱ्या मफिलीचं किंवा मग मनात जन्मणाऱ्या एखाद्या कम्पोझिशनचं रंगरूप आकारत असतं. वेगळ्या विषयावरच्या अल्बमच्या संकल्पनांची चित्रं तयार होत असतात. हे विचारही रियाजाइतक्याच तोलामोलाचे असतात म्हणूनच अशा रियाजानंतर प्रत्यक्ष मफिलींत, कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करताना मन आपोआपच आपल्यापाशी नोंदवलेल्या रचना पायरीपायरीने सुरांतून उलगडत नेतं. हा अनुभव दौऱ्यांनिमित्ताने मला अनेकदा आलेला आहे आणि यासाठी मला प्रख्यात सतारवादक पं. रविशंकरजींचे आभार मानायला हवेत. पंडितजींच्या सान्निध्यात तब्बल दोन दशकं राहण्याचं भाग्य माझ्या वाटय़ाला आलं आणि त्या सहवासाने मला खूप काही शिकवलंही. त्यापकीच एक म्हणजे स्वत:च्या कृतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनाला सतर्क, तत्पर ठेवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कलेला भारतीय चेहरा देणं. या शिकवणीतील सखोलता, गíभत अर्थ अनुभवी जाणकारांना कळेलच. पंडितजी जेव्हा सतार घेऊन कार्यक्रमाला बसत त्या वेळी त्यांचं प्रारंभीचं निवेदनच समोरच्या श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेई. त्यांच्या आवाजातील धीरगंभीरता, आपुलकी, चेहऱ्यावर झळकणारा भारतीय संस्कृती- परंपरेचा सार्थ अभिमान हे पाहूनच त्यांनी अर्धी मफल जिंकलेली असे, असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. ते अतिशय ज्ञानी तर होतेच शिवाय समोरच्या रसिकांच्या नजरांतील पारदर्शकताही टिपण्यात ते वाकबगार होते. माझे ते दैवतच होते. त्यांच्याकडे अगदी कोवळ्या वयाचा असतानापासून मी जात असल्याने त्यांच्या संस्कारांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. अनेकदा मला त्यांच्यासारखा माणूस व्हावं असं वाटे. मात्र कलाकार म्हणून माझ्यासारखं मीच व्हावं, असं वाटे. ही थोडीशी आत्मप्रौढी वाटेल, परंतु ते खरं नाही. काळाच्या ओघात मला अनेक दिग्गजांचा सहवास लाभला, त्यांच्याकडून शिकताही आलं. परंतु कुणाचीही कॉपी करणं हे माझ्या स्वभावातच नव्हतं. भेटलेल्या अशा अनेक मसीहांकडून मी चांगलं ते स्वीकारत गेलो. माझ्यातील प्रतिभेने त्या चांगल्याला उत्तम कसं करता येईल, यासाठी नेहमीच प्रयोगशील राहिलो. आणि सुदैवाने रसिकांनी माझं काम मोठय़ा मनाने आणि मानानेही स्वीकारलं.
‘शंख बासरी’ हा बासरीचा नवा बाज साकारण्याची प्रेरणा मला पं. रविशंकरजींच्या रुद्रवीणेतून उमटणाऱ्या अतिमंद्र सप्तकातील स्वरांनी दिली. धृपद गायकीची आठवण करून देणारे ते सूर बासरीतून कसे आविष्कृत करता येतील याचा मी सतत विचार करीत असे. त्यातूनच या क्षेत्रातील जाणकार पसाहेब यांनी मला या कामी मदत केली. तीन फुटांचा मोठा बांबू निवडून त्याला बासरीचं रूप देत असताना प यांनी वैज्ञानिकदृष्टय़ा बोटांची रचना बासरीच्या छिद्रांवर योग्य प्रकारे कशी येईल ते पाहण्यासाठी मोलाचं साह्य केलं. शंखाचा आवाज घुमावा तसे सूर जेव्हा या शंख-बासरीतून उमटू लागले त्या वेळेस त्या सुरांतून मनाला विलक्षण शांतिअवस्था प्राप्त होते. रसिकांकडूनही जेव्हा असा अभिप्राय मिळू लागला तेव्हा माझा हा प्रयोग सफल झाल्याचा आनंद काही औरच होता.
   किशोरदांची गाण्यातील नटखट अदाकारी असो की पंचमदांनी संगीताशिवाय केवळ आपल्या आवाजाच्या माध्यमातून निर्माण केलेली भावना असो किंवा गाण्यात चतन्य कसं ओतावं, ते जिवंत कसं करावं याचा घालून दिलेला वस्तुपाठ असो. महानायक अमिताभजींचा खर्जातील आवाज असो की मग लतादीदी-आशाताईंचे सूर असोत, विशाल भारद्वाजचं संगीत असो या सगळ्यांनी मला बहुमुखी कलाकार म्हणून घडविण्यास हातभारच लावला. वैयक्तिक कार्यक्रम, मफिली, कॉन्सर्ट्स यांतून माझ्यातल्या शास्त्रीय कलाकाराच्या संवर्धनाला वाव मिळाला. चित्रपट संगीतामध्येही मी माझं योगदान दिलं, ते नावाजलंही गेलं.
 या दोन्ही संगीताशीच संबंधित गोष्टी असल्या तरीही मला असं वाटतं की, स्वतंत्र मफल असो की कॉन्सर्ट तिथे पूर्ण रंगमंच, कार्यक्रम हाच तुमच्यासमोरचा कोरा कॅनव्हास असतो. तुमच्या मनातल्या रचनेचे रंग तुमच्यातील प्रतिभेने पेरत तिथे तुम्ही तुमचं स्वतंत्र चित्र एखाद्या चित्रकाराप्रमाणे बासरीच्या सुरांतून साकारत असता. सिनेसंगीतामध्ये मात्र संपूर्ण चित्राचा तुम्ही एक भाग असता. ते चित्र कल्पिणारा, रेखाटणारा, रंग भरणारे, सादर करणारे असे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे कलाकार त्यात सहभागी झालेले असतात. दोन्ही चित्रं ही आकर्षकच असतात, दिसतात. ही दोन्ही क्षेत्रं तेवढाच आनंद देणारी असतात.
बासरीवादनाने आज तरुणवर्गाला स्वत:कडेच नाही तर भारतीय शास्त्रीय संगीताकडे आकृष्ट करून घेतलं असल्याचं बोललं जातं, त्यात बऱ्यापकी तथ्य आहे. आजच्या युवावर्गाला परंपरेकडे परत आणायचं असेल तर आग्रही भूमिका किंवा हेका न धरता त्यांच्या कलाने घेत जर आपले कलाविचार साकारले तर मला खात्री आहे, की हे आज ना उद्या नक्की घडेल. नव्या पिढीशी माझी नाळ चांगली जुळते, असं सगळे म्हणतात, त्याचं एक कारण असं मला सांगावंसं वाटतं की, त्यांना कमीत कमी वेळामध्ये उत्तमातला उत्तम शास्त्रीय संगीताचा तुकडा मी माझ्याकडून ऐकवतो. तो ऐकल्यानंतर त्याबद्दलची उत्सुकता या युवावर्गाला जिज्ञासू व्हायला भाग पाडते, हे मी अनुभवलं आहे. आज अशा मुलांना शिकवताना, त्यांच्याशी संवाद साधताना मला त्यांच्यावर आग्रहाने संस्कार करावे लागत नाहीत. मी अमुकच वाजवीन, असंच वाजवीन हा हट्ट न धरता आजच्या संगीताकडून अलगदपणे शास्त्रीय संगीताच्या परंपरेकडे या पिढीला नव्हे तर पुढच्याही पिढय़ांना कसं नेता येईल, याचा विचार होण्याची अधिक गरज आहे. म्हणूनच फ्युजन हा कलाप्रकार भारतामध्ये प्रचलित करण्यापूर्वी वेस्टर्न म्युझिक ही संकल्पना, त्यातील कॉर्ड, हार्मनी यांचं मी शास्त्रोक्त शिक्षण घेतलं. फ्युजन या कलाप्रकाराचा ठरावीक असा साचा अगर निकष नाही. काहीही उचलून कुठेही जोडलं की ते फ्युजन होत नाही. दोन भिन्न संगीत संस्कृतींचा तो उत्तम मिलाफ असायला हवा. आणि यासाठी त्या त्या संगीत प्रकारांचं योग्य ज्ञान असणं ही गरज आहे, हे लक्षात घ्यायला हवं. या क्षेत्रामधले चार्ली पार्कर हे खूप मोठं नाव आहे. ते माझे हीरो होते.
पंचमदांकडे काम करत असताना तिथे असलेल्या स्टॅन्ली गोम्स या पोर्तुगीज गोवन कलाकाराकडून वेस्टर्न संगीताचे धडे घेतले. माझे वडील नेहमी म्हणत असत, की वेळ कधीही वाया घालवू नकोस. वाया गेलेला वेळ हा प्रत्यक्ष देवदेखील आपल्याला परत देऊ शकत नाही. त्यांची ही शिकवण मी कायम स्मरणात ठेवली आणि सुरांच्या या प्रवासात प्रत्येकाकडून कण न् कण वेचत गेलो. म्युझिशियन, कवी म्हणूनही व्यक्त होताना माझ्यावर झालेल्या या संस्कारांनी मला नेहमीच प्रेरणा दिली, कार्याला दिशा दिली.
 बासरीच्या सुरांनी मला अर्धागिनीसारखी साथ दिलेली आहे. मला कधी हसवलं आहे तर कधी रडवलं आहे. कधी माझ्या निराश मनाला उभारीही दिली आहे. मानवी मनाच्या भावनांचे हे नाटय़ स्वरांतून, अल्बम्समधून मांडताना असे जीवनाभिमुख प्रसंग मला नेहमीच साद घालत आले आहेत. गंगा नदीच्या भल्या मोठय़ा पात्रामध्ये पाण्यावर तरंगणाऱ्या मोठय़ा नौकेवर एक संगीत महोत्सव आजही होतो. या महोत्सवामध्ये एकदा बासरीवादनाचा योग मला आला. महागंगेच्या पाण्यावर हलके हलके उमटणारे तरंग आणि बासरीतून निनादणारे सूर यामुळे मी आणि दोन्ही तीरांवर उपस्थित असलेले रसिक यांच्यातील अंतर केव्हाच विरून गेलं होतं. हा क्षण नितांत रमणीय तर होताच शिवाय अतिशय पवित्रसुद्धा. असाच एक पवित्र, आध्यात्मिक अनुभव मला साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलासमोर आला. तिथल्या कैकिणी महाराजांचं प्रवचन मंदिरामध्ये श्रीविठ्ठलासमोर होणार होतं आणि मला त्यानंतर बासरीवादन करण्यास सांगितलं. मला मोठंच दडपण आलं होतं. साक्षात श्रीहरीसमोर त्याचीच बासरी छेडण्याची दैवी संधीच ती होती असं म्हणावं लागेल. खूप विलक्षण अनुभव होता तो
जुगलबंदीच्या निमित्तानेही अनेक कलाकारांसोबत मी वादन केलं. प्रत्येकाचा काही ना काही विशेष इथे नक्कीच सांगता येईल. उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासोबत जुगलबंदी करताना तुमच्या तर्कालाही कुंठित करणारी त्यांची नसíगक प्रतिभा असल्याने दडपण असतं पण त्यांच्याबरोबर वाजवण्याचा आनंद खूप वेगळ्याच प्रतीचा असतो. शिवाय ते तुमच्यातल्या कलाकाराला कधीच दडपून टाकत नाहीत, उलट साथी कलाकाराच्या मनातलं बरोब्बर ओळखून ते जेव्हा पेशकश करतात, तेव्हा अचंबित होण्यापलीकडे आपल्या हाती काहीच उरत नाही. हा त्यांच्याकडून घ्यावा असा गुण आहे. एक सच्चा, निर्मळ, प्रांजळ असा हा कलाकारांचा कलाकार आहे आणि त्याच्यात एक खेळकर मूल दडलेलं आहे.
 भारतीय आणि पाश्चात्त्य रसिकांमधील जिंदादिल रसिकता हा एक सामायिक धागा असला तरीही तिथला रसिक हा शिस्तप्रिय, संयमी, वक्तशीर आणि अदबशीर अधिक जाणवलेला आहे. सन्मान, प्रेम आणि आदर तर या दोन्ही प्रकारच्या रसिकांनी मला भरभरून दिला आहे. आजही जेव्हा मी बासरीचे सूर आळवतो तेव्हा त्या जादूई स्वरांच्या छडीने या दुनियेतील दु:खितांची दु:खं, सर्व प्रकारचे भेदाभेद, कोलाहल, तंटे नाहीसे करत प्रेमाची बरसात करावी आणि सर्वाना त्या सुरांमध्ये बांधून एकसंध भारताची सुंदर प्रतिमा जगासमोर साकारावी, अशी प्रार्थना मी त्या श्रीहरीपाशी करत असतो. कारण आपल्या संगीतामध्ये असे परिवर्तन घडवून आणण्याची अद्भुत शक्ती आहे, हा माझा ठाम विश्वास आहे.
शब्दांकन- अनुराधा परब
anuradhaparab@gmail.com
‘चतुरंग मैफल’ मध्ये पुढील शनिवारी(१४ डिसेंबर) सुप्रसिद्ध वैज्ञानिक, विज्ञान कथा लेखक  जयंत नारळीकर

Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण