छोटंसं बाळ आईच्या मऊ मऊ स्पर्शाने जेवढं सुखावतं, तेवढेच बाबाच्या स्नायूमय शरीरावर विसावतं. बाबाची संध्याकाळी वाढलेली दाढी, बळकट हातावरची लव बाळाला स्पर्शसंवेदनाची वेगळी ओळख देऊन जाते. डॉक्टरकडे इंजेक्शन घेताना चळवळ करणाऱ्या बाळाला घट्ट पकडून ठेवणं बाबाला जसं जमतं, तसं आईला जमेलच असं नाही. खर्जातल्या आवाजात बाळाला छातीशी धरून बाबा गाणं म्हणतो, त्या वेळी बाळापर्यंत पोचतात ती केवळ ध्वनीची कंपनं नव्हेत, तर विश्रब्ध करणारी बाबाची मायासुद्धा. बाबांनी या संधीचं सोनं करायलाच हवं..
क बूल आहे की गर्भारपण, बाळंतपण आणि ‘पाजणं’ हे स्त्री आणि फक्त स्त्रीच करू शकते. बाळाला वाढवण्यासाठी आणखी काय काय करावं लागतं त्याकरिता घरातल्या प्रौढ बायका पुढे सरसावतात आणि त्यात पुरुषांना प्रवेश नसतो. एवढंच काय, बाळ-बाळंतिणीजवळ घुटमळणाऱ्या बाबाची सरळ टिंगल केली जाते. पिढय़ान्पिढय़ा हे चालत आलेले आहे.
आताचा काळ मात्र विलक्षण वेगळा आहे. आजची भावी आई-बाबांची जोडी बरोबरच ‘प्रेग्नंट’ होते; डिलिव्हर होते आणि बाळाबरोबर ‘बाँडिंग’ करते. गर्भारशीबरोबर प्रसूतिपूर्व प्रशिक्षण घेणारा, प्रसूतीच्या प्रत्येक टप्प्यावर क्षणोक्षणी तिला साथ देणारा आजचा बाबा या अनमोल काळासाठी पितृत्वाची रजा हक्कानं घेऊ लागलाय. जरुरीच्या वस्तू मिळवण्यासाठी धावपळ करू लागलाय. बाळाच्या संगोपनात बरोबरीनं गुंतून गेलाय.
बाळाच्या दोन्ही आज्या हजर असल्या, तरी आजच्या आईला काही गोष्टी बाबांनीच करायला हव्या आहेत. अगदी नवजात अर्भकाला प्यायला घेताना आईची पाठ दुखू नये म्हणून उशा-तक्के लावणारा, तिला ‘नर्सिग पिलो’ तत्परतेने आणून देणारा आणि बाळाचं पोट भरलं की खांद्यावर टाकून त्याची ढेकर काढणारा बाबा हे दृश्य आता नवीन नाही. बाळाचे ओले कपडे बदलणं, आईला थोडी सलग झोप मिळावी म्हणून मध्यरात्रीचं एक दूध बाळाला बाटलीतून पाजणं, संध्याकाळच्या वेळी किरकिर करणाऱ्या बाळाला कडे-खांद्यावर घेऊन फिरवणं, औषधी थेंब कौशल्यानं बाळाला पाजणं अशी कामंसुद्धा आजचा बाबा आनंदानं करताना दिसतो.
कसा काय झाला हा बदल? शहरं वाढली, स्थलांतरण वाढले, देश बदलले, कुटुंब छोटी होत गेली, लग्नाचं आणि मूल व्हायचं वय इतकं वाढलं की साहजिकच वरची पिढी वयस्कर होत गेली, दगदग करण्याची त्यांची ताकद कमी होत गेली आणि त्याचबरोबर आपल्या बाळाला आपणच वाढवायचं याची असोशीपण आजच्या आई-बाबांमध्ये उत्पन्न झाली.
आजची आई ही २७ ते ३५ वयोगटातली उच्चशिक्षित मुलगी आहे. पतीइतकंच काम करणारी, त्याच्यासारखंच कमावणारी आहे. त्या दोघांचं मिळून एक युनिट आहे. बाळ होऊ द्यायचा निर्णय दोघांनी एकविचारानं घेतलाय. त्या वेळीच हे ठरलं की बाळाला वाढवायची जबाबदारी दोघांची. आणि तुम्ही – अमोल, संदीप, सौरभ, सिद्धार्थ – हे जर तुम्हाला मान्य नसेल, तर मग बहुधा बाबा बनायची वेळ तुमच्यावर येणारच नाही. कारण आजच्या आया तुम्हाला रोखठोक विचारणार- बाळाला वाढवण्यात तुझं काँट्रिब्युशन किती? आणखी खरं सांगू? तुम्ही एका फार समृद्ध करणाऱ्या अनुभवाला मुकताय असं म्हणावं लागेल.
