भीती आणि न्यूनगंड यामुळे लाजिरवाणा होण्याचा स्वभाव हे ‘अव्हॉइडन्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ या व्यक्तिमत्त्व विकाराचे लक्षण. माणसे हवी तर आहेत, मात्र त्यांच्याशी जुळवून घेऊ शकतो का, हा प्रश्न त्यांना लोकांमध्ये मिसळू देत नाही. लोकांशी संपर्कच नको म्हणून नोकरीतील चांगली संधी सोडणाऱ्या, नवीन नातेसंबंध प्रस्थापित करायला घाबरणाऱ्या लोकांच्या या व्यक्तिमत्त्व विकाराची लक्षणे कोणकोणती आहेत?

व्यक्तिमत्त्व विकारातील वर्गीकरणामध्ये तीन समूह केलेले आहेत. त्यातील ‘क्लस्टर ए’मध्ये विचित्र आणि विक्षिप्त लक्षणांचा समूह आहे. ‘क्लस्टर बी’मध्ये अति नाटकीय, अति भावनिक अशी लक्षणं दिसून येतात. शिवाय या समूहातील व्यक्तिमत्त्व विकार असणाऱ्या व्यक्तींचं वर्तन नेहमीच अनिश्चित असं असतं. मागच्या काही लेखांमध्ये या दोन्ही समूहांतील विकार आपण समजावून घेतले. आता आपण तिसरा विभाग समजावून घेऊया.

‘क्लस्टर सी’मधील व्यक्तींमध्ये प्रामुख्यानं ‘भीती वाटणं’ आणि ‘चिंताक्रांत वर्तन’ ही लक्षणे दिसून येतात. खरं तर भीती अगदी लहानपणापासून केव्हा ना केव्हा तरी अनुभवावी लागणारी भावना आहे, आणि सामान्यत: ती अनेक भावनांपैकी एक असते. या व्यक्तिमत्त्व विकारामध्ये मात्र भीती हीच प्रमुख भावना होऊन जाते. पाठीवर पान पडल्यावर आकाश पडलं, असं वाटणाऱ्या सशाची गोष्ट आठवा बरं. अचानक पान पाठीवर पडल्यावर दचकणं अगदीच समजू शकतो, पण पानाचं दचकवण्याचं खरं मूल्य विसरून त्याला अवास्तव मोठ्ठं करून स्वत:चं मानसिक स्वास्थ्य बिघडवणं हे निश्चितच धोक्याचं आहे.

तर अशा ‘क्लस्टर सी’मधील तिनांपैकी पहिला प्रकार आहे. ‘अव्हॉइडन्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर(AVPD)’. या व्यक्तिमत्त्व विकाराच्या नावातच ‘टाळणे’ अधोरेखित आहे. काय टाळतात या व्यक्तिमत्त्व विकाराने पीडित माणसे? माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि अशी माणसं समाजात मिसळायलाच घाबरतात आणि त्यामुळेच ते समाजाशी संपर्क टाळतात. हे वाचल्यावर आपल्या मनात पटकन विचार येऊ शकतो की, अरे, असं तर मलाही बऱ्याच वेळा वाटतं. पण असं नुसतं वाटणं आणि व्यक्तिमत्त्व विकार असणं. यात एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे आपल्या वर्तनाचा स्वत:ला किंवा समाजाला धोका असेल तर तो विकार असतो. शिवाय वयाची १८ वर्षं पूर्ण असणं आणि सात लक्षणांपैकी किमान पाच लक्षणं ठळकपणे दिसणं हे निकष तर आहेतच.

सुरेश, ३२ वर्षांचा तरुण एका कंपनीत काम करायचा. अभ्यासात हुशार असल्यामुळे त्याला व्यवस्थापनाच्या पदवीनंतर लगेच नोकरी मिळाली. खरं तर त्याची या विषयातली प्रगती बघून त्याच्या शिक्षकांनी त्याला प्राध्यापक होण्यासाठी सुचवलं होतं. पण त्याला लोकांशी प्रत्यक्ष संपर्क येईल असा कोणताच व्यवसाय निवडायचा नव्हता. त्याला वाटायचं, लोक आपल्याला काही बोलले किंवा त्यांनी आपल्यावर टीका केली तर? त्याला या गोष्टीची इतकी चिंता वाटायची की त्यासाठी त्याने चांगली संधी असलेली आणि त्यासाठी तो पात्र असतानासुद्धा प्राध्यापकाची नोकरी सोडून, तुलनेनं कमी पगार असलेली कंपनीतली नोकरी स्वीकारली होती. या नव्या कंपनीत कार्यालयाच्या एका कोपऱ्यात त्याचं टेबल होतं. जिथं बसून तो इतरांच्या गप्पा, चेष्टा-मस्करी सगळं बघायचा पण प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये सामील व्हायचा प्रयत्न करायचा नाही. त्याच्याच कंपनीत काम करणारा मंदार मात्र उत्साहाचा झरा होता. तो आला की, वातावरणात चैतन्य यायचं. मंदारनेच सुरेशला ‘एकलकोंडा’ नाव दिलं होतं. कार्यालयात सगळेच तरुण असल्यामुळे ट्रेकिंगला जाणं, एकत्र जेवायला जाणं असे बरेच कार्यक्रम ठरायचे, पण सुरेश कुठेही जायचा नाही. त्याला वाटायचं, तिथं गेलं की मंदार त्याला चिडवायला सुरुवात करेल आणि मंदारचं बघून सगळे तसंच करतील. एका बाजूला या विचारांमुळं सुरेश सगळ्यांबरोबर जायचा नाही तर दुसऱ्या बाजूला आपण या सगळ्यांसारखी मजा करावी, सगळ्यांशी मैत्री करावी अशी ओढही त्याला वाटायची. पण रोज त्यांच्यामध्ये सहभागी व्हायचं ठरवूनही त्याला ते जमायचं नाही. त्याची कामातली प्रगती मात्र वाखाणण्याजोगी होती आणि त्यामुळेच त्याला पदोन्नती देऊन मॅनेजर होण्याची संधी दिली गेली होती. पण मॅनेजरला अनेक लोकांशी बोलावं लागेल आणि तिथं आपलं काही चुकलं तर किती लाजिरवाणं ठरेल या विचारानं त्यानं ती संधी नाकारली होती. सुरेशसारख्या या व्यक्तिमत्त्व विकाराच्या व्यक्ती जिथं त्यांच्यावर टीका होऊ शकते किंवा त्यांची चेष्टा होऊ शकते अशा ठिकाणी जाणं टाळतात. मात्र ज्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांच्या गटामध्ये त्यांना, त्यांच्या संवेदनशीलतेला समजावून घेतलं जाईल अशा ठिकाणी ते मोकळेपणानं जातात. अर्थात अशा ठिकाणी जातानाही टीका होण्याच्या भीतीला पूर्णविराम नाही तर केवळ स्वल्पविराम मिळतो. आणि अशा कार्यक्रमात गेल्यानंतर चुकून जरी त्यांच्या मनातली भीती खरी ठरली आणि त्यांना कोणी काही बोललं तर ते कायमस्वरूपी त्या लोकांवर मग ते नातेवाईक असो की मित्र की कामाचं ठिकाण, ते फुली मारून टाकतात. अशा फुल्यांमुळे आयुष्यात कितीतरी गैरसोयी होतात, ते त्यांना चालतं, पण टीका किंवा चेष्टा व्हायची भीती मात्र त्यांना सहन होत नाही.

कामावर या लोकांची काय परिस्थिती होते ते पाहिल्यावर असंही वाटू शकतं की, त्यांच्यात आत्मविश्वास कमी असू शकेल म्हणून बाहेरच्या जगात ते असं सगळ्यांपासून अलिप्त, घाबरणारे आणि चिंताक्रांत असू शकतील. पण दिसायला देखणा, हुशार व्यवस्थित उत्पन्न असणारा सुरेश वयाच्या बत्तिशीपर्यंत जोडीदाराशिवाय राहिला असेल का? आश्चर्य वाटेल पण इतक्या वर्षांत तो कधी कोणत्याही मुलीच्या नातेसंबंधात अडकलेला नव्हता. असं नव्हतं की, त्याला कोणाचं आकर्षणच वाटलं नव्हतं, पण त्या मुलीशी जाऊन बोलणं हे त्याच्यासाठी माऊंट एव्हरेस्टवर चढण्याएवढं अवघड काम होतं. त्याच्याच घराच्या बाजूला स्मिता ही २८ वर्षांची तरुणी राहायची. त्याला स्मिता मनापासून आवडायची. अर्थातच त्यानं हे कोणालाच सांगितलं नव्हतं. त्यानं मनातल्या मनात तिला खूपदा प्रपोज केलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र तो त्या तयारीनं गेला की त्याला घाम फुटायचा, चक्कर यायची, तोंडाला कोरड पडायची आणि मग तो काही न बोलता परत यायचा. त्याला नेहमी वाटायचं की, तो काही तरी चुकीचं बोलला आणि ती हसली तर कायमची नामुष्की ओढवेल. ती नाही म्हणाली तर काय? हेही विचार वरवर बघता साधारणच वाटतात, पण कधी ना कधी या विचारातून बाकीचे लोक बाहेर पडतात, ती ‘हो’ म्हणेल या आशेने मागणी घालतात, पण या व्यक्तिमत्त्व विकाराच्या व्यक्ती मात्र या विचारांना घट्ट चिटकून बसतात. त्यांचं आयुष्यभराचं नुकसान होतंय हे लक्षात आल्यावरसुद्धा ते स्वत:ला या विचारांमधून बाहेर काढू शकत नाहीत. आपण नकार पचवूच शकत नाही हे त्यांच्या मनात खूप पक्क असतं. मुळात या लोकांचा आत्मविश्वास कमी असल्यामुळं आपल्याला नकार मिळायची शक्यता जास्त आहे, असं हे गृहीत धरून चालतात. सुरेशसुद्धा स्मिताशी कधीच आपल्या मनातलं सांगू शकला नाही.

