विवाह झाल्यावर आपण मुलाची अपेक्षा करत असतो. तेव्हा माहीत नसते की मुलगा होणार की मुलगी होणार. बोस्की होणार हे मला कुठे माहीत होतं? फक्त मी आणि माझा ड्रायव्हर पांडे हय़ा आम्हा दोघांची इच्छा होती की मला मुलगी व्हावी. राखीचे आई-वडील, माझे भाऊ, इतर नातेवाईक सर्व जण मुलाची अपेक्षा करीत होते. आम्ही दोघे एकीकडे आणि इतर आमच्याविरोधात अशी अवस्था होती. पण मुलगी झाली आणि आम्ही जिंकलो. मला मुलगीच पाहिजे होती. माझ्या अंतर्मनात कुठेतरी होतं की, आपल्याला मुलगीच व्हावी. मला वाटत होतं छोटीशी मुलगी असावी, तिनं आपल्याजवळ यावं, मी तिची रिबिन बांधावी. मुलगा झाला तर म्हणेल, ‘बाबा, मी खेळायला जातो.’ राखी नेहमी म्हणत होती की, माझ्या मनात जी मुलाची इमेज आहे ती खराब करू नका. अशी गमतीदार चर्चा आमच्या घरात चालायची. आपला स्वत:चा असा एक अंदाज असतो. माझी आई लहानपणीच वारली. वडिलांनीच माझा सांभाळ केला. लहानपणी माझा भांग वडीलच पाडत होते. आईचा फोटो आमच्या घरात नव्हता. तो काळ तसबिरींचा नव्हता. एक काळी, रिकामी चौकट सतत माझा पाठलाग करते आहे. मला मुलगी व्हावी अशी इच्छा होती याचं कारण माझ्या अंतर्मनात कुठेतरी आईची प्रतिमा दडलेली होती.
मुलगी झाल्यावर मी तिचं नाव बोस्की ठेवलं. राखी म्हणाली, ‘मुलीला कुठे वस्त्राचं नाव ठेवतात का?’ तिला पाहिल्याबरोबर मी तिला बोस्कीच म्हणालो. तलम वस्त्रासारखी सुंदर भासत होती. मुलीचं कुठलं नाव ठेवायचं याची बरीच चर्चा झाली. मी उत्स्फूर्तपणे तिला बोस्की म्हणालो. घरात तेच नाव सगळ्यांच्या ओठांवर आलं. मी बोस्की म्हटल्यावर सगळेच बोस्की म्हणायला लागले. तिचं नामकरण करायचं
सुजान हे नाव ठेवायचं म्हटल्यावर माझ्या घरच्या माणसांची प्रतिक्रिया त्वरित व्यक्त झाली. सुजान हे माझ्या आईचं नाव होतं आणि तेच नाव मी मुलीला देत होतो. आता वाटतं माझ्या अंतर्मनात जे होतं, तेच अप्रत्यक्षरीत्या व्यक्त होत होतं. आईचं नाव कुठे नातीला देतात का म्हणून त्या नावाला घरच्यांचा विरोध झाला. पारंपरिक दृष्टिकोनातून घरातील माणसं नावाचा विचार करीत होती. त्यांनी तसा विचार केला नसता तर बोस्कीचं नाव सुजानच झालं असतं. पण तसं झालं नाही. राखीनं मेघना नाव सुचवलं. राखीचा ज्या गावी जन्म झाला त्या सागरकिनाऱ्याचं नाव मेघना होतं. राखीनं मेघना नावाच्या पाठीमागे आपल्या जन्मगावाचा जो नातेसंबंध जोडला तो मला खूप चांगला वाटला. राखीचं जन्मगाव बंगालमध्ये आहे. माझं जन्मगाव पाकिस्तानात आहे. कधी विनोदानं आम्ही म्हणत असतो, बोस्कीच भारतीय आहे. बंगाल, पाकिस्तान आणि भारत असे आम्ही सगळे एका घरात राहतो.
मूल जेव्हा बोलायला लागतं, त्याचा शोध घेणं मोठी मजेशीर गोष्ट आहे. मूल जेव्हा ‘ऑ’ म्हणायला लागतं तेव्हा वाटतं, त्याच्या ओठांवर आईचंच नाव आहे. मूल जेव्हा हाक मारायला लागतं तेव्हा त्यात मोठं थ्रिलिंग असतं. मुलाची होणारी वाढ पाहणं मोठी आनंदाची गोष्ट आहे. मुलाच्या होणाऱ्या वाढीवर कुणीच स्क्रीन प्ले लिहू शकत नाही. अवघड गोष्ट आहे. मूल कधी कधी आईचा पदर ओढतं, मुलाला पदर आवडतो की, पदराचा लाल रंग आवडतो सांगणं मोठं कठीण आहे. त्याचा मनोव्यापार सांगणं कठीण आहे. मूल पहिल्यांदा चालायला लागतं. पहिल्यांदा शब्द उच्चारला ते सगळं मोठं आनंददायी असतं. ते सतत डोळ्यासमोर उभं असतं.
मूल पहिल्यांदा शाळेत जातं तो मुलाचा पहिला अनुभव असतो. आई-वडिलांपासून वेगळं होण्याचा. मुलाच्या वाढीबरोबरच आपलीही वाढ होत असते. आपणही शिकत असतो. मूल दोन वर्षांचं असेल तर तुम्हीही दोन वर्षांचे असता. तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे असू शकत नाही. तुमचीही वाढ त्याच्याबरोबर होत असताना तुम्हीही त्याच्याच वयाचे असता. मुलाचं शिकवणं सुरू होत नाही. मुलांबरोबर आपलंही शिक्षण सुरू होत असतं.
ज्या हॉस्पिटलमध्ये बोस्कीचा जन्म झाला तिथले डॉक्टर कामा आणि डॉ. गोखले यांनी ज्या पद्धतीनं बोस्कीला कपडे घालायला शिकवलं, ती मोठी मजेदार गोष्ट आहे. त्या लहानशा बाळाला कपडे घालताना भीती वाटत असते. आपला हात त्याला लागू नये, आपणच मनातल्या मनात आपल्या हाताला जखमी करत
मुलीचा शाळेतला पहिला दिवस जेवढा महत्त्वाचा असतो, तेवढाच महत्त्वाचा तो दिवस आई-वडिलांचाही असतो. आमच्या घराजवळ शाळा होती. राखी त्या काळात खूप बिझी होती. मी तेवढा बिझी नव्हतो. फ्रीलान्स करीत होतो. मला वेळ होता. मी तिला शाळेत घेऊन गेलो. पण तिला ती शाळा आवडली नाही. परिसरातल्या अनेक शाळांमधून मी तिला नेलं. पण कुठल्याच शाळेत ती रमली नाही. एके दिवशी सकाळीच तिला मी खारच्या शाळेत घेऊन गेलो. ती गेल्याबरोबरच तिथे रमली. मुलांबरोबर खेळायला लागली. तिला ती शाळा आवडली. त्या शाळेतच तिचं नाव घातलं. अनेक शाळांमधून तिला नेलं, हा माझ्या दृष्टीनं माझा वेगळा अनुभव होता. मोठय़ा शाळेत नाव घालताना मी आणि राखी- आम्ही बरोबर गेलो. राखीचा तो काळ खूप वेगळा होता. खूप लांब लांब शूटिंगला जावं लागे. जेढी नावाची आया होती. तिनं दहा-बारा र्वष तिची काळजी घेतली. एका गोष्टीचा मला आनंद आहे की, प्रारंभापासून ते कॉलेजपर्यंत तिला कधीही शिकवणीची गरज लागली नाही. ती स्वत:च सगळं शिकत होती. मी तिला कधीच सांगितलं नाही की वर्गात तू पहिली आली पाहिजेस. मी तिला एवढंच सांगितलं, खेळात- संगीतात तुला आवडेल त्या कुठल्याही गोष्टीत तू आनंद घेत जा. तिनं संगीतात, अभ्यासात, खेळात रस घेतला. शाळेच्या नाटकात वगैरे भाग घेतला. ही तिची नैसर्गिक वाढ होती. तिच्या खारावाला नावाच्या प्राचार्या होत्या. मी त्यांना मानतो. मुलांच्या नैसर्गिक वाढीला त्यांनी महत्त्व दिलं. मुलांची स्वत:ची एक कल्पनाशक्ती असते. तिला आपण वाव दिला पाहिजे.
बोस्कीची लहानपणी वेणी घालत असताना मी म्हणायचो, आपण दोघे मिळून तुझी वेणी घालूया. तू मला शिकव कशी वेणी घालतात ते.
मी तिच्याजवळ बसायचो. ती म्हणायची, बाबा, तुम्हाला वेणी घालता येत नाही. तुम्ही कंगवा नुसता इकडेतिकडे फिरवता. माझं बालपण मी पुन्हा अनुभवायचो.
बोस्कीवर मी अनेक कविता लिहिल्या. तिच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी मी तिला एक पुस्तक अर्पण केलं आहे. पुस्तक समजण्याचं तिचं वय नव्हतं. पण पुस्तकाचं मुखपृष्ठ, आतील चित्रं पाहून तिला आनंद व्हायचा. तिच्या निमित्तानं लहान मुलांसाठी माझ्याकडून पुस्तकं लिहून झाली. बोस्कीसाठी मी पहिलं गाणं लिहिलं.
बिंदूरानी बोस्की
बूँद गिरी है औस की
तिच्यावर लिहिलेल्या सगळ्याच कविता माझ्या ओठांवर असतात. मुलांसाठी लिहिणं खूप कठीण गोष्ट आहे. प्रत्येक वर्षी तिच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक लिहीत असताना तिच्या वयाचा वयोगट डोळ्यांसमोर ठेवूनच मी पुस्तकं लिहिली. कधी पंचतंत्रातल्या गोष्टींचा वेगळ्या पद्धतीनं उपयोग केला. तेराव्या वर्षांपर्यंत मी तिच्यासाठी पुस्तकं लिहिली. मी माझ्या आवडीनिवडीही तिच्यावर कधी लादल्या नाहीत. तिला तिच्या पद्धतीनं वागू दिलं. अनेक गोष्टींची, विषयांची माहिती मी तिला सांगत गेलो. पण अमुकच एक गोष्ट तू कर, असं सांगितलं नाही. मुलं सभोवतालचं वातावरण पाहून विकसित होत असतात. स्वत: घडत असतात.
ती कॉलेजमध्ये गेल्यावर तू हाच विषय घे, असं मी तिला सांगितलं नाही. तिनं तिच्या आवडीप्रमाणं विषय निवडले. अभ्यास केला. ती घडत असताना मी तिच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न केला. तिला समजून घेण्यासाठी मीही अनेक गोष्टी शिकत गेलो. मुलं आणि आईवडील बरोबरच वाढत असतात. एकमेकांकडून शिकत असतात. विचारांची देवाणघेवाण करत असतात. आपण मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न केला की मुलंही आपल्याला समजून घेत असतात. मुलं आपल्यापेक्षाही पुढं जात असतात. वडील वकील असले तर मुलाला वकील करतात, हे बरोबर नाही. मुलाला जे व्हावंसं वाटत असेल तसं त्याला होऊ द्या. एखाद्या डॉक्टरच्या मुलाला इंजिनीअर व्हायचं असेल तर त्यानं इंजिनीअर व्हावं. आई-वडील जे करतात ते त्यानं केलं पाहिजेच असं नाही. मुलाच्या आवडीनिवडी आई-वडिलांशी जुळत असतीलच असं नाही. मुलांना त्यांचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. मुलांच्या वाढीत सहभागी व्हावं, त्यांना समजून सांगावं, पण आपलं व्यक्तिमत्त्व त्यांच्यावर लादण्यात काही अर्थ नसतो. मुलं तसं बोलून दाखवत नाहीत, पण नंतर कंटाळतात.
एक गोष्ट सहज आठवते. बोस्कीला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता. तेव्हा राखीला वाटे की आपण जिथे राहतो त्या परिसरातल्या कॉलेजमध्येच बोस्कीनं शिकावं. तिनं लांब जाऊ नये. जवळच असावं. मला वाटत होतं, जवळच्याच कॉलेजमध्ये तिनं शिकलं पाहिजे, असं नाही. तिनं लांब गेलं तरी हरकत नाही. हे सर्व राखीला समजून सांगताना मला बरेच कष्ट पडले. शेवटी राखीला मी गमतीनं म्हणालो, ‘तू काही तिच्याबरोबर वर्गात बसू शकणार नाहीस. ती एकटीच तिच्या वर्गात बसणार आहे. तेव्हा तिला तिचं कॉलेज निवडू दे. आपला आग्रह नको.’ लहानपणापासूनच आम्ही दोघांनी बोस्कीला कधी गाडीतून शाळेत सोडलं नाही. बोस्की कधी शाळेत रिक्षानं जायची, बसनं जायची. कधीतरी आम्ही तिला प्रेमानं गाडीतून सोडलं. पण तिनं कधी हट्ट धरला नाही. ती स्वत:च्या शाळेत मैत्रिणीबरोबर जायची. मुलांविषयी आपल्याला जी भीती वाटत असते ती व्यर्थ असते. शाळेत एकटं जाताना मुलांमध्येही आत्मविश्वास वाढीस लागतो. कॉलेजला जातानासुद्धा बोस्की ट्रेननं जायची. तिच्यात लहानपणापासून एक आत्मविश्वास निर्माण झाला. मुलांना स्वतंत्रपणे वागण्याची जी इच्छा असते, त्याप्रमाणं वागू द्यावं. त्यांचे ते मित्र निवडत असतात. आजूबाजूच्या मुलांबरोबर चर्चा करत असतात. शिक्षण पुस्तकापासून मिळत नाही. पुस्तकं तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. शिक्षण तुम्हाला आयुष्यातून मिळत असतं. बोस्की सेंट झेवियर्स कॉलेजला जाताना घरापासून रिक्षानं स्टेशनपर्यंत जायची. तिथून लोकलनं मरिन लाइन्सपर्यंत जायची. तिथून पुढं बस पकडून कॉलेजला जायची. हे सगळं करीत असताना तिला आजूबाजूच्या जगण्यातून जे शिकायला मिळालं, ते फार महत्त्वाचं होतं. बोस्कीला मी कधी अभ्यासाचं ओझं जाणवू दिलं नाही. तिच्याजवळ कधी बसलो नाही. तिनं कधी शंका विचारली तर तिच्या शंकेचं निरसन केलं. मी तिला स्वत:चं स्वत:ला शिकू दिलं. मी शिकवण्याचा प्रयत्न केला नाही. जिथं मला आणि तिलाही मार्गदर्शनाची आवश्यकता वाटली तिथं वेळोवेळी मार्गदर्शन केलं. मुलांच्या मागे सतत पळत राहणं बरोबर नाही. आई-वडिलांची ही चुकीची पद्धत आहे. तिचे वेगवेगळे छंद जोपासण्याचा मी प्रयत्न केला. तिला पोहण्याची आवड होती. मी तिला पोहणं शिकवलं. ती पोहायला शिकली. मी पाण्यात बुडायचं शिकलो.
मुलं अशा वयात असतात की त्यांना होही म्हणता येत नाही, नाहीही म्हणता येत नाही. आई-वडिलांच्या दृष्टीने तो कठीण काळ असतो. आई-वडिलांची परीक्षाच असते. खेळणं देऊन मन रमविण्याचे त्यांचे दिवस संपलेले असतात. अशा वेळेस मुलं रुसतात. दोन-तीन दिवस मुलं आपल्याशी बोलली नाही तर आई-वडील अस्वस्थ होतात. अशाच एका क्षणी मी कविता लिहिली.
नाराज है मुझसे बोस्की शायद
जिस्म का इक अंग चूप चूप सा है
सुजे से लगते है पांव
सोच में एक भवर की आँख है
घूम घूम कर देख रही है
बोस्की, सूरज का तुकडा है
मेरे खून में रात और दिन घुलता रहता है
वो क्या जाने, जब वो रुठे
मेरी रगों में खून की गर्दिश मग्दम पडने लगती है
बोस्कीचं लहानपण माझ्या डोळ्यांसमोर उभं आहे. अनेक घटना मला आठवत असतात. राखी टिपिकल बंगाली आहे. बंगाली कविता राखीच्या व्यक्तिमत्त्वात आहे. ती बोस्कीला अनेक कविता सांगायची. एक कविता मला आठवते. राखी बोस्कीला गॅलरीत घेऊन जायची आणि सांगायची, चंदामामा माझ्या कपाळावर तू टिकली लावून जा. बोस्कीला गंमत वाटायची. चंदामामाला पहिल्यांदा मामा कुणी बनवलं कुणास ठाऊक. एके दिवशी बोस्की एकटीच गॅलीत गेली. तिला चंद्र ढगाआड होताना दिसला. ती आईला म्हणाली, आई, चंदामामा लपून बसला आहे. मला मोठी गमतीशीर गोष्ट वाटली.
ती परदेशात शिकायला गेली. तिथं अनेक र्वष राहिली. पण तिला कधी वाटलं नाही की आपण परदेशात जाऊन राहावं. तिच्या मनाची सांस्कृतिक वाढ इथल्या मातीत, इथल्या उत्सवात, इथल्या शिक्षणात झाली आहे. ती जग फिरून आली तरी या मातीतच तिचं मन रमणार. इथली होळी, इथली दुर्गापूजा तिला आपलीशी वाटणार. ती अजूनही होळी खेळते. दुर्गापूजेच्या कार्यक्रमात भाग घेते. होळी खेळतानाचे तिचं लहानपणाचे अनेक फोटो आहेत. तिनं कॉलेजलाही समाजशास्त्र हाच विषय घेतला. इथला समाज, इथली माणसं समजून घेण्यात तिला रस आहे. आमच्या पिढीपेक्षा नव्या पिढीला समाजशास्त्र अधिक कळते. मी आणि राखीनं बोस्कीला एकत्र वाढविलं. तिला तिच्या गोष्टीत प्रोत्साहन दिलं. तिनं तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवलं. तिला आम्ही हातभार लावला.
बोस्की
वक्त को आते ना जाते ना गुजरते देखा
ना उतरते हुए देखा कभी इलहाम की सूरत,
जमा होते हुए एक जगह मगर देखा है
शायद आया था वो ख्वाबों से दबे पाँव ही
और जब आया ख्यालों को भी एहसास ना था
आँख का रंग जुलू होत हुए देखा जिस दिन
मैंने चूमा था मगर वक्त को पहचाना ना था,
चंद तुतलाए हुए बोलो में आहट भी सुनी,
दूध का दाँत गिरा था तो वहाँ भी देखा,
बोस्की बेटी मेरी, चिकनी सी रेशम की लडम्ी
लिपटी-लिपटाई हुई रेशमी तागों में पडी थी
मुझको एहसास नहीं था कि वहाँ वक्त पडा है
पालना खोलने जब मैंने उतारा था उसे बिस्तर पर
लोरी के बोलों से इक बार धुआ था सबको,
बढते नाखूनों में हर बार तराशा भी था
चुडियाँ चढती उतरती थी, कलाई पे मुसलसल
और हातों से उतरती कभी चढती थी किताबें
मुझको मालूम नही था कि वहाँ वक्त लिखा है
वक्त को आते ना जाते गुजरते देखा
जमा होते हुए देखा मगर उसको मैंने
इस बरस बोस्की अठरह बरस की होगी।
राखी, मी आणि बोस्की आम्ही तिघे बरोबरच आयुष्य जगलो. अंतर जाणवलं नाही. बोस्कीच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही दोघांनी मिळून सहभाग घेतला.
माझा ‘राबीपार’ हा कथासंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला. ते पुस्तक मी राखीला अर्पण केलं आहे. अर्पणपत्रिकेत लिहिलं आहे-
For Raakhee the-longest short story of my life.
‘पुखराज’ हा माझा अलीकडचा कवितासंग्रह मी बोस्कीला अर्पण केला आहे.
अर्पणपत्रिकेत लिहिले आहे-
बोस्की बिटिया,
कुछ ख्वाबों के खत इन में,
कुछ चाँद के आयनें,
सूरज की शुआएं है,
नज्मों के लिफाफों में कुछ मेरे तजुर्बे है
कुछ मेरी दुवाएं है
निकलोगे सफर पे जब ये साथ में रख लेना,
शायद कही काम आएं
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा