‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदरहू पीक आम्ही आमच्या आसवांवरच काढलं आहे’, ही यशवंत मनोहर यांची कविता आजही शेतकऱ्यांना अनुभवायला मिळते. यंदा  वेळेवर पाऊस सुरु झाल्याने ती वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, पावसाने ‘ताण’ देऊ नये म्हणून सारेच जण प्रार्थना करीत आहेत. कारण शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला शाप आहे. विदर्भ, मराठवाडा हे तर शेतकऱ्यांसाठी आत्महत्याप्रवण प्रदेश ठरत आहेत. शेतकरी मरुन जातो, पण मागे उरतं ते त्याच्या बायकोसाठी, कुटुंबीयांसाठी भयाण रितेपण.तुटपुंजी,न पोचणारी सरकारी मदत, नापिकी, पावसाचा आशा-निराशेचा खेळ, बाजारातले पडेल भाव या साऱ्यांतून घराला सांभाळण्यासाठी मग घरातल्या बाईलाच पतीनिधनाचं द:ुखं बाजूला ठेवून पदर खोचावा लागतो. शेतात स्वत: राबावं लागतं. अशा अनेक शेतकरी स्त्रिया उभ्या राहिल्या आहेत, परिस्थितीशी झुंज देत आहेत.. त्यांच्या या कहाण्या.. मन सुन्न करणाऱ्या..
ली काही वर्षे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय महाराष्ट्राला नवीन राहिलेला नाही. यवतमाळमधल्याही कर्जबाजारी शेतक ऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. इतक्याजणांनी की हा जिल्हाच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. काळीभोर जमीन असलेला यवतमाळचा पट्टा कपाशीचे सुवर्णक्षेत्र म्हणून १९६० च्या दशकापर्यंत ओळखला जात होता. परंतु नंतर परिस्थिती एकदमच बदलली. निसर्गाचा प्रकोप, नापिकी, कापसाचा पडेल हमीभाव आणि बँकांची नकारघंटा अशा चक्रव्यूहात भरडलेले कास्तकार गळफास लावून किंवा विषारी औषध पिऊन आत्महत्या करीत आहेत. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे काय, या भयाण प्रश्नाचे उत्तर सध्यातरी कोणाजवळ नाही. पॅकेजेस जाहीर होऊनही शेतक ऱ्यांच्या कुटुंबापर्यंत प्रत्यक्ष पोहोचलेले नाहीत. अशा विपरीत परिस्थितीतही न डगमगता अनेक शेतकरी विधवांनी शेतीची आणि घराची दुहेरी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. पतीच्या आत्महत्येनंतर भवितव्याची चिंता निर्माण झालेल्या शेतकरी विधवांची दुसह्य़ परिस्थिती संवेदनशील समाजमनांना अस्वस्थ करून सोडणारी आहे. यंदा मान्सूनचे आगमन झाले असले तरी पावसाने ऐनवेळी दगा दिल्यास वर्षभराचे काय याची चिंता लागली आहे. माळी, बेरकी, बंजारा या पारंपरिक शेती कसणाऱ्या समाजातील महिलांवर पतींच्या आत्महत्येची कु ऱ्हाड कोसळली आहे. कोरडवाहू शेती बिनभरवशाची, रोजच्या तेलमिठाला लागणारा पैसा, मुलाबाळांचे शिक्षण, आजारपण, शेतीसाठी लागणारा पैसा.. दररोजची चिंता आणि फक्त चिंता.. आहे त्या स्थितीत दिवस पुढे ढकलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.. यवतमाळातील शेतकरी विधवांच्या घरात यापेक्षा वेगळी स्थिती नाही.. शेती कसून घरप्रपंचाचा गाडा ओढणाऱ्या या विधवांचे जिणे अभावाचे असले तरी खंबीर मनांचे.. पावसावर अवलंबून असलेली शेती बांधण्याला तेवढी हिंमत लागते आणि या बायांनी तेवढय़ाच कणखरपणाने कुटुंबे पोसून दाखविली आहेत.
यवतमाळच्या आत्महत्याग्रस्तप्रवण पांढरकवडा तालुक्यातील विधवांनी पतीच्या निधनानंतर घराची जबाबदारी स्वत:वर घेऊन घर चालते ठेवले आहे. त्यांच्या या कहाण्या. यंदाच्या पावसाकडून त्यांना खूप अपेक्षांचा आहेत..

पोटाला काही पाहिजे की नको?
पांढरकवडा तालुक्यातील पडा गावच्या अंजनाबाई भुसारी यांनी गेल्या सहा वर्षांपासून मानेवर जू ठेवून शेतीला जुंपून घेतले आहे. कारण एकच, नवऱ्याची आत्महत्या. नापिकीमुळे बँकेचे तर नाहीच बचत गटाचेही कर्ज  फेडता आले नाही. व्याजावर व्याज चढत गेले.. कर्जाचा डोंगर इतका वाढत गेला की त्याखाली जिवंत राहणे त्याला शक्य झाले नाही आणि त्याने आत्महत्या केली. ते वर्ष होतं २००७. पदरात लहान एक मुलगा आणि एक मुलगी. आणि आर्थिक परिस्थिती तर अधिकच बिकट होत चाललेली. अंजनाबाईला पदर खोचून उभं राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. नवरा गेल्यानंतर बाईच्या वाटय़ाला येणारे भोग अंजनाबाईलाही सुटले नाहीत. गावातच टिन, कौलांनी आच्छादलेले छोटेसे घरवजा खोपटे.. सासू आणि दोन मुलांची जबाबदारी अंगावर येऊन पडलेली. घरी पाच एकर शेती. या शेतीच्या भरवशावरच संपूर्ण घर चालते. शेती कसल्याशिवाय पर्याय नव्हता. पहिल्या वर्षी रोजंदारीवर शेती केली. पण सारे रोजंदाराच्याच खिशात जात असल्याचे पाहून अंजनाबाईंनी स्वत: जातीने शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली. शेतावर जाऊन कामे करणे, वेचणी, नांगरणी, मळणी स्वत: करायला सुरुवात केली. ऐनवेळी भाऊ बहिणीच्या मदतीला धावून आला. सासूनेही साथ दिली. मुलांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत सुरू ठेवण्याचे अंजनाबाईने ठरवले. मुलगा राहुलला दहावी-बारावीनंतर कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची इच्छा आहे. मुलगी योगिता यंदा बारावीला आहे. मुले अद्याप कमावती झालेली नाहीत. कधी होतील तेव्हा होतील. पण आजतरी अंजनाबाईने परिस्थिती हातात घेतली आहे. अर्थात ती खूपच कष्टाची, निराशेचीच आहे. अजूनही कर्जाचा ससेमिरा चुकलेला नाही. पऱ्हाटी लावून उगवणाऱ्या कापसावरच वर्षभर घर चालवावे लागते. रोखीचे पीक नसल्याने कापूस हमीभाव जाहीर होईपर्यंत वाट पाहावी लागते. भाव नाही मिळाला तर मिळेल त्या भावाने कापूस विकून पैशाची सोय करण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या वर्षी ३०-३५ क्विंटल कापूस झाला; पण भावच मिळाला नाही. शेतीवरील खर्चानेच कंबर मोडून गेली. नांगरणी, फवारणी, मळणी, बियाणे, औषधांची खरेदी, शेतमजुरांची मजुरी देऊन हाती आलेल्या पैशातूनच मुलांची फी, धान्य, रोजचा खर्च भागवावा लागतो. अलीकडे बैलाची जोडी आणि शेतातील विहिरीतून ओलित करण्यासाठी मोटार घेतली. पण मोटार चालवायला वीजच नाही. शेताच्या अगदी बाजूनेच एक कालवा गेला आहे. त्याचे पाणी कधी मिळते आणि कधी मिळतही नाही. पतीच्या आत्महत्येनंतर मिळालेल्या सरकारी मदतीतून शेतात विहीर बांधली असली तरी त्यात पदरचे ६० हजार रुपये टाकावे लागले. शेतक ऱ्यांना बँका कर्ज देत नाहीत, उधार उसनवार करून पैसे जमवले आणि शेतीत ओतले आहेत.
या वर्षी पावसाकडून कडून खूप अपेक्षा आहेत. यंदा कापूस लावला आहे. यवतमाळचा पट्टाच कापसाचा आहे. चार वर्षांपासून भाडय़ाने बैलजोडी आणून शेती केली. आता स्वत:ची बैलजोडी आल्याने किंचित दिलासा मिळाला आहे; पण अभावाचे जिणे आहे. मुलीला शिकायचे आहे, पण गावात सातवीपर्यंतच शाळा असल्याने आठव्या वर्गापासून शिकायचे असेल तर वाईला जावे लागते. मुलगी ऑटोने जाणे-येणे करते. त्यामुळे अंगावर थकीत असलेले कर्ज शिल्लकच आहे. हाती काहीच पडत नाही, त्यामुळे हप्ते भरायचे कुठून, हा रोजचाच प्रश्न आहे. ‘‘पहिले घर चालवावे लागते जी, रोज पोटालातरी काही पाहिजे की नको. नंतर बँकेच्या कर्जाचे हप्त्याचे पुढचे पुढे पाहू,’’ असे अंजनाबाईचे उत्तर आहे.. येत्या पावसात कापूस पिकेल, पैसा येईल, मुलांना चांगले-चुंगले खाण्यास मिळेल, कपडेलत्ते करता येतील, आजतरी ही छोटी छोटीच स्वप्नं आहेत त्यांची.. या स्वप्नांना पावसाने उभारी दिली तर ठीकच, नाहीतर दरवर्षीचे कर्जाच्या ओझ्याखाली जगणे नशिबी.. दुसरे काहीच नाही..

काय हाय जी मानसाच्या हातात?
याच गावातील निर्मला शेंडे यांच्या पतीने (आत्माराम) २००४ साली आत्महत्या करून कुटुंबाला वाऱ्यावर सोडले. सहा एकर शेती असली तरी सोसायटीच्या कर्जाचा ससेमिरा पाठीशी लागल्याने खचलेल्या आत्मारामने जीवनयात्राच संपविली. तीन मुली आणि एक मुलगा असा फुललेला संसार एका क्षणात उघडय़ावर पडला. मुली लग्नाला आलेल्या होत्या. मुलगा सतीशही १४ वर्षांचा; तरीही निर्मलाबाई खचल्या नाहीत. शेतीत राबणे हा एकच पर्याय होता. मुलींना हाताशी घेऊन पदर कसून शेतीत उतरण्याची हिंमत केली. दोन वर्षे रोजदाराला शेती दिली. आता त्या स्वत:च शेती करीत आहेत. अंगावर ५०-६० हजारांचे कर्ज आहे. काळ्या मातीवरच घर चालत आहे. गेल्या वर्षी कापूस-ज्वारी लावली. सरकारी पैशांतून विहीर खोदून घेतली. पण वीज नसल्याने ओलित करण्याची सोय नाही. जनरेटर लावून पाणी खेचायचे तर ५०० रुपये रोज द्यावा लागतो. त्यामुळे समस्या संपलेल्या नाहीत. शिल्लक पैशातून तिन्ही मुलींचे विवाह कसेबसे लावून दिले. मुलगाही आता हाताशी आला आहे. या वर्षी पीक चांगले आले तर खाऊनपिऊन सुखी राहू. शिल्लक हाती पडलीच तर कर्जाचे पाहू, असे निर्मलाबाई सांगत होत्या.
हाताला रट्टे पडलेली ही शेतकरी विधवा पती निधनानंतर खंबीरपणे उभी राहिली आहे. शेतीबद्दल काहीच माहिती नव्हती. आता सवय झाली आहे. बियाणे, मजुरी, फवारणी वजा जाऊन कापसाला मिळणारा भाव हेच निर्मलाबाईचे उत्पन्न.. पावसाचे काय, येईल तर येईल नाहीतर दडी मारून बसेल. या वर्षी चांगला पाऊस पडावा, अशी प्रार्थना आहे, दुसरे काय हाय जी मानसाच्या हातात? साधारण साठीच्या घरात आलेल्या निर्मलाबाईंचा अस्वस्थ करणारा सवाल.. सगळ्यांनाच अस्वस्थ करणारा.

दोन वेळला जेवलं तर दिवाळी
सायखेडय़ाच्या चंद्रकला मेश्राम या आदिवासी गोंड समाजाच्या महिलेला दोन मुली. बारा वर्षांपासून ही कणखर बाई शेतीत राबत आहे. २००२ साली पती गंगारामने आत्महत्या केली. मुली अगदीच लहानशा होत्या. म्हातारे सासू-सासरे आहेत. मुली आणि सासू-सासऱ्यांची जबाबदारी ध्यानीमनी नसताना चंद्रकलाबाईवर येऊन पडली. पाच एकराच्या शेतीच्या भरवशावर घर चालवायचे कसे? हा यक्षप्रश्न उभा ठाकला. विहीर नाही म्हणून ओलितही करता येत नाही. नाहीतर वर्षभर शेती केली असती, असं त्यांचं म्हणणं. ‘बाप मेला तवा पोरी लायन्या होत्या, त्याईले सिकवावं लागन न, सिक्सन चालू ठेवलं हाये..’,
बोलता बोलता चंद्रकलाबाईच्या मनाचा बांध फुटला. तीन खोल्यांच्या घरात दोन तरुण मुलींसोबत चंद्रकलाबाई राहते. सकाळचा स्वयंपाक करून दिवसभर शेतात जाते, सायंकाळपर्यंत राबून परतते. पाच एकरांतून उत्पन्न काहीच नाही मिळत, उलट लागतच खूप लागते. कापूस, तूर भरभरून झाली तरच चांगले दिवस, नाहीतर येरे माझ्या मागल्या.. मोठी मुलगी १८ तर लहानी १६ वर्षांची आहे. चंद्रकलाबाई शिकलेली नाही. पण शेतीचे गणित चांगले जाणते, म्हणूनच घर चालले आहे. पोरींच्या शिक्षणात कसर ठेवायची नाही, त्या चांगल्या शिकल्या तर चांगले दिवस येतील, या आशेवर जगत आहे. कोरडवाहू शेती कधीच भरवशाची नसते. निसर्गाने हात दिला तर खरे, नाहीतर.. शाळेला सुट्टय़ा असल्याने पोरीही शेतावर राबत आहेत.
या वेळचा पाऊस घराला चांगले दिवस दाखवेल, असे चंद्रकलाबाईला राहून राहून वाटते. तिला सरकारची मदत अजूनही मिळालेली नाही. पुस्तके, आजारपणाचा खर्च, रोज लागणारे तेलमीठ यातच सारा पैसा वाहून जातो. दोन वेळला जेवलं तर दिवाळी, नाहीतर कण्या खाऊन दिवस काढावे लागतात. पावसावरच सारे अवलंबून आहे. पिके बदलण्याचा विचार आहे, पण भरोसा कोण देणार? हा तिचा सवाल.. शेतावर जायचे आहे, असे सांगून ती उठली.. लगबगीने बाहेर पडली..

जनावरानं कोणच्या तोंडानं मांगावं?
मोरना या अगदीच लहानशा गावातील कमलाबाई सुरपामचा पती रावभाव २०१० साली मोठय़ा मुलीच्या ऐन लग्नाच्या वेळी बैलजोडी विकली गेली नाही म्हणून खचून गेला आणि त्याने विष पिऊन घेतले. पोरीचे लग्न तोंडावर असताना कमलाबाईवर डोंगर कोसळला.. मुलीचे लग्न, दुसरी मुलगी आणि लहानसा मुलगा यांची चिंता आभाळाएवढी भासू लागली. घरात सासूसह चौघे.. खाणारी तोंडे चार आणि उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. तीन एकर शेती असली तरी जमीन हलकी आहे. पिकलेले उगवेलच याची शाश्वती नाही. शेतीचा खर्च भागवता भागवता कुटुंब खचून गेले आहे. मोठय़ा मुलीचे लग्न विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी लोकवर्गणीतून लावून दिले. तिला बाजूच्याच गावात दिली आहे.
हलक्या कोरडवाहू जमिनीवर काय उगवणार? ‘‘बैल आहेत. पण यंदा बैलाले चाराच नाही. कडबा झाला तर बैल जगतील. आमी जगून घेऊ. पन जनावरानं कोणच्या तोंडानं मांगावं?’’ गेल्या तीन वर्षांपासून पऱ्हाटी, तूर, ज्वारी ही पिके घेणारी कमलाबाई या वर्षी हिंमत बांधून शेतात उतरली आहे. ‘‘तेलमिठाले पुरते, नवे कपडेलत्ते तर कय्योक दिवसांत पाह्य़ले नाही. पोराच्या मदतीने सारे आयुष्य जगायचे आहे. यंदा निसर्गाने हात दिला तरच दोन वेळ भरपेट जेवण मिळेल, नाहीतर येणार दिवस पुढे ढकलायचा, याशिवाय दुसरा पर्याय नाही..’’
पोराने सातवीनंतर शिक्षण सोडून दिले. तोही तिच्यासोबत शेतात राबतो. मुलगी १८ वर्षांची आहे. शेतात येते किंवा घरचं पाहते. सासू म्हातारी आहे. तिचेही करावे लागते. ‘‘किसोरभाऊनंच मदत केल्ली बाकी कोनी नाय.. स्टेट बँकेचे कर्ज फिटलेले नाही. सरकारच्या मदतीची अजूनही प्रतीक्षा आहे. तुम्हीच मदत द्या..’’ तिचे शब्द कानात रुतून बसले.

खेळ आशानिराशेचा
पडापासून साधारण पाचसहा किलोमीटर अंतरावर साखरा गावातील इंदू आष्टेकर. हीसुद्धा एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची विधवा. आर्थिक प्रश्नाने त्यांचं कंबरडं आधीच मोडलंय, त्यातच तिच्या हृदयात ब्लॉक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने पूर्णच मोडून गेल्यात.
त्यांचे पती गजेंद्र यांनी अलीकडे म्हणजे २०१० साली आत्महत्या केली. सावकारी पाशात पुरत्या फसलेल्या गजेंद्र आष्टेकर यांना दुसरा मार्गच दिसला नाही. घरापासून दूर असलेल्या करंजी गावात स्वत:ला संपवून टाकले. साडेनऊ एकर शेती असल्याने सरकारी मदत मिळाली नाही. कर्जाच्या वसुलीसाठी कोर्ट केस झाली. वकिलाची फी देता देता कुटुंब खचले. पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा यांच्यासमोर पुढचं सगळं आयुष्य प्रश्नचिन्ह घेऊन उभे आहे. इंदूबाईंनीच शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली. घराचा गाडा खेचण्यासाठी दुसरा पर्यायच नव्हता.
पतीने घेतलेले कर्ज थकीत आहेच. दोन मुलींपैकी एकीचे लग्न लावून दिले. पण ती आता घरीच आहे आणि शिलाई मशीन चालविते. एकीचे लग्न करायचे आहे. मुलाने बारावीनंतर शिक्षण सोडले आणि तोही मदतीला आला आहे. पाच जणांचे कुटुंब पोसण्यासाठी लागणारा खर्च शेतीतून निघत नाही. पैसा ओतावा लागतो आणि नंतर पावसाचा खेळ बघत आशानिराशेचे झोके घेत राहायचे. कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. कर्जाच्या पुनर्वसनाची योजनाही फायद्याची नाही. आधी हप्ते भरा, असे सांगितले जात आहे. सरकारी कार्यालयांचे खेटे घालून कुटुंब थकले आहे. त्यातच मध्यंतरी प्रकृती बिघडल्याने इंदूबाईंची इस्पितळात तपासणी केली तेव्हा दुसऱ्यांदा आकाश कोसळले. डॉक्टरांनी हृदयाला ८०-९० टक्के ब्लॉकेजेस असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे इंदूबाई पुरत्या खचल्या आहेत. खंगून गेलेल्या इंदूबाईची हालत बघवत नाही. पती निधनानंतर दिवस कसे निघाले हेच समजत नाही. आता सारे आहे ते शेतीच्या भरवशावर. पाऊस पडला तर पऱ्हाटी, तूर निघून विकता येईल. ‘‘पान्याकडे आशेनेच पाह्य़तो, पाह्य़ने भागच आहे. यंदाच्या पावसाने जमीन चिवडली. आता बियाणांच्या खरेदीचा प्रश्न आहे. सावकारच मदत करते जी, या बँका-फँका काय बी कामाच्या न्हायीत,’’ शून्यात नजर लावलेल्या इंदूबाईचे उद्गार हृदयाला घरे पाडून गेले..