ही गोष्ट आहे माझ्या एका सुशिक्षित जिवलग मित्राची आणि त्याच्या सौम्य डाऊन सिन्ड्रोम असलेल्या तीन मुलांची! समाजाकडून करुणा आणि उपेक्षा यांचीच अपेक्षा असणारी ही मुले आज थोडी हतबल आहेत. इतरांसारखं ‘फादर्स डे’च्या दिवशी त्यांना त्यांच्या वडिलांचे ऋण मार्गदर्शकाशिवाय व्यक्त करता येत नाही, पण आजूबाजूचे लोक, नातेवाईक यांनी या तीनही मुलांना आता कुटुंबाचा महत्त्वाचा घटक म्हणून स्वीकारले आहे आणि हे सर्व शक्य झाले ते माझ्या मित्राच्या गेली ४० वर्षे सुरू असलेल्या अथक प्रयत्नांमुळेच!
भाऊ (रामकृष्ण मरतडेय) हा माझा बालपणचा मित्र. मराठवाडय़ातील एका लहानशा गावात आमचे घराशेजारी घर. अतिशय बुद्धिमान असलेला माझा हा मित्र उच्च शिक्षणासाठी अभियांत्रिकीकडे वळला. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षांला असतानाच त्याचे लग्न ठरले. आम्हा सर्वासाठी तो आश्चर्याचा धक्काच होता. आणि खरेच त्याचे लग्न अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांची परीक्षा देण्याअगोदरच झाले. दोन्हीही कुटुंबांनी ठरवून केलेला हा विवाह. तो काळ होता, १९७०चा. वहिनींच्याकडे पाहिल्यावर मला तो बालविवाह आहे की काय अशीच शंका वाटली. मित्राच्या या आनंदाच्या डोहात पुढे दु:खाचे अश्रू पडतील आणि त्याचा मी
त्यांच्या या उपक्रमात त्यास मुलीचे बरोबरीने सहकार्य मिळाले. भाऊचे घर म्हणचे एक शाळाच वाटे. भिंतीवर लटकवलेले चार्ट, पाटी-पेन्सिल, रंगीत खडू, फळा, वैज्ञानिक खेळणी आणि त्याची शिकवण्याची सोपी पद्धत. याचा परिणाम मुलांच्या बौद्धिक वाढीवर दिसू लागला. कार्यालयातून थकून घरी आल्यावरसुद्धा तो नेहमीच शिक्षकाच्या भूमिकेत जात असे, फरक एवढाच की या शाळेतील मुले त्याची स्वत:ची होती. एके दिवशी मी असाच त्याच्या घरी गेलो असताना त्याची दोन मुले समोरच्या गॅलरीमधील फुलझाडांच्या कुंडय़ांकडे पाहून माझ्याशी बोलू लागली. माझ्या दृष्टीने हा त्यांच्यामधील प्रगतीचा, विशिष्ट गुणाचा ‘स्पार्क’ होता. भाऊशी चर्चा केल्यानंतर मुलांना कुंडीत रोप कसे लावायचे, ते कसे वाढवायचे हे शिकवण्याचे भाऊने ठरविले आणि मुलांच्या शिक्षणास वेगळी दिशा मिळाली आणि यामधूनच त्याच्या गॅलरीत ४०-५० फुलझाडांच्या कुंडय़ा जमा झाल्या. सोबत छोटासा गांडूळ खत प्रकल्पसुद्धा! घरी येणाऱ्या प्रत्येकास ही गॅलरीमधील हसरी बाग आणि घरच्याच निर्माल्य आणि भाजीच्या केरकचऱ्यापासून निर्माण केलेले खत दाखविण्यामध्ये मुले आघाडीवर राहू लागली. याचेसुद्धा श्रेय भाऊलाच! एवढय़ा मोठय़ा उच्च पदावरील माझ्या मित्राने आपल्या मुलांमधील बागकामाचा हा ‘स्पार्क’ पाहून हाताखालच्या ठेकेदारास त्यांना बागेत काम देण्याची विनंती केली. मुले बागेत झाडांना पाणी घालू लागली. खत देऊन रोपांची काळजी घेऊ लागली आणि या नावीन्यपूर्ण कल्पनेमधून एका सुंदर बागेची निर्मिती झाली. मुलांच्या प्रयत्नांनी, ठेकेदाराच्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झाले. भाऊस आनंद झाला आणि त्याचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. त्याच्या मोठय़ा मुलाने त्यास मिळालेल्या अल्प पगाराचे पैसे जेव्हा मला दाखवले तेव्हा त्याच्यापुढे पाच आकडी पगार मिळवूनही मी कफल्लक आहे, असे मला वाटले. माझ्या मित्राच्या कष्टाचे ते फळ होते.
मध्यंतरीच्या काळात मुलांची प्रगती सुरू असतानाच भाऊची लाडकी कन्या त्यास सोडून कायमची निघून गेली. अवघे २३ वर्षे वय! आपले लग्न, त्या पश्चात वडील आणि भावांची काळजी, त्यांच्यावरील तिचे प्रेम यामुळे ती कायम बेचैन असे, मात्र वरून ती आनंदी असल्याचेच भासवित असे. अरबी समुद्र आणि त्याच्या उसळत्या लाटा तिला एवढय़ा प्रिय का झाल्या? याचे उत्तर भाऊ अजूनही एकांतात भरल्या डोळय़ांनी शोधतो आहे! स्मशानभूमीत प्रथमच भाऊच्या डोळय़ांतील अनिवार अश्रू मी पाहिले. आता तो पूर्ण एकाकी झाला होता आणि या एकांतातूनच त्यानं राखेतील फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली. माझ्या तिन्ही मुलांना घडवायचं आहे, त्यांना त्यांच्या पायावर उभे करावयाचे आहे, या एका ध्येयानेच या जगावेगळ्या वडिलांना अक्षरश: पछाडले. त्याच्यापुढे आता एकच ध्येय होते, मुलांना त्यांच्या पायावर उभं करायचेच..
सेवानिवृत्त झाल्यानंतर २००७ मध्ये मुंबई सोडून तो पत्नी आणि त्याच्या तिन्ही मुलांसह कायमस्वरूपी गावी वास्तव्यास गेला. आणि एकेक प्रयोग सुरू झाले. आपल्या या तीनही मुलांच्या मदतीने भाऊने विविध प्रकारचे आंबे, चिंचा, आवळे, जांभूळ, पेरू, डाळिंब अशी फळबाग विकसित केली. आज तो गावातील एक प्रगतिशील शेतकरी आहे. विविध पिके, गांडूळ खत प्रकल्प, गायीचा गोठा, घरचे दूध, फुलबाग, ताजा भाजीपाला हे सर्व त्याने त्याला मुलांमध्ये सापडलेल्या स्पार्कमधून निर्माण केले. आजही तो दररोज सकाळी मुलांना घेऊन शेतावर जातो, तेही रविवारची सुट्टी न घेता. वडील या नात्याने त्याने त्याच्या तिन्ही बौद्धिक अंपग मुलांवर मनापासून प्रेम केले, त्यांना घडवले, वाढवले, समाजात, मित्रमंडळींत, पाहुणे, नातेवाईक यांच्यामध्ये प्रोत्साहित केले. घरामध्ये सणवार, उत्सव साजरा करून त्यात त्यांचा सहभाग वाढवला. अशी मुले घरात असल्यावर आई-वडील मुलांना घरातच राहण्यास आग्रह धरतात. भाऊने त्यांना समाजात मिसळू दिले. व्यवहारिक ज्ञान, बाजारातून मोजक्या वस्तू आणणे, निटनेटकेपणा, स्वच्छता, टापटीप, हसतमुख चेहरा, येणाऱ्यांचे स्वागत यामध्ये मुले कधीही कमी पडत नव्हती आणि अजूनही नाहीत. मुलांचे आरोग्य आणि त्यांच्या नियमित औषध उपचारांसाठी भाऊनं नेहमीच प्राधान्य दिलं.
मुलांचे वडीलपण करताना, मुलांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या मामांची आणि आजोळची खूप मदत झाली. मुलांना ग्रामीण भागाची आवड व शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यामध्ये मामांचा वाटा मोठा होता. ‘डाऊन’च्या मुलाची जबाबदारी आईवर ढकलून तिलाच त्यांचे सर्व करावयास लावणारे वडीलही मी या समाजात पाहिले आहेत. भाऊ मात्र स्वत: आईच्या भूमिकेत गेला. तीच ममता, तेच प्रेम, सोबत वडील या नात्याने थोडा धाक आणि शिस्त यामुळे मुले घडत गेली. आजही ‘डाऊन’च्या मुलांना त्यांच्या विशेष शाळेत पाठवून रुमालाने अश्रू टिपणारे आईवडील मी पाहतो. प्रश्न प्रेमाचा अथवा अश्रूंचा नाही. या ‘सौम्य डाऊन’च्या मुलांना घरीच योग्य शिक्षण देऊन त्यांच्यातील ‘स्पार्क’ शोधणे जास्त महत्त्वाचे आहे आणि माझा मित्र वडील या नात्याने त्यात पूर्ण यशस्वी झाला.
माझा मित्र जगावेगळा ठरला आहे. मुलांकडून कसलीही अपेक्षा न बाळगता, केवळ माझ्या मुलांकडे कुणी बोट दाखवून त्यांना कमी लेखू नये म्हणून धडपडणारा! दु:खाचे डोंगर झेलणारा! तरीही पत्नी आणि मुलासह आनंदात राहणार! हा माझा जिवलग मित्र आज मला मित्रत्वाच्या नात्यापेक्षाही तीन मुलांना यशस्वीपणे घडवणारा वडील म्हणून जास्त प्रिय आहे. ‘यलो’हा तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या सत्यघटनेवरील मराठी चित्रपटात ‘सौम्य डाऊन’ची गौरी गाडगीळ, तिला घडवणारी तिची आई आणि तिच्यामध्ये पोहण्याच्या कलेमधील ‘स्पार्क’ शोधणारा ‘कोच’ हे सर्व पाहताना मला हा माझा मित्र व त्याची ही तीन मुले आठवून माझ्या डोळय़ांतील पाणी थांबत नव्हते. चित्रपटात आई आणि कोचने गौरीस घडवले. वडील मात्र बरोबरीचे वाटेकरी असूनही पळपुटे ठरले.
माझा मित्र पळपुटा ठरला नाही. तिन्ही मुलांसाठी आई तोच, वडील तोच आणि कोचसुद्धा तोच होता. ‘फादर्स डे’चा खरा अर्थ मला माझ्या या मित्राकडून समजला…
संग्रहित लेख, दिनांक 14th Jun 2014 रोजी प्रकाशित
‘फादर्स डे स्पेशल : फिटे.. नैराश्य कृष्णमेघी
रामचंद्र मार्कंडेय आणि समाजाकडून करुणा व उपेक्षा यांचीच अपेक्षा असणारी त्यांची एका मागोमाग झालेली तीन सौम्य डाऊन सिन्ड्रोमची मुलं, त्यातच आधार ठरलेल्या मुलीचं आकस्मिक निधन, या
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-06-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fathers day special story of a father ramakrishna markandey