रेश्मा भुजबळ
मणिपूरमध्ये वापरला जाणारा ‘पोटलोई’ हा नववधूचा पोशाख तेथील एक वैशिष्टय़पूर्ण प्रादेशिक नमुना आहे. हा पोशाख बनवणाऱ्या ‘फॅशन डिझायनर’ आजींना, राधे देवींना या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पारंपरिक प्रथेला कलेचा मिळवून दिलेला दर्जा आणि खडतर परिस्थितीतही कला शिकण्याचा त्यांनी घालून दिलेला आदर्श जाणून घेण्यासारखाच.
‘पद्मश्री’ हंजबम राधे देवी, वय वर्ष फक्त ८८! वृद्धत्वाच्या काही शारीरिक खुणा सोडल्या तर सळसळता उत्साहच त्यांच्या प्रत्येक हालचालीमध्ये जाणवतो. एवढंच नव्हे, तर त्यांच्या भविष्यातल्या योजना म्हणजे त्यांच्या तरुण मनाची साक्षच! त्या नववधूंसाठी लग्नातला खास पारंपरिक पोशाख ‘पोटलोई’ बनवत असल्यामुळेही असेल, पण त्यांची ऊर्जा या वयातही कायम तशीच आहे. म्हणूनच आजही त्या निवृत्त व्हायला तयार नाहीत.
भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांपैकी एक मणिपूर. याच मणिपूरमधील थोबल जिल्ह्य़ातला वांगजिंग सोरोखाईबम लेईकाई भाग हा राधे देवी यांची कर्मभूमी. गेली सहा दशकं त्या प्रसिद्ध पारंपरिक मणिपुरी वधू पोशाख ‘पोटलोई’ बनवतात. आतापर्यंत जवळपास एक हजारांहून अधिक पोशाख त्यांनी तयार केले आहेत. या पोटलोईला त्यांनी कलेचा दर्जा मिळवून दिला आहे. त्यासाठीच त्यांना या वर्षीचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला.
राधे देवींचं बालपण हलाखीतच गेलं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात, त्याप्रमाणे लहानपणापासून त्यांना कपडय़ांच्या विविध डिझाइन्स करायला आवडायचं. मैत्रिणींची वेशभूषा करून देणं त्याचं आवडतं काम. त्या १५ वर्षांच्या असतानाच त्यांचा विवाह हंजबम मणी शर्मा यांच्याशी झाला. लग्नानंतर मात्र त्यांच्या या आवडीला परिस्थितीमुळे मुरड घालावी लागली. रोजच्या जेवणाचीच भ्रांत असल्यानं त्या घरकामात बुडून गेल्या. त्यांचे पती ज्योतिषी होते. त्यांच्या कमाईतून घरखर्चासाठी जेमतेमच पैसे मिळत असल्यामुळे राधे देवी रस्त्याच्या बाजूला स्टॉल लावून खाद्यपदार्थ विकत असत. तो त्यांच्या जीवनातील अतिशय कठीण काळ होता.
राधे देवींना पोटलोई शिकण्याची लहानपणापासून इच्छा होती. त्यांच्या शेजारी राहाणाऱ्या थोनाओजंम प्रियोसखी यांनी पोटलोई तयार करण्यात मदत करण्यासाठी विचारणा केली. राधे देवींना आनंद झाला, मात्र त्यासाठी त्यांना त्यांच्या पतीची परवानगी घ्यावी लागली. पतीचं म्हणणं होतं, की आधीच संपूर्ण दिवस दोन घास मिळवण्यासाठी कष्टात जातो, त्यात पोटलोईसारखी कला शिकण्यासाठी कसा वेळ काढणार? पण राधे देवी त्यांच्या कला शिक्षणात येणाऱ्या सगळ्या अडचणींना तोंड द्यायला तयार होत्या. एकदा त्यांच्या मुलीनं रासलीलामध्ये भाग घेतला होता. त्यासाठी त्यांनी अवघ्या पाच दिवसांमध्ये पोटलोई पोशाख तयार केला. तो लोकांना इतका आवडला की पोटलोई तयार करण्याचा व्यवसाय करता येईल याची खात्री त्यांना पटली आणि त्यांनी तो सुरू केला.