हे फक्त नातेसंबंधांच्या बाबतीतच नाही तर कुठेही गेलं तरी या लोकांना अशीच भीती वाटत राहाते. खरं तर चारचौघांत गेल्यावर प्रत्येकाची वेगवेगळी मतं असणार आणि ते ती बोलूनही दाखवणार. पण ही मतं जर ‘अव्हॉइडन्ट व्यक्तिमत्त्व विकारा’च्या लोकांच्या विरोधी असतील किंवा त्यांच्या मताशी मिळतीजुळती नसतील, तर हे लोक प्रचंड अस्वस्थ होतात. जगाची ही रीत आहे, त्यात सामाजिक माध्यमं तर एखाद्याला डोक्यावर चढवण्यात आणि त्यांना नाकारण्यातही एकदम अग्रेसर असतात. चित्रपट कलाकार, राजकारणी लोक, खेळाडू या सगळ्यांना या नकाराचा सामना करावा लागतो आणि परत जोमानं कामाला लागावं लागतं. त्यांना या नकाराकडं दुर्लक्ष करायला जमवावंच लागतं. सुरेशच्या बाबतीत एकदा असंच झालं. कार्यालयात एका मीटिंगमध्ये त्याच्या बॉसने त्याने केलेल्या कामातली एक चूक सगळ्यांसमोर सांगितली आणि त्याच्याकडून एक प्रोजेक्ट काढून त्याला दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये टाकलं. अशी वागणूक मिळणं हे त्याच्या दृष्टीनं प्रचंड लाजिरवाणं होतं. त्याला त्या कार्यालयात परत पाय ठेवणंसुद्धा इतकं अवघड वाटायला लागलं की, त्यानं तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला. भीती किंवा लाजिरवाणं वाटणं यांचा आयुष्यातल्या काही मोठ्या निर्णयांवर परिणाम करू शकतो.

या व्यक्तिमत्त्व विकाराचं आणखी एक लक्षण म्हणजे हे लोक घरातील किंवा कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या घेणं टाळत राहातात. त्यांच्यातील न्यूनगंड त्यांना या जबाबदाऱ्या घेण्यापासून मागे खेचतात. नवीन लोकांशी जुळवून घेणंही त्यांना प्रचंड अवघड जातं. न्यूनगंड आहे म्हणून लोकांमध्ये जायचं नाही आणि लोकांमध्ये गेलं नाही म्हणून भीतीच्या आणि लाजिरवाणं वाटण्याच्या भावना अधिकच पक्क्या होत जाणं, अशा विचित्र चक्रात हे लोक अडकून पडतात.

शेवटचं जे लक्षण आहे ते म्हणजे नवीन काम सुरू करताना कोणताही धोका न पत्करणं. आपण एखाद्या साहसी खेळात भाग घेताना गृहीत धरतो की, आपल्याला हे जमलं तर आपलं कौतुक होईल किंवा आपल्याला कदाचित जमणारही नाही. पण आनंदासाठी करून तर बघूया. इथं हे लोक नेमकं स्वत:ला असं सांगतात की, ‘हे तुला जमणारच नाही आणि तरीही करायला गेलास तर तुझं हसं होईल’, असा आवाज ‘आतून’ आला की यांनी मिळणारी संधी घालवलीच म्हणून समजायचं.

कित्येकदा ‘सोशल अँक्झायटी डिसऑर्डर (एसएडी)’ आणि ‘अव्हॉइडन्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर ( APAD)’ सारखंच वाटू शकतं. पण प्रत्यक्षात त्यामध्ये फरक आहे. ‘एसएडी’ मध्ये एखाद्या विशिष्ट सामाजिक परिस्थितीची चिंता, भीती वाटते. ‘एपीएडी’मध्ये मात्र सर्वच परिस्थितीत चिंता आणि भीती जाणवते. दोन्ही आजारांमध्ये लोकांच्या टीकेची भीती वाटते पण ‘एसएडी’मध्ये न्यूनगंड असेलच असं नाही, तिथं आत्मसन्मान टिकून असतो. ‘एपीएडी’मध्ये मात्र न्यूनगंड खूप ठळकपणे दिसून येतो. इतर व्यक्तिमत्त्व विकारांप्रमाणेच इथेही ‘सायकोथेरपी’ची चांगली मदत होऊ शकते. शेवटी या व्यक्तिमत्त्व विकाराच्या व्यक्तींनी आपल्या भीतीला एवढंच सांगणं गरजेचं आहे की, ‘मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात हैं, लेकिन हम कोशीशही ना करें ये तो गलत बात है।’

trupti.kulshreshtha@gmail.com

(तळटीप या लेखातील माहितीचा वापर स्वत:च्या किंवा आप्तस्वकीयांच्या निदानासाठी कृपया करू नये. योग्य निदानासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.)