माहीत आहे तुम्हाला? छोटंसं बाळ आईच्या मऊ मऊ स्पर्शाने जेवढं सुखावतं, तेवढेच बाबाच्या स्नायूमय शरीरावर विसावतं. बाबाची संध्याकाळी वाढलेली दाढी, बळकट हातावरची लव बाळाला स्पर्शसंवेदनांची वेगळी ओळख देऊन जाते. डॉक्टरकडे इंजेक्शन घेताना चळवळ करणाऱ्या बाळाला घट्ट पकडून ठेवणं बाबाला जसं जमतं, तसं आईला जमेलच असं नाही. खर्जातल्या आवाजात बाळाला छातीशी धरून बाबा गाणं म्हणतो, त्या वेळी बाळापर्यंत पोचतात ती केवळ ध्वनीची कंपनं नव्हेत, तर विश्रब्ध करणारी बाबाची मायासुद्धा. मात्र हे सगळं सोपं, सुरळीतपणे पार पडतं असं नाही. आधी त्याविषयी खूप विचार झाला असला, तरी प्रत्यक्षात नवजात बाळाचं आगमन होतं, त्या वेळी बाबा गोंधळूनच जातो. त्याला मदत करायची असते, पण कशी ते कळत नाही. त्या वेळी खरं तर आई-बाळाचं नातं रुजत असतं, बाबाचं काम आहे की त्यासाठी पूरक वातावरण घरात निर्माण करणं. घरव्यवस्थेची-परंपरेने गृहिणी करत असलेली कामं उरकणं. स्वयंपाक, स्वच्छता आणि रोज लागणाऱ्या वस्तू हे सगळं स्वत: करावं असं नाही, पण वेळेवर होतंय ना हे नक्की बघावं. दूध पाजताना दमून जाणाऱ्या नव्या आईला व्हिटॅमिन कॅल्शियमच्या गोळ्या, दुधाचा ग्लास, पौष्टिक खाणं वेळोवेळी स्वत: नेऊन द्यावं. आईचा डोळा लागला, ती अंघोळीला गेली, तर त्या वेळी बाळ रडणार नाही अशी काळजी घ्यावी.
पुष्कळ वेळा आजच्या आईला मदत मागताच येत नाही. मी थकलेय, माझी कंबर दुखतेय, भूक लागलीय असं सांगायचा संकोच वाटतो. कारण या कर्तबगार मुलीला आपली वैयक्तिक कामं दुसऱ्याला सांगायची सवयच नाही. तिच्या गरजा ओळखणं हे बाबाचंच काम नाही का? ती काही ‘सुपरमॉम’ नाहीये.
नव्या बाळाला बघायला खूप सारी माणसं येतात- आधी न सांगता, कोणत्याही वेळेला. अशा वेळी आई-बाळाचं खासगीपण जपणं हे बाबा करू शकतो. चांगल्या हेतूनं का असेना, वडीलधारी माणसं कधी परस्परविरोधी सल्ले देतात, त्यामुळे आई गोंधळात पडते, तर कधी दुखावली जाते. अशा लोकांपासून अंतरावर राहण्याचं कामही बाबाचंच आहे आणि बाळाची मोठी ताई, दादा? त्यांचा तर खूपच गोंधळ उडालेला असतो. असुरक्षित वाटत असतं. या मोठय़ांशी खेळणं, त्यांना जेवायला घालणं, बाहेर खेळायला घेऊन जाणं हे बाबा नक्कीच करू शकतो.
थोडं मोठं झालं की बाळाला घराबाहेरचं जग पाहावसं वाटू लागतं. त्याला कॅरियरमध्ये घालून फिरायला नेणारे बाबा आजकाल दिसायला लागलेत. आई जेवायला बसली की नेमकं बाळ कुरकुरणार. आजची आई आणि आजचे बाबा या गोष्टी आळीपाळीने करतात. बाळ वाढवताना आपण एका चाकोरीत अडकलोय ही भावना आईला कधी कधी छळू लागते. तिलाही आपण एकटं फिरायला जावं, व्यायामाला जावं, ब्यूटीपार्लरला भेट द्यावी, मैत्रिणींना भेटावं असं वाटू शकतं. या सर्व गोष्टींसाठी आधीपासून ठरवून बाबा तेवढा अवकाश आईला देऊ शकतो.
मात्र हे करायचं तर त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. बाबाला एखादं काम जमत नाहीये असं दिसलं तर अनेक आया तातडीने धावतात आणि बाळाला ताब्यात घेतात. ‘माझ्यापाशीच चांगला राहतो बाळ’ असा अभिमानही बाळगतात. पण आपल्या आईपणातून थोडी विश्रांती हवी असेल, तर बाबाला या गोष्टी तुम्हीच कशा करायच्या ते दाखवा. बाळाचं पोट भरलंय अशी खात्री असेल तर १५-२० मिनिटे घराजवळ एकटंच चालून या. असं शक्य आहे की अचानक बाळ रडायला लागतं. त्याला शांत करण्याचा प्रयत्न बाबा करतो. या कामात तो यशस्वी होतो की नाही बघा. आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण बाळ आणि बाबा बहुधा अशा संधीचे सोनं करताना दिसतील. अखेर बाबांनी बाळाची काळजी घेणं हे केवळ आईच्या सोयीसाठीच नसतं, तर त्यातून बाळाला मिळणार असतो त्याचा पहिला सच्चा मित्र!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा