‘‘कुठलंही मुखपृष्ठ करताना मला तो तो विषय माध्यमही सुचवतो. एकाच एका माध्यमात मी कधीही चित्रं करत नाही. साधी पेन्सिल ते ऑइल कलर्स अशा सर्व माध्यमांत मी चित्रं केलीयत. काही वेळा फोटोही काढतो. एकदा तर पोस्टर कलरने केलेलं चित्र मी नळाखाली धुतलंही होतं. माझी काही मुखपृष्ठं ही खरं तर माझ्या न लिहिलेल्या आत्मचरित्राची पानंच आहेत.’’ सांगताहेत सुप्रसिद्ध चित्रकार रविमुकुल.
एक
मी तेव्हा पहिली-दुसरीत असेन. वाढवणा (ता. उदगीर, जि. उस्मानाबाद, आताचा जि.लातूर) या आडबाजूच्या खेडय़ात आम्ही राहत होतो. ‘नॅशनल एको’ या आमच्या रेडिओची बॅटरी आणण्यासाठी दोन-तीन महिन्यांनी बाबांची उदगीरला चक्कर असे. कोणत्याही गावी जायचं म्हणजे वाढवण्याहून वाढवणापाटीला दोन कोस चालत जावं लागायचं. लातूर-उस्मानाबादहून येणाऱ्या बसला हात दाखवून गाडी पकडावी लागायची. गाडी थांबवणं सर्वथा ड्रायव्हरसाहेबांच्या मर्जीवर असायचं.
एवढं चालणं असूनही बाबांबरोबर उदगीरला जाण्यासाठी मी हट्ट धरायचो. कधीकधी जायला मिळायचं. उदगीरला जायचं म्हणजे माझा आनंद अगदी ओसंडून वाहायचा. तिथं जाऊन उदगीरच्या सुप्रसिद्ध लकी रेस्टॉरंटमधले रसाळ गुलाबजाम (आमच्या भाषेत ‘गुलाब जंबू’) खाणं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, माझं आतलं आकर्षण म्हणजे हॉटेलच्या सर्व भिंतींवर काढलेली प्रचंड चित्रं पाहाणं. मी त्या अद्भुत चित्रांकडं एकटक पाहत राहायचो. गंमत म्हणजे ती चित्रं त्या वेळच्या परंपरेप्रमाणे राम-सीता किंवा राधा-कृष्ण असली नव्हती तर चक्क ग्रीक-रोमन योद्धय़ांची, युद्धप्रसंगांची अशी होती. एकोणीसशे बासष्ट- चौसष्ट साली उदगीरसारख्या मराठवाडय़ातल्या एका गावी अशी चित्रं हॉटेल मालकानं भिंतीवर काढून घ्यावीत, ही आजही मला आश्चर्याचीच गोष्ट वाटते. चित्रकार कोण होता देव जाणे. पण अव्वल दर्जाचा होता हे निश्चित. हॉटेलातून हलूच नये असे वाटायचं. कितीही वेळ ती चित्रं पाहिली, तरीही समाधान व्हायचं नाही. एक चित्र अजूनही आठवतंय. एक योद्धा भरधाव रथ हाकतोय. पांढरेशुभ्र घोडे चौखूर उधळलेत, योद्धय़ाच्या अंगावरचं लालभडक वस्त्र वाऱ्यावर फडफडतंय..
गुलाबजाम म्हटलं, की मला लकी हॉटेल आणि हे पेंटिंग आठवतंच. खूप नंतर असलं दृश्य मी ‘बेन हर’ या इंग्रजी चित्रपटात पाहिलं. एकोणीसशे सहासष्टला बाबांची बदली वाढवण्याहून मुरूम या जरा मोठय़ा गावी झाली. खूप वेळा मनाशी ठरवत होतो. एकदा उदगीरला जाऊन ‘लकी’ पुन्हा बघून यावं. परवाच कळलं. आता तिथं काहीही नाही.
दोन
आजोळी तुळजापूरला सुट्टीसाठी गेलो होतो. नुकतीच ‘कैची’ सायकल चालवायला शिकलो होतो. सायकलच्या फ्रेममधून एक पाय पलीकडच्या पॅडलवर ठेवून सायकल दामटायची म्हणजे कैची सायकल. अशी सायकल चालवताना हँडल छातीपर्यंत यायचं. मामेभाऊ म्हणाला, ‘चल बघू, घे सायकल, शेतात जाऊ’. मी कैची सायकल चालवतोय हे बघून तो हसला. म्हणाला, बरं, तसं तर तसं. खरं तर मुरुमच्या मानानं तुळजापूर ‘शहरात’ सायकल चालवायची म्हणून घाबरलोच होतो. पण आता मागे हटता येत नव्हतं. प्रतिष्ठेचा प्रश्न होता. गावातली गल्ली-बोळं, गटारं, डुकरं अशी सगळी व्यवधानं पार करत करत स्टँडच्या बाजूला असलेल्या डांबरी सडकेपर्यंत आलो आणि जिवात जीव आला. आता काही कुणी समोरून येण्याची भीती नव्हती.
छान सकाळ होती. डांबरी सडकेवरून थोडा निर्धास्त होऊन सायकल चालवत होतो. थोडय़ाच वेळात लांबलचक उतार लागला आणि गाडीनं आपोआप वेग पकडला. माझ्या इच्छेविरुद्ध सायकल वेगानं खाली खाली जाऊ लागली. मी हँडल गच्च पकडून ठेवलं होतं. तळहाताला घाम सुटला होता. सायकलच्या चेनचा आवाज द्रुतगतीत सलग वाढत चालला होता. इतक्यात समोरून एक भलीमोठी लाल-पिवळी एस.टी.ची बस येताना दिसली. क्षणाक्षणाला दोघातलं अंतर कमी-कमी होत होतं. मी बसकडे भारल्यासारखा पाहतच राहिलो. सायकल वळवून बाजूला घ्यायचंही भान राहिलं नाही. सायकलला ब्रेक असतात हेही विसरून गेलो होतो. अगदी जवळ आल्यावर माझी अवस्था ड्रायव्हरच्या लक्षात आली असावी. त्यानं शिताफीनं गाडी सडक सोडून खाली घेऊन, मला चुकवून बाजूने काढली. कानाजवळून एक लाल-पिवळा पट्टा सर्रकन  निघून गेल्याचं जाणवलं. एक-दोन मिनिटांचा सारा खेळ. पण अजूनही मला जसाच्या तसा आठवतो. सुदैवानं पुढे चढावाचा रस्ता असल्यानं सायकलचा वेग आपसूक कमी झाला. मी उडय़ा मारत मारत थरथरत एका झाडाखाली उभा राहिलो. पाठोपाठ मामेभाऊ आला. पाठीवर जोरदार थाप मारून म्हणाला, ‘अरे वा, मस्त हाणतोस की! मलाही मागे टाकून पुढे निघून गेलास.’ मी कोरडय़ा घशानं कसातरी हसलो.
भाऊ, आपण आता इथून चालतच जाऊ या- मी भीती लपवत म्हणालो. हरकत नाही, शेत आता जवळच आलंय. शॉर्टकटनं जाऊ. सडक सोडून आम्ही उजवीकडं गवताळ पायवाटेवर वळलो. दोन-पाच मिनिटांतच उंच, सोनेरी गवतात आम्ही सामावून गेलो. छडीदार सळसळत्या गवतात मी तर बुडूनच गेलो होतो. सायकल हातात धरून निवांतपणे चालत होतो.
आजूबाजूचं ते मस्तदार झुलणारं, चमकदार माळरान पाहून मी हरखून गेलो. मनातली भीती पूर्ण गेली. दोघेही न बोलता चाललो होतो. सायकलच्या चेनचा मंद लयीतला आवाज सोडला, तर बाकी आसमंत शांत, निवांत होता. डोक्यावर अधूनमधून किडय़ांची गुणगुण ऐकू येत होती. एकदा एकच मुठीएवढा पक्षी हवेत झेपावून, मधेच हवेतल्या हवेत एखाद्या अदृश्य खोडाला पायाचा रेटा देऊन सपकन वळून दिसेनासा झाला. या सगळ्या पसाऱ्यात मीही आहे, याची एक मनभर जाणीव होत होती.
पुढे पुण्यात आल्यावर खूप वर्षांनी व्यंकटेश माडगूळकर या समर्थ लेखकाच्या अनेक पुस्तकांसाठी मुखपृष्ठ करण्याचं भाग्य लाभलं. त्यातच एक होतं-‘वाटा’. तुळजापूरच्या शेताची ती गवताळ पायवाट इथे स्टुडिओत सर्व सामर्थ्यांनिशी माझ्या मनात लख्ख उभी राहिली. इंडियन रेड, यलो ऑकर, क्रोम यलो, अधूनमधून लेमन यलो अशा छडीदार रेषा मारत मी ते चित्र करण्यात दोनतीन दिवस मस्त रमून गेलो होतो. तात्या माडगूळकरांना मुखपृष्ठ खूप आवडलं. गप्पा मारताना मी त्यांना सहज विचारलं होतं, ‘इतका जुना अनुभव कसा तंतोतंत डोळ्यासमोर उभा राहू शकतो?’
‘त्याचं असं आहे चित्रकार, खेडय़ातली एखादी म्हातारी असते ना, ती पोरानं कधीकधी दिलेला आठ आणे-रुपया उतरंडीच्या मडक्यातल्या धान्यात टाकून ठेवत असते. मग अचानक एखाद्या दिवशी एखादा पाहुणा दारात उभा राहतो. पोरगा आता कसं करायचं म्हणून काळजीत पडतो. पाहुणा आलाय, काहीतरी गोडधोड करणं भाग आहे, अशावेळी म्हातारी, गाडग्या-मडक्यातले असे जमलेले दोन-चार रुपये पोराला अलगद काढून देते आणि वेळ निभावून नेते. कलावंताचं तसंच असतं. आपल्या मनाच्या उतरंडीमध्ये जे काही कळत-नकळत पडलेलं असतं, ते असं आपसूक कामाला येतं!’
तीन
आमची उन्हाळ्याची सुट्टी आलूर या मूळ गावी असायची. कर्नाटक हद्दीला जवळ असलेल्या या गावी आमचा प्रशस्त वाडा होता. निजामी राजवटीतलं वंशपरंपरागत कुलकर्णीपण अगदी थोरल्या काकांपर्यंत होतं. त्यामुळे वाडय़ामधल्या बिनवापराच्या अंधाऱ्या खोल्यांतून पोत्यानी जुनी कागदपत्रं भरून ठेवलेली आढळायची. दुपारी जेवून-खाऊन वडीलधारी मंडळी आडवी झाली, की आम्हा काही उत्साही पोरांचा मोर्चा असल्या पोत्यांकडे वळायचा. आम्हाला जीर्ण, जाड कागदावरचे दस्तऐवज वाचायला येणं शक्यच नव्हतं. कारण त्यातले बरेचसे उर्दू मोडीत असायचे. पण त्या वेळी आम्हा एक-दोघा भावांना पोस्टाची तिकिटं जमवण्याचा छंद लागल्यामुळे अशा दस्तऐवजावरची तिकिटं आम्ही बिनदिक्कतपणे फाडून घ्यायचो. चारमिनारची चित्रं असलेली अशी तिकिटं पुन्हा पुन्हा दिसू लागल्यावर मग आम्ही तो उद्योग थांबवला. पुढे खूप दिवसांनी कळलं ती तिकिटं म्हणजे रेव्हेन्यू स्टॅम्प होते. पोस्टाची तिकिटं नव्हेत. असाच एकदा खकाणा उपसताना, तारेला लावलेल्या पत्रांचा गठ्ठा दिसला. त्या काळी आलेली पत्रं वाचून झाली, की हूक असलेल्या एका तारेला खोचून ती कुठेतरी कोपऱ्यातल्या सराच्या हलकडीला टांगून ठेवलेली असायची. आम्हाला खजिनाच सापडला.
एकेक पत्र सरकावून तिकिटं पाहत असताना एका पत्रानं मात्र मला चक्रावून टाकलं. ते पत्र माझ्या बाबांनी थोरल्या काकांना गुलबग्र्याहून पाठवलेलं होतं. पण पत्रावर श्री, ती. व. अण्णास सा.नं. वगैरे काहीही नव्हतं. उघडंच होतं. कसली तरी दु:खद बातमी कळवणारं ते पत्र होतं. पण अशी पत्रं वाचून लगेच फाडून फेकली जात. हे पत्र चुकून तसंच राहिलं असावं. पण खरा धक्का पुढेच होता. पत्रात एकच ओळ होती. आज मला देवाज्ञा झाली. मुरलीधर. स्वत:च्या मृत्यूची बातमी कशी कळवता येते कळेना. बाबांना भीत भीत विचारलं. कारण हा उद्योग कुणी सांगितला होता म्हणून मारच बसायचा. पण बाबा हसून म्हणाले, अरे मला कावळा शिवला होता. कावळा शिवला की त्याचा दोष नाहीसा व्हावा म्हणून जवळच्या वडीलधाऱ्यांना कळवायची पद्धत होती तेव्हा. जन्मापासून मरेपर्यंत आपल्या संस्कृतीत कावळ्याला शुभाशुभाचे अनेक संदर्भ आहेत. हे मात्र नवीनच होतं. पुन्हा कधीही असलं पत्रं कुठे पाहायला मिळालं नाही.
ज्येष्ठ लेखक मनोहर शहाणे यांची ‘पुत्र’ ही एक महत्त्वाची कादंबरी. तिच्या नव्या आवृत्तीचं मुखपृष्ठ मला करायचं होतं. पहिल्या आवृत्तीचं मुखपृष्ठ कसलं होतं, माहीत नाही. कादंबरीचं बीज कसं सुचलं, या विषयी सुरुवातीला लेखकानं लिहिलं होतं. पहाटेच्या वेळी नाशकातल्या एका घाटावरच्या दूध केंद्रावर एक आवाज ऐकू आला. ‘आम्ही आमच्या बापाला स्पष्ट सांगितलं, आम्हाला पुढे शिकायचं तर पैशे टाक.’ ४०-५० वर्षांपूर्वी असली उद्धट, रोखठोक भाषा कुणाची म्हणून लेखकानं वळून पाहिलं, तर त्या वेळच्या एका व्युत्पन्न ब्राह्मणाचा तो तरुण मुलगा होता. लेखकाला वाटलं अशा आदरणीय पुरोहिताचा हा मुलगा आणि त्याच्या तोंडी ही भाषा? पण संस्कार म्हणजे तरी काय? त्यावरून ही कादंबरी आकाराला आली- ‘पुत्र’.
मुखपृष्ठ करताना मला बाबांचे ते पत्र आठवलं. नुसता काकस्पर्श झाला, तर साक्षात मृत्यूच मानणाऱ्या त्या वेळच्या समाजात जर पुत्ररूपी कावळाच त्या पंडित ब्राह्मणाच्या डोक्यावर ठाण मांडून बसला तर?
कुठलंही मुखपृष्ठ करताना मला तो तो विषय माध्यमही सुचवतो. एकच एक माध्यमात मी कधीही चित्रं करत नाही. साधी पेन्सिल ते ऑइल कलर्स अशा सर्व माध्यमांत मी चित्रं केलीयत. काही वेळा फोटोही काढतो. एकदा तर पोस्टर कलरने केलेलं चित्र मी नळाखाली धुतलंही होतं.
‘पुत्र’साठी मी कलर पेपर्सच्या कोलाजमधून चित्र तयार केलं. पाठमोऱ्या, तुळतुळीत गोटा आणि संजाबाची शेंडी राखणाऱ्या ब्राह्मणाच्या डोक्यावर कुर्रेबाजपणे वळून पाहणारा कावळा दाखवला. चित्र तयार करताना एक लक्षात आलं. कावळ्याचं कावळेपण नुसत्या काळ्यात नसून ते त्याच्या गळ्याजवळच्या राखाडी रंगात जास्त असतं.
अशी माझी काही मुखपृष्ठं ही खरं तर माझ्या न लिहिलेल्या आत्मचरित्राची पानंच आहेत. ‘मुखपृष्ठाची गोष्ट’ हा माझा दृक्श्राव्य कार्यक्रम त्याचंच फलित आहे.
चार
कधी कधी उत्तररात्री नीरव शांततेत, घरी एकटाच असताना मी माझ्या आवडीची जुनी हिंदी/मराठी गाणी ऐकत बसतो. सगळे दिवे बंद करून हॉलमधल्या म्युझिक सिस्टीममध्ये सीडी चालू असते. मी बाल्कनीत अंधारात बसलेला असतो. अशावेळी पूर्वी ऐकलेली गाणीही अनपेक्षितपणे वेगळ्याच पैलूतून अंतरंग दाखवत मला त्यांच्यात सामावून घेतात. ती गाणी मग ‘माझी’ होऊन जातात. मग ते सुरय्याचं ‘मनमोर हुवा मतवाला’ असो की पहिल्याच भेटीत पागल करणारी सवितादेवीची ठुमरी असो.
एकदा असाच पं. कुमार गंधर्वाची निर्गुणी भजनं ऐकत होतो. त्यांच्या आवाजाच्या किंचित अर्ध पाऊल मागे त्यांच्या पत्नी वसुंधरा कोमकली गातात असं मला वाटतं. म्हणून ते निव्वळ द्वंद्वगीत न राहता चित्रावरचा ट्रेसिंग पेपर सूतभर हलल्यासारखी नादप्रतिमा निर्माण होते.
कबीर, मीरा यांची अप्रतिम भजनं एका पाठोपाठ चालू होती. हॉलभर भरून राहिलेला तो स्वरांचा भार माझ्यापर्यंत पोहोचून मला हळूहळू सामावून घेत होता. मी डोळे मिटले.
त्या शब्दस्वरांच्या उत्तुंग कल्लोळामध्ये मला हळूहळू एक दृश्य दिसायला लागलं. पहाटेपूर्वीचा काळोख. आकाशातली नक्षत्रं कमी कमी होत चाललेली. भरपूर पाणी पिऊन तृप्त झालेल्या गच्च पिकातून येणारा मंद ओला वारा सुटलेला आणि अशावेळी सुती पांढरी लुंगी आणि खांद्यावरून रुळणारं एक पाढरंच उपरणं पांघरलेला एक बैरागी मुक्तपणे जगाचं कल्याण मागत, शेताच्या बांधावरून गात चाललाय असं दिसत होतं. बैराग्याचं अस्तित्व म्हणजे फक्त त्याच्या अंगावरची वस्त्रे. बाकी तो या निळ्याकाळ्या रंगातच मिसळून गेलाय.
त्या रात्रीनंतर जेव्हा जेव्हा मी निर्गुण भजनं ऐकतो, तेव्हा हमखास हे दृश्य आठवतंच. एकदा कॅनव्हासवर उतरवायला हवं. लिखित, उच्चारित शब्दच काय, पण कधी कधी संगीतासारखं केवळ अनुभूती घेण्याचं माध्यमही माझ्या मन:चक्षूंसमोर चित्ररूप धारण करतं. हे चांगलं का वाईट, माहीत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


‘चतुरंग मैफल’मध्ये पुढील शनिवारी (१ जून ) सुप्रसिद्ध संगीतकार व गायक श्रीधर फडके


‘चतुरंग मैफल’मध्ये पुढील शनिवारी (१ जून ) सुप्रसिद्ध संगीतकार व गायक श्रीधर फडके