प्रियोसखी यांना त्या ‘इचे’ म्हणजे मोठी बहीण मानत. त्या त्यांच्या पहिल्या गुरू. प्रसिद्ध नर्तक आणि पोटलोई वेशभूषाकार खुराईलाकपम इबोटोन शर्मा यांच्याकडून त्यांनी या विषयातलं सखोल ज्ञान मिळवलं. त्यामुळे त्यांचं काम अधिक सफाईदार झालं. मणिपूरमधील ‘मेईथेई’ हिंदू समाजातील विवाहात वधू पोटलोई पोशाख परिधान करते. या पोशाखाची निर्मिती त्या काळचे राजे महाराज भाग्यचंद्र (१७६९-१७९८) यांनी शास्त्रीय नृत्यासाठी, ‘रासलीला’साठी केली. रासलीलामध्ये गोपिका हा पोशाख परिधान करत. त्यानंतर पोटलोई रासलीलाबरोबरच वधू पोशाख म्हणूनही वापरला जाऊ लागला. पोटलोईमध्ये गोलाकार घागरा, ब्लाऊज आणि ओढणी यांचा समावेश असतो. यातील सर्वात कलाकुसरीचं काम असतं ते घागऱ्यावर. राधे देवींना एक पोटलोई बनवण्यासाठी जवळपास १५ दिवसांहून अधिक कालावधी लागतो. त्या सांगतात, ‘‘घागऱ्याला गोलाकार आणि कडक बनवण्यासाठी तांदळाच्या खळीमध्ये कापड बुडवलं जातं. कापडाचे नऊ स्तर एकमेकांवर ठेवून त्याला गोलाकार आकार येण्यासाठी अनेक दिवस उन्हात सुकवलं जातं. त्यानंतर त्याच्यावर टिकल्या, मणी आणि धाग्यांनी भरतकाम केलं जातं. तांदळाच्या खळीमध्ये ठेवल्यानं कापड खूपच ताठ आणि कडक होतं. त्यामुळे त्यावर कलाकुसर करणं जिकिरीचं आणि कौशल्याचं असतं. अनेकदा त्याच्या कडकपणामुळे सुई तुटून जाते.’’
तांदळाच्या खळीमध्ये कापड कडक करणं ही पारंपरिक पद्धत झाली. सध्या बाजारात मिळणाऱ्या फायबर किंवा इतर साहित्यामुळे हे काम थोडं सोपं झालं आहे, त्यामुळे पोटलोई बनवण्याचा कालावधी थोडा कमी झाला आहे, असं राधे देवी आवर्जून सांगतात. सध्या एका पोटलोईची किंमत १० ते १५ हजार रुपये आहे. अनेकांना ती परवडत नसल्यानं राधे देवींनी भाडय़ानंही पोशाख देण्यास सुरुवात केली आहे. त्या पोटलोईबरोबरच खंबा थोईबी नृत्यासाठीचे पोशाख, पारंपरिक बाहुल्या, देवांची वस्त्रंही त्या तयार करतात. लाई हरौबा (देवाचा उत्सव) या काळात संपूर्ण मणिपूरमधून अनेक जण राधे देवींनी तयार केलेल्या वस्तू घेण्यासाठी येत असतात. मणिपूरमध्ये त्या ‘अबोक राधे’ म्हणजे राधे आजी म्हणून ओळखल्या जातात.
ऐन विशीत असताना त्यांनी ही कला शिकायला सुरुवात केली. वांगजिंग भागात पोटलोई तयार करणाऱ्या त्या आणि प्रियोसखी दोघीच होत्या. त्यात मणिपूरमध्ये अनेक लग्नं रात्री लावली जातात. त्या वेळी वाहतूक व्यवस्था मोठय़ा प्रमाणात नसल्यानं अनेकदा अडचण व्हायची. कित्येकदा लग्नासाठी वधूची वेशभूषा करून येताना रात्र उलटून जायची, त्यामुळे त्यांच्या मुलांना अनेकदा उपाशीच झोपावं लागायचं. शेजारच्या जिल्ह्य़ातून येणाऱ्या ऑर्डर कित्येकदा केवळ वाहतूक व्यवस्था नसल्यानं त्यांना घेता येत नसत. राधे देवींनी आपली कला अनेकांना शिकवली आहे. त्यात त्यांच्या मोठय़ा मुलीचा, इबेना लोंगजम यांचाही समावेश आहे. मात्र, आपली कला अधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांना पोटलोईचं प्रशिक्षण देणारी शाळा (संस्था) सुरू करायची आहे. वयोमानानुसार राधे देवींनी आता काम थांबवावं असं त्यांच्या कुटुंबीयांना वाटतं. त्या मात्र निवृत्ती घ्यायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं आहे, की पोटलोईवर असणारी नक्षी आणि त्यावरील चिन्हं, प्रतीकं ही देवाच्या प्रति प्रार्थना आहे. म्हणूनच मला ती कला पारंपरिक पद्धतीनंच जोपासायची आहे आणि इतरांनाही त्याच पद्धतीनं सोपवायची आहे.
राधे देवींची केवळ आपल्या कलेप्रति बांधिलकी आहे असं नाही, तर त्या सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. महिला सक्षमीकरणासाठी त्या कार्यरत आहेत. तसंच व्यसनमुक्ती आणि महिलांच्या रोजगारासाठीही त्या जनजागृती करतात.
त्यांच्या कलेतून त्यांची कल्पकता दिसते, वेशभूषेतली एक वैशिष्टय़पूर्ण परंपरा जपण्यातली त्यांची तळमळ जाणवते आणि त्यांचा खळाळता उत्साह अनेकांना प्रेरणा देतो.. तो तसाच देत राहो..
reshmavt@gmail